पॅरिसमधल्या मान्यवर संस्थांमध्ये ‘तेआत्र द फ्रान्स’चे नाव घेतले जाई. सेन नदीच्या डाव्या कुशीला, लुक्सांबुर्ग बागेच्या जवळ असलेल्या ओदेयाँ (डीिल्ल) या भव्य इमारतीत तिचा संसार होता. सुप्रसिद्ध नाटय़- दिग्दर्शक जां लुई बारो आणि त्याची पत्नी सुविख्यात नटी मादलेन रेनो हे दोघे ती संस्था चालवीत. ओदेयाँचे मुख्य प्रेक्षागृह खरोखरच प्रेक्षणीय होते. जुन्या धर्तीच्या लाल मखमली खुच्र्या, छोटय़ा छोटय़ा बाल्कन्या, भिंतीवर सुबक नक्षीकाम केलेले आणि पायतळी गालिचा असा सारा थाट होता. या प्रेक्षागृहात विस्मयकारक निर्मितीमूल्यं असलेली महत्त्वाकांक्षी नाटके केली जात. इथे नाटक पाहणं म्हणजे एखाद्या शाही समारंभाला हजेरी लावण्यागत मानलं जाई. लोक नटूनथटून येत. या नाटय़गृहात एक पिटुकला हॉलही होता. ‘पतितोदेयाँ’ म्हणजे छोटा ओदेयाँ छोटा मंच. पडदे वगैरे काही नाही. पन्नास खुच्र्या फक्त. अधिककरून इथे प्रायोगिक, नव्याचा शोध घेणारी नाटके होत. प्रेक्षकांत विद्यार्थ्यांचा आणि तरुणांचा भरणा अधिक असे. माझ्या हॉटेलचा रस्ता ‘हृू व्होजिरार्ड’ हा थेट ओदेयाँच्या पायरीपर्यंत पोचत असे. मात्र हा पॅरिसचा सर्वात लांब रस्ता असल्यामुळे पायपीट बरीच करावी लागे.
मी छोटय़ा थिएटरकडे वळले आणि धुगधुगत पास दाखवला. दारावरच्या सेवकाने तोंडभर हसून माझे स्वागत केले आणि सांगितले, ‘कुठेही बसा.’
‘सिलान्स’ (इंग्रजी ‘सायलेन्स’ किंवा मराठीत ‘शांतता’) हे मी पॅरिसला पाहिलेले पहिले नाटक. मंचावर ओळीने सहा साध्या खुच्र्या मांडल्या होत्या. इतर रंगसज्जा काही नाही. या खुच्र्यावर विराजमान सहा पात्रे. वेगवेगळ्या कारणांमुळे सगळी गप्प असतात. एक म्होरक्या त्यांना बोलकं करण्याचा अखंड प्रयत्न करतो. मला साधारण ६० टक्के संवाद कळू शकले. पण तरीही नाटकाने मला भारावून टाकले. प्रत्येक नट मातब्बर. न का बोलेनात; त्यांचे चेहरे विलक्षण बोलके होते.
माझ्या फ्रेंच वर्गातली इस्रायली मैत्रीण रिबेका आपल्या नवऱ्याबरोबर या नाटकाला आली होती. नाटक पाहिल्यावर आम्ही ‘ले आल’ला जेवायला गेलो. ‘ले आल’ ही मंडई पॅरिसचं वैशिष्टय़ म्हणून प्रसिद्ध आहे. रात्री बारा वाजता ही मंडई जागी होते. फ्रान्सच्या दूरदूरच्या कोपऱ्यांतून ट्रक भरभरून ताजा माल इथे येतो. फळे, भाज्या, सॉसेजेस, चीज, घरगुती लोणची, मुरंबे.. अगदी ब्रह्मांड लादलेले तट्ट ट्रक येतात आणि सॅक्रेकर कॅथ्रिडलजवळच्या मोकळ्या चौकात खुशाल आपल्या गाडय़ांमधला माल ओततात. रसरसलेल्या मालाचे ढीगच ढीग. रंगीबेरंगी. मग विक्री, लिलाव, घासाघीस सुरू होते. हास्य, विनोद, मस्करी, भांडाभांडी यांना ऊत येतो. अभिजात नाटय़! हा खेळ पहाटेपर्यंत चालतो. मग भरलेले खिसे आणि रिकामे ट्रक घेऊन मंडळी परत जातात. म्युनिसिपालटीची झाडूसेना येते आणि हा-हा म्हणता पूर्ण परिसर लखलखीत करते. कसल्याही फोलपटाचा मागमूसदेखील उरत नाही.
