प्रा. मं. गो. राजाध्यक्ष

संभाजी कदम सरांची पहिली भेट मला अजूनही आठवते. त्यापूर्वी जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधील या शैलीदार आणि सर्जनशील कलाकारांची नावेच फक्त ऐकून होतो आणि त्याला कारणही तसेच घडले. माधवराव सातवळेकर त्या वेळी कलासंचालक म्हणून कार्यरत होते. एक जबरदस्त ताकदीचा वास्तववादी कलाकार आणि तेवढय़ाच ताकदीचे प्रशासकीय काम पाहणारे कलासंचालक म्हणून त्यांची ख्याती होती. एकदा काही कामानिमित्त त्यांनी मला बोलावले होते. त्यांच्या केबिनमध्ये जाताच मला समोरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एक भव्य असे लाइफ साइझ पेंटिंग दिसले. त्या तैलरंगातील व्यक्तिचित्रात डॉ. आंबेडकरांचे पुरेपूर व्यक्तिमत्त्व व्यक्त होत होते. क्षणभर मी भान हरपून त्या पेंटिंगचे निरीक्षण करू लागलो. त्या पेंटिंगशेजारीच एक कोट-टाय परिधान केलेली व काखेत एक चामडय़ाची बॅग धरलेली किरकोळ शरीरयष्टी असलेली एक प्रसन्न चेहऱ्याची व्यक्ती चेहऱ्यावर निरागस हास्य आणून उभी होती. ‘‘यांना ओळखता का?’’ मला सातवळेकरांनी विचारले. क्षणभर मी प्रश्नार्थक चेहरा करून उभा राहिलो. ‘‘अहो, हे संभाजी कदम.’’ सातवळेकरांनी त्या व्यक्तीचे नाव सांगताच आदराने माझी मान त्यांच्यापुढे झुकली. कारण संभाजी कदम हे नाव आम्ही बरेच ऐकून होतो. योग मात्र त्या दिवशी आला त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा आणि त्यांचा परिचय होण्याचा!

philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी
spread of bogus research papers The proposed regulations mention the UGC Care List pune news
बोगस संशोधनपत्रिकांचे पुन्हा पेव? प्रस्तावित नियमावलीत ‘यूजीसी केअर लिस्ट’चा अनुल्लेख
Animals have exceptional memory
विलक्षण स्मरणशक्ती असते ‘या’ प्राण्यांकडे! माणसालाही देऊ शकतात आव्हान
तर्कतीर्थ विचार: तर्कतीर्थांचे वेदाध्ययन
success story of Nitin seth who once borrowed 5 rs lakh from friends now owns crores company know his business success story of Nitin seth who once borrowed 5 rs lakh from friends now owns crores company know his business
एकेकाळी मित्रांकडून घेतली होती लाखोंची उधारी, आता उभारलीय १००० कोटींहून अधिकची कंपनी, वाचा नेमका कोणता व्यवसाय करते ‘ही’ व्यक्ती
Loksatta lokrang Love Pictures Poet Relationship PWD Engineer
अन्यथा.. स्नेहचित्रे : अजंठ्याची पुसट रेषा…

हेही वाचा >>> कलास्वाद : एशियन पेंटचा ‘गट्टू’

