‘कधी येतसे क्षुद्रता कस्पटाची

कधी वाढता वाढता व्योम व्यापी

कधी धावतो विश्व चुंबावयाला

कधी आपणाला स्वहस्तेच शापी..’

या ओळी विंदा करंदीकरांच्या. आणि..

‘एक परी

फूलवेडी,

फुलासारखी

नेसते साडी,

फुलामधून

येते जाते

फुलासारखीच

छत्री घेते..’

या ओळीही त्यांच्याच.

..

‘आपण असतो उभे एकमेकांजवळ

एकमेकांशिवाय

तरीही ओळखतो भुकेचा वास, इच्छांचे वळसे..’

हे शब्द मंगेश पाडगांवकरांचे. आणि..

‘एक म्हण, दोन म्हण,

तीन चार पाच रे,

भोपळ्या भोपळ्या

टुणूक् टुणूक् नाच रे..’

हे शब्दही पाडगांवकरांचेच.

..

ग. दि. माडगूळकर लिहितात..

‘कोन्यात झोपली सतार, सरला रंग

पसरली पैंजणे, सल टाकून अंग..’

आणि तेच माडगूळकर..

‘सिंह वनाचा असतो राजा

घेती त्याची चिठ्ठी

वाघ वागतो भिऊन त्याला

गुडघे टेकी हत्ती..’

असेही लिहितात.

आपल्या मराठीत ही अशी उदाहरणं कमी नाहीत. ‘गेले द्यायचे राहुन’सारखी कविता देणारे आरती प्रभू तेवढय़ाच ताकदीची बालकविता लिहून गेले. पिकासोचं चित्रचरित्र मांडणाऱ्या माधुरी पुरंदरे अविरत, तितक्याच ताजेपणाने आपल्या लिखाणातून आणि प्रसन्न चित्रांतून यश, राधा ही बच्चेमंडळी खेळवीत असतात. या मंडळींनी मोठय़ांसाठीही लिहिलं आणि छोटय़ांसाठीही तेवढय़ाच असोशीने लिहिलं. कुणास ठाऊक, छोटय़ांसाठी लिहिण्यातील त्यांचा आनंद कदाचित काकणभर अधिकही असावा!

छोटय़ांचं जग विलक्षण अद्भुत. छोटय़ांचं वास्तव आणि मोठय़ांचं वास्तव यांत अनेकदा फरक असतो. एका वेगळ्याच जगात छोटे वावरत असतात. मोठय़ांना जे दिसतात त्यापेक्षा वेगळे आकार, रंग त्यांना दिसत असतात. मोठय़ांना ऐकू येणाऱ्या स्वरापेक्षा वेगळा स्वर त्यांना ऐकू येत असतो. म्हणूनच त्यांना जे सांगायचं असतं ते मोठय़ांपेक्षा वेगळं असणार. हे जे त्यांना सांगायचं असतं ते- जी मंडळी छानपकी मांडतात ती नि:संशय मोठी. पण आपल्या मराठीतील एकूण साहित्यव्यवहार लक्षात घेता प्रश्न पडतात ते- त्यांचं; आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे या साहित्याचं मोठेपण आपल्याला माहिती आहे का.. त्याची जाणीव आपल्याला आहे का, असे.

डोंबिवलीत नुकतंच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलं. लेखिका माधुरी पुरंदरे यांनी यानिमित्ताने संमेलनास आलेल्या लहानग्यांशी आणि त्यांच्या पालकांशीही संवाद साधला. ‘छोटय़ांसाठी लिहिल्या जाणाऱ्या साहित्याकडे बघण्याची दृष्टी आपण बदलायला हवी,’ असं त्यांचं आग्रहाचं सांगणं. कशी आहे या साहित्याकडे पाहण्याची आपली दृष्टी?

