ही बातमी आपल्याकडची नाही. म्हणजे महाराष्ट्रातली नाही आणि भारतातलीही नाही. गेल्या वेळी ज्या पुस्तकांच्या गावाचा उल्लेख झाला होता त्या हे ऑन वेच्या वेल्सला जवळच असलेल्या ब्रिटनमधली ही बातमी. ब्रिटिश मंडळी म्हणजे तालेवार, शिस्तप्रिय आणि त्याचसोबत साहित्यादी विषयांत चोखंदळ रस असणारी अशी एक प्रतिमा. ही प्रतिमा दीर्घकाळापासूनची. पण या प्रतिमेमागचे आजचे सत्य त्यास जागणारे आहे? इंग्रजी साहित्याला जागतिक परिमाण मिळवून देण्याचे महत्त्वाचे काम याच ब्रिटनमधील असंख्य नाटककार, कादंबरीकार, कवी यांनी केले, हा त्यांच्यासाठी गौरवास्पद इतिहास. पण आजचे वर्तमान या गौरवास्पद इतिहासाला धरून आहे?

हे प्रश्न ब्रिटिशांसह सगळ्यांनाच पडण्याचे कारण म्हणजे तेथील ‘रॉयल सोसायटी ऑफ लिटरेचर’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून उघड झालेले तथ्य. ‘रॉयल सोसायटी ऑफ लिटरेचर’ ही सन १८२० मध्ये स्थापन झालेली जुनी-जाणती संस्था. साहित्यविषयक काम सातत्याने करणारी. साहित्य उपक्रम सातत्याने राबवणारी. या संस्थेने ब्रिटनमध्ये एक सर्वेक्षण केले. कादंबरीकार कादंबरी लिहितात, कथाकार कथा लिहितात, कवी कविता लिहितात, आणि कोण कोण आपापल्या आवडीनुसार, वकुबानुसार काय काय लिहीत असतात. हे सारे ठीकच. पण वाचक काय वाचतात? मुळात वाचक साहित्य वाचतात का? असे अगदीच मूलभूत आणि काहीसे बाळबोध प्रश्न हाताशी घेऊन या संस्थेने सर्वेक्षण केले. सर्वेक्षणात सहभागी करून घेतलेल्यांचा आकडा- दोन हजार. म्हणजे तसा फारच कमी. पण या दोन हजारांच्या सहभागातील सर्वेक्षणातून जे निष्कर्ष हाती आले ते धक्कादायक आहेत. काय आहेत हे निष्कर्ष?

या दोन हजार लोकांपैकी- ‘जेन ऑस्टिन कोण बुवा? जॉर्ज ऑरवेलचे नावही आम्ही कधी ऐकलेले नाही.. चार्ल्स डिकन्स? कोण हे गृहस्थ?’ असे प्रश्न करणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी होती.

अनेकांची गाडी शेक्सपिअर, डिकन्स, रोलिंग यांच्यापलीकडे सरकली नाही.

१५ टक्के लोक म्हणाले की, साहित्य वाचणे म्हणजे फारच अवघड बुवा. तर ६७ टक्के म्हणाले, आम्ही वाचतो ते रोजच्या जगण्यातील धबडग्याचा ताण जरा हलका व्हावा, म्हणून. बहुतांशांची पहिली पसंती शेक्सपिअरला होती. २० टक्के लोकांना एकाही साहित्यिकाचे नाव सांगता आले नाही.

आणि या निष्कर्षांतील एक महत्त्वाचा निष्कर्ष असा की, जी मंडळी थोडेफार वाचतात त्यांना माहिती असलेले लेखक हे जुन्याच काळातील ‘लोकप्रिय’ या सदरातील आहेत. नव्या लेखकांबाबत त्यांना माहिती नाहीच.

आता हे सर्वेक्षण दूर तिकडच्या ब्रिटनमधले. त्याचे निष्कर्ष काही का असेनात. आपल्याला काय करायचे आहे त्याचे? साहित्य वगैरेत नसेल उरलेला रस त्या मंडळींना.. तर त्यांचे ते बघून घेतील की! साहित्यिक व सांस्कृतिक उन्नती गरजेची असते असे त्यांना वाटत नसेल तर त्यांचा मार्ग त्यांना खुला आहे की- असे वाटू शकते आपल्याला.. या इथल्या महाराष्ट्रातील आपल्याला.

या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांवरून तिकडे ब्रिटनमधील साहित्यप्रेमींमध्ये चर्चा सुरू आहेच. त्या चर्चेतील सूर काळजीचा आहे. तो तसा असणे स्वाभाविकच. ब्रिटनमधील तो काळजीचा सूर इथे आपल्यालाही ऐकू येऊ  शकतो. आणि त्या सुरांचे पापुद्रे अलगद उलगडण्याचा प्रयत्न केला तर त्या पापुद्रय़ांना अगदी आपले.. महाराष्ट्रातील काळजीचे सूर बिलगलेले असल्याचेही ध्यानात येऊ  शकते. आणि त्यासाठी ब्रिटनमधील ‘रॉयल सोसायटी ऑफ लिटरेचर’ने केले तसे सर्वेक्षणही करण्याची गरज नाही. भोवताली सहज पाहिले तरी काही गोष्टी ध्यानी येतात.

आपल्याकडेही साहित्याची परंपरा जुनी, प्राचीन आहेच. पार अगदी चक्रधरस्वामींच्या लीळाचरित्रापासून, ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीपासूनचे दाखले त्यासाठी देता येतात. अनेकदा अशा प्राचीन ग्रंथांची मोजणी ‘आध्यात्मिक, धार्मिक’ अशा श्रेणींत केली जात असली तरी साहित्यदृष्टय़ा त्यांचे असलेले स्थान मोठेच. त्या प्राचीन काळापासून ते आजपर्यंतच्या साहित्याच्या अनुषंगाने वाचकांकडे नजर टाकली, त्यांच्या पसंतीचा अदमास घेतला तर जे काही दिसते ते त्या दूरच्या ब्रिटनमधील ‘रॉयल सोसायटी ऑफ लिटरेचर’च्या निष्कर्षांशी साधम्र्य सांगणारेच! ही साधम्र्ये कशी?

तर ती नोंदवण्याआधी दिवंगत ज्येष्ठ समीक्षक रा. ग. जाधव यांनी साहित्य संमेलनात केलेला एक प्रश्न येथे मांडणे उचित ठरेल. ‘आपल्याकडील संतसाहित्य थोरच. त्यातली शब्दकळा, अर्थघनता या बाबी निर्विवादपणे श्रेष्ठ. पण या साहित्याच्या पलीकडे आपण जाणार आहोत की नाही?’ असा प्रश्न जाधव यांनी केला होता. त्यांच्या त्या प्रश्नाचा संदर्भ होता तो- वाचकाने वर्तमानाशी निगडित असण्याचा. आता या वर्तमानाशी निगडित असण्याच्या पाश्र्वभूमीवर आपल्याला आपल्याकडेच पाहता येईल.

आपण मराठी वाचक खूप जाणते, सुज्ञ आहोत असे सातत्याने म्हणतो. साहित्य संमेलनादी प्रसंगी ही वैशिष्टय़े आमच्याकडे आहेत, असे आपण मिरवतोदेखील. पण या जाणतेपणात, सुज्ञपणात नव्याचे स्वागत.. निदान मूल्यमापन करणे आपण समाविष्ट करतो की नाही, हा मोठाच प्रश्न आहे. ब्रिटनसारखे सर्वेक्षण आपल्याकडे केले (अशा प्रकारची सर्वेक्षणे वेगवेगळ्या निमित्ताने वृत्तपत्रे वा इतर माध्यमे अधूनमधून करीत असतातच!) तर त्याचे काय निष्कर्ष येतील याचा अंदाज सहजी करता येऊ  शकतो.

म्हणजे आजही ग्रंथालयांत काही विशिष्ट लेखकांच्या पुस्तकांनाच सर्वाधिक मागणी असते. काही विशिष्ट लेखकांच्या पुस्तकांचा खप सर्वाधिक असतो. अमेरिकेत वा परदेशात राहणाऱ्या मराठीजनांत तर ही बाब अतिशय ठळकपणे आढळणारी. आपल्या देशापासून, माणसांपासून दूर असलेल्या या मंडळींना भाषक, सांस्कृतिक चिन्हे कदाचित मानसिक आधार व आपुलकी देत असावीत.. त्यांना हळवे करीत असावीत. त्यामुळेच परदेशात गेलेल्या कालच्या पिढीला जे लेखक-कवी आवडत होते, तेच आजच्या पिढीतील बहुतांशांना आवडतात- असे होत असावे का? सर्वाधिक मागणी असणारे हे लेखक आजचे नव्हेत. म्हणजे काळाच्याही दृष्टीने आणि लिखाणाच्याही दृष्टीने. ही मंडळी मराठी माणसाची निर्भेळ करमणूक करणारी, त्यांचे रंजन करणारी, त्यांचा सांस्कृतिक पट समृद्ध करणारी. हे काम या लेखकांनी त्या काळात अगदी आनंदाने, मनमुक्तपणे केले. त्यांच्या काळाच्या पटावर ते मोठे होतेही. हे सारे खरेच. त्यासाठी या लेखकांप्रती कृतज्ञताभावही बाळगायला हवा, यात काडीमात्र शंका नाही. मात्र, त्याच त्या लेखनात, त्याच त्या स्मरणरंजनात, त्याच त्या साहित्यिक, सामाजिक, बौद्धिक, मानसिक, वर्गीय जाणिवांत किती काळ अडकून पडायचे, याचाही विचार करायला हवा. ती मंडळी होतीच थोर.. तर त्यांचे ऋण मानून, वाटल्यास त्यांना अगदी मन:पूर्वक कृतज्ञतेने नमस्कार करून पुढे जाण्याचा, पुढे बघण्याचा विचार करायला  हवा. हा असा पुढे जाण्याचा, पुढे बघण्याचा विचार अजिबातच होत नाही असे नाही. मात्र, त्याचे प्रमाण आवश्यक तेवढे नाही. त्याने काय होते? तर आजच्या नसलेल्या लेखकांचे काहीच बिघडत नाही. आणि हयात नसलेल्या लेखकांचे तर त्याहूनही काही बिघडत नाही. बिघडते ते जिवंत असलेल्या आजच्या आणि उद्याच्या लेखकांचे.

कारण कालच्यांचे कौतुक करण्यात आणि त्यांच्या शब्दांमध्ये आपण इतके रमून जातो, की त्यात आजच्यांकडे थोडे दुर्लक्षच होते. हे असे दुर्लक्ष करायचे आणि मग- अरेरे.. अमका एक लेखक, अमका एक कवी हयातभर दुर्लक्षित, उपेक्षितच राहिला बिचारा- असे लटक्या पश्चात्तापाचे उसासे सोडायचे, ही आपली आवडती सवय.

पश्चात्ताप अगदीच अनावर झाला आणि तो लेखक हयात नसेल तर त्याच्या स्मारकाची मागणी करायची.. एवढे पुरते आपल्याला.

नव्याचे स्वागत.. किमान मूल्यमापन (फक्त समीक्षकांकडून नव्हे; वाचकांकडून-) मराठीत अजिबातच होत नाही असे नाही. मात्र, ते आवश्यक प्रमाणात होत नाही, हे कुणीही मान्य करेल. त्या लेखकांच्या दृष्टीने आणि वाचक म्हणून आपला विकास होण्याच्या दृष्टीने हे काही उचित नाही.

तर ही सगळी मांडणी त्या ब्रिटनमधल्या एका सर्वेक्षणाच्या धर्तीवर. आता यावर कुणी ‘बघा- तिकडेही आपल्यासारखेच चालले आहे. त्यामुळे आपल्याला कुणी बोल लावण्याचे कारणच नाही..’ असे म्हटले नाही म्हणजे मिळवली.

राजीव काळे rajiv.kale@expressindia.com

Story img Loader