..सारे काही ठरल्याबरहुकूम झाले. म्हणजे पहिल्या दिवशी- शुक्रवारी ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे डोंबिवलीत उद्घाटन, अध्यक्षांचे भाषण, ‘मायमराठीचे पांग फेडू’ वगैरे, राजकीय मंडळींचा वावर, परिसंवाद, कविसंमेलने, नाष्टा संमेलने, भोजन संमेलने, पुस्तक प्रदर्शन, आदी. आणि आज- रविवारी ठरलेल्या वेळापत्रकानुसार समारोप. संमेलनस्थळी एक सेल्फी पॉइंट उभारलेला. लेखणीच्या आकाराचा उंच मनोरा. त्यावर थोडय़ा उंचीवर जाऊन छायाचित्र काढण्याची मुभा.
या संमेलनाचे संकेतस्थळ उघडले की प्रथमदर्शनी दिसते ती व. पु. काळे यांची छबी आणि सोबत त्यांचा एक सुविचार.. ‘समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोहोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते.’ आता संमेलनाच्या संकेतस्थळाच्या प्रथमदर्शनी व. पु. काळे का? तर संमेलनाध्यक्षांचे आडनाव ‘काळे’ आहे.. आणि व. पु. हेदेखील ‘काळे’च. शिवाय त्यांचा सुविचारही आयुष्याचा गहन अर्थ सांगणारा. म्हणून मग असू दे त्यांची छबी आणि त्यांचा सुविचार. त्यात ‘उंची’ असा उल्लेख आहे, तर मग लोकांना जरा उंचीवर जाऊन बघू दे जगाकडे.. निदान साहित्याकडे.. निदान संमेलनस्थळाकडे- असा गंभीर विचार संमेलन आयोजकांनी केला नसेलच असे सांगता येत नाही. सकळांना शहाणे करून सोडण्यासाठीच व. पु., त्यांचा सुविचार आणि लेखणीचा उंच मनोरा. तर मग जा या उंच मनोऱ्यावर. खूपच गर्दी असेल तर उभे रहा मनोऱ्याखाली- आणि काढा सेल्फी. डकवून टाका तो फेसबुक वा अन्य ठिकाणी. पाठवा मित्रमैत्रिणींना आणि मिळवा आत्मिक समाधान, नैतिक समाधान किंवा मिरवा आत्मिक तोरा, नैतिक तोरा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास उपस्थित राहिल्याचा!
यात एक गंमत आहे. सेल्फीला चेहरे असतात. रंग असतात. नसतो तो स्वत:चा आवाज. म्हणूनच मग सेल्फीत वरवर सारेच छान दिसते. ते तसेच दिसावे अशी रचनाच असावी मोबाइलमध्ये बहुदा. म्हणजे कुठल्या गोष्टीवर किती प्रकाश पडावा, कुठली गोष्ट अंधारात झाकली जावी, वगैरे.
म्हणजे संमेलनस्थळीच्या मनोऱ्याजवळून किंवा मनोऱ्यावरून घेतलेल्या सेल्फीत किंवा छायाचित्रात काय दिसणार?
