सुबोध साहित्य म्हणजे काय? दुर्बोध साहित्य म्हणजे काय?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या प्रश्नांची अगदी सुबोध उत्तरे देता येतील. ज्या साहित्यातून लिहिणाऱ्याला काय म्हणायचे आहे, हे तातडीने कळते ते सुबोध साहित्य. आणि ज्या साहित्यातून लिहिणाऱ्याला नेमके काय म्हणायचे आहे, हे तातडीने कळत नाही.. ते समजून घेण्यासाठी थोडे बौद्धिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक श्रम घ्यावे लागतात ते दुर्बोध साहित्य. आता हे  वरकरणी इतके सरळ वाटत असले तरी ते तितकेसे सरळ नाही. उदाहरणार्थ..

‘कलाकृतीच्या कोणत्याही घटकांत त्यांना स्वायत्त अस्तित्व देणारे गुण नसतात. तिचे घटक पूर्णापासून अलग करता येत नाहीत. त्यांचे नाते आंतरिक असते. कोणत्याही विश्लेषणाने ते पूर्णपणे उलगडता येत नाही. हे घटक एकमेकांच्या स्वरूपावर प्रकाश टाकणारे, एकमेकांना बदलवणारे आणि एकमेकांतून उद्भवल्यासारखे असतात..’ हा वेचा म. सु. पाटील यांच्या ‘सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध’ या पुस्तकातला.

‘ओळखीच्या वाऱ्या

तुझे घर कुठे सांग?

गरुडाच्या पंखामध्ये

डोंगरांची रांग..’

या ओळी ग्रेस यांच्या कवितेतल्या.

म. सु. पाटील यांचा वेचा साध्या वाचकांना दुर्बोध वाटू शकेल कदाचित, पण समीक्षेच्या भाषेची ओळख असलेल्यांना तो तसा वाटणार नाही. तसेच, ग्रेस यांच्या उद्धृत केलेल्या या ओळी काहींना लगेच आकळतील, काहींना उशिराने आकळतील, काहींना आकळणारही नाहीत. म्हणजेच या ओळी सुबोध वाटण्याच्या, तसेच दुबरेध वाटण्याच्या शक्यता वाचकानुसार बदलतील. म्हणजे सुबोधता व दुर्बोधता ही व्यक्तिसापेक्षच आहे. अमके शब्द, त्यांचे असे असे अर्थ, त्यांची अशी अशी रचना असा हिशेब मांडला म्हणजे एखादी कलाकृती सुबोध, व तसे न झाल्यास ती दुर्बोध असे गणित नसतेच. सुबोध व दुर्बोधही मांडणी तशी ढोबळ नाही. तरीही काही साधे, सोपे निकष लावून ती केली जातेच व त्यास प्रत्यवाय नाही.

उद्याच्या ‘मराठी भाषा दिना’च्या आदल्या दिवशी, आज हा विषय मांडण्याचे प्रयोजन म्हणजे याचविषयी फेसबुकवर झालेली, होत असलेली चर्चा. फेसबुक वा इतर समाजमाध्यमांना, त्यावरील चर्चाना किती गांभीर्याने घ्यायचे, असा प्रश्न काही जणांना पडू शकतो. या समाजमाध्यमांची प्रचंड अक्राळविक्राळ व्याप्ती, कुठल्याही विषयावर, कुठल्याही भाषेत-स्तरावर मत व्यक्त करण्याची कुणालाही खुली संधी अशा गोष्टींमुळे हा प्रश्न पडणे सयुक्तिकच. मात्र, तरीही अशा चावडय़ांवर साहित्यिक विषयांवर, काही लिहिती, जाणती मंडळी पुरेशा गांभीर्याने चर्चा करतात, मते व्यक्त करतात, हे चांगलेच लक्षण. आणि हे माध्यम आजच्या काळाचे आहे. त्याकडे सरसकट नाक मुरडून पाहणे चुकीचेच. साधारणत: अशा चर्चाच्या अखेरीस एकच एक टोक हाती लागत नाही. कुणाला काय वाटावे हा ज्याचा त्याचा प्रश्न.. ज्याच्या त्याच्या समजुतीचा प्रश्न इथवर येऊन चर्चा थांबते आणि पुढील चर्चेसाठीचा एखादा धागा हाती देऊन जाते.

तर, हाती आलेला हा धागा जरूर निरखावा, पण त्याच वेळी, सुबोधतेच्या वा दुर्बोधतेच्या आवरणाखाली आपल्याला सोयीचे, किंवा शक्य असेल तेच माथी मारण्याचा कुणी प्रयत्न करीत नाहीये ना, तशी मखलाशी त्यामागे नाहीये ना, हेही तपासून पाहणे गरजेचे.

ही मखलाशी दोन्ही बाजूंकडून असू शकते आणि त्या मखलाशीला जोड मिरवण्याची.

कुठलाही लेखक वा कवी, ‘चला आता आपण सुबोध लिहू, किंवा दुर्बोध लिहू’, असा पवित्रा घेऊन लिखाणासाठी बैठक मारत नसतो. निदान तशा आविर्भावात त्याने किंवा तिने बैठक मारू नये. इतपत प्रामाणिकपणाची अपेक्षा करायलाच हवी त्याच्याकडून. म्हणजे जो तो लेखक-कवी त्याच्या त्याच्या आंतरिक प्रेरणेनुसार, व्यक्त होण्याच्या रीतीनुसार शब्दांतून सादर होत असतो. ही बाब अत्यंत खासगी व स्वयंभू आहे. त्यामुळे तिचा गवगवा करण्याची वा त्याबद्दल मनात काही अपराधगंड बाळगण्याची कुणालाही काहीही गरज नाही. ज्याने त्याने लिहावे की आपल्याला हवे तसे. ते स्वातंत्र्य आहेच प्रत्येकाला. येथे मुद्दा येतो तो आपण लिहितो तेच श्रेष्ठ व बाकी सारे कमअस्सल, हिणकस असे मानण्याचा. म्हणजे मी सुबोध लिहिणारा असेन तर मी म्हणणार की ‘सोपे लिहिणेच अधिक कठीण असते. एक तरी ओळ लिहून दाखवा बरे सोपी’. तर मी दुर्बोध लिहिणारा असेन तर म्हणणार की- ‘सोपेपणा म्हणजे लोकानुनय. शिवाय मला जे काही म्हणायचे आहे, ज्याविषयी सांगायचे आहे तो विषयच इतका व्यामिश्र आहे की त्यात दुबरेधता येणारच.’ तर या दोन्ही गोष्टी ठीकच. पण या ठीक गोष्टींमागे कुणी काही दडवत असेल तर?

म्हणजे सोपे लिहिणे कठीण आहे, असे प्रामाणिकपणे वाटतही असेल कुणाला. पण त्या सोप्याची ढाल पुढे करून कठिणाला सामोरे जाण्याची आपल्यातील नसलेली ताकद जर कुणी लपवू पाहत असेल तर तो अप्रामाणिकपणा झाला. अवतीभवतीच्या व्यामिश्रतेला, त्यातील गहन कल्लोळाला किंवा मग भवतीच्या आनंदाला, शुभंकराला खूप आवेगाने भिडण्याची ताकद नसेल एखाद्याची, त्यातील गाभाच दिसत नसेल त्याला, ते नितांत आवेगाने शब्दांतून उतरवता येत नसेल त्याला तर ती त्याची मर्यादा म्हणू या किंवा त्याचा तो परीघ. तो ज्याचा त्याचा असतोच. आपला परीघ कमी आहे, याची खंत समजा नसेल वाटत एखाद्याला तर त्याबद्दल आक्षेप घेण्याचे काही कारण नाही. पण परीघ कमी असणाऱ्याने त्याचा वृथा अभिमान बाळगावा आणि ‘तुम्हाला तरी जमते का अशा परिघात लिहिणे’, असे दुसऱ्याला विचारावे, हा अप्रमाणिकपणा झाला आणि शहाजोगपणाही!

तसाच उलटाही प्रकार. आणि हा प्रकार तर अधिक निसरडा आणि चकवा देणारा. सर्वसामान्य वाचकांच्या दृष्टीने एखादा लेखक-कवी दुर्बोध असेल तर त्याच्या दृष्टीने ते ठीक. पण व्यक्त होण्यातील कमी असलेली क्षमता, स्वत:चा मर्यादित वकूब कुणी दुर्बोधतेच्या आड लपवीत असेल तर? म्हणजे लेखकाला मुळात जे फारसे उमगलेले नाही आणि जे मांडायचे आहे त्याबाबत त्याच्याच मनात स्पष्टता नाही, असे काही शब्दांत उतरवताना जो गोंधळ होऊ  शकतो, त्यास दुर्बोधता कसे म्हणणार? बरे, यात एक मेख अशी की बहुसंख्य समीक्षकांच्या कृपेने म्हणा किंवा साहित्यव्यवहारावर प्राबल्य असलेल्या मंडळींच्या अदृश्य दबावाने म्हणा, दुर्बोधता ही श्रेष्ठच असला काहीतरी समज आपल्याकडे पसरलेला व पसरवलेला आहे. या कृपेखाली व दबावाखाली प्रत्यक्षात सत्त्व नसलेल्या दुर्बोध लिखाणाचा उदोउदो होण्याची भीती असतेच. अनेकदा भीती असते ती लेखक-कवी स्वत:च स्वत:च्या लेखनधाटणीचा पिंजरा स्वत:भोवती तयार करून घेण्याची. हा पिंजरा इतका मजबूत की त्यातून बाहेर पडणे त्यालाच अशक्य व्हावे, तो पिंजरा हा जणू त्यांच्या अस्तित्वाची ओळख व्हावा. एखाद्या कवीची शैली दुर्बोध असेल आणि ती त्याची एक महत्त्वाची ओळखखूण ठरत असेल तर मनात येऊनही तो सुबोध लिहिण्यास धजावत नाही. स्वत:ची स्वत:पास असलेली व इतरांपास असलेली प्रतिमा जपण्याचा हा खेळ विलक्षण असला तरी एका रीतीने ही आत्मवंचनाच.

या सगळ्यात आपण.. वाचकांनी कुठे असायला हवे? काय करायला हवे? तर, सुबोध-दुर्बोध अशी सरधोपट मांडणी स्वत:च्या मनापाशी करीत असू तरी कुठलेही साहित्य हे नीटच पारखून घ्यायला हवे. वाचतानाची पाटी त्या अर्थाने कोरी हवी आपली. म्हणजे एखादा लेखक सुबोध म्हणून गणला जात असेल तर तो वाचायला घेताना गांभीर्य फारसे बाळगायचे नाही, हे चुकीचे. त्याचसोबत, दुर्बोध अशी गणती झालेल्याचे साहित्य हाती घेताना त्याचा दाब मनावर ठेवणे हेही चुकीचे. त्याचसोबत, हे काहीतरी दुर्बोध आहे, म्हणून एखादे पुस्तक तातडीने बाजूलाच ठेवून देणेही फारसे हितावह नाही. बुद्धी, मन कामाला लावायला हवे त्यासाठी. त्यातून गवसतेही कधी हाती काही. वाचक म्हणून स्वत:चा विकास घडवण्यासाठी आणखी काय हवे?

राजीव काळे rajiv.kale@expressindia.com