मालवणी, मराठवाडी, वऱ्हाडी, नागपुरी, अहिराणी, चंदगडी, झाडीबोली, कोल्हापुरी, बेळगावी, बाणकोटी.. ही अशी यादी कितीतरी मोठी होऊ शकेल. ज्येष्ठ भाषाअभ्यासक डॉ. गणेशदेवी यांच्या नेतृत्वाखाली काही मंडळींनी आस्थेने अभ्यास केला त्या अभ्यासाच्या निष्कर्षांनुसार ही यादी आणखी पुढे ६० आकडय़ांपर्यंत जाऊ शकते. ही लांबलचक यादी आपल्या मराठीच्या बोलीभाषांची. पुस्तकांतील सरकारी व्यवहारातील भाषेपासून थोडय़ा वा बऱ्यापैकी वेगळ्या, मात्र रोजच्या जगण्याच्या व्यवहारात बोलल्या जाणाऱ्या या भाषा. जागतिकीकरणाचा रेटा, प्रमाणभाषा प्रमाण असलेल्या माध्यमांची मोठी संख्या, आर्थिक व सामाजिक चलनवलन अशा अनेक गोष्टींमुळे भाषेचे सपाटीकरण होण्याचा, तिच्यातील विविधता हरवण्याचा धोका मोठा आहेच. पण तरीही मराठीतील अनेक बोलीभाषा जगल्या आहेत. मात्र केवळ त्या श्वास घेत आहेत, एवढय़ावरच समाधानी राहणे परवडणार आहे का आपल्याला? आपल्या मराठीला?
वर्धा येथे नुकतेच दहावे ‘सत्यशोधकी साहित्य संमेलन’ झाले. त्यात या बोलीभाषांच्या जगण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला तो ज्येष्ठ विचारवंत, भाषा व जनसंस्कृतीचे जाणकार डॉ. आ. ह. साळुंखे यांनी. बोलीभाषांतील शब्द स्वीकारून प्रमाण मराठी भाषा अधिक समृद्ध, सशक्त करावी असे त्यांचे म्हणणे. आता प्रमाण मराठी भाषेने बोलीभाषांतील शब्द स्वीकारायचे म्हणजे आपणच ते स्वीकारायला हवे. त्यासाठी काहीतरी पावले टाकायला हवी. त्यासाठी पहिली अत्यावश्यक गोष्ट म्हणजे- प्रमाणभाषा व बोलीभाषा यांच्यात काहीतरी सनातन युद्ध आहे, ही भावना मनातून काढून टाकायला हवी. प्रमाणभाषा ही काही आकाशातून अवतरलेली गोष्ट नाही. केवळ मूठभर शहाण्या लोकांसाठीचीही ती गोष्ट नाही. इथल्याच जमिनीतून उगवलेल्या भाषांच्या सांधणीतून ती निर्माण झालेली आहे. आणि ती सगळ्यांसाठीची आहे. किमान असायला हवी, अशी अपेक्षा तरी ठेवायला हवी. ‘अखिल भारतीय साहित्य महामंडळा’ने आखलेल्या व्याकरणाच्या नियमांच्या चौकटीत प्रमाणभाषा बद्ध आहे. राज्यभर मराठीच्या सरसकट वापरात, विशेषत: कागदोपत्री- मग तो शैक्षणिक पातळीवरील असो, वा सरकारी, आर्थिक व्यवहारांच्या पातळीवरील- एकवाक्यता राहावी, त्यात संभ्रम नसावा, या दृष्टीने तिचा वापर केला जातो. पण याचा अर्थ प्रमाणभाषेने बदलूच नये, असा मुळीच नाही. उलट तिने बदलायला हवे. जिवंत राहण्यासाठी आणि केवळ जिवंत राहण्यासाठी नव्हे, तर चांगले सशक्त होऊन मजबुतीने वाढण्यासाठी तिने बदलायला हवे. त्यासाठी बोलीभाषांमधील शब्दांशी सौहार्द वाढवणे, ते आत्मसात करणे, ते आपल्यात सामावून घेऊन प्रवाही करणे या गोष्टी अगदी सहजी करता येण्याजोग्या आहेत.
मग त्यात अडचण काय? बोलीतील शब्दांना प्रमाणभाषेत आणण्याच्या वाटेवर कुणी आडवे उभे आहे का? तर या मार्गात अगदी ठळकपणे आडव्या आलेल्या दिसतात त्या इच्छाशक्तीचा अभाव, आस्थेचा अभाव, बेफिकिरी या गोष्टी. महाराष्ट्र सरकारने काही काळापूर्वी राज्याच्या सांस्कृतिक विकासाला चालना मिळावी, तिचे जतन-संवर्धन व्हावे, या हेतूने एक समिती स्थापन केली होती, हे पाऊल नक्कीच स्तुत्य. याच समितीने ‘बोली अकादमी’ स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला होता. पण प्रस्तावाच्या पलीकडे सरकारी पातळीवर अद्याप तरी त्याची काही हालचाल दिसत नाही. ही अनास्था केवळ सरकारी पातळीवरच आहे असे नव्हे, तर समाज म्हणूनही आपण भाषेबाबत, बोलीभाषेबाबत फारसे आस्थेवाईक नाही. या अनास्थेला जोड आहे ती बोलीभाषांकडे, त्यातील शब्दांकडे खास अशा उच्चभ्रू, नाके मुरडण्याच्या वृत्तीने पाहण्याची. इंग्रजी भाषेतील शब्द, हिंदी भाषेतील शब्द, त्यांतील शब्दबंध आपण सर्रास वापरतो. ते वापरण्यावरही काही आक्षेप नाही. भाषा ही प्रवाही असते आणि प्रवास करताना सोबत खूप काही सामावून घेत असते. (आपला दिमाख दाखवण्याच्या हेतूनेही इंग्रजी शब्द कधी वापरले जातात, ही गोष्ट वेगळी!). मात्र, बोलीभाषांतील शब्द वापरायची वेळ आली की आपली जीभ आणि लेखणीही जड होते. हा न्यूनगंड की आणखी काही? डॉ. आ.ह. साळुंखे अशा शब्दांच्या वापराबाबत आग्रही आहेत. त्याचे एक साधे उदाहरण. ‘लई’ हा शब्द बोलीभाषेत कित्येक वर्षे आणि समाजातील मोठय़ा वर्गात वापरात आहे. मात्र प्रमाणभाषेने तो अद्याप स्वीकारलेला नाही. तो स्वीकारला जावा हे त्यांचे म्हणणे. हे झाले केवळ एक उदाहरण. असे शब्द खोऱ्याने मिळतील की जे सर्रास आपल्या रोजच्या जगण्याच्या व्यवहारांत आहेत, भाषिक चलनात आहेत. मात्र प्रमाणभाषेने ते स्वीकारलेले नाहीत. प्रमाणभाषेबाबतची आपली अनाठायी सोवळी व कर्मठ वृत्ती हे त्यामागील कारण आहे.
हा एक महत्त्वाचा जोडमुद्दा. पहिली इयत्तेपासून विद्यार्थ्यांना ‘शुद्धलेखना’चे धडे दिले जातात. ‘शुद्धलेखना’च्या परीक्षा घेतल्या जातात. भाषेत हे ‘शुद्ध-अशुद्ध’ कसे? मुळात ही शब्दयोजनाच खटकणारी आहे आणि कितीही नाही म्हटले तरी त्यास वर्गीय, जातीय अशी डूब आहेच. सरकारने ठरवून दिलेल्या नियमांनुसार लिहिले म्हणजे ते ‘शुद्ध’ झाले का? त्यासाठी ‘प्रमाणलेखन’ हा किंवा अन्य शब्द योजणे आवश्यक आहे. तर लेखनाकडे, शब्दांकडे पाहण्याची आपली सुरुवात होते तीच मुळी अशी. ही दृष्टी मुळात बदलायला हवी. ती बदलली तर भलेच होईल आपल्या बोलीभाषांचे आणि अर्थातच मराठीचेही! विशेषत: ‘मराठीचे काय होणार’, असे म्हणत निव्वळ गळेच काढत राहण्यात काहीही हशील नाही. तिच्यापुढील आव्हाने विविध प्रकारची आहेत आणि त्यांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठीचे मार्ग वेगवेगळे आहेत. बोलीभाषांतील शब्दांचा समावेश करून प्रमाणभाषा अधिक मजबूत करणे, तिची व्याप्ती वाढवणे, ती अधिकाधिक लोकाभिमुख करणे हा त्यातील एक मार्ग आहे. केवळ बोलण्यातीलच नव्हे, तर अगदी शैक्षणिक, आर्थिक, सरकारी व्यवहारांतील भाषाही लोकांना आपली वाटायला हवी. अन्यथा तिचा वापर वाढणार कसा? ती जिवंत, वाहती राहणार कशी? आणि भाषा म्हणजे केवळ शब्दांचा गुच्छ नव्हे. भाषा.. विशेषत: प्रत्येक बोलीभाषा आपापली संस्कृती, आपापल्या गोष्टी, आपापल्या मातीचा काहीसा उग्र असा गंध घेऊन आपल्या अंगभूत अशा तोऱ्यात वावरत असतात. या सगळ्या गोष्टी आपल्याला सांस्कृतिकदृष्टय़ाही समृद्ध करणाऱ्याच. त्यामुळे अशा बोलीभाषांचा आब राखायला हवा, त्यांचा तोरा सांभाळायला हवा.
भाषा म्हणजे तासून गुळगुळीत केलेली, दिखाऊ रंगलेप चढवलेली, बेतशीर दिखाऊ वस्तू नाही. भाषेला कंगोरे हवेतच, तिला स्वत:चे अस्सल मूलभूत रंग हवेतच, आणि ती बेतशीर तर असताच कामा नये. ती मोकळी, खुली, सैलच असायला हवी. मग भले तिच्या बेतशीर नसण्यावर कुणी मूठभरांनी नाके मुरडली तरी हरकत नाही. ते मुरडलेले नाक त्यांच्यापाशी, आपली भाषा आपल्यापाशी!
राजीव काळे rajiv.kale@expressindia.com