छानपैकी निघालेली संमेलनाची शोभायात्रा.. रुबाबदार मराठी कपडय़ांत त्यात सहभागी झालेले सानथोर.. ढोल-ताशे-लेझीम-पालख्या.. उत्सवी वातावरणात झालेले संमेलनाचे उद्घाटन.. टाळ्याखेचक वाक्ये.. ‘आम्ही आमचे राजकीय जोडे व्यासपीठाखाली ठेवूनच येतो’ ही राजकारणी मंडळींची ग्वाही.. कविसंमेलनांनाही मिळालेली चांगली दाद.. परिसंवादांना झालेल्या वा न झालेल्या गर्दीच्या बातम्या.. पुस्तक प्रदर्शनासाठी उसळलेली गर्दी.. रसभरीत भोजन पंगती.. आणि आज संध्याकाळी त्यात भर समारोपाच्या सोहळ्याची.. मराठीच्या भल्यासाठीच्या त्यातील ठरावांची.. ‘सरकारी कार्यालयांत मराठीचा वापर वाढावा..’ इथपासून ते ‘निपाणी, बेळगाव व त्या परिसरातील गावांसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे..’ इथपर्यंतचे ठराव. त्याशिवाय काही घोषणा, आश्वासने. हे झाले चेहरे, रंग सेल्फीचे. हे चेहरे व रंग तसे सराईत. पण सेल्फीला कंठ फुटला तर मात्र मोठी पंचाईत. चेहऱ्यांमागील काही, रंगांमागील काही असे काही सेल्फी दाखवू लागली तर मात्र मोठी पंचाईत. पंचाईत कुणाची? संमेलनांचा घाट घालणारे, त्याची अंमलबजावणी करणारे, साहित्यिक, आपण वाचक या सगळ्यांचीच थोडी थोडी.
संमेलनाचा घाट घालतात ते अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि यजमान संस्था मिळून. आता इतका मोठा उत्सव करायचा, तर त्यात थोडे इकडचे तिकडे होणारच. म्हणजे कुणा पाहुण्यांची सोयच झाली नाही नीट. कधी जेवणात मीठच कमी पडले. प्रदर्शनातील स्टॉल्सची व्यवस्था हवी तशी नसल्याची प्रकाशकांची तक्रार.. वगैरे नेहमीच्या गोष्टी. त्या महत्त्वाच्या नाहीत का? आहेतच. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे आहे ते संमेलनातून हाती काय लागते, याचा हिशेब. तो हिशेब भरभक्कम नाही. तसा तो गेली कित्येक वर्षांपासून नाहीच. म्हणजे चार लोक एकत्र येतात, भेटतात, गप्पा मारतात, एकत्र जेवतात, राहतात. या सगळ्यातून मिळणाऱ्या आनंदाची प्रतवारी एखाद्या मॉलमध्ये गेल्यानंतर मिळणाऱ्या आनंदासारखीच असेल, किंवा रात्रीच्या टीआरपी वेळेत जेवताना पाहिल्या जाणाऱ्या टीव्ही मालिकांमधून मिळणाऱ्या आनंदासारखी असेल तर कठीणच. तोंडात खवट शेंगदाणे आल्यावर होतो तसा चेहरा संमेलनाचा असावा अशी अपेक्षा मुळीच नाही. तो आनंदी असायलाच हवा. मात्र, त्या आनंदाची जातकुळी ही वरवरची, गुलछबू, कचकडय़ाची नसावी. संमेलनातील जेवणात मीठ कमी असेल, एखाद्या पाहुण्याची सोय यथास्थित झाली नसेल, पत्रकारांना वार्ताकन करण्यासाठी सुयोग्य जागा मिळाली नसेल तर अशा गोष्टी क्षम्यच एक वेळ. हे मुद्दे गहन महत्त्वाचे नाहीतच. पण संमेलनाच्या परिसंवादांचे विषय वर्षांनुवर्षांचे चावून चोथा झालेले असतील, कविसंमेलनात तेच ते कवी त्याच त्या यशस्वी कविता म्हणत असतील, त्याचवेळी नव्यांना प्रोत्साहन देण्याच्या नावाखाली दर्जाहीनता खपवून घेतली जात असेल (संमेलनाच्या संकेतस्थळावर कविता विभागात ज्या कवितांचा समावेश करण्यात आल्या आहेत त्या जिज्ञासूंनी जरूर बघाव्यात!), राजकारणी मंडळींच्या वावरासोबत त्यांची राजकीय विचारसरणीही व्यासपीठावर, संमेलनात वावरत असेल, तर या अशा गोष्टी अक्षम्यच.
हे संमेलन साहित्याचे, साहित्यिकांचे आणि साहित्यप्रेमींचे. पण संमेलनात साहित्यिक असतात कुठे? दिसतात कुठे? मुळात साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे अनेकदा उद्घाटन सोहोळ्यानंतर थेट उगवतात ते समारोप सोहोळ्यातच. अध्यक्षीय भाषण व समारोपाचे भाषण एवढय़ापुरताच त्यांचा संमेलनाशी संबंध आहे की काय असे वाटण्यासारखे हे चित्र. (यंदाच्या संमेलनात अध्यक्षीय भाषणावर चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे, ही खचितच स्वागतार्ह बाब.) संमेलनाध्यक्ष म्हणजे संमेलनाचा चेहरा. संमेलनाध्यक्ष म्हणजे निदान ठरावीक परिघापुरते तरी साहित्याचे सदिच्छादूत. संमेलनाध्यक्षांचे आसन म्हणजे निदान संमेलनापुरते तरी राज-आसनच. पण याचा अर्थ अध्यक्षांनी या राज-आसनावरच बसून, खूप उंचावरून संमेलनातील इतर सहभागींकडे पाहायला हवे असा नियम नाही. त्यांनी संमेलनात मिसळायला हवे, साहित्यप्रेमींशी औपचारिक, अनौपचारिक संवाद साधायला हवा. तशीच अपेक्षा इतर साहित्यिकांकडूनही. त्यात सर्वच पंथांचे साहित्यिक आले. प्रदर्शनात आपला, आपल्या पंथाच्या पुस्तकांचा स्टॉल मांडायचा; मात्र संमेलनापासून दूर राहायचे. का? तर त्यावर, ‘तो आमचा प्रांत नाही,’ असे शहाजोगपणे सांगणारी मंडळी आहेत. हा निव्वळ दुटप्पीपणा झाला. जे लोक संमेलनास येणार त्यांनी आपली पुस्तके विकत घेतलेली चालतात, त्यातून मिळालेला पैसा चालतो; मात्र त्यांच्या संमेलनापासून चार हात दूर राहायचे- या वागण्यास दांभिक सोवळेपणाखेरीज दुसरा शब्द नाही.
आणि आता आपण.. आपण म्हणजे वाचक. संमेलनात काढलेल्या आपल्या सेल्फीस कंठ फुटला तर? तर प्रश्न समोर उभा ठाकेल- संमेलनाकडे आपण किती गांभीर्याने पाहतो, असा. ते किती बारकाईने निरखतो, असा. त्यात काही नवीन आणि चांगले घडत असेल तर त्याला किती प्रतिसाद देतो, असा. संमेलन हा दुतर्फा व्यवहार आहे. आपण त्याकडे पुरेशा गांभीर्याने बघणार नसू, तर तेही स्वत:चे गांभीर्य गमावून बसणार यात शंका नाही. जे सध्या होतेच आहे. संमेलनातील चांगल्या प्रयोगांना लोकांचा प्रतिसाद मिळाला नाही तर तसे प्रयोग करण्याच्या फंदात संमेलनवालेही पडणार नाहीत. त्यामुळे चांगल्या प्रयोगांना बळ देण्याची जबाबदारी आपलीही आहेच. काव्यसंमेलनात एखाद्या प्रख्यात कवीला त्याची एखादी प्रख्यात कविताच म्हणायचा आग्रह करण्यात काय अर्थ? हा तर कवींसाठी आणि आपल्यासाठीही ‘सेफ गेम’ झाला. त्यातून बाहेर कधी पडणार आपण?
तर सेल्फीला कंठ फुटलाच तर काय काय ऐकू येईल, काय काय ऐकावे लागेल, याची ही एक झलक. सेल्फीला कंठ फुटणे कपोलकल्पित असले तरी असा कंठ न फुटताही हे सारे ऐकू शकतातच सारे. डोळे खुले असतील, कान उघडे असतील, मन-बुद्धी जागी असेल तर या गोष्टी ऐकू येणारच. त्या ऐकायच्या की नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी त्या ऐकाव्यात, हा आग्रह सगळ्यांसाठी.. आजच्या योग्य निमित्ताने.
राजीव काळे rajiv.kale@expressindia.com