कुणी काय लिहावे, हा जसा ज्याचा त्याचा प्रश्न; तद्वत कुणी काय छापावे, हादेखील ज्याचा त्याचा प्रश्न. एखाद्या लेखक- कवीला ‘तू अमकेच लिहिले पाहिजेस’ किंवा उलट ‘तू अमके लिहिता कामा नयेस,’ असे सांगणे चूकच. काय लिहायचे अथवा काय लिहायचे नाही, यासाठी जो- तो आपापला मुखत्यार. पुस्तके छापणाऱ्यांचे.. म्हणजे प्रकाशकांचेही तसेच. कुठल्या लेखकाचे, कुठल्या स्वरूपाचे लेखन छापायचे हा अधिकार सर्वस्वी प्रकाशकाचा. अमकेच छाप, तमके छापू नको, असे त्याला सांगणेही चूक. तसे करणे म्हणजे हुकूमशाहीच. तरीही सरकारी नसली, कुणा संघटनेची नसली, कुठल्या धर्माची नसली, तरी वाचकांची म्हणून एक अदृश्य हुकूमशाही असतेच असते. ती जाणवतही असते प्रकाशकांना. ही हुकूमशाही हातात हत्यारे घेतलेली, हिंसक स्वरूपाची नव्हे; तर काहीशी सलगीची, आग्रहाची. मुळात प्रकाशन संस्थाही आपापल्या ठरवून घेतलेल्या विशिष्ट मार्गावरच चालत असतात. प्रत्येक प्रकाशन संस्थेचे स्वत:चे काही नियम असतात, निकष असतात. साहित्य-निवडीसाठीचे त्यांचे मापदंड असतात. त्यांना धरूनच त्यांची वाटचाल होते. आता उदाहरणार्थ, आपल्या मराठीमधील जुन्या-जाणत्या प्रकाशन संस्थांचे बघा. प्रत्येक प्रकाशन संस्थेची लेखननिवडीची वैशिष्टय़े आहेत. त्या चौकटीच्या बाहेर त्या संस्था सहसा जात नाहीत. त्या चौकटीमुळे त्यांच्या पुस्तकांमध्ये एकसुरीपणा येतही असेल; पण त्या स्वत:ची चौकट सोडत नाहीत. आणि महत्त्वाचे म्हणजे वाचकाच्याही त्यांच्याकडून तशाच अपेक्षा असतात. म्हणजे अमुक एक प्रकाशनाचे कवितांचे पुस्तक आहे, तर त्यातील कविता कुठल्या रीतीच्या असतील, याबाबत त्याच्या मनात सुस्पष्ट कल्पना असतात. त्या कल्पनांना धक्का बसलाच क्वचित, तर तो बोलूनही दाखवतो.
अर्थात ही चर्चा आपण करीत आहोत काहीएक निष्ठेने (त्यावर कदाचित कुणाचे आक्षेपही असू शकतात!) पुस्तकांचे प्रकाशन करीत असलेल्या संस्थांबद्दल. अन्यथा कसलाही पाचपोच नसलेल्या, मिळाले साहित्य (आणि त्यापेक्षाही त्याच्या प्रकाशनासाठी आयते पैसे) तर टाक छापून, असला व्यवहार करणाऱ्या प्रकाशन संस्था पैशाला पासरी आहेत. असल्या प्रकाशन संस्था एका वेळी ‘आयुष्याच्या अर्थाच्या शोधात असलेल्या कविता’ छापू शकतात, त्याचवेळी लठ्ठ माणसांवरील विनोदाची पुस्तकेही छापू शकतात, आणि त्याचवेळी ‘सुरमईचे ३२ प्रकार’ असेही पुस्तक छापू शकतात. हे असले विक्रम करण्यात त्यांचा हात कुणीच धरू शकत नाही. असो. ज्याचा त्याचा प्रश्न!
प्रकाशकांच्या निष्ठेचा, त्यांच्या लेखननिवडीचा मुद्दा येथे आणण्याचे कारण म्हणजे अशाच एका मोठय़ा प्रकाशन संस्थेने पुस्तकांच्या निवडीबाबत घेतलेला महत्त्वाचा निर्णय! ही संस्था गुजरातमधली. तिचे नाव ‘नवजीवन ट्रस्ट’! ही संस्था महात्मा गांधी यांनी स्थापन केलेली. स्वराज्यप्राप्तीच्या लढय़ात लोकांना शहाणे करण्यासाठी, त्यांच्यात जागृती निर्माण करण्यासाठी म्हणून या संस्थेच्या माध्यमातून वृत्तपत्रादी प्रकाशने प्रसिद्ध करण्यात येत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संस्थेचा पूर्ण भर हा महात्मा गांधी यांनी लिहिलेली वा त्यांच्यावरील पुस्तके प्रकाशित करण्यावरच होता. गुजराती, हिंदी, इंग्रजी, मराठी आदी विविध भाषांमध्ये या संस्थेने गांधीजींवरील पुस्तके प्रकाशित केली. या पुस्तकांची आजची संख्या आठशेच्या घरात आहे.
आणखी वाचा – विश्लेषण : ‘गोडसे’ उदात्तीकरण की अभिव्यक्ती स्वातंत्र्य?
अगदी आत्ता आत्ता या संस्थेने निर्णय घेतला तो इतर साहित्याच्याही प्रकाशनाचा. म्हणजे संस्थेची प्रकाशनाची जी मुख्य धारा आहे- ती न सोडता इतरांचीही पुस्तके प्रकाशित करण्याचा. काजल ओझा-वैद्य, गुणवंत शहा, माधव रामानुज, विनोद भट्ट ही त्यातील काही नावे. यापैकी गुणवंत शहा यांची निवड नवजीवनची विचारधारा लक्षात घेता निश्चितच खटकणारी. इशरत जहाँ चकमक प्रकरणात वादग्रस्त ठरलेले आणि अगदी आत्ता आत्ता गुजरातमधील सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणातून दोषमुक्त झालेले निवृत्त पोलीस अधिकारी डी. जी. वंजारा यांचे या शहा यांनी उघड समर्थन केले होते. पण ही बाब ‘नवजीवन’ने डोळ्यांआड केलेली दिसते.
पुन्हा मुद्दा तोच.. कुणी कुणाचे काय छापावे याचा अधिकार ज्याचा त्याला असला तरी काही बाबी वाचकांना खटकणारच. आणि त्यासाठी वाचक गांधीवादीच हवा असे नाही. जो गांधींना जाणतो किंवा जाणू पाहतो, जो ‘नवजीवन’ची परंपरा जाणतो, ज्याला वंजारा माहीत आहेत, ज्याला गुणवंत शहा माहीत आहेत, त्यांना ही निवड खटकल्यास आश्चर्य नाही. एकंदरीतच या नव्या लेखनप्रवाहाबद्दल गांधीवाद्यांमध्ये नाराजी आहे.
यात एक महत्त्वाचा मुद्दा असा की, गांधीजींव्यतिरिक्त कुणाचेही, कुठलेही साहित्य ‘नवजीवन’ने छापूच नये असा दुराग्रह धरणे योग्य नाही. बदलता काळ, बदलता वाचक, नवी पिढी, त्याची वाचनरुची या गोष्टी एकीकडे, व्यवहार दुसरीकडे आणि तत्त्व, दर्जा तिसरीकडे असे गणित सांभाळणे, हे आज कुठल्याही प्रकाशन संस्थेसाठी सोपे राहिलेले नाही. त्यातून ‘नवजीवन’ने जी पावले टाकली त्याबद्दल सरसकट आक्षेप घेण्याचे कारण नाही. पण तरीही तसे आक्षेप घेतले जात आहेत.
आणखी वाचा – गांधीजींवर दोषारोप करून मोकळे होण्यापूर्वी…
यावर ‘नवजीवन’चे म्हणणे काय? तर, ‘स्वत:ला गांधीवादी म्हणवणारे अनेक लोक कोत्या मनाचे आहेत. ते फारच आडमुठे आहेत. नवे काही स्वीकारण्याची त्यांची तयारीच नसते..’ असे.
‘नवजीवन’च्या म्हणण्यात असेलही तथ्य. पण हे असे म्हणताना सुमारे तीन वर्षांपूर्वीचा संदर्भ येथे आठवतो. तो संदर्भ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांना भेट दिलेल्या पुस्तकाचा. ‘द गीता- अकॉर्डिग टू गांधी’ हे ते पुस्तक. हे पुस्तक ओबामा यांना दिल्याबद्दल गुजरात विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. सुदर्शन अय्यंगार यांनी आक्षेप घेतला होता. आक्षेप त्या पुस्तकाबद्दल नव्हता, तर ओबामा यांना त्या पुस्तकाची जी प्रत दिली त्याबद्दल होता. ‘नवजीवन’च्या या पुस्तकाची आधीची आवृत्ती व ओबामा यांना दिलेल्या पुस्तकाची आवृत्ती यांत फरक होता तो मुखपृष्ठाचा. आधीच्या आवृत्त्यांवर स्वत: महात्मा गांधी व अन्य काही छायाचित्रे होती. मात्र, नंतर त्यांची जागा घेतली ती सुदर्शनचक्र व शंखाने. भगवद्गीतेच्या अनुषंगाने सुदर्शनचक्र व शंख यांचे संदर्भ काय ते सगळ्यांनाच ठाऊक. ते संदर्भ महाभारतामधील युद्धाचे. ‘अहिंसा हेच अस्त्र मानणारे महात्मा गांधी यांच्या दृष्टीने महाभारत हे युद्धकाव्य नाही. स्वत:चा आंतरिक पालट, स्वयंशिस्त अशा कोनातून गांधीजी महाभारताकडे बघत. त्यामुळे त्या पुस्तकावर शंख व सुदर्शनचक्र यांची चित्रे असणे सर्वथा गैर आहे,’ असा अय्यंगार यांचा आक्षेप होता. तो ‘नवजीवन’ने ‘पुस्तकावर शंख छापणे म्हणजे हिंसा आहे असे कुणाला वाटत असेल तर वाटू दे. मुळात विद्यापीठाने शिकविण्याचे काम करावे. इतर गोष्टींकडे लक्ष देऊ नये,’ अशा शब्दांत धुडकावून लावला.
सुरुवातीला वैचारिक व तात्त्विक पातळीवरील वाटत असलेला वाद पुढे ‘नवजीवन’ने विद्यापीठाला दिलेली देणगी, तिचा वापर, हिशेब अशा वळणावर गेला. आणि आपल्याकडे बहुतांश तात्त्विक चर्चाची जशी वासलात लागते तशीच याचीही लागली.
पण तरीही मूळ मुद्दा उरलाच मागे.
‘नवजीवन’ने जे काही केले ते योग्य केले का? आणि जे काही करीत आहेत ते योग्य आहे का?
आणखी वाचा – गांधींच्या लढ्यापासून प्रेरणा घ्या; लादेनने केले होते समर्थकांना आवाहन
तर- गांधींसारख्या माणसाची पुस्तके प्रसिद्ध करताना केवळ त्यांच्या शब्दांचा विचार करून चालत नाही, तर पुस्तकाची मांडणी, त्याचे मुखपृष्ठ, त्यातील छायाचित्रे यांचाही बारकाईने विचार करायलाच हवा. अन्यथा, गांधीजींना पळवून नेऊन, त्यांच्यावर छापा टाकून त्यांना आपल्याच गोटात ओढण्याचे जे विपरीत प्रयत्न सुरू आहेत, त्यांना बळच मिळेल. ‘नवजीवन’सारख्या संस्थेला याची जाणीव नसेल असे वाटत नाही.
गांधीजींव्यतिरिक्त इतरांचेही साहित्य प्रसिद्ध करण्याच्या त्यांच्या निर्णयावर आधीच म्हटल्याप्रमाणे सरसकट आक्षेप घेण्याचे खरोखर कारण नाही. पण त्यातही पुस्तकांची निवड करताना ‘नवजीवन’ने तारतम्य बाळगायला हवे, ही अपेक्षा आहेच. या अपेक्षांची जाणीव ‘नवजीवन’ला नसेल असेही वाटत नाही. पण या अपेक्षा केवळ वाऱ्यावर विरून जाऊ नयेत, एवढीच अपेक्षा. अन्यथा ‘हे राम!’ म्हणून सुस्कारा टाकण्याचा पर्याय आहेच आपल्याला. सोपा व सोयीचा.
राजीव काळे rajiv.kale@expressindia.com