शब्दांमध्ये खरोखरच ताकद असते का? शब्दांमध्ये म्हणजे लिखित शब्दांमध्ये- म्हणजेच साहित्यामध्ये.
की, शब्द म्हणजे अंगार, ते क्रांती घडवू शकतात, ते सत्ताधाऱ्यांना, व्यवस्थेला वठणीवर आणू शकतात, ते दुर्जनांना फटकारे मारू शकतात, ते सत्ताचक्र फिरवू शकतात, वगैरे वगैरे गोष्टी आपण फक्त सुविचारांच्या स्वरूपातच वाचायच्या? किंवा मग साहित्य संमेलनांच्या भाषणात ऐकायच्या?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

किंवा थोडं वेगळं- म्हणजे शब्द जग घडवू शकतात, स्वर्गाला धरतीवर आणण्याची ताकद शब्दांमध्ये आहे, माणूस आमूलाग्र बदलण्याची ताकद शब्दांमध्ये आहे, समाज घडविण्याची ताकद शब्दांमध्ये आहे, वगैरे गोष्टींकडेही भिंतींवरील सुविचारांकडे पाहतो त्याचप्रमाणे पाहायचे?

की, आपले शब्द बापुडे केवळ वारा.. अर्थ राहतो मनात सारा.. हेच खरं?

ज्या लोकांसाठी लिखित शब्द अतिपरिचयाचे झाले असतील, ज्यांना ते गुळगुळीत भासत असतील, किंवा ज्यांना जगताना काही विपरीत अनुभव आले असतील त्यांच्यासाठी ‘शब्द बापुडे केवळ वारा..’ हे खरं असू शकतं. त्यांच्यापुरतं. पण तरीही शब्दांचं महत्त्व, त्यांची उपयुक्तता माहिती असतेच एकुणात सामान्यांना. विशेषत: जेथे शब्दांवर नको त्यांची सत्ता चालत असेल तेथे तर लोकांना शब्दांचं महत्त्व अधिकच.

जेथे साहित्याबाबतचे कार्यक्रम कुठे ना कुठे सातत्याने होत असतात, जेथे कविसंमेलने सतत होत असतात, जेथे कथावाचनाचे उपक्रम सुरू असतात, जेथे ठरावीक हंगाम हा साहित्य संमेलनांचा असतो, जेथे वाचनालये वा दुकानांत पुस्तके उपलब्ध होणे ही फारशी कठीण गोष्ट नसते.. अशा ठिकाणी- म्हणजे आपण जेथे राहतो तेथे शब्दांचे महत्त्व कळणार नाही असे नाही. मात्र, त्यांची निकड कळते आपल्याला? की अतिपरिचयात अवज्ञा.. असला प्रकार?

या प्रश्नांचं उत्तर काश्मीरमधील साहित्यिक आणि साहित्यप्रेमीच देऊ  शकतील चांगलं.

काश्मीरमधील साहित्यिकांची परंपरा तशी खूप जुनी आणि मोठीही. अगदी संत लल्लेश्वरी यांच्यापासून ते ज्ञानपीठविजेते कवी रहमान राही यांच्यापर्यंत आणि अहमद शबीर यांच्यापासून ते मिर्झा वहीद यांच्यापर्यंत कितीतरी नावे घेता येतील. ‘नेआब’, ‘शीरझा’ अशी पूर्णपणे साहित्यिक स्वरूपाची अशी मासिकेही निघतात तेथून. काश्मीरमधील सध्याच्या परिस्थितीतही असे काही तेथे चालू आहे. ही सध्याची परिस्थिती अचानक उद्भवलेली नाही. ती वर्षांनुवर्षे तशीच आहे. तिची तीव्रता कमी-अधिक होत असते अधूनमधून. दहशतीचे वातावरण, रक्तपात, साध्या साध्या गरजांची- सुविधांची कोंडी, बेलगाम वक्तव्ये, अस्वस्थता, घुसमट असा सारा माहोल. पर्यटन कंपन्यांच्या काश्मीर विशेष पॅकेजच्या जाहिराती पेपरात दिसू लागल्या आणि लोक तिकडे जाऊ  लागले की तेथील परिस्थिती बरी आहे, हा आपला सर्वसाधारण मापदंड. मात्र ,ती कधी बिघडेल काहीच सांगता येत नाही अशी स्थिती. या असल्या स्थितीत कुणाला वेळ असणार साहित्याकडे वगैरे बघायला? कुणाची मन:स्थिती असणार अशा परिस्थितीत काही लिहिण्याची, काही वाचण्याची?

तर या प्रश्नांची उत्तरे खूप काही उत्तम नसली तरी ती नापास दर्जाचीही नाहीत. भोवतालच्या नकारस्थितीतही काश्मीरमध्ये शब्दांना आजही धुमारे फुटत आहेत. ते धुमारे पाहण्याची, अनुभवण्याची आजही काश्मीरमधील साहित्यप्रेमींची इच्छा आहे.

आता हे धुमारे कसे असणार?

तर..

‘गर फिरदौस बर रूये जम्मी अस्त।

हमी अस्तो हमी अस्तो हमी अस्तो..’

म्हणजेच ‘धरतीवरील स्वर्ग येथेच आहे.. येथेच आहे.. येथेच आहे..’ असा पुकारा त्या धुमाऱ्यांत असणे अशक्यच. निदान कठीण तरी. घराबाहेर गोळीबार सुरू आहे आणि ते ऐकत असलेला कवी- ‘हे प्रिये, झेलम नदीच्या काठची आपली पहिली भेट स्मरते का तुला?’ असे काही लिहिणे थोडे.. फारच अवघड की! भोवतालची अस्वस्थता, घुसमट ही आताच्या साहित्यिकांच्या शब्दांत येणारच. ‘काय हे..? हे असे काय लिहितायत? छे छे! भलतेच आहे हे!’ असे वाटेलही कुणाला ते वाचून. पण त्यांच्यासाठी त्या लिखाणाला तूर्तास पर्याय नाही.

तरीही लोक लिहिते आहेत, बोलते आहेत ही बाब नक्कीच समाधानाची. आणि त्यांचे लिखाण वाचले जात आहे, त्यावर चर्चा होत आहे, ही त्याहून आणखीन समाधानाची बाब. अगदी नुकतीच त्याची प्रचीती आली. ‘समासा’तील आजचे हे लिखाण त्यासाठीच.

जम्मू-काश्मीर कला, संस्कृती, भाषा अकादमीने पर्यटन विभागाच्या सहकार्याने मध्यंतरी एक आठवडय़ाचा कार्यक्रम आयोजित केला होता. ‘कल्चर ऑन क्रूज’ हे त्या आठवडाभराच्या कार्यक्रमाचे नाव. क्रूज का? तर हा कार्यक्रम झाला तो श्रीनगरमधील प्रख्यात दल सरोवराच्या काठी. त्यात सहभागी झाले होते लेखक, कवी, संगीतकार अशी मंडळी. आणि त्यास प्रतिसादही मिळाला चांगला. दल सरोवरासारख्या निसर्गश्रीमंत ठिकाणी शब्द, स्वरांचा आस्वाद घेण्याची ही कल्पना सुंदरच. हा कार्यक्रम यशस्वी झालाच; शिवाय यापुढेही असे साप्ताहिक कार्यक्रम आयोजित करण्याचा अकादमीचा प्रयत्न असेल.

काश्मीरमधील आणि खुद्द श्रीनगरमधील सद्य:स्थिती लक्षात घेता तेथील धुमसत्या वातावरणात असा काही कार्यक्रम होणे ही निश्चितच दिलासादायी आणि स्वागतार्ह बाब. त्यात कवी मंडळींनी कविता म्हटल्या, संगीतकार-गायक यांनी गाणी सादर केली- एवढय़ा दृश्य परिणामांपुरता हा दिलासा नाही. तर अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने चार जाणते, सुजाण, लिहिते, वाचते लोक एकत्र येतात, कलेचा आस्वाद घेताना त्यावर चर्चा करतात, आणि आयुष्यावरही बोलतात, हा त्यातील भाग अधिक महत्त्वाचा. चांगल्या अर्थाने व्यक्त होण्यावरही बंधने असताना असे काही होणे स्वागताचेच. सुचले काही की टाकले व्हॉट्स अ‍ॅपवर, दिले फेसबुकवर डकवून, करून टाकले १४० शब्दांच्या मर्यादेत ट्विट, झटकन् काढला फोटो आणि टाकला इन्स्टाग्रामवर.. ही रीत आपल्याला ओळखीची. पण जिथे आठवडेच्या आठवडे इंटरनेट बंद असते, मोबाइल सेवा खंडित करण्यात येते, मुक्त संचारावर बंधने आलेली असतात, दहशत अनेक घटकांची असते- तेथील लोकांना या सुविधा दुर्लभच. पुस्तके प्रकाशित होणे ही आपल्यासाठी अतिशय सवयीची बाब. ती दुकानांत विकत घेता येणे हीदेखील तितक्याच सवयीची बाब. मात्र, या गोष्टी ज्यांच्यासाठी बिनसवयीच्या आहेत त्यांची मन:स्थिती समजू शकतो आपण. एखादे पुस्तक आवडले तर इंटरनेटवर मागणी नोंदवायची- की काही दिवसांत पुस्तक घरपोच.. हा आपल्यासाठी शिरस्ताच. पण जेथे अशा मार्गाने पुस्तके पोहोचू शकत नाहीत, तेथील वाचकांची मन:स्थितीही नक्कीच समजू शकतो आपण.

हा असा पट काश्मीरमधील लोकांच्या मागे धरला की तेथील साहित्यिकांची लेखनाची, व्यक्त होण्याची आणि वाचकांची वाचनाची, त्यावर संवाद साधण्याची निकड किती असोशीची असू शकते याची जाणीव होईल आपल्याला. हा असा संवाद सुरू झाला म्हणजे सगळ्या समस्या सुटतील, असल्या भाबडय़ा समजुतींत कुणीच नसेल. पण सध्याच्या वातावरणात असा संवाद होऊ  शकतो.. झाला.. आणि पुढेही होण्याची आशा आहे, ही बाब मोलाची. शब्दांची ताकद प्रकट करणारी. ‘शब्द बापुडे नाहीत वारा’ असे सांगणारी. तिचे स्वागत करायला हवे.

शब्दांशी अतिपरिचय झालेल्या आपल्यासारख्यांनी तर नक्कीच..

राजीव काळे rajiv.kale@expressindia.com