या मंडईमधला मेन्यू फार बहारदार असे. चौकाच्या सभोवताली छोटी-मोठी हॉटेल्स ट्रकड्रायव्हरांचे आवडते ‘अनियन सूप’ बनवण्यात माहीर होती. खरपूस भाजलेला कांदा, कोंबडीच्या अर्कात मिसळून पावाचा काप आणि चीजचा थर घालून बेक करतात. चौकात मांडलेल्या खुच्र्या-टेबलांवर जागा पकडून आपण या वाफाळणाऱ्या सूपचा समाचार घ्यायचा. इथला दुसराही एक खाद्यप्रकार विख्यात आहे. गोगलगाई (छी२ी२ूं१ॠ३). लसूण घातलेल्या वितळलेल्या लोण्याबरोबर या खातात.. एका विशिष्ट काटय़ाने अलगद त्यांना शिंपल्यांमधून बाहेर काढून! या मंडईचा आता मुक्काम हलवला आहे.. पार ऑर्ली विमानतळाच्या पलीकडे. केवढे हे दुर्दैव!
माझ्या फुकट पासची महती पटल्यावर मी नाटकं पाहण्याचा सपाटा सुरू केला. जवळजवळ रोज. माझा मुळी तोच अभ्यास होता. सुदैवाने मी अरुणला आणि आईला नियमित पत्रं लिहीत असे. त्यात बहुतेक सर्व नाटकांची नावे, वर्णनं, श्रेयनामावली, इ. तपशील असे. अगदी तारीखवार. अरुणला लिहिलेली पत्रं नाही सापडली; पण आईने मात्र माझ्या पत्रांची जंत्रीच केली होती, ती मिळाली. तिच्या आधारे या लेखासाठी त्या सुवर्ण-नाटय़ानुभवाने पुन्हा थरारणे शक्य झाले आहे. नाहीतर तारखा आणि सन यांबद्दलचे माझे अज्ञान आणि उदासीनता याबद्दल मी आधीच नमूद केले आहे.
पॅरिसची अतिशय जुनी नाटक कंपनी ‘कॉमेडी फ्रान्सेझ’ ही राजा चौदावा लुई याच्या आदेशावरून १६८० साली स्थापन झाली- राजघराण्याच्या मनोरंजनाखातर. ती अद्याप जोशात चालू आहे. जुनी नावाजलेली आणि विनोदावर भर असलेली नाटके इथे केली जातात. राष्ट्रीय नाटय़संस्थांमध्ये तिचे मानाचे स्थान आहे. स्वत:चा पगारी नटवर्ग असणारी ही एकमेव कंपनी. तुफान विनोदी नाटकं करणाऱ्या या संस्थेनं बसवलेली मोलिएरची चार-पाच नाटकं मी पाहिली. अत्र्यांच्या नाटकात मला मोलिएरचे पडसाद आढळले. आणि त्याच्याही मागे जाऊन ‘मालाद इमॅजिनेअर’ हे नाटक पाहताना काळाच्या पडद्याआड दडलेले एक नाटक आठवले. हरी नारायण आपटे यांनी याच नाटकाचे केलेले भाषांतर ‘मारूनमुटकून वैद्यबुवा.’ लहानपणी आईबरोबर मी ते वाचले होते.
