‘‘काहीतरी वैचारिक असलं तरच बोलूया, नाहीतर नुसतेच शब्दांचे बुडबुडे, उथळ विनोद यात ‘माझ्यासारख्या’ माणसाचा वेळ घालवू नका..’’ स्वयंघोषित विचारवंत प्राध्यापक शहाणे आपल्या सासऱ्यांना म्हणाले. वरील वाक्यात ‘माझ्यासारख्या’ या शब्दावर इतका जोर होता, की शहाण्यांचे सासू-सासरे दोघेही चप्पल घालून दाराकडे निघाले. शहाण्यांनी नवीन कार घेतली होती आणि नवीन गाडीतून देवदर्शनाला जायचं म्हणून मंडळी निघाली.
‘‘गाडी घेतानासुद्धा माझी तत्त्वं सोडली नाहीत मी..’’ स्टीअरिंगवर बसता बसता शहाणे म्हणाले. तेवढय़ात आपल्या गाडीशेजारी एक गाडी अगदी चिकटून लावली आहे, तेव्हा त्या गृहस्थांना फोन करून दोन गोष्टी ऐकवायला हव्यात, हे शहाणेंच्या लक्षात आलं. ‘‘नमस्कार. प्रा. शहाणे हिअर. वुड यू माइंड मूव्हिंग युवर कार?’’
सासऱ्यांकडे बघून स्मितहास्य!
आपल्याकडे मराठीचे प्राध्यापकसुद्धा अनेकदा काहीही गंभीर बोलायचं तर इंग्रजीत का बोलतात, देवास ठाऊक. मग बायको, पाच वर्षांचा मुलगा पप्पू आणि सासू-सासरे यांना पार्किंग आदी विषयांवर एक व्याख्यान.. ‘‘आपल्याकडच्या लोकांना छोटय़ा छोटय़ा गोष्टीसुद्धा शिकवायला हव्यात. आपण पलीकडच्या दाराने बसू शकलो असतो. पण प्रश्न तत्त्वाचा आहे. आपल्याला अर्धा तास उशीर झाला तरी चालेल; पण हा प्रश्न मनोवृत्तीचा आहे..’’
सासू-सासरे हतबल होऊन बघत होते. बसच्या प्रवासात बसमध्ये जो चित्रपट सुरू असेल तो बघताना जी अगतिकता दिसते माणसांच्या चेहऱ्यावर- तीच त्यांच्या चेहऱ्यावर होती. प्रवास तर करायचाच आहे, आणि चित्रपटाची निवड मुलीने करून ठेवलीये. त्यांची मुलगी म्हणजे सौ. शहाणे मात्र आठ वर्षांच्या अनुभवांनी आधी कौतुक.. मग आश्चर्य.. मग राग.. मग नाइलाज.. आणि आता बधीर अवस्थेपर्यंत पोचल्या होत्या.
लग्नाच्या वेळी मध्यस्थांनी ‘‘यांची वैचारिक बैठक जोरदार आहे बरं का!!!’’ हे वाक्य कौतुक म्हणून नव्हे, तर सावधानतेचा इशारा म्हणून बोलले होते, हे आता सौ. शहाणे स्वत:शी घोकत होत्या. मग त्यांनी- ‘‘मी, पप्पू आणि आई मागे बसतो. बाबा, तुम्ही पुढे बसा..’’ असं म्हणून आपली सोडवणूक करून घेतली.
‘आधी गाडी नीट शिका, मग नवीन गाडी घ्या’, ‘आधी एखादी जुनी गाडी घ्या. हात साफ करा, मग नवीन घ्या’, ‘पहिले काही दिवस कोणीतरी ड्रायव्हर घ्या, निरीक्षण करा, मग चालवा..’ यापैकी एकाही सल्ल्याकडे लक्ष न देता प्रा. शहाणे स्वत: गाडी चालवायला बसले. ज्यांना सतत उपदेश द्यायला आवडतो त्यांचे सर्वात आवडते श्रोते म्हणजे दहा वर्षांखालील मुलं! ती उलट प्रश्न विचारत नाहीत. कारण त्यांना नव्वद टक्के गोष्टी कळतच नसतात. आणि मोठय़ांवर सर्वार्थाने अवलंबून असल्यामुळे ती पोरं पळून पण जाऊ शकत नाहीत. आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे ‘पोरा बोले सर्वाना लागे’! ‘पप्पू, हिंमत हवी माणसात.. विचारांची शक्ती हवी.. शब्द आणि विचार हे तोफगोळे असतात..’’
