अधिकृत नोंदी हा तसा अनेकदा फसवाच प्रकार असतो असे म्हणायला वाव आहे. आता व्यंगचित्रांचेच घ्या. ‘जगातील पहिले व्यंगचित्र कुणी काढले?’ या प्रश्नाचे उत्तर ‘रिचर्ड आऊटकल्ट’ असे येते. ‘ते कुठे काढले?’ या प्रश्नाचे उत्तर ‘न्यू यॉर्क वर्ल्ड या वर्तमानपत्रात!’ असे येते. हे वृत्तपत्र जोसेफ पुलित्झर यांचे. आऊटकल्ट यांचे जे व्यंगचित्र पहिले म्हणून नोंदवले गेले, ते आहे जवळपास सव्वाशे वर्षे जुने. नेमकी तारीख- ५ मे १८९५. यलो किड हा पिवळ्या रंगाच्या कपडय़ांतला टकलू, खोडसाळ मुलगा इतरांच्या टोप्या उडवायला लागला तो या दिवसापासून. या खोडसाळ चित्रव्यक्तीचे नाव हॉग्न्स अॅली. त्याच्या व्यंगचित्र मालिकेच्या निमित्ताने आऊटकल्ट यांनी तत्कालीन घटनांवर मार्मिक व खुसखुशीत भाष्य केले. ही मालिका लोकप्रियही झाली तेव्हा खूप. तशी नोंदही मिळते.
मग ही नोंद फसवी कशी?
तर आऊटकल्ट यांची ही व्यंगचित्रमाला ‘न्यू यॉर्क वर्ल्ड’मध्ये प्रसिद्ध झाली म्हणून ती लोकांपुढे आली.. म्हणजे त्यातील व्यंगचित्रे लोकांपुढे आली. पण त्याआधीही व्यंगचित्रे काढली असणारच कित्येकांनी. अगदी आदिम काळातही ती काढली गेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुळात शब्दभाषेच्या रचनेआधी जन्म झाला तो दृश्यभाषेचा. आदिम काळात गुहांमध्ये, डोंगरांमध्ये काढलेली भित्तीचित्रे, खोदचित्रे ही त्याची उदाहरणे. त्या चित्रांचे विषय बहुतांशी निसर्गाला धरून. पण त्यातही एखादा आदिम माणूस समजा वैतागला असेल रोजच्या उन्हाळ्याला, तर त्याने कोपलेल्या सूर्याचे व्यंगचित्र काढले असल्याची शक्यता पूर्णत: मोडीत काढता येत नाही! आज आपल्याला गुहांमधील जी भित्तीचित्रे सरळ अशी वाटतात, त्यातील एखादे काढताना त्या काढणाऱ्याच्या मनात मुळात वक्ररेषा काढावी अशी इच्छा असण्याची शक्यताही बिलकूल नाकारता येत नाही. आणि त्यानंतरही अशी चित्रे काढली गेली असणारच. पण माध्यमांत झळकायचे भाग्य त्यांना मिळाले नसल्याने त्यांची नोंद झाली नाही, एवढेच.
तर नोंदी फसव्या असू शकतात, ते या अर्थाने.
या अनुषंगाने आपल्या मराठीच्या दृष्टीने व्यंगचित्रांकडे कसे पाहता येईल?
तर मराठी साहित्य- आणि एकूणच मराठी संस्कृतीचा, तिच्या प्रवाहांचा विचार केला तर दृश्यभाषेपेक्षा शब्दभाषाच आपल्याला अधिक जवळ वाटल्याचे आजवर दिसून येते. साहित्याची जेवढी परंपरा आपल्याकडे रुजली, वाढली, तितक्या प्रमाणात दृश्यकलेची परंपरा विकसित पावली नाही. सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अशी अनेक कारणे असू शकतील त्यामागे. मुळात चित्रकलेची परंपरा मोठय़ा समूहापर्यंत पोहोचलेली नाही. आणि त्यामुळेच व्यंगचित्रांची परंपरा समूहापर्यंत पोहोचणे, विकसित पावणे हे त्याहून अवघड. आता त्यात फरक पडला आहे, पडतो आहे, एवढे मात्र नक्की. आणि हा फरक खचितच स्वागतार्ह.
हा फरक पडण्यासाठी खूप वेळ का जावा लागला असावा? तर वर म्हटल्याप्रमाणे मुळात चित्रभाषेचे महत्त्व जाणणाऱ्यांची संख्या कमी. त्यात व्यंगचित्र म्हणजे तर फारशा गांभीर्याने न घेण्याचा विषय. म्हणजे शाळेत मागील बाकांवर बसणाऱ्या बिनअभ्यासू, वांड आणि सतत खोडय़ा काढणाऱ्या मुलांकडे पाहण्याची जी नजर असते, तीच या व्यंगचित्रांकडे पाहण्याचीही. अशा वांड मुलांच्या खोडय़ा कधी कधी खुदकन् हसू आणत असतीलही; पण पहिल्या बाकावर बरोबर मधला भांग पाडून, गंभीर चेहऱ्याने बसणाऱ्या मुलांची प्रतिष्ठा त्यांना नाही मिळायची, अशी स्थिती. या शाळांमध्ये चित्रकला शिकवणार. पण व्यंगचित्रकला म्हणजे काय, याचे शिक्षण नाही मिळायचे, असे आजवरचे चित्र. या पाश्र्वभूमीवर एक बातमी जरासा दिलासा देणारी ठरते. नांदेडचे मधुकर धर्मापुरीकर हे व्यंगचित्रांचे संग्राहक आणि या कलेकडे, तसेच साहित्याकडे आस्थेने बघणारे लेखक. ‘हास्यचित्रांतील मुलं’ हा त्यांचा लेख यंदा नववी इयत्तेच्या पाठय़पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना या कलेचा परिचय होण्यासाठी मदत होईल, हे नक्की.
हा असा परिचय शाळेपासूनच असणे आवश्यक होतेच.. आहेच. याचे कारण- व्यंगचित्र या माध्यमाची ताकद काय असू शकते, याची जाणीव या वयात होणे चांगलेच. व्यंगचित्रे म्हणजे दिवाळी अंकातील केवळ पानपूरके नव्हेत. अशी पानपूरकी व्यंगचित्रे काढून देणारे पैशाला पासरी आहेत तसे. पण त्यांचे महत्त्व पानपूरकांएवढेच. मुळात या कलेची ताकद कितीतरी मोठी. व्यंगचित्रे म्हणजे आपले जगणे आपणच एखाद्या वक्र पृष्ठभूमीच्या आरशात पाहतो आहोत असा भास देणारी. या वक्र आरशातील प्रतिमा कधी मिश्कील हसू आणणाऱ्या, तर कधी आपल्यालाच आपल्यात मुरडून पाहण्यासाठी भाग पाडणाऱ्या, कधी आपल्याच मनातील काही बोलणाऱ्या, कधी मनातील आक्रोशाला चित्ररूप देणाऱ्या, तर कधी समंजस खिन्नता आणणाऱ्याही! इतकी मोठी ताकद असलेल्या या वक्र रेषांबाबत म्हणूनच विद्यार्थिदशेपासून ओळख होणे महत्त्वाचेच.
या व्यंगचित्रांच्या ताकदीचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे प्रस्थापितांविरोधात उभे राहण्याची इच्छा, खुमखुमी आणि ताकद. हे प्रस्थापित मग कुठल्याही क्षेत्रातील असोत. कलावंताने प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधातच उभे राहिले पाहिजे, त्या व्यवस्थेला प्रश्न विचारले पाहिजेत, असे मानणाऱ्यांची संख्या मोठी आहे. हे असे मानण्यामागील एक स्पष्ट गृहितक असे की, प्रस्थापित व्यवस्था ही अनेकदा नको त्या मार्गाने जात असते.. जो मार्ग सामान्यांच्या हिताचा नसतो. अशा वेळी त्या व्यवस्थेला चार खडे बोल सुनवायला हवेतच. त्यासाठी व्यंगचित्र हे उत्तम माध्यम. हे असे माध्यम आपल्याकडे अनेकांनी वापरले. खूप ताकदीने वापरले. आर. के. लक्ष्मण यांच्यापासून शंकर यांच्यापर्यंत.. वसंत सरवटे, शि. द. फडणीस यांच्यापासून मंगेश तेंडुलकर यांच्यापर्यंत. यांच्याशिवायही कितीतरी. उल्लेख केलेल्या या दिग्गज मंडळींबरोबरच इतरही अनेक व्यंगचित्रकारांची व्यंगचित्रे ही केवळ रेषा नव्हेत, नुसते हसू आणण्यासाठी केलेली कारागिरी नव्हे, तर त्या चित्रांमागे गंभीर विचारही आहे. म्हणजे या मंडळींची चित्रे पाहून तुमच्या मेंदूला चालना मिळणारच. ती तुम्हाला दृश्यानंदासोबत बुद्धीलाही आनंद देणार. इतकी ताकद असलेल्या या कलेची ओळख शालेय आयुष्यापासून व्हायलाच हवी. म्हणजे मग या कलेची कदर करण्याची, तिला समजून घेण्याची वृत्ती लहान वयापासूनच कदाचित रुजू शकेल मुलांमध्ये.
हे आपल्या मराठीबाबत बोलायचे एक कारण म्हणजे काही मोजके सन्माननीय अपवाद सोडले तर मराठी साहित्यात, पुस्तकांमध्ये दृश्यविचार फारसा होताना दिसत नाही. मग ती व्यंगचित्रे असोत वा साधी चित्रे. शब्दबंबाळता हे जणू आपले सर्वसाधारण व्यवच्छेदक लक्षणच. (चित्रपट, नाटके या दृश्यकलांतही आजवर ते प्राय: दिसून आलेले आहेच.) हल्ली काही प्रमाणात त्यात बदल होत आहे. वाचकांची अभिरुची चांगल्या अर्थाने बदलत गेली, विकसित होत गेली तर त्याचा दबाव पुस्तकांच्या रंग-रूपावरही होण्याची आशा बाळगता येते.
तर व्यंगचित्रांची निकड ही अशी आहे. अर्थात खुद्द व्यंगचित्रकारांसाठी या रेषा तशा सोप्या नाहीत. कलाकृती म्हणून तर त्यांची निर्मिती कठीण आहेच; शिवाय त्या अवघड असण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्यांचा व्यवस्थाविरोध. व्यवस्था कुठलीही असो; तिला आपल्याविरोधातील वाकडे काही चालत नाही. मग ते वाकडे शब्द असोत वा वक्ररेषा. वाकडे शब्द सरळ करण्यासाठी आणि वक्ररेषा एकरेषीय करण्यासाठी व्यवस्था प्रयत्नशील असतात. अशा व्यवस्थांशी झगडतच वक्ररेषेला पुढे जावे लागते. हा झगडा आवश्यकच. अन्यथा रेषेला पीळ येणार कुठून? आणि तुम्ही-आम्ही त्या वक्र आरशात बघणार कुठून?
राजीव काळे rajiv.kale@expressindia.com