‘तेआत्र नास्योनाल पॉप्युलेअर’ ही आणखी एक सरकारी नाटय़संस्था. ती नदीच्या डाव्या विभागात आयफल टॉवरजवळ एका सुंदर शुभ्र इमारतीत वसली होती. त्रोकादारो या अप्रतिम देखण्या विस्तारावर तिचे साम्राज्य होते. ‘कॉमेडी फ्रान्सेझ’ राजेराजवाडय़ांच्या रंजनासाठी, तर ‘ते. एन. पे.’ आम जनतेसाठी १९२० साली गेमियेर या गृहस्थाने सुरू केली. या संस्थेचे नाटक ‘लाग्रेस्याँ’ (‘ळँी अॠ१ी२२्रल्ल’ किंवा ‘आक्रमण’) मी कदापि विसरणार नाही. या नाटकात ‘आम आदमी’च्या चहुबाजूंनी होत असलेल्या मुस्कटदाबीचे आणि इतर हर प्रकारच्या आक्रमणाचे प्रभावी चित्रण आहे. महागाई, वाढती गुन्हेगारी, हिंसा, बलात्कार, बेबंद वागणारी तरुण पिढी, भ्रष्टाचार, इ. दर्शवणारी प्रभावी दृश्ये विलक्षण वेगवान गतीने मंचावर उलगडत जातात. डोळ्यांचे पाते लवते- न लवते तोच दुसरे अधिक जबरदस्त दृश्य सुरू होते. दृष्ट लागावी अशी सांघिक एकजूट, समर्पक प्रकाश व ध्वनियोजना आणि कल्पक रंगसज्जा यामुळे हा प्रयोग अक्षरश: अंगावर आला. पडदा पडला तरी मी मंत्रमुग्धपणे खुर्चीत बसून होते. कुणीतरी म्हटलं, ‘मादमॉझेल.. नाटक संपलं आहे.’
पॅरिस हे नित्यनवीन घडामोडींचे शहर. अ ५ी१८ ँंस्र्स्र्ील्ल्रल्लॠ ्रू३८! नाटय़शौकिनांना तर तिथे कायम तुडुंब मेजवानी असे. घनगंभीर क्लासिक नाटकांपासून ते उडत्या, उथळ वात्रटिकापर्यंत! फ्रेंच रंगमंच सगळ्यांचे सगळे चोचले पुरवतो. नाटक कोणत्याही पठडीचे असले, तरी प्रयोग चपखलच होत असत. नाव ठेवायला बोटभरदेखील जागा सापडत नसे.
कोर्नेय या नाटककाराची दोन-चार नाटके, ‘ल नॅक’, ‘बेकेट’, ‘स त्रूव्हे’, ‘द बॉल्ड प्रिमा डोना’, ‘किचन’, ‘मॅड वुमन ऑफ शाय्यो’, ‘द मेड्स’, ‘कॅलिगुला’, ‘बोइंग बोइंग’, ‘ओदिन’, ‘ले मूश’.. किती नावं घ्यावी? आठवडय़ाला पाचएक नाटके तरी मी पाहत असे. या नाटकांची भलीथोरली यादी देता येईल. पण नुसती नामावली देऊन फारसे काही साधणार नाही. एवढेच म्हणावेसे वाटते, की पाहिलेल्या प्रत्येक नाटकाने मला काही ना काही दिले. रीव्ह गोशच्या सेनलगतच्या रस्त्यांवरून छोटय़ा छोटय़ा हॉल्समधून फार मजेदार प्रकार पाह्यला मिळाला. रिव्हय़ू! हा बहुरंगी नाटय़ानुभव अगदी शब्दापलीकडचा होता. रिव्ह्यूला साचेबंद कथानक नसते. त्याच्या अवखळ प्रकृतीला कसलेच बंधन मानवत नाही. एखादे ‘सूत्र’ पकडून त्याला धरून छोटे छोटे स्वयंपूर्ण प्रवेश सादर केले जातात. गाणी, नकला, कसरत, नाच, चुटके यांची रेलचेल असते. रिव्ह्यू हा प्रकार मला फार मनोहर वाटला. बेबंद, उत्स्फूर्त. खिल्ली उडवणारा. काहीसा द्वाड. प्रेक्षकांना गुदगुल्या करीत, हसतखेळत हे मोहनाटय़ उलगडत जाते. सात्र्, आयनेस्को, आंवी, जने, इब्सेन, इ. श्रेष्ठ नाटककारांच्या प्रस्तुती पॅरिसच्या मंचावर पाहून जरा जडावल्यासारखे झाले, की माझी पावले रिव्ह्यूच्या शोधात वळत. माझ्या स्वत:च्या लेखनशैलीला हा नाटय़प्रकार पोषक होता. भारतात परतल्यावर आपण एक स्वतंत्र, मिस्कील ‘रिव्ह्यू’ लिहून तो अरुणबरोबर बसवायचा आणि ‘नाटय़द्वयी’तर्फे रंगभूमीवर आणायचा असा मी मनोमनी निश्चय केला.