संभाजी सोमाजी कदम यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यतील देवगड (जामसंडे) या गावी ५ नोव्हेंबर १९३२ साली  झाला. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्याने अल्पवयातच त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी पडली. हातात चित्रकला असल्याने तीही पुढे वाढवायची इच्छा प्रकर्षांने होत असे; आणि म्हणूनच देवगड येथून शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी तडक मुंबई गाठली व १९५२ मध्ये  सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये उच्च कला शिक्षणासाठी प्रवेश घेतला. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतच त्यांना कलासाधना करावी लागली. त्याच काळात कला क्षेत्रात एक नवे वारे वाहू लागले होते. काही चित्रकारांनी यथार्थ आणि रूढीबद्ध चित्रीकरणाच्या विरुद्ध बंड करण्याचा, कलेची संकल्पना, आशय, जाणिवा यांच्यातील नीतिमूल्ये बदलण्याचा मार्ग स्वीकारला आणि त्यातून ‘प्रोग्रेसिव्ह ग्रुप’ आकाराला आला व त्यातून चित्रकारांची विभागणी झाली. स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांमध्येही हे गट निर्माण झाले. ते आपापल्या गुरुजनांच्या कार्यप्रणालीप्रमाणे विभागले गेले होते. अशा त्या काळात संभाजी कदमांनी ‘पोट्र्रेट’ या कला विषयात प्रावीण्य मिळवले. आर्ट स्कूलमध्ये त्या काळी बाबूराव सडवेलकर, तय्यब मेहता, रवींद्र मेस्त्री यांच्यासारखे मातब्बर विद्यार्थी होते. त्यांना लाभलेले शंकर पळशीकर, भोंसुले, वसंत परब असे निष्णात गुरुजनही तितक्याच ताकदीचे होते. कदमांना त्यांच्यातील विलक्षण कलागुणांमुळे विद्यार्थिदशेत असतानाच ‘डॉली करसेटजी’ हे मानाचे पारितोषिक मिळाले आणि यशस्वीरीत्या त्यांनी आपले कला शिक्षण पूर्ण केले. विद्यार्थिदशेतच कदमांनी आत्मसात केलेले कौशल्य जाणून त्या वेळचे जे.जे.मधील एक ज्येष्ठ कला अध्यापक प्रा. शिरगांवकर यांनी त्यांना जे.जे.मध्ये अध्यापकांच्या जागेसाठी मुद्दाम पाचारण केले. तोपर्यंत कदमांनी व्यक्तिचित्रणामध्ये असामान्य प्रभुत्व मिळवले होते. त्या वेळी इतरत्र मिळत असणारी भरपूर पगाराची नोकरी डावलून त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारण्याचा निर्णय घेतला. कारण कलावंताचे मृदू, मुलायम हृदय असलेल्या कदमांचा पिंडच मुळी शिक्षकाचा होता. संभाजी कदम हे जे.जे.च्या अध्यापकांच्या भूमिकेत शिरले.  जे.जे.मध्ये कदम सर सुरुवातीपासूनच एक विद्यार्थिप्रिय शिक्षक म्हणून गाजले. विद्यार्थ्यांबद्दल त्यांच्या मनात नेहमीच आपुलकी असे. चेहऱ्यावर हास्य धारण केलेला त्यांचा मृदुभाषी स्वभाव एखाद्याला आपलासा करण्यास पुरे होई. ‘शिक्षक’ हा त्यांचा केवळ पेशा नव्हता, तर ती त्यांची तळमळ होती. कलेच्या विद्यार्थ्यांचा चहूबाजूने विकास व्हावा या हेतूने त्यांना केवळ हस्तकौशल्य शिकवून चालणार नाही, तर त्यासाठी त्यांना कलेचे मर्म कळायला हवे, त्यांना सौंदर्यदृष्टी यायला हवी, या गोष्टी त्यांनी जाणल्या होत्या. कदमांना स्वत:लाही चित्रकलेसोबतच साहित्य, संगीत, काव्य आदी ललित कलांची आवड होती. त्यांच्याकडून पेंटिंगसोबतच काव्यही साकारत होते, साहित्यही घडत होते आणि संगीताचे सूरही निनादत होते. त्यासाठी ते हॉर्मोनियम शिकले. ते एक उत्कृष्ट हार्मोनियम वादक ठरले. कलाकृतीचा आस्वाद घेता यावा म्हणून सौंदर्यशास्त्राचा अभ्यास करणे त्यांना आवश्यक वाटू लागले. प्रथम दृश्यकलेच्या अंगाने त्यांनी सौंदर्यशास्त्राचा अभ्यास केला. त्यानंतर इतर कलांच्याही अंगाने तो विस्तारत नेला. संभाजी कदमांनी व्यक्तिचित्रणामध्ये स्वत:ची अशी खास शैली निर्माण केली. व्यक्तिचित्र म्हणजे केवळ त्या व्यक्तीची ओळख दाखवणारे चित्र नसून त्या व्यक्तीच्या अंतरंगाला अधोरेखित करणारे चित्रण होय, ही व्यक्तिचित्र व्याख्या त्यांनी रुजवली. व्यक्तीचे केवळ हुबेहूब चित्रण न करता तिच्या अंतरंगासह, त्यातील व्यक्तिमत्त्वाचा आशयही ते आविष्कृत करीत असत. त्यांच्या पोट्र्रेटमधील व्यक्तीच्या अंगावरील वस्त्रे रंगविणे ही तर त्यांची खासियत होती. ज्या साहित्याने ते वस्त्र विणले आहे, त्याचा पोतही कदम सर आपल्या कुंचल्यातून साकारीत असत. असे हे कदम सर साहित्यातदेखील तेवढेच नाव कमावून होते. त्यांचे वाचन अफाट होते. मराठीतील एक नामांकित समीक्षक म्हणून कदम ओळखले जात. १९६० च्या दरम्यान त्यांनी ‘मौज’ या दर्जेदार आणि विशिष्ट वाचकवर्ग असलेल्या नियतकालिकातून ‘विरुपाक्ष’ या टोपणनावाने समीक्षा लिहिण्यास सुरुवात केली. कोणत्याही कलामाध्यमातील समीक्षा ते अतिशय तौलनिक आणि सर्जनशीलतेला धरून लिहीत असत. पुढे त्यांनी ‘सत्यकथा’ या मासिकातून स्वत:च्या नावाने समीक्षा लिहिण्यास सुरुवात केली. जे. जे.मध्ये कदम यांचा वावर होताच, तसेच ‘मौज’च्या कार्यालयातही विचारवंतांच्या घोळक्यात ते दिसत, तर कधी चित्रकार, कवींच्या मेळाव्यात.. कधी संगीत मैफलीत दंग असत. स्वस्थ असलेले कधी दिसलेच नाहीत.

हेही वाचा >>> कलास्वाद : रंगानंदात रंगलेली कलावंत

स्कूल ऑफ आर्टमधील टीचर्स रूम ही त्या काळात प्रा. प्रल्हाद धोंड यांनी आपल्या विनोदी वाक्चातुर्याने व अवर्णनीय अशा त्यांच्या स्मरणातील आठवणींच्या पोतडीतील घटनांनी खूप गाजली होती. त्याला धोंड सर ‘धुरांडे’ म्हणत. त्या गप्पा ऐकायला बाहेरील नामांकित व्यक्तीही येत असत. त्यामध्ये ‘सत्यकथा’चे राम पटवर्धन असत, कादंबरीकार श्री. ना. पेंडसे असत, नाना पळशीकर, चंद्रकांत मांडरे हे अभिनेते असत, तर कधी अशोक रानडे, चिं. त्र्यं. खानोलकर अशा विविध प्रकारच्या व्यक्तीही मजा लुटण्यास येत असत. बऱ्याच वेळा कदम सरांचे लग्न हा विषयही त्यात असायचा. बैठकीत बसलेले राम पटवर्धन अथवा चिं. त्र्यं. खानोलकर धोंडांना हा विषय हाती घेण्यास सांगत असे. तेव्हा धोंड सर आपले खास असे मालवणी चिमटे त्यांना घेत असत; पण कदम सरांच्या कामाची ताकद सर्वाना माहीत होती आणि त्यांच्याबद्दल नेहमीच सर्वाना आदर होता. अशा या कदम सरांना ऐन उमेदीच्या काळात क्षयासारख्या रोगाने ग्रासले. एखाद्या  कलावंताच्या वाटय़ाला असे दिवस यावेत यापेक्षा दुर्दैवी घटना कोणती असेल? दोन महिने त्यांच्या आजाराचं निदानच झाले नव्हते; पण जेव्हा क्षयाची बाधा आहे हे कळले तेव्हा अशा या रोगाच्या औषधांचा खर्चही तेवढाच अफाट असतो याची त्यांना जाणीव झाली. या त्यांच्या आजारपणात या रोगावरचे निष्णात तज्ज्ञ डॉ. माधवराव देशमुख यांनी त्यांच्यावर योग्य प्रकारे उपचार करून एखाद्या धन्वंतरीप्रमाणे कदमांना बरे केले. अगदी रोगाचे समूळ उच्चाटन करून डॉ. देशमुखांनी कदम सरांना घरी पाठवले. ते त्यांचे ऋण पैशाने फेडणे काही कदमांना शक्य नव्हते; पण मृत्यूवर मात करणाऱ्या या वीर धन्वंतरीचे- डॉ. देशमुखांचे पोर्टे्ट त्यांनी इतक्या भावुकपणे रंगवले आहे, की त्यांचे न फिटणारे ऋण अंशत: फेडण्याचा प्रयत्न केला.

कदम सरांनी आपल्या सौंदर्यशास्त्र विषयात खास रुची घेतली होती. जे.जे.मध्ये तर तो विषय ते शिकवीत असतच, शिवाय मुंबई विद्यापीठात एम.ए.च्या विद्यार्थ्यांना हा विषय शिकविण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली. त्यांचे व्याख्यान असो वा पोट्र्रेटचे प्रात्यक्षिक, विद्यार्थी त्यामध्ये मोठय़ा आवडीने रस घेत, पण एवढे असूनही कदमांनी आपली शैली, आपले विचार अथवा मतप्रणाली कोणावरही लादली नाही. पळशीकर निवृत्त झाल्यावर लोकसेवा आयोगाने त्यांची जे.जे. स्कूल ऑफ आर्टच्या अधिष्ठाता पदावर नियुक्ती केली. विद्यार्थ्यांना व शिक्षकांना त्यांच्यातीलच एक जण आल्यासारखे वाटले. स्कूल ऑफ आर्टच्या वैभवशाली काळात तेथे ए.ए. भोंसुले, शंकर पळशीकर या मातब्बर चित्रकारांनी स्वत:चा दबदबा निर्माण केला होता. त्यांच्यासोबत कदमांचेही नाव घेण्यात येऊ लागले. अनेक दर्जेदार व्यक्तिचित्रे त्यांनी रंगवली. ते म्हणत त्याप्रमाणे व्यक्तिचित्रण केवळ व्यक्तीची ओळख पटेल असे चित्रण करणे नव्हे, तर त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, तिचे अंतरंग, तिचे अंतर्बा रूप, चित्राचा आशय, रंग, रेषा, आकार अन् अवकाश यांच्या संयोगातून झालेली निर्मिती असते आणि स्वत: कदम त्या कसोटीला पुरेपूर उतरले होते. मुळातच कदम घडत गेले ते त्रिंदाद, लॅंगहॅमर, ए. ए. भोंसुले, सातवळेकर अशा विशिष्ट शैलीच्या बुजुर्ग कलाकारांच्या परंपरेतून. शिवाय पाश्चात्त्य कलावंतांपैकी व्हिसलर, सरजट हे त्यांनी गुरुस्थानी मानले होते. चित्र करतानाही ते एका दमात पूर्ण करत. पॅलेटवर रंग घेताना व त्यांचे लेपन करताना त्यात कधी कंजुषी नसे. ‘रंग कसा लोण्याऽऽऽसारखा मुलायम हवा!’ हे त्यांचे हुकमी वाक्य होते व तसा रंग करून त्याचा मुलायमपणा ते रंगलेपनात आणत असत. त्यांचा ब्रश कधी हळुवारपणे, तर कधी विलक्षण ताकदीने कॅनव्हासवर फटकारे मारीत असे. १९७६ साली कदम सरांनी अधिष्ठातापद स्वीकारले. त्याच काळात जे.जे.मध्ये विद्यार्थी-शिक्षक असा संप घडून आला. कदम सरांना जी तत्त्वे पटत होती त्या बाजूने ते ठामपणे उभे राहिले; पण पुढे त्यांनी या संस्थेतील राजकारणामुळे व्यथित होऊन आपल्या नोकरीतील तब्बल तेरा वर्षे शिल्लक असतानाही १९७७ सालामध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली- तीही त्यांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसताना.

पुढे कदम सर आणि ज्योत्स्ना जोशी यांच्या गुरू-शिष्याच्या नात्याने प्रेमाचे रज्जू बांधण्यास सुरुवात केली. ज्योत्स्नाताई या नेहमी सरांच्या सोबत दिसू लागल्या व थोडय़ाच दिवसांत त्या ज्योत्स्ना संभाजी कदम झाल्या आणि सरांशी पूर्ण मिसळून गेल्या.

एकदा महाराष्ट्र राज्याच्या उच्च कला शिक्षक संघटनेतर्फे सोलापूर येथे भरलेल्या कार्यशाळेसाठी मी  गेलो होतो. सोबत आमचे अधिष्ठाता किसन कामत, वसंत सोनवणी, प्रभाकर कोलते, काशिनाथ साळवे, दिवाकर डेंगळे असे सर्व शिक्षक कलावंत होते आणि या कार्यशाळेत प्रात्यक्षिकासाठी संभाजी कदम सरांना आमंत्रित केले होते. मला स्वत:ला त्यांना काम करताना कधी पाहण्याचा योग आला नव्हता. कदम सरांचे प्रात्यक्षिक अगदी सुरुवातीपासून पाहण्याची दुर्मीळ संधी आज  लाभणार या आनंदात मी होतो. दुपारची जेवणे झाली. आम्ही जरा आडवे झालो होतो, तेच कदम सर फिरत फिरत आमच्या खोलीत आले व मला उठवून म्हणाले, ‘‘राजाध्यक्ष, चला, माझे मॉडेल मला मिळाले!’’ आणि त्यानंतर मलाच मॉडेल म्हणून बसवून त्यांनी पोर्ट्रेटचे प्रात्यक्षिक दाखविले. मला काही ते काम करताना त्यांना पाहता आले नाही, पण कदम सरांच्या अजरामर कुंचल्यातून माझे व्यक्तिचित्रण निर्माण झाले हे तर परम भाग्याचे होते!

एकदा ज्योत्स्नाताईंनी त्यांच्या पॅथॉलॉजिस्टचे केलेले तैलरंगातील सुमारे सहा फूट उंचीचे लाइफ साइझ पेंटिंग घेऊन ते दोघेही माझ्याकडे आले. पिवळय़ा साडीतील ते व्यक्तिचित्रण इतके सुंदररित्या आविष्कृत केले होते की त्यावरील नजर ढळत नव्हती. सर मला म्हणाले, ‘‘काही दिवस हे पेंटिंग तुमच्याकडे राहू दे.’’ आणि आमच्या त्या प्रशस्त हॉलच्या दोन काचेच्या दरवाजाच्या मधील जागेत ते पेंटिंग इतके चपखल बसले, की जणू त्या जागेचा विचार करूनच ते बनवले असावे. 

१९९७ साली दिल्लीच्या आयफॅक्स या कलासंस्थेने ‘व्हेटरन आर्टिस्ट’ हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविले होते. चित्रकलेसोबतच कवी, वादक, साहित्यिक, संगीत समीक्षक, कला समीक्षक अशा भूमिकांतून त्यांनी अफाट लेखन केले. १९६५ पासून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या विश्वकोशासाठी कदम यांनी लेखन व कला संपादनाचे महत्त्वपूर्ण कार्य केले. अनेक कलासंस्था, कला संग्रहालय या ठिकाणी त्यांची व्यक्तिचित्रे संग्रहित आहेत. त्यांनी केलेली शंकर पळशीकर, डॉ. एम. डी. देशमुख, मंगेश पाडगांवकर अशांची व्यक्तिचित्रणे त्यांच्या कलेची साक्ष देतात. जे.जे. सोडल्यानंतर काही ठरावीक दिवस सोडले तर कदम सर बहुधा घरीच असत. तेव्हा त्यांचे लिखाण, पेंटिंग, हॉर्मोनियमवादन सुरू असे.

कदम सरांनी आपल्या कारकीर्दीत अनेक मानसन्मान मिळवले. राज्य पुरस्कारही त्यांना मिळाला. कलावंत ते समीक्षक, टीकाकार, विचारवंत अशा विविध भूमिका कदम सर जगले. अफाट वाचनातून त्यांनी मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग विचारप्रसारणासाठी केला. आपल्या चित्रकलेला त्यांनी नेहमीच संगीत आणि काव्याची जोड दिली. आत्मस्वाभिमान हा आपला धर्म समजून त्याच्याशी कधीही तडजोड केली नाही, की कोणाला कधी दुखावले नाही. संसाररथ चालवणारी जोत्स्नाताईंसारखी जोडीदार भेटली, तीही त्यांना समजून घेणारी, त्यांची सुखदु:खे वाटून घेणारी आणि त्यांच्या जीवनात वसंत फुलवणारी कलासक्त मनाची. वयाचे अंतर तेथे कधी उरलेच नाही आणि त्यांच्या संसारवेलीवर आलेले फूल म्हणजे त्यांचा मुलगा शार्दूल. त्याच्यावरही संस्कार झाले ते कलासंस्कृतीचे, साध्या जीवनराहणीचे. अशा आनंदी आणि तृप्त कुटुंबाच्या जीवनात अचानक तो दिवस आला. १५ मे १९९८! त्या दिवशी कदम कुटुंबाच्या जीवनातील पॅलेटवरील रंग अचानकपणे दैवाने पुसून टाकले. संभाजी कदम सरांना नियतीने अनपेक्षितपणे आमच्यातून हिरावून घेतले.

rajapost@gmail.com

Story img Loader