शहाणेंनी गाडी सुरू करतानाच व्याख्यान सुरू केलं.
‘‘रेडिओ नाही का लावला गाडीत?’’ सासूबाईंनी मागच्या सीटवरून गुगली टाकला.
‘‘कुठलीतरी अर्थहीन गाणी ऐकण्यापेक्षा आपण मौनाचा आनंद घेऊ या!!’’
‘‘तुम्ही दिलात तर ना!!!’’ असं वाक्य सौ. शहाणेंनी महत्प्रयासानं गिळलं. आणि पहिल्या टोलनाक्यावर ‘पेरू हवाय मला..’ असा हट्ट पप्पूने धरला.
‘‘इतक्या विचित्र ठिकाणी अशा चढणीवर कसा टोलनाका?’’ चढावर गाडी हळूहळू पुढे नेणं अवघड आहे हे लक्षात आल्यामुळे शहाणेंनी टोलनाक्याच्या जागेवर टीका सुरू केली.
‘‘मागची गाडी किती चिकटलीये.. लोकांना कशी आणि कधी शिस्त लागणार?’’ असं प्रा. शहाणे बोलत असतानाच- ‘‘अहो.. अहो जावईबापू, मागे जातीये गाडी. अहो आपटेल..’’ असं म्हणेपर्यंत मागची गाडी शहाण्यांच्या गाडीला चिकटली. शहाण्यांनी काच खाली करून मागे बघितलं आणि मागच्या गाडीच्या खिडकीतून एक भलाभक्कम हात बाहेर आला. प्रत्येक हातात अंगठी. मनगटात सोन्याचं जाड, भव्य ब्रेसलेट. पाठोपाठ दाढी दिसली आणि आवाज आला- ‘‘ओ साहेब..’’
शहाण्यांची वैचारिकच काय, पण सर्वागीण बैठक हादरून गेली. तिसरीत असताना एका मुलाला पाठीत गुद्दा मारल्याचा प्रसंग सोडला तर असा थेट संघर्ष शहाणेंच्या समग्र जीवनात आलेला नव्हता. तेवढय़ात टोलनाक्यावरच्या माणसाने ‘‘चला साहेब, पुढे घ्या गाडी..’’ असं म्हटल्यावर शहाणेंनी थरथरत्या पायांनी अॅक्सिलेटर दाबला आणि मागची गाडी टोलसाठी थांबली..
एकीकडे बायको, मुलगा, सासू-सासरे यांच्यासमोर उभी केलेली विचारांची, तत्त्वांची बैठक सांभाळायची आणि दुसरीकडे मनात उभी राहिलेली भीती- ही कसरत मोठी चमत्कारिक होती.
‘‘पप्पू, मागच्या गाडीत एक डेंजर माणूस होता. तो थांबा म्हणाला- तुला ओरडायला.. तू फार हट्ट करतोस..’’ शहाण्यांनी तो माणूस डेंजर वाटतोय हे अप्रत्यक्षपणे व्यक्त केलं.
‘‘अशी गुंड माणसं समजा आपल्यासमोर आलीच, तर काय पद्धतीची चर्चा करावी?’’ न राहवून शहाणेंनी सासऱ्यांशी चर्चा सुरू केली.
‘‘तुम्ही चर्चेला जाताना चष्मा मात्र काढून जा.’’
