ता सन् तास हातात पेन घेऊन कोऱ्या कागदांकडे पाहत बसलोय. गेले काही दिवस हे असंच होतंय. माझी आई, मुलं यांच्याविषयी लिहायचं म्हटलं तर मला जसं थिजून जायला होतं, तसंच.. कुठून सुरुवात करू? शीर्षक काय? ‘मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते..’ हे असावं? ‘वादळाच्या सागराचे घोर ते तू रूप का..’ हे असावं? स्वरशब्दांचं विद्यापीठ? ‘मैत्र जीवाचे’ का नुसतंच ‘ते’?

कागद आणि पेन एवढय़ाशा अवकाशात मावणारे ‘ते’ नाहीत. आणि माझ्यासाठी ‘ते’ जे आहेत ते सांगणंसुद्धा शब्दांच्या शक्तीच्या पलीकडलं आहे. माझ्या लहानपणी बाबांनी पैसे जमवून एक रेकॉर्ड- प्लेयर घेतला होता आणि काही निवडक रेकॉर्ड्स.. त्यातल्याच एका ‘कोळीगीते’ असं लिहिलेल्या रेकॉर्डवर मी त्यांचा फोटो पाहिला. समुद्र पहिल्यांदा भेटला तो त्या गाण्यांमधून. अगदी पाच वर्षांचा होतो मी; पण ‘राजा सारंगा’ ऐकताना छातीत काहीतरी झालं. अनेक र्वष ते गाणं लतादीदींचं म्हणून ऐकताना रेकॉर्डच्या कव्हरवरचे ते हुशार डोळ्यांचे चष्मेवाले गृहस्थ कोण, हे समजलं नव्हतं. मग एक दिवस दूरदर्शनवर अचानक ‘ते’ दिसले.. गाताना. थोडंच गुणगुणले; पण बऱ्याच वर्षांनी पुन्हा छातीत काहीतरी झालं. ते होतं- ‘त्या फुलांच्या गंधकोषी..’ आणि मग शाळेमध्ये स्पर्धेत भाग घेताना माझ्या डोक्यात हीच गाणी- ‘ती गेली तेव्हा रिमझिम..’ ‘तू तेव्हा तशी..’ मग सातवी-आठवीत असताना घराजवळ ‘ते’ कार्यक्रम सादर करणार म्हणून धावत गेलो आणि ‘ते’ दिसले. ‘भावसरगम’ची पहिली वारी शाळेत असताना केलेला मी भावसंगीतातला वारकरी! त्यानंतर अगदी आजपर्यंत त्या वारीत चालताना तीच नशा, तोच आनंद.. आणि सांगता न येणारं ते छातीत जाणवणारं सुख..

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

पंडित हृदयनाथ मंगेशकर नावाच्या शब्दस्वरांच्या विद्यापीठात लांबून का होईना, पण आपल्यावर त्या चंद्राचे चार किरण पडताहेत याचाच आनंद खूप मोठा होता.. आणि आजही आहे.

डोळसपणे संगीत आणि काव्य या विषयाकडे पाहू लागल्यानंतर हा आदर, भारावलेपण अजूनच वाढायला लागलं. किती पद्धतीनं आपलं जीवन व्यापलंय या माणसानं, हे जाणवू लागलं. गणपती उत्सवांत ‘गजानना श्रीगणराया’, ‘गणराज रंगी नाचतो’ यांचीच गाणी.. शिवजयंतीच्या कार्यक्रमांत ‘हे हिंदुशक्ती संभूतदीप्तीसम तेजा’.. ‘आनंदवनभुवनी’.. यांचीच. नृत्यांच्या कार्यक्रमातही ‘ओम नमोजी आद्या’ यांचंच.. स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी बोलताना ‘सागरा प्राण तळमळला’ यांचंच.. आणि कोणत्याही कार्यक्रमाच्या शेवटी गायली जाणारी पसायदानाची चालसुद्धा पंडितजींचीच..

मास्टर दीनानाथांसारख्या स्वरसूर्याची ही पाचही किरणं अखंड भारतवर्षांला व्यापून राहिली आहेत गेली सात दशकं. पंडित हृदयनाथ
मंगेशकर यांची सृजनशीलता ही त्या स्वरसूर्याच्या खुणा दाखवत स्वत:चं अस्तित्व सिद्ध करणारी आहे. मराठी भावसंगीतात खऱ्या अर्थानं नवा प्रवाह आला तो हृदयनाथजींच्या रूपानं. वयाच्या पंधराव्या-सोळाव्या वर्षी भा. रा. तांबे यांची ‘तिन्हीसांजा सखे मिळाल्या’सारखी अभिजात कविता निवडून ती ज्या पद्धतीनं स्वरबद्ध केली आहे तिथेच या संगीतकाराच्या कारकीर्दीची ‘वाट दूर’ जाणार हे जाणवलं असणार. मुळात उत्तमोत्तम काव्यं निवडून ती संगीतबद्ध करून रसिकांपर्यंत पोचवणारी मराठी भावसंगीताची परंपरा पंडितजींमुळे केवळ अधिक उजळली नाही, तर काव्य आणि संगीत या दोन्हीच्या कक्षा रुंदावल्या असं मला फार मनापासून वाटतं.

चालींमधली आक्रमकता, चमत्कृती आणि सहज गुणगुणता आली नाही तरी पुन: पुन्हा ऐकावीशी वाटावी अशी तेज:पुंज रचना.. या सगळ्याच्या मुळाशी असलेली साहित्याची उत्तम जाण आणि त्याच्यापुढे जाऊन भाषेवर असलेलं प्रेम यातून या साऱ्या अद्वितीय रचना घडल्या असाव्यात.

‘भावसरगम’चं सादरीकरण हा माझ्यासाठी कायमच अतिशय आकर्षक भाग होता. स्टेजवर बसल्यानंतरची पंडितजींची एकाग्रता, गाण्यांमागून गाणी सादर करून लोकांना खिळवून टाकण्याची खुबी, कवितेविषयी बोलताना रसिकांना समृद्ध करण्याची धडपड.. आणि या सगळ्याइतकीच हवीहवीशी वाटणारी एक कलंदर वृत्ती. ‘भावसरगम’चे शंभरच्या वर प्रयोग बघूनसुद्धा त्यांना प्रत्यक्ष भेटायला जाण्याची मला हिंमत झाली नाही. एकदा मेडिकल कॉलेजमधल्या मित्राच्या आग्रहाखातर भेटायला गेलो अणि समोर उभा राहून नुसताच बघत बसलो. तोंडून शब्दच फुटला नाही. शेवटी तेच म्हणाले, ‘सही हवीये का?’ मी म्हटलं.. ‘मी तुमचा..’ एक मोठ्ठा पॉज.. ‘ते’ म्हणाले, ‘फॅन आहात का?’ मी मान डोलवली. पूर्णपणे मॅड झालो होतो मी. मनात वाटलं, ‘असं’ व्हायचंय मला.. जास्त वाद्यबिद्यं नाहीत.. आपणच कवितेविषयी, गाण्याविषयी बोलायचं.. आणि गायचं..!!

अगदी परवा परवा मी ‘मैत्र जिवांचे’ सादर करताना पंडितजी म्हणाले, ‘हे डॉक्टर माझे मित्र आहेत. मी डॉक्टरांचा ‘फॅन’ आहे.’ मला भरत नाटय़मंदिरचा ‘तो’ प्रसंग आठवला. मी म्हटलं, ‘ते प्रेमानं मला ‘मित्र’ म्हणाले, माझ्या रचनांचं कौतुक केलं, तरी आपल्याला ठाऊक असतंच, की कोण ‘विठ्ठल’ आणि कोण ‘वारकरी’!’ पंडितजी हसले.. प्रसन्न!

रसिकता आणि रसग्रहण याची कार्यशाळा असावी अशा गप्पा. आचार्य अत्रे, राम गणेश गडकरी, तांबे, कुसुमाग्रज, आरती प्रभू, शांताबाई शेळके, सुरेश भट, शंकर वैद्य आणि ग्रेस यांच्या शब्दांच्या पलीकडचेही जाणवेलेले पंडितजी शून्यात बघत या साऱ्यांविषयी बोलायला लागले की जाणवतं, की मुळात केवळ संगीतकार म्हणून नव्हे, तर रसिक म्हणून, मित्र म्हणून त्यांना ही सगळी मंडळी सतत आजूबाजूला जाणवतात.

‘सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या’ गाताना त्यांना भटसाहेब दिसत असतात आणि ‘जीवलगा’ गाताना शांताबाईंची आठवण पंडितजींच्या डोळ्यांत दिसते. आरती प्रभूंविषयी बोलताना ते दोन ओळींमध्ये जो विश्राम घेतात त्यात त्यांना आरती प्रभूंचे डोळे दिसत असावेत. आणि ग्रेसविषयी बोलताना ते मधेच उसासा टाकतात. तो उसासा खूप काही सांगून जातो.

शिवाजीमहाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, बाजीप्रभू देशपांडे यांच्या कथा सांगताना त्यांच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक येते. प्रा. राम शेवाळकर, बाबासाहेब पुरंदरे यांचा उल्लेख झाला की एक वेगळंच मार्दव त्यांच्या स्वरांत जाणवतं. मंगेशकर कुटुंबीयांविषयी बोलतानाचे पंडितजी लोभस वाटतात. आणि त्यांचा सगळ्यात हळवा कप्पा म्हणजे ‘दीदी’! पंडितजींना दीदींविषयी आणि दीदींना पंडितजींविषयी बोलताना ऐकणं हे एखादी कविता ऐकण्यासारखं सुंदर असतं.

भाषा हा मुळातच पंडितजींचा जिव्हाळ्याचा विषय. उत्तम मराठी, उत्तम हिंदी आणि उत्कृष्ट उर्दू कळणारे एकमेव संगीतकार म्हणजे पं. हृदयनाथ मंगेशकर. ‘मैत्र जीवांचे’च्या निमित्तानं अक्षरश: लहान मुलाचं बोट धरून त्याला एखादं कलादालन किंवा किल्ले, गड दाखवावेत तसं त्यांनी संत ज्ञानेश्वर.. मीराबाई.. गालीब उलगडले. जितक्या सहजतेनं पंडितजींचे गुरू उस्ताद अमीरखांसाहेबांची बंदिश उलगडली जाते, तितक्याच सहजपणे गालीबचा शेर समजावून सांगितला जातो तो हृदयनाथ मंगेशकर नावाच्या कार्यशाळेत.

माझ्यासाठी पंडितजी गुरू तर आहेतच; पण देव तुम्हाला मार्ग दाखवायला पाठवतो तो देवदूतही आहेत. रोज बोलणं होतं असं नाही. भेट तर क्वचितच होते. पण दोन वाक्यांमध्ये खूप काही सांगून जाणारी व्यक्ती तुम्हाला स्वरशब्दांच्या अवकाशाचं खरंखुरं दर्शन घडवते. आणि अशा व्यक्तीचे शाबासकीचे दोन शब्दसुद्धा पुरस्कारापेक्षा मोठे असतात. त्यांची ‘डॉक्टर’ ही हाकच मला पाठीवरच्या हातासारखी वाटते. जगणं, संकट, दु:ख, नाती, रसिक , यश या सगळ्याविषयीचे संदर्भ आणि व्याख्या बदलणारा त्यांचा सहवास हा माझ्यासारख्या त्यांच्या चाहत्याच्या आयुष्यात परमेश्वरानं योजलेला सुवर्णयोग वाटतो.

अत्यंत उथळ अफवांना स्पष्टीकरण देताना मला बघून त्यांनी ‘डॉक्टर, तुम्ही छान गाणी करा.. उगीच या खडकांवर पाणी टाकून झाड उगवणार नाही. तुम्ही त्रास करून घेऊ नका..’ एवढय़ा दोन वाक्यांत माझ्या मनातला संदेह दूर केला. याला म्हणतात मार्गदर्शन! तासन् तास बोलायची गरजच वाटत नाही अशावेळी.

देवाच्या कृपेनं आमच्या घरी डोळ्याला दिसणाऱ्या बऱ्याच पुरस्काराच्या बाहुल्या आहेत. पण मी जपतो त्या बाहुल्या म्हणजे रसिकांची दाद आणि कार्यक्रमांत मी ‘संधिप्रकाशात’ किंवा ‘हुरहुर असते’ किंवा त्यांचं ‘तू तेव्हा तशी’, ‘भय इथले’ गाताना ‘‘क्या बात है डॉक्टर!’’ हे त्यांचे शब्द.

अगदी लहानपणी फोटोत बघितलेले ते हुशार, तेजस्वी डोळे माझ्याकडे कौतुकानं बघतात तेव्हा ‘याजसाठी केला होता अट्टहास’ असं वाटल्याशिवाय राहत नाही. खरं तर मी तिथेच असतो अजुनी मनानं.. भारावलेला.. कॉलेजमधला.. त्यांच्याकडे खुळावून बघणारा. माझ्या फर्माईशी आज तरी गातील का, अशी हुरहुर असलेला. आणि ‘ते’ तितकेच सहज, तितकेच उत्कट, उत्तम सेन्स ऑफ ह्युमर आणि मैफील हमखास जिंकणारी त्यांची अदा.. डोळे मिटून मन लावून ज्ञानेश्वरांच्या ओळी समजावून सांगताहेत-
बापरखुमादेवीवरू सहज नीटु झाला
हृदयी नटावला ब्रह्माकारे।
ज्ञानेश्वरांच्या हृदयात ‘पांडुरंग’.. पंडितजींच्या मनात ‘ज्ञानेश्वर माऊली’ आणि माझ्या हृदयात ‘ते’.. पं. हृदयनाथ मंगेशकर..!!
saleel_kulkarni@yahoo.co.in

Story img Loader