पायी पायी, क्वचित बस, पण अधिककरून मेट्रोने मी माझ्या नाटय़‘मंदिरा’पर्यंत पोचत असे. मेट्रोचा प्रवास मला फार आवडे. कित्येक वेळा सहप्रवासी न्याहाळण्याच्या नादात मी योग्य स्टेशनवर उतरायला विसरून गेले आहे. (पूर्वी ‘पत्तेनगरीत’चा आराखडा बसच्या तिकिटावर टिपण्यात गर्क होऊन मी पार स्वारगेटपयर्र्त बसने गेले होते. तेव्हा हा माझा हातखंडा प्रयोग म्हणता येईल.) एकदा मेट्रोच्या तिकीट तपासनीसांचा संप होता. फाटकावरचे नित्यनेमाने जे असायचे ते सर्व चेकर गायब होते. फाटके खुली होती. मग फ्रेंच प्रवाशी फाटकापाशी थांबत, स्वत: आपले तिकीट फाडून शेजारच्या टोपलीत टाकत आणि मगच चालू लागत. संपाचा गैरफायदा कुणी घेतला नाही.
रस्त्याने असंख्य सडकछाप रोमिओ मला हटकत असत. ‘कॉफी प्यायला चलणार का?’ विचारीत. हसून ‘नाही’ म्हटले, की निघून जात. फारसा त्रास देत नसत. तेव्हा फ्रेंचमधून ‘तुला आया-बहिणी नाहीत का?’ असं विचारायची वेळ आली नाही.
नाटकं पाहता पाहता मार्च महिन्याचा मध्य उलटून गेला. एव्हाना वसंत ऋतूने हजेरी लावायला हवी होती. पण यंदा फ्रेंच कोकिळा गप्पच होत्या. सूर्यदेवाचे दर्शन क्वचितच घडे. ‘व्वा! आज सूर्य उगवला आहे!’ या वाक्याने संभाषणाची सुरुवात होऊ शकते, याचे मला विलक्षण आश्चर्य वाटे. पण सूर्य उगवला की माहेरचं माणूस भेटल्याचा आनंद होत असे. ओल्या गारठय़ाला मी फार कंटाळून गेले होते.
आणि मग एके दिवशी वसंत आला. कथा-कादंबऱ्यांमधून आधी त्याची चाहूल लागते. पण इथे मात्र तो अगदी अचानकच हजर झाला. आपल्या वैभवासकट. दिरंगाईची भरपाई करायला त्याने सुरुवात केली. एखादा बंगाली सिनेमा पाहत असता अचानक हॉलीवूडच्या रंगपिसाट म्युझिकलचे एखादे रीळ सुरू व्हावे, तद्वत वाटले. मी वाट फुटेल तिकडे भटकायचे ठरवले. एक दिवस थिएटरला रजा देऊन हे अनोखे निसर्गनाटय़ पाहण्याचे ठरवले. आयफल टॉवरच्या सभोवताली मोकळ्या विस्तीर्ण जागेत मोठमोठाले वृक्ष आहेत. त्या वृक्षराजीवरून बिचकत, लाजत पालवी फुटली होती. ‘या वयात ही पोपटी पानं शोभत नाहीत..’ असं म्हणत का होईना, ही जुनी खोडे वसंतराजाच्या आग्रहास्तव पालवली होती. बोलूनचालून ती फ्रेंच झाडे.. म्हातारी झाली तरी त्यांचा हिरवटपणा जातो थोडाच! लहान लहान पोरसवदा झाडेझुडपे तर वेड लागल्यागत फुलली होती. लाल, निळय़ा, जांभळ्या, गुलबक्षी फुलांचे गुच्छ जणू. पाहता पाहता असंख्य कुरूप बदकांचे राजहंस झाले होते. वास्तविक माझी कविप्रकृती नाही. नद्या, नाले, चंद्र, तारे या विषयांपासून मी अदबीने चार हात दूरच असते. त्यातून वसंत ऋतू तर भल्याभल्यांनी हाताळल्यामुळे कोमेजण्याच्या पंथाला आलेला. पण त्या दिवशी वसंताच्या दर्शनाने झालेला आनंद कंठात दाटून आला. हा अनुभव अनोखा होता. मी त्रोकादारोच्या बागेकडे वळले. वाटेत सेन नदी लागली. ती वाहत नव्हतीच मुळी. ऊन अंगावर घेत चक्क लोळत पडली होती. बागेतल्या हिरवळीवर छोटी छोटी ब्रह्मफुले फुलली होती. जणू कुणी चित्रकाराने रंगीत ब्रश बुचकळून त्या ‘हरित तृणाच्या मखमालीवर’ झटकला होता. एका जाळीदार फांद्यांच्या झाडावर बऱ्याच लहान पिवळ्या पक्ष्यांनी मुक्काम ठोकला होता. बहुधा ते एकत्र कुटुंब असावे. या फांदीवरून त्या फांदीवर उडय़ा मारणारी हालती-बोलती फुलेच जणू. कितीतरी वेळ मी त्यांचा खेळ पाहत उभी राहिले. बाजाराच्या पिशव्या घेऊन चाललेली एक म्हातारी बाई, मी एवढे काय पाहते आहे, हे पाहण्यासाठी थबकली. आपली टोपी न पडेल अशा बेताने तिने मान उंचावून पाहिले. काहीच नवलाईचे न आढळल्याने ती खांदे उडवून चालती झाली.
वसंत ऋतूच्या आगमनाने पॅरिस खडबडून जागे झाले. झाडांच्या साथीने रस्तेही फुलले. रंगीबेरंगी माणसांनी दुथडी वाहू लागले. हिवाळ्यातल्या शुकशुकाटाचे पाहता पाहता गजबजाटात रूपांतर झाले. थंडीला भिऊन आत दडलेल्या खुच्र्या-टेबलांनी सरळ फुटपाथवर आक्रमण केले. कॉफीचा कप सांभाळत या कॅफेमध्ये बसून समोरून वाहत जाणारे पॅरिस पाहण्यासारखा दुसरा विरंगुळा नाही. हातात लांबलचक पावाचे सोट घेऊन घरी निघालेले संसारी पुरुष, कुत्र्यांना साखळीला बांधून फिरायला निघालेल्या नखरेबाज म्हाताऱ्या, चमकदार कृष्णवर्णी आफ्रिकन अमेरिकन, वाकडय़ा नजरेचे अ‍ॅल्जीरियन्स, पाहाव्याशा वाटणाऱ्या बायका, खावीशी वाटणारी मुले.. सगळे काही कॉफीच्या एका कपाच्या बदल्यात.
ऋतू बदलला की शहरामध्ये हंगामी दुकाने जागोजागी उगवतात. जत्राछाप. न्यूगोटीन ही फ्रेंच चिक्की (फ्रेंच असल्यामुळे ती गोरी असते.), लखलखणारे दागिने, ‘रामबाण’ काष्टौषधे, प्रसाधने- या दुकानांमधून ‘कोई भी चीज’ मिळू शकते. गॅरंटीचे तोंडभर आश्वासन दिले जाते. आश्वासन जितके भरघोस, तितका जिन्नस तकलादू समजावा. थंडीच्या दिवसांमध्ये ‘मराँ’ (शिंगाडय़ाचा भाऊ) विकणारे नाक्या- नाक्यावर आपली धगधगती शेगडी आणि कढई घेऊन गिऱ्हाईकांना गरमागरम मराँ पुरवतात. ते दृश्यच ऊब देऊन जाई. वसंत आला की कढया नाहीशा होतात. आइस्क्रीमच्या पोई उघडतात. आजोबा आणि नातवंडे सारख्याच एकाग्रतेने बिस्किटाच्या कोनमध्ये बसवलेले आइस्क्रीमचे गोळे चाखत मजेत हिंडतात. बागा गच्च भरून जातात. तरुण आया आणि बाबागाडी पलटण, फॅशन मिरवणाऱ्या तरुणी, त्या कौतुकाने पाहणारे तरुण, अभ्यास करणारे विद्यार्थी आणि अर्थातच प्रेमी युगुले यांनी उद्याने जणू ओसंडून वाहतात. गंमत म्हणजे तुडुंब गर्दीतसुद्धा प्रेमार्जन करणाऱ्यांना एकांत मिळतो. कारण वखवखलेल्या नजरा त्यांचा वेध घेत नाहीत. इतरजण त्यांच्याकडे पाहिले- न पाहिल्यासारखे करून सभ्यपणे दृष्टी दुसरीकडे वळवतात. अनेकदा जिकडे पहावे तिथून घाईने नजर काढून घ्यावी लागल्यामुळे अखेर आभाळातले ढग पाहण्याची माझ्यावर पाळी आली आहे. हातात पुस्तक धरून भोवतालची माणसं वाचत मी तासच्या तास लुक्साम्बुर्गच्या बागेत घालवले आहेत. माणसांचा कंटाळा आलाच, तर उठून पुतळे पाहत हिंडावे. पॅरिस हे पुतळ्यांचे शहर आहे. या पुतळ्यांचा मान तिथली कबूतरेही राखतात.
बागांमधल्या रस्त्यावर खेळला जाणारा एक बहारदार खेळ मला पाह्यला मिळाला. पन्नाशीच्या पुढचेच खेळाडू लोखंडी गोळा घेऊन तो खेळ खेळतात. ठराविक अंतरावरून तो गोळा फेकायचा. तो खोदलेल्या गलीत गेला पाहिजे. खेळापेक्षा खेळाडू प्रेक्षणीय वाटत. चेष्टामस्करी, विनोद यांना ऊत येई. जिवाचे कान करून मी त्यांचे अभिजात संवाद ऐकत असे. खेळणारा प्रत्येक म्हातारा अल्लड तरुण भासायचा. खेळ ऐन रंगात आला असता एखादी रमणी शेजारून ठुमकत गेली, की क्षणभर खेळ थांबे. माना वळत. मग एक-दोन सुस्कारे, एखादे ‘ओ ला ला’.. खेळ पुन्हा सुरू!
दरवर्षी फॅशनसाठी पॅरिसच्या बायका कोणतातरी एक रंग निवडतात. या वसंत ऋतूत नारिंगी रंगाचे नशीब उघडले. त्याच्यावर प्रबंध लिहावा इतक्या छटा मी तिथे पाहिल्या. प्रत्यक्ष निसर्गाकडेदेखील एवढी विविधता नसेल. बरं, या फ्रेंच ललनांच्या चतकोर मिनिझग्यांची मिजास केवढी! त्याला साजेल अशी पर्स, टोपी, बूट, आभरणे हे सगळे हवेच. फॅशन म्हटली की तिला ताळतंत्र हवे अशी कुणी अपेक्षा करीत नाही. त्यातून ती फ्रेंच बायकांनी- त्याही पॅरिसच्या- वसंत बहरला असताना केली, की आपण पाहत राहावे. प्रश्न विचारू नयेत.
या ऋतूत फ्रेंच लोक अधिकच फ्रेंच होतात. निसर्गाच्या साथीने माणूस बहरतो. प्रत्येक स्त्री सुंदर बनते आणि प्रत्येक पुरुष रंगेल. ‘..तशात मद्य प्याला’ अशी सगळ्यांची अवस्था होते. युगायुगांचा इतिहास पाहिलेले हे प्राचीन शहर पुन्हा तरुण होते आणि माझ्यासारखी परदेशी पाहुणी भारावून पाहत राहते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा