कल्पना करा, जी. ए. कुलकर्णी यांचे ‘डोहकाळिमा’, चिं. त्र्यं. खानोलकर यांचे ‘गणुराया आणि चानी’, सुप्रिया दीक्षित यांचे ‘अमलताश’, भालचंद्र नेमाडे यांचे ‘हिंदू’, श्रीराम लागू यांचे ‘लमाण’, नंदा खरे यांचे ‘अंताजीची बखर’ अशी पुस्तके दिली साधारणत: पंधरावर्षीय मुलामुलींच्या हातात.. आणि सांगितले त्यांना : वाचा.. तर काय होईल? अगदी सक्तीच केली तर वाचतीलही; पण या अशा पुस्तकांमध्ये जे काही मांडले आहे, जो या पुस्तकांचा गाभा आहे त्यापर्यंत ही मुले पोहोचू शकतील? थोडे कठीण वाटते. कारण उल्लेख केलेल्या या पुस्तकांची जातकुळी पाहता त्यांच्या गाभ्यापर्यंत पोहोचणे ही तशी सहज, सुलभ गोष्ट नाही. शिक्षण, जगतानाचे अनुभव, दृष्टी विकसित होण्याची प्रक्रिया अशा अनेक घटकांनी माणसाची वाचनदृष्टी विस्तारत, समृद्ध होत जाते. या विस्ताराला अंत नाही, हे खरे असले तरी काहीएक किमान विस्तार होणे हे अशा रीतीच्या साहित्याच्या वाचनासाठी, ते आकळून घेण्यासाठी आवश्यकच. हा असा विस्तार वयाच्या पंधराव्या वर्षी होणे, ही गोष्ट तशी दुर्मीळच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मग या वयोगटातील मुलांनी वाचायचे काय? हे वय तसे अडनिडे. बालसाहित्यातील अद्भुत गोष्टी जेवढय़ा लहानपणी रुचत होत्या, तेवढय़ा त्या आता रुचत नसतात. त्यात पूर्वी ज्या तन्मयतेने रमायला व्हायचे, तेवढे आता होता येत नाही. हे लहानग्यांचे साहित्य. आपल्याला हे नको. आपण आता मोठे झालेलो आहोत.. किंवा होत आहोत. म्हणून आपल्याला मोठय़ांचे साहित्य वाचायला हवे. मात्र, ते साहित्य वाचायला घेतले तर फार वाचवत नाही. कंटाळा येतो. का? तर त्यातील शब्द, मांडणी, अर्थ या गोष्टी चटकन् समजत नाहीत. खूप कठीण वाटतात त्या. म्हणून मग पुस्तक हाती धरावेसे वाटले तरी थोडय़ाच वेळात ते मिटून ठेवावेसे वाटते..

या वयातील मुला-मुलींपुढे वाचनासंदर्भातील हे प्रश्न तसे जटिलच. मग ते सोडवण्यासाठी काय करायला हवे? बालसाहित्य तर त्यांना देऊन उपयोग नाही. मग मोठय़ांचेच साहित्य जर थोडे सुलभ करून त्यांच्या हाती दिले तर..?

हे सुलभीकरण म्हणजे काय? तर मोठय़ांच्या साहित्यातील मूळ गाभ्याला धक्का न पोहोचविता ते या मुलांच्या हाती देणे. भाषाशैलीत थोडे बदल, शब्दांत थोडे बदल, मांडणीत थोडे बदल वगैरे करून. हे बदल काळाला अनुसरून, तसेच ज्या वयाची मुले हे साहित्य वाचणार आहेत त्यांची समज, त्यांचे भाषाज्ञान, त्यांचे संकल्पनाज्ञान यांबाबत एक ठरावीक चौकट आखून केलेले..

या अशा गोष्टींचा उपयोग काय? तर- वाचक घडण्याच्या शक्यता वाढविणे.

कशा?

तर- वर उल्लेख केल्याप्रमाणे या वयातील मुलांना मोठी माणसे जे वाचतात ते वाचण्याची इच्छा असते; पण ते फारसे उमजत नाही. अशा वयात मोठय़ांचेच साहित्य, पण वेगळ्या व सुलभ रूपात त्यांच्याकडे दिल्यास वाचनाबाबतची त्यांची ओढ टिकविण्यास मदत होईल. वाचन सुटण्याची खूपच शक्यता असलेल्या या वयात हा असा उपाय नक्कीच परिणामकारक ठरू शकतो. हे असे प्रयोग परदेशात बऱ्यापैकी झाले आहेत आणि रुजलेही आहेत. अगदी शेक्सपिअरच्या जाडजुड पुस्तकांच्या सुलभ इंग्रजी भाषेतील आवृत्त्या तेथे मिळतात. पंधराच्या वयोगटातील मुलांबरोबरच मोठय़ांनाही त्या आवडतात. मोठेही ती पुस्तके मनापासून वाचतात.

हे सारे आठवण्याचे आणि आठवण करून देण्याचे कारण म्हणजे आपल्या मराठीत होऊ घातलेला असा एक प्रयोग. या प्रयोगाला हात घातला आहे तो ज्योत्स्ना प्रकाशन आणि पुण्यातील साहित्यप्रेमी भगिनी मंडळ यांनी. आपल्याकडे कुमारवयीन मुलामुलींसाठी फारसे साहित्य उपलब्ध नाही. बालसाहित्यातही वयोगटाचे फारसे भान राखले जात नाही. जे मोठय़ांसाठी नाही ते बालसाहित्य- असा शिक्का सरसकट मारला जातो. या बालसाहित्याचा टप्पा पार केल्यानंतरच्या पुढच्या टप्प्यात मुलांहाती चांगले साहित्य लागावे, या हेतूने हा प्रयोग हाती घेतल्याचे ज्योत्स्ना प्रकाशनचे मिलिंद व विकास परांजपे सांगतात. या मंडळींनी प्रकल्प हाती घेतला आहे तो पहिल्या टप्प्यात एकूण दहा पुस्तके संक्षेपित व सुलभ स्वरूपात प्रसिद्ध करण्याचा! नाथमाधव यांची ‘वीरधवल’ ही कादंबरी, गो. नी.  दांडेकर यांची ‘आम्ही भगीरथाचे पुत्र’ ही कादंबरी, श्री. ज. जोशी यांची ‘आनंदी गोपाळ’ व श्री. ना. पेंडसे यांची ‘हत्या’ ही कादंबरी ही त्यातली काही पुस्तके. या पुस्तकांचे साहित्यिक, सांस्कृतिक असे स्वत:चे वेगळे मूल्य आहे. कुमारवयातील मुले ही पुस्तके मूळ स्वरूपात वाचण्याची शक्यता कमी. मात्र, संक्षेपित आणि सुलभ स्वरूपात ती त्यांच्या हाती आल्यास ती ते वाचण्याची शक्यता अधिक. आणि त्यांचे वाचनसातत्य राहण्याची शक्यताही तितकीच अधिक.

आपल्या मराठी वाचकांसाठी तसा हा प्रयोग नवीन. पण एका अंगाने पाहायला गेल्यास असे प्रयोग आपल्याकडे कितीतरी वर्षांपासून होत आले आहेत. ते प्रयोग झाले व आजही होत आहेत ते पौराणिक साहित्याबाबत. पौराणिक साहित्य सुलभ स्वरूपात व सारस्वरूपात देणे व आपण ते वाचणे ही परंपरा जुनीच आहे. आणि आपण ते अगदी आनंदाने, अगत्याने स्वीकारलेही आहे. त्यामुळे हे काही भलतेच आणि नको ते घडत आहे असे वाटण्याची खरोखर काही गरज नाही. ‘साहित्यावर काय हे दिवस आले..!’ असले उमाळे, उसासे टाकण्याचीही आवश्यकता नाही. अशा प्रयोगांमुळे वाचनसंस्कृतीच्या संवर्धनात हातभार लागत असेल तर त्याला नाके मुरडून चालणार नाही. खुल्या मनाने त्याचे स्वागतच व्हायला हवे. विशेषत: व्हॉट्स अ‍ॅप, ब्लॉग आदी माध्यमांमुळे पुस्तकांचे वाचन कमी होत चालले आहे, अशी खंतभावना बळावल्याच्या काळात तर हे स्वागत निकडीचेच.

यात एक मुद्दा असाही, की हल्ली मोठा मजकूर वाचण्याची उसंत, सबुरी कुणाकडे नसते.. त्यामुळे असे पुस्तकांचे संक्षिप्तरूप चांगलेच.. अशा उठवळ भूमिकेतून या प्रयोगाकडे कुणी पाहू नये. या अशा भूमिकेपेक्षा खूपच वेगळी भूमिका या प्रयोगामागे आहे. त्यात आहे ती वाचक टिकवून धरण्याची इच्छा आणि वाचनासाठी उसंत काढावी लागते, सबुरी ठेवावी लागते, हे मुद्दे वाचकावर ठसविण्याची ताकद. शिवाय एक शक्यता अशीही, की ही पुस्तके वाचल्यानंतर त्यात रस वाटल्यास मोठी मंडळी मूळ पुस्तक वाचलेले नसल्यास त्याकडे वळू शकतात. एक अधिक एक बरोबर दोन असा ढोबळ, बाळबोध हिशेब वाचनसंस्कृतीत नसतो, हे मान्य. तरीही या प्रयोगाबाबत जसा भाबडा आशावाद नको, तसाच टोकाचा टीकाभाव, निरुत्साहही नको. मराठी साहित्यात काही वेगळे आणि चांगले घडत असेल तर त्याची दखल घ्यायलाच हवी आणि त्याचे स्वागतही करायला हवे.

राजीव काळे rajiv.kale@expressindia.com