मुळात लहानग्यांसाठी लिहिताना अनेक मोठय़ांची मनात पक्की धारणा अशी की- आम्ही मोठे.. त्यामुळे आम्हाला लहानग्यांपेक्षा अधिक कळतं. त्यामुळे काय करावं, काय करू नये, अमक्या वेळी कसं वागावं, तमक्या वेळी कसं वागावं, हे सांगण्याचा वयोदत्त अधिकार आम्हालाच मिळालेला. त्यातून मग लिहिलं जाणारं साहित्य कसं असणार? तर मोठय़ांसाठी मोठीच माणसं ‘अधिक श्रीमंत व्हायचे २१ उपाय’ या पद्धतीची जी पुस्तकं लिहितात, तशा पद्धतीचं. अशा प्रकारच्या पुस्तकांतून लहानग्यांचे फारसे नुकसान होण्याची भीती नसली तरी त्यातून काय फायदा होणार, हा प्रश्नच. कारण मोठे लिहिणार मोठेपणाच्या भूमिकेतून.. एका उंचीवर बसल्याच्या आविर्भावातून. छोटे त्याकडे जरा आदरातून बघणार. पण ते किती काळ? केवळ कोरडय़ा आदराच्या पलीकडे त्यात काही नाही, हे कळलं की त्यांची चुळबुळ होणारच.

लिहिण्याची एक रीत तर थोरच. पऱ्या, राक्षस, जादू, वेताळ, बोलणारे प्राणी आदी म्हणजे बालसाहित्याचा कच्चा माल. तो हाती घ्यायचा, यमकं जुळवता येत असतील, शब्दांमधील, ओळींमधील गेयता साधता येत असेल तर त्या साच्यात तो कच्चा माल ओतायचा आणि बालकविता रचायची, किंवा कथा तयार करायची. अनेकांना तर बालसाहित्य म्हणजे बालबुद्धीचं साहित्य असंच वाटतं. मग तशाच धाटणीचं साहित्य निर्माण होणार, यात शंका ती काय?

बालसाहित्य लिहिण्याची आणखी एक रीत भाषांतराची. तेही दोन भाषांमधील, संस्कृतींमधील फरक लक्षात न घेता करण्याची. तसा फरक असेल व तो जाचत असेल तर तो आस्थेने, हळुवारपणे बाजूला सारण्याचेही यत्न न करण्याची. हे आणि अशा प्रकारचं छोटय़ांचं साहित्य कदाचित मोठय़ांना पसंत पडू शकतं. मेख आहे ती इथे..

छोटय़ांच्या अंगानं, त्यांच्या मनानं, त्यांच्या आवडीचं साहित्य त्यांच्या हाती देण्याचं प्रमाण तसं कमीच. छोटय़ांच्या हाती कुठल्या कविता द्यायच्या, कुठल्या कथा द्यायच्या, ते मोठेच ठरवणार. त्यात हरकत काहीच नाही. पण ते देताना छोटय़ांना काय द्यायला हवं, याचा एकांगी विचार करून चालणार नाही. म्हणजे छोटय़ांच्या हाती अमकंच दिलं पाहिजे. त्यांच्यावर चांगले संस्कार झाले पाहिजेत.. वगरे. छोटय़ांवर चांगले संस्कार व्हायला हवेत, यात दुमत असण्याचं कारण नाही. पण ते करताना छोटय़ांच्या मानसिकतेचा विचार हवा. आणि बदलत्या भवतालाचादेखील. उदाहरणार्थ.. साने गुरुजींचं ‘श्यामची आई’ हे पुस्तक मोठंच. त्यात साने गुरुजींनी जे सांगितलंय ते मोठंच. पण म्हणून तेच पुस्तक आज छोटय़ांनी वाचायला हवं आणि त्यातूनच संस्कार शिकायला हवेत, असा आग्रह धरणं अनाठायी ठरेल. ‘श्यामची आई’ आजच्या छोटय़ांना आवडलं तर उत्तमच. पण नाही आवडलं म्हणजे संस्कृती बुडाल्यासारखा चेहरा करून बसणं चुकीचं. त्याऐवजी ते ज्या साहित्याशी नातं जोडू शकतील, अशीच पुस्तकं त्यांना द्यायला हवीत. काळासोबत भाषा बदलणारच. सांगण्याची रीत बदलणारच. पण जे सांगायचं ते आजच्या भाषेतून सांगता येतंच की. आणि ते तसंच सांगायला हवं.

दुसरं म्हणजे शाश्वत मूल्ये वगरे ठीक. ती राखायला हवीतच. पण या मूल्यांच्या पल्याड जे आजचं जगणं आहे, तेही लहानग्यांपुढे यायला हवं. त्यात नको इतका सोवळेपणा राखून चालणारच नाही. त्याची मांडणी कशी करायची, हा कौशल्याचा भाग. पण त्यापासून मुद्दामहून दूर राहणे ही आत्मवंचनाच. त्याखेरीज संस्कारांच्या पलीकडे जाऊन मनाचं समृद्धीकरण, त्याला सौंदर्याची जाणीव करून देणं, त्याचा आस्वाद घेण्याची सवय लावणं या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. शब्दांसोबत पुस्तकातील चित्रं, रंग याकामी मोलाची कामगिरी बजावू शकतात. मराठीत काही मोजके प्रकाशक सोडले तर मोठय़ा आस्थेनं व सौंदर्यदृष्टी ठेवून लहानग्यांची पुस्तकं काढणारे तुलनेनं थोडेच. इंग्रजी भाषेतील बालसाहित्याच्या पुस्तकांमध्ये अगदी आकारापासून वेगवेगळे प्रयोग होतात, तसेही आपल्याकडे फारच क्वचित आढळतात. अर्थात इथे प्रश्न पशांचा आहेच. इंग्रजी बालसाहित्याचा खप, त्याचा वितरणपसारा, त्याचा ग्राहक, त्यातून प्रकाशकांच्या गाठी लागणारा पसा हे मुद्दे मोठेच आहेत. त्यामुळेच इंग्रजीत असे प्रयोग करणे परवडू शकते, हे मान्य. तरीही जेवढं काही आपल्या हाती आहे, प्रयोगशीलतेला जेवढा म्हणून वाव आहे, तेवढे प्रयत्न तर आपण करायलाच हवेत.

बालसाहित्याकडे.. मुळात साहित्याकडेच पाहण्याची आपली वृत्ती काय आहे? पुस्तकांचं वाचन, कवितांचं वाचन याकडे आपण कसे पाहतो? तर- ‘अवांतर वाचन’ म्हणून. ‘अवांतर वाचन’ या शब्दाआड आपण दडवलेला अर्थ आहे तो म्हणजे- फावल्या वेळेत करायचा असा काही उद्योग. तुम्ही शाळेत जायलाच हवं.. क्लासला जायलाच हवं.. गृहपाठ करायलाच हवा.. टेबल टेनिस अकादमीत जायलाच हवं.. आणखी एखादा तबला, गाणं, नृत्य यांचा क्लास असेल तर त्याला जायलाच हवं. त्यातून मग वेळ मिळाला तर करा हे अवांतर वाचन. साहित्याकडे पाहण्याचा मूळ दृष्टिकोनच असा असेल, तर तोच बालसाहित्यासाठीही लागू पडणार.

या अशा सगळ्या परिस्थितीत आज मराठीत जे बालसाहित्य निर्माण होत आहे ते बहुतांशी मोठय़ांच्या नजरेतूनच. अगदी आत्ता-आत्तापर्यंत मोठय़ांसाठी उत्तम लिहिणारे ज्येष्ठ, जाणते लेखक-कवी छोटय़ांसाठीही लिहायचे. किरकोळ अपवाद वगळता तसे चित्र सध्या दिसत नाही. त्यात मोठय़ा वाचकांचा लहानांच्या साहित्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही जरा कमीच गंभीर. लहानग्यांच्या साहित्यातील निभ्रेळ आनंदाकडे, नादाकडे मोठे पाहणार जरा आढय़तेनेच. ही आढय़ताही अनेकदा कचकडय़ाची. वरवरची. लहानग्यांच्या कवितांनी आपल्याला आनंद झाल्याचे दिसले तर कुणाला काय वाटेल, अशी त्यामागची काळजी. ही काळजी दूर भिरकावून द्यायला हवी मोठय़ांनी.

‘एक म्हण, दोन म्हण, तीन चार पाच रे,

भोपळ्या भोपळ्या, टुणूक् टुणूक् नाच रे..’

ही ओळ वाचल्यावर, ऐकल्यावर तुमच्या चेहऱ्यावर थोडंसं का होईना, पण हसू पसरत असेल तर तुमच्यासारखे तुम्हीच. आणि पसरत नसेल, तरीही तुमच्यासारखे तुम्हीच. फक्त थोडय़ा सुधारणेची आवश्यकता असलेले!

राजीव काळे rajiv.kale@expressindia.com

Story img Loader