सासरेबुवांनी मिळालेल्या संधीचं सोनं केलं.. ‘‘तुमच्या प्रत्येक वाक्यावर ती मंडळी तुमच्या चेहऱ्याशी जो हाताचा संवाद साधतील त्यासाठी चष्मा मधे मधे नको. हॅ हॅ हॅ..’’ सासरेबुवांनी विनोद केला.
‘‘मी घाबरलेलो नाही. पण विचारात मात्र पडलो आहे. कारण आतासुद्धा ती गाडी आपल्यामागे आहे. तो माणूस कोणी राजकारणी असेल? गुंड असेल? की व्यापारी असेल? समजा, तो हमरीतुमरीवर आलाच तर मात्र..’’ वाक्यं नुसतीच घरंगळत येत होती तोंडातून.. अर्थ असा नव्हताच त्यात.
‘‘आजकाल लगेच बंदूक काढतात एवढय़ा-तेवढय़ावरून. त्यांनी गाठलंच आपल्याला- तर सरळ माफी मागा आणि नुकसानभरपाई देऊन टाका..’’ सौ. शहाणेंना मात्र आता खरंच भीती वाटायला लागली होती.
‘‘शाळेतल्या मैत्रिणीचे मिस्टर पोलीस आहेत. त्यांना फोन करू या का? पण ते ट्रॅफिकचे कमिशनर आहेत. आणि ते पण मराठवाडय़ात! त्यांची इथे पुणे-मुंबई रस्त्यावर कशी काय ऑर्डर चालेल?’’ – सौ. शहाणे.
‘‘नगरसेविका चांगल्या परिचयाच्या आहेत माझ्या.. त्यांच्याशी बोलू या का?’’ – सासूबाई.
‘‘मला बंदूक हवीये..’’ – पप्पू.
‘‘हे पाहा, बायका-पोरं बरोबर असताना नाही कोणी मारणार तुम्हाला. आणि तुम्ही लगेच सॉरी म्हणा.’’ – सासरेबुवा.
शहाणे मात्र बधीर झाले होते. एक हात दिसतो आणि थोडी दाढी.. आणि आपण हादरून जातो? आपली गाडी खरंच धडकलीये की नाही याची खात्री करायला पण थांबायची भीती वाटते? चर्चा, विचार, तत्त्वं यांचं काय मोल? सगळं घुसळलं जात होतं मनातल्या मनात. आणि आरशात मात्र ती गाडी पुन्हा जवळ येताना दिसत होती. आणि समोर पुन्हा टोलनाका!! मोठ्ठी रांग!!
शाळेपासून इतक्या वादविवाद स्पर्धा, मग चर्चा, बैठकी यात तासन् तास विचारांची शस्त्रास्त्रे वापरणाऱ्या शहाणेंना हतबल वाटत होतं. एक दृश्य.. एक प्रसंग.. एक भीती आपल्या सगळ्या विचारांना, तत्त्वांना हलवून सोडू शकते याचा राग, आश्चर्य आणि भानही शहाणेंना आलं होतं.
मागच्या गाडीचं दार उघडून तो भव्य माणूस चालत चालत शहाणेंच्या गाडीशी आला आणि काचेवर हाताने वाजवून खूणेनं त्यानं काच खाली घ्यायला सांगितली. गाडीत एक विचित्र शांतता. शहाणेंनी काच खाली केली. भव्य सोन्यानं मढलेला तो माणूस म्हणाला, ‘‘साहेब, नवीन गाडी का? अहो, मागचं दार उघडं आहे का चेक करा.. लहान पोरगं दिसतंय गाडीत म्हणून सांगत होतो मगापासून.’’
शहाणे स्तंभित होऊन बघत होते. सासूबाईंच्या बाजूचं दार उघडून त्यांनी ते पुन्हा घट्ट लावलं..
आता शहाणे भानावर आले.
‘‘पप्पू, पाहिलंस ना? आपली चूक नसली तर आपण घाबरायचं नाही.. शेवटी जी तत्त्वं घेऊन आपण जगत असतो.. वगैरे.. आणि शिवाय..’’
पप्पू हिरमुसला होता. त्याला बंदूक काही बघायला मिळाली नाही!!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा