‘‘चल उंच उंच जाऊ, चंद्रास हात लावु..
अस्तित्व अन् लयाचा झुलला झुला जिथुन,
दिसतात त्या धरेच्या साऱ्या कला इथुन
चल आपुलेच ‘असणे’ आता दुरून पाहु’’
तुम्ही पाहिलंय कधी असं स्वत:कडे? म्हणजे सॅटेलाइट व्ह्यूमध्ये पृथ्वी दिसते आणि मग नीट बघितल्यावर भारत देश, ज्याला पाहून अंतराळवीर राकेश शर्मासर म्हणाले होते, ‘सारे जहां से अच्छा, हिंदोस्ता हमारा’ आणि आपण सगळे गहिवरून गेलो होतो तसे.. पाहिलंय कधी?
विमानातून आपली घराची इमारत किंवा जत्रेतल्या पाळण्यातून आपलं कुटुंब दिसतं तसं.. स्वत:सकट सगळं दिसलंय कधी? मी मध्यंतरीच्या काळात पाहिलं तसं स्वत:ला आणि माझ्या संदर्भातल्या जगालासुद्धा! मी काही योगी नाही आणि अंतराळवीरही नाही, पण दोनशे मैल प्रति तासाच्या वेगाने धावणाऱ्या आपल्या आयुष्याच्या रेलगाडीतून उतरून त्या रेलगाडीकडे पाहाता येतं.. थोडं थांबावं लागतं त्यासाठी. स्पर्धेतून, चक्रातून बाहेर यावं लागतं. अर्थात, हे ठरवून करणारे फार थोर असतात, पण ही संधी मिळते ती आजारपणात, चाळीस-पन्नास तासांच्या विमान प्रवासात आणि सर्वात जास्त म्हणजे संकटात.. तुम्ही कधी दोन्ही डोळ्यांना पट्टी बांधून बघितलीय? त्यानेपण दिसू लागतात वेगळेच संदर्भ, ऐकू यायला लागतात वेगळेच आवाज; जे एरवी कानावरून जतात, पण कानात जात नाहीत.
अलीकडे मी बघतोय, की लांबून दिसणारा ‘मी’ अगदीच शांत वाटतोय, पण अस्वस्थ आहे. जग मात्र सुखात असावं, कारण मुळातच एकदा उंचावर येऊन जगाकडे बघायला लागलं की जाणवतं, की आपल्याला वाटतं तितके महत्त्वाचे नसतोच आपण. नाती, मित्र, पैसा, इस्टेट, कविता, गाणी, चित्रपट, प्रेम हे सगळं अगदी तसंच चालू राहातं. अर्थात या सुखी जगाचा एकेक भाग झूम करून बघायला लागलो की एकदम वेगळं दिसतंय चित्र..
मी बघतोय.. की वैतागलेले दिसतायत बहुतेक सगळे चेहरे.. कोणाला हवी तशी जागा नाहीये, कोणाचा पैशाचा अंदाज चुकलाय, कोणाचा नात्याचा होरा फसलाय, कोणी दिवस ढकलतंय, कोणी जगण्यासाठी धडपडतंय आणि कोणी मरणाची वाट बघतंय.. कोणाचा अपेक्षाभंग झालाय, कोणाचा रसभंग झालाय.. कमी-अधिक प्रमाणात, पण सगळे अस्वस्थ..
रुपयाकडे पाहणारे हजार रुपयाकडे.. लाख.. करोड.. अब्ज.. सगळेच अजून एक एक शून्य वाढवण्याच्या धडपडीत धावतायेत..
‘हर किसीका खुशी से फांसला सिर्फ एक कदम है
हर इक घर में सिर्फ एक कमरा है,
ध्यान लावण्यासाठी किती उपाय? योग, संगीत, निसर्ग.. पण जितकं उंच जातोय तितका तितका कोलाहल जास्त ऐकू येतोय मला. कारण आकाशात उंच झोक्यावर कॅमेरा लावून बघत बसलं आपल्याकडे, तर ऐकू येतात मनाच्याही मनातले आवाज.
मी बघतोय की.. सगळ्यांचाच ओढा आहे सुटसुटीतपणाकडे.. कोणालाही कशातच आणि कोणातच अडकायला नको वाटतंय. आपण बरं, आपलं घरं बरं.. घरात गेल्यावर आपण दोघंच बरे आणि खरं तर दार लावून घेतल्यावर एकमेकांकडे पाठ करून झोपल्यावर एकेकटेच बरे.. उपचार म्हणून भेटवस्तू, शुभेच्छा दिल्या जातायेत, पण अडकत नाही कोणीच कोणांमध्ये.. येताय का? याला ‘नको’ हे उत्तर अपेक्षित ठेवलं जातंय.. पण प्रश्न विचारायला तर हवा! ‘वाईट’ दिसतं म्हणून खूप लांबून पाहिलं ना की दिसायला म्हणून वाईट काहीच जाणवत नाही.
आपल्या आयुष्याचा नकाशा मोठा.. अजून मोठा करून पाहताना जाणवतं, की जे गाव, जे ठिकाण फार महत्त्वाचं नव्हतंच, तिथेच घुटमळताना फार शक्ती आणि वेळ घालवला आपण.. अगदी नगण्य गोष्टींमध्ये किती त्रास करून घेतला जीवाला! जी गोष्ट आता बघताना अख्ख्या शेताच्या कडेला एखादं काटेरी खुरटं झुडुप असावं इतकी छोटी दिसते.
मला तुम्ही मुद्दामून टाळलं! माझा मान राखला गेला नाही. माझ्यासारख्या माणसाचा वेळ घालवला तुम्ही! तुला माझ्या भावना समजत नाहीत.. मला माझं अस्तित्वच नाही.. ही व अशी अनेक वाक्यं आणि विचार हे इतके छोटे छोटे दगडांसारखे दिसायला लागतात, की तेव्हा आपण इतक्या छोटय़ाशा दगडाला डोंगर समजून स्वत:ला आणि त्यापेक्षाही दुसऱ्याला किती त्रास दिला याचं हसू येऊ लागतं.
मी बघतोय की.. गर्दी जमतीये ती भांडण बघायला. चांगल्या कामाचा सत्कार बघायला मात्र मोजकीच टाळकी.. गर्दी जमतीये ती अस्वस्थ विचारांभोवती.. सुखाची गाणी फुटकळ वाटू लागली आहेत.
मी बघतोय की.. सासरी गेल्यावर आपलंसं कर त्यांना. किंवा इथला हट्टीपणा तिथे कमी कर, ही वाक्यं आता कथा-कादंबऱ्यांमध्येसुद्धा दिसत नाहीत. ‘लवकरात लवकर वेगळं घर कर,’ असा सल्ला मोठय़ा बहिणी लहान बहिणींना देतायेत.. अख्ख्या आयुष्याच्या चित्राकडे उंचावरून पाहाल तर जाणवेल की कधी संवाद न करताच ठरवून टाकलं होतं तुम्ही की नाही जमणार!
मी बघतोय की.. लालनपालनाची गुंतवणूक करतायेत पालक.. त्या ठेवीचं रूपांतर अमेरिकेतला बंगला आणि मग आयुष्यभराची ती ठेवणीतली वाक्यं, की ‘आम्ही कित्ती केलं?’ सोमवार ते शुक्रवार मुलांकडे अजिबात न बघता, शनिवारी मॉलमध्ये नेऊन दोन तासांत पाच हजार खर्च करून, डेली हजार रुपयेप्रमाणे दिवसांचे मोबदले दिले जातायेत.. अगदी लहान बाळांना जेवण भरवताना वरणभाताचे मोठ्ठे घास कोंबले जातायेत त्यांच्या इवलाशा तोंडात. पट्कन जेवण उरकून माऊलींना फोनवर गप्पा मारायच्या आहेत. नंतर पाहाल अख्ख्या आयुष्याकडे तेव्हा जाणवेल की, काय होत्या त्या गप्पा? कशासाठी केली उरकाउरकी? आता म्हातारपणी तुमचा हात धरून जिना उतरताना त्यांनी एकदम दोन-दोन पायऱ्या उतरल्या तर चालतील? मग का जेवण संपवून टाकायची घाई होती तुम्हाला?
मी बघतोय.. या सगळ्यातही वसंत फुलतोय, झरे वाहतायेत फुलं डोलतायत.. आजही शाळेच्या पहिल्या दिवशी छोटय़ा चेहऱ्यांवर भीती आहे.. आजही तीन पिढय़ा एकत्र गणपतीची मूर्ती घेऊन चालत येताना जल्लोष करतायेत.. आजही कोणीतरी कोणासाठी गाणी म्हणतंय आणि कोणी जीव तोडून कुणाची वाट बघतंय.. पण ही गावं फार छोटी छोटी दिसतायेत..
थोडं थांबून स्वत:सकट सगळ्याकडे बघण्याची संधी मिळते तेव्हा उंचावरून बघताना दिसतायेत ते शाळेतले दिवस, आणि बारा स्वच्छ सुंदर तळी.. किती दंगली झाल्या, धूळफेक, चिखलफेक झाली तरीही तितकीच स्वच्छ राहिलेली ती बारा तळी.. बारा स्वरांची.. आणि त्या तळ्यापर्यंत जाण्याच्या रस्त्यातले सगळे काटे बाजूला करून माझा रस्ता सोपा करणारी माझी आई आणि संथपणे त्या तळ्यांकडे जाणारा ‘मी’ आणि दोन्ही हातांना बिलगलेली माझी दोन पिल्लं..
कितीही उंचावरून बघितलं तरी हेच मोठं दिसतं.. कितीही लांबून, थांबून थांबून पाहिलं तर दिसेनासे होतात छोटे छोटे हट्ट, वाद, आक्रस्ताळेपणा, दंगली, अश्रू.. कारण ती गावं तेव्हा कितीही मोठी वाटली तरी आता दिसतसुद्धा नाहीत. आता मीसुद्धा किती ‘शांत’ दिसतोय लांबून आणि माझ्या दोन्ही हातांना बिलगलेले माझा मुलगा आणि मुलगी खिदळतायेत आनंदानी.. आणि नीट ऐकतो, तर त्याचीच गाणी होतायेत.. एकानंतर एक.. तळ्यातलं पाणी अजूनही स्वच्छच आहे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा