बळीराजाची आत्महत्या म्हणजे समाजमनाला जिव्हारी लागणारा चटका. २००० च्या दशकाची सुरुवात झाली ती अशाच असंख्य चटक्यांनी. नापिकी, कर्जबाजारीपणा आणि भावमंदीच्या फेऱ्यात अडकल्याने आर्थिकदृष्टय़ा उन्मळून पडलेला विदर्भातील शेतकरी आत्महत्येला कवटाळत होता. यवतमाळ जिल्ह्यत आत्महत्यांचं प्रमाण सर्वाधिक होतं. यामुळे बाबा खूपच अस्वस्थ होते. वयाची नव्वदी आलेली. शिवाय हृदयरोग आणि इतर आजारांनी त्यांना पछाडलं होतं. असं असूनही त्यांच्या सामाजिक जाणिवा तरुण आणि जागृत होत्या. सर्वस्व गमावलेले कुष्ठरुग्ण आत्महत्येची वाट चोखाळत नाहीत; मग बळीराजा असं दुर्दैवी पाऊल का उचलतो आहे? हा प्रश्न त्यांना सतावत होता. समाजाने नाकारलेल्या घटकांसाठी आनंदवनाने काम केलं, तसं आत्महत्येच्या दुष्टचक्रात पिसल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायला हवं, आनंदवन-सोमनाथमधील शेती आणि जलसंधारणातील यशस्वी प्रयोगांचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायला हवा अशी बाबांची इच्छा होती. २००५ मध्ये मला एका खाजगी वृत्तवाहिनीत काम करणारा आमचा मित्र मंदार फणसे याचा फोन आला. ‘कर्जामुळे बैलजोडी विकावी लागल्याने शेतकऱ्याच्या कुटुंबाने स्वत:ला नांगराला जुंपून घेतलं’ अशी एक घटना घडली होती. मंदारने माझ्याकडे विचारणा केली (खरं तर आम्हा दोघांची अंतरीची इच्छाच बोलून दाखवली.), ‘‘भाऊ , आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करू शकतो का?’’ मी तत्काळ त्याला ‘हो’ म्हणालो आणि ‘आनंदवन शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नावर काम करणार’ अशा आशयाची बातमी झळकली. बातमी बघून मदतीचा ओघही सुरू झाला. मंदारचा मला आलेला तो फोन आनंदवनाच्या नव्या कामाचं ट्रिगर ठरलं.

समक्ष जाऊनच या प्रश्नाची दाहकता जाणून घेता येईल, अशी सूचना बाबांनी केली. त्यानुसार लगतच्या यवतमाळ जिल्ह्यत दौरा काढायचं आम्ही कार्यकर्त्यांनी ठरवलं. आमचे चार खंदे कार्यकर्ते- सुधाकर कडू, अरुण कदम, गजानन वसू आणि अशोक बोलगुंडेवार यांनी वणी, मारेगाव आणि झरी-जामनी अशा तीन तालुक्यांतील गावांना तीन-चार वेळा भेटी दिल्या आणि तिथल्या ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न जाणून घेतले. हळूहळू माणसं बोलती झाली तशी आत्महत्यांमागची कारणं लक्षात येऊ  लागली. लहरी पाऊस, कधी कोरडा, तर कधी ओला दुष्काळ, नापिकी, शेतीव्यवस्थेचं नुकसानीचं अर्थकारण, त्यातून निर्माण झालेला कर्जाचा बोजा, व्यसनाधीनता.. अशी एक ना अनेक कारणं. या तीन तालुक्यांतला झरी-जामनी हा तालुका सर्वाधिक मागास होता. झरी-जामनीत कोलाम या आदिवासी जमातीची संख्या खूप होती. त्यातल्या बहुतेकांना शेतीच्या तंत्राचा गंधही नव्हता. जमीन वरवर वखरून दुकानदार देईल ते कापसाचं बियाणं पेरायचं, त्याने सांगितलेल्या भरमसाट रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा मारा करायचा. मग ते पीक पावसाच्या आणि देवाच्या हवाली करायचं. आलं तर आलं. असं पाऊसभरोसे काम. बहुतांशी वेळा खतं-बियाणी विकणारा दुकानदारच सावकाराच्या (उदार) भूमिकेतही असे. महिन्याला शेकडा दोन टक्क्यांपासून पुढे कितीही व्याजदराने कर्जे दिली आणि घेतली जात. अशी ही कर्जे फिटणं सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा आणि शिक्षणाचीही दुरवस्थाच. अशी एकूण सगळी भयाण परिस्थिती.शेतकऱ्यांच्या सात पिढय़ा राबल्या तरीही शक्य नव्हतं. हा तालुका आंध्र प्रदेशच्या सीमेलगत. तिथले ठेकेदार वर्षांला एकरी अत्यल्प रक्कम देऊन या आदिवासी शेतकऱ्यांकडून ठेक्याने जमिनी घेत आणि रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा भरमसाट मारा करत मिरचीचं पीक घेऊन निघून जात. यातून काही शेतजमिनी कायमच्या भरकाड झाल्या होत्या. तसा हा मूळचा जंगली भूभाग. पण प्रचंड वृक्षतोडीमुळे संरक्षित साग वगळता जवळपास सगळं जंगल संपलेलं. सिंचनाचा अभाव. सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा आणि शिक्षणाचीही दुरवस्थाच. अशी एकूण सगळी भयाण परिस्थिती.

हे विदारक चित्र पाहिल्यानंतर झरी-जामनी तालुक्यात काम सुरू करायचं यावर शिक्कामोर्तब झालं. ‘आत्महत्या’ हा शब्द केंद्रस्थानी न ठेवता आनंदवनाने या भागात शेती आणि जलसंधारण क्षेत्रात सर्वागीण विकासाचं काम करावं असं ठरलं. नकारात्मकतेच्या विळख्यातून आदिवासी शेतकऱ्यांची सुटका करून आधी त्यांना शून्यापर्यंत आणणं आणि मग सकारात्मकतेच्या दिशेने नेणं- असं हे आव्हान होतं. यासाठी आधी एक प्रारूप उभं केलं तर शेतकऱ्यांच्या मनात आशा निर्माण होईल असं आमच्या लक्षात आलं. त्यामुळे या भागात ‘बेस कॅम्प’ उभा करणं क्रमप्राप्त होतं. मग सरकारदरबारी आमचं जमीन टटोलणं सुरू झालं. यात उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलझेले यांची खूप मदत झाली. त्यांच्या सूचनेनुसार तहसीलदारांनी आम्हाला सरकारी मालकीच्या उपलब्ध जमिनींची यादी सादर केली. अर्थात उपलब्ध जमीन ज्या गावाच्या हद्दीत होती त्या गावाच्या ग्रामसभेचा ठरावही आवश्यक होता. मग अरुण, अशोक, सुधाकर यांनी गावोगावी जात ग्रामस्थांशी चर्चा केली. पण प्रत्येक ठिकाणी लोकांची पैसा, धान्य, जनावरं अशा स्वरूपात संस्थेकडून आधी काहीतरी मिळावं अशी अपेक्षा असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. हे आनंदवनाच्या कार्यपद्धतीच्या विपरीत असल्याने जमीन मिळण्याच्या फ्रंटवरील चर्चा निष्फळ ठरत होत्या. अखेर मूळगव्हाण या खेडय़ाने आम्हाला साथ दिली. तिथल्या काही ज्येष्ठ मंडळींनी बाबांबद्दल आणि आनंदवनाबद्दल अंधूकसं ऐकलं होतं. त्यांच्या पुढाकाराने ग्रामसभेत ठराव मंजूर झाला आणि आम्हाला सरकारकडून दोन हेक्टर जमिनीचा तुकडा मिळाला.

ते २००६ साल होतं. बाबा खूप आजारी होते. पण कामासाठी जमीन मिळाल्याचं जसं त्यांना समजलं तसं मला बोलावून घेत ते म्हणाले, ‘‘आता अजिबात चालढकल नको. तू ताबडतोब नीघ. आणि तुला जमत नसेल तर मी जातो!’’ मग काय, युद्धपातळीवर आमची तयारी सुरू झाली. जो जमिनीचा तुकडा आम्हाला मिळाला तो उतरता आणि दगडांची भरमार असणारा होता. थोडक्यात, बंजर होता. लाकूडफाटा, तंबू, सतरंज्या, शिधासामुग्री, शिवाय एक्सकॅव्हेटर, ट्रॅक्टर, ट्रॉली असं सगळं घेऊन २ ऑक्टोबर २००६ रोजी गांधी जयंतीला आमच्या छंल्ल Land Army च्या ऐंशी-शंभर लोकांनी आनंदवनातून मूळगव्हाणकडे प्रस्थान केलं. यात कुणी शेती-पाणीविषयक कामाचं ज्ञान असलेले होते, कुणी माळीकाम करणारे होते, कुणी स्वयंपाकी, तर कुणी पडेल ते अंगमेहनतीचं काम करण्यास तयार असलेले होते. अरुण, भास्कर तसंच नुकतेच आनंदवनात कार्यकर्ता म्हणून दाखल झालेले बदलापूरचे प्रमोद बक्षी माझ्यासोबत होते. गजानन, अशोक तिथे आधीच जाऊन पोहोचले होते. या नव्या प्रकल्पाचं नामकरण आम्ही ‘Center for Social & Environmental Action’ (सामाजिक कृती आणि पर्यावरण संवर्धन केंद्र) असं केलं. चार तंबू ठोकून आमचं काम सुरू झालं. जमीन समतल करताना काही हाडांचे सांगाडे सापडले आणि ही जागा म्हणजे गावची पूर्वीची दफनभूमी असल्याचं आमच्या लक्षात आलं. त्याकडे दुर्लक्ष करत आमचं काम आम्ही जोमाने सुरू ठेवलं. गावकऱ्यांच्या नजरा आमच्याकडे खिळल्या होत्या. ‘ही कुष्ठरुग्ण, अपंग, दृष्टीअधू मंडळी शेतीविकासाचं कसलं काम करणार?’ अशी टिंगलटवाळी सुरू होती. मग गावकऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी आम्ही त्यांच्यातल्या काहींना आनंदवन आणि सोमनाथची वारी घडवून आणली. तिथली शेती, तलाव, दुग्धव्यवसाय, उद्योग पाहून गावकऱ्यांचा दृष्टिकोन समूळ बदलला. आधी ‘आपल्याला आनंदवन काय देईल’ इथपासून सुरू झालेल्या चर्चानी आता ‘आपण आपलं गाव आनंदवन-सोमनाथसारखं स्वयंपूर्ण कसं करू शकतो’ याकडे वळण घेतलं. मिळालेली जागा राहण्यायोग्य करणं आणि शेतकऱ्यांच्या शेतात कामं करणं असं दुहेरी काम अरुण, अशोक, गजानन, प्रमोद आणि सहकाऱ्यांनी सुरू केलं. शेतकऱ्यांच्या शेतजमिनीची खोलवर नांगरट, बांधबंदिस्ती, जलस्रोतांचा विकास इत्यादी काम सुरू झालं. आम्हाला प्यायचं पाणी बरंच दूरवरून आणावं लागत होतं. शिवाय त्यात नारू होते. म्हणून आम्ही पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकली तर मालकाला ते कुठलं तरी विष वाटलं. शेवटी काही दिवसांनी प्रकल्प परिसरात आम्ही एक विहीर खणायला घेतली. त्यात ब्लास्टिंगचं काम देण्यात आलेल्या बाहेरच्या ठेकेदाराच्या माणसांच्या निष्काळजीपणामुळे दगडाचा एक अणकुचीदार टवका उडून दोन-अडीचशे मीटर अंतरावर रस्त्यावरून चाललेल्या एका तरुण मुलीला लागला आणि त्यात तिचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेने गावं बिथरली. घटनेच्या रात्री तरुणांच्या काही टोळक्यांनी दारूच्या नशेत आमच्या प्रकल्पावर हल्ला करत अरुण आणि इतर कार्यकर्त्यांना मारहाण केली आणि प्रकल्प जाळून टाकायची धमकी देऊ  लागले. त्यांना समजावण्याचे माझे प्रयत्न निष्फळ ठरत होते. त्याचवेळी आमच्या तंबूवजा दवाखान्यात उपचार घेत असलेली एक स्थानिक व्यक्ती सलाइन लावलेल्या अवस्थेतच बाहेर आली आणि हल्ला करण्यास सज्ज असलेल्या गावकऱ्यांना त्यांच्या भाषेत उद्देशून म्हणाली, ‘‘या लोकांनी माझा जीव वाचवला आणि त्यांनाच तुम्ही मारायला निघाले?’’ या घटनेने वातावरण एकदम निवळलं. गावातल्या ज्येष्ठ मंडळींनी आणि पत्रकारांनीही जमावाला समजावून सांगितलं की, या घडलेल्या दुर्दैवी घटनेचं सर्वानाच दु:ख आहे, पण आनंदवनाची यात चूक नाही. शिवाय आनंदवन मुलीच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारायलाही तयार आहे. अखेर वाद मिटला आणि आमचं काम पुन्हा सुरू झालं. पुढे विलास आणि रेणुका माझ्यासोबत बऱ्याच अवधीसाठी इथे वास्तव्याला होते.

इथल्या ग्रामस्थांच्या मनात आनंदवन प्रवेशलं ते आरोग्यसेवेमुळे. स्थानिक पातळीवर रुग्णांची मोफत तपासणी, उपचार, शस्त्रक्रियेसाठी त्यांना आनंदवनात, तर कधी सेवाग्रामला पाठवणं, इत्यादीमुळे लोकांवर आनंदवनाची पकड घट्ट होऊ  लागली. माझी मुलगी शीतल डॉक्टर होऊन आल्यानंतर तिने इथे येऊन-जाऊन दीडेक वर्ष काम करत ‘उघडय़ावरची ओपीडी’ चालवली आणि आमच्या केंद्राच्या आरोग्यसेवेचा परीघ ग्रामस्थ महिला आणि मुलांपर्यंत विस्तारला. कधी गावजेवण देत, तर कधी स्थानिक धार्मिक सोहळ्यांत सामील होत आमच्या मंडळींनी ग्रामस्थांना आपलंसं केलं. आनंद निकेतन महाविद्यालयामार्फत मूळगव्हाणमध्ये ‘राष्ट्रीय सेवा योजने’अंतर्गत शिबीर घेतलं. ‘स्वरानंदवन’ वाद्यवृंदाचा प्रयोग केला. त्यामुळे आमच्या मूळ कामांना चांगला वेग येऊ  लागला. आनंदवन-सोमनाथला शेतीविकासात बहुमोल सहकार्य करणारी ‘सिंजेंटा फाऊंडेशन’ ही संस्था आणि आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून आम्ही शेतकरी मेळाव्यांचं आयोजन करू लागलो. शेतकऱ्यांनी किमान दुबार पीक घ्यावं या उद्देशाने आम्ही नव्या जलस्रोतांच्या उभारणीवर भर देण्याचं ठरवलं. आनंदवनानजीकच्या काही गावांमध्ये आम्ही जे प्लास्टिक-टायर-काँक्रिटचे बंधारे बांधले होते तसा एक बंधारा मूळगव्हाणजवळून बारमाही वाहणाऱ्या नाल्यावर बांधायचं असं सर्वेक्षणाअंती ठरलं. गजानन आणि आमच्या लँड आर्मीने रात्रीचा दिवस करत पावसाळ्याआधी हा बंधारा बांधून काढला. साठलेलं पाणी बघून गावकरी खूश झाले. पावसाळ्यानंतर या पाण्यावर पीक घेता येईल याची खात्री त्यांना पटली. आमच्या जमिनीच्या उजाड तुकडय़ावरही आता शेती फुलली होती. चारा लागवड झाली होती. पक्का दवाखाना, स्वयंपाकघर आणि निवासस्थानं उभी राहिली होती. आमची शेती बघून शेतकऱ्यांनी बंधाऱ्यात साठलेल्या पाण्यावर भाजीपाला पिकवला. आणि ती मूळगव्हाणमधील दुबार पिकाची नांदी ठरली.

या कामाबद्दल जाणून घेण्यासाठी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. रावसाहेब शिंदे, गजानन महाराज संस्थान, शेगावचे अध्यक्ष शिवशंकरभाऊ  पाटील, महाराष्ट्राचे तत्कालीन कृषिमंत्री बाळासाहेब थोरात प्रभृतींनी प्रकल्पाला भेट दिली. संदीप खरे आणि डॉ. सलील कुलकर्णी यांनी याच सुमारास प्रकल्पाला भेट देऊन एक छोटेखानी कार्यक्रमही सादर केला. पुढे २००८ मध्ये आनंदवनाचे आप्त आणि सारस्वत बँकेचे सर्वेसर्वा खासदार एकनाथ ठाकूर हे बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पाच जनरल मॅनेजर्स अशी अख्खी टीमच घेऊन आमच्या प्रकल्पात दाखल झाले. इथली परिस्थिती आणि आमचं काम बघून त्यांनी हे काम पुढे नेण्यासाठी चक्क एक कोटी रुपयांची मदत बँकेतर्फे दिली. यातून मूळगव्हाणसोबत आजूबाजूच्या गावांमध्येही आम्ही अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या सुमारे ७०० एकर जमिनीत जलसंधारण, मृदासंधारण आणि सिंचनाची कामं करू शकलो. या कामांचं यश बघून लोकप्रतिनिधी, शासनाचे अधिकारी आमच्या प्रकल्पाला भेट देऊ  लागले आणि केलेल्या कामांचं अवलोकन करू लागले. याची परिणती म्हणून २००९ मध्ये एक शासन निर्णय प्रसिद्ध झाला की, महाराष्ट्रात आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या सर्व शेतजमिनींच्या जल आणि मृदासंधारणाचं काम ‘महारोगी सेवा समिती, वरोरा’तर्फे करण्यात यावं! अर्थात आमच्या मर्यादित मनुष्यबळामुळे आम्ही या कामाचा फोकस झरी-जामनी तालुक्यापुरताच मर्यादित ठेवायचा असं ठरवलं. या शासन निर्णयाच्या माध्यमातून आम्ही पुढे चार र्वष जल-मृदासंधारण आणि सिंचनाची कामं झरी-जामनी तालुक्यातील विविध गावखेडय़ांत प्रभावीपणे राबवली. पण पुढे पुढे केलेल्या कामाच्या लाखो रुपयांच्या रकमेची परतफेड होण्यास शासनदरबारी दोन- दोन र्वष खेटे घालावे लागल्याने आम्हाला फार मन:स्ताप सहन करावा लागला. त्यामुळे काही काळ काम थांबलं. आजवर ३०० पेक्षा जास्त अल्पभूधारक शेतकरी कुटुंबांपर्यंत पोहोचलेलं हे काम आता आम्ही स्वबळावरच पुढे नेण्याचं ठरवलं आहे. ‘भारत जोडो’ अभियानातील आमचा सहकारी आणि किनवटच्या साने गुरुजी रुग्णालयाचा संस्थापक डॉ. अशोक बेलखोडे महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी केंद्रातील कॉटेज हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या तपासणीसाठी येत असतो. त्याचा हा सेवायज्ञ गेली नऊ- साडेनऊ  र्वष अखंड सुरू आहे. माझा ज्येष्ठ सहकारी कुष्ठमुक्त अनिल लेले केंद्राचं व्यवस्थापन सांभाळतो.

शेतीविकासाच्या ‘झरी’ प्रयोगाच्या या यशस्वी वाटचालीतलं एक उदाहरण सांगतो. ‘घर बांधून द्या’ म्हणत आमच्याकडे सतत खेटे घालणारा दादाराव मेश्राम नावाच्या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या शेतात आम्ही सारस्वत बँकेच्या सहकार्यातून कामं केली. आज दादाराव आणि त्याचे भाऊ  शेतीत वर्षांकाठी एक नाही, दोन नाही, तर तीन-तीन पिकं घेतात! त्यांच्या उत्पन्नाचे आकडे थक्क करणारे आहेत. शेतीउत्पन्नातून दादाराव आणि त्याच्या भावांनी पक्कं घरही बांधलं आहे. दादारावच्या शेतीकडे आज एक ‘मॉडेल’ शेती म्हणून बघितलं जातं. यात आमचा वाटा केवळ दहा टक्के. बाकी ९० टक्के श्रेय दादाराव आणि त्याच्या भावांच्या मेहनतीचंच! गमतीचा भाग म्हणजे ‘आनंदवनाला शेतीत शिरकाव करू दिला तर ते लोक तुझं शेत बळकावतील..’ असा सल्ला देणारे लोक आज दादारावकडे ‘आनंदवनाच्या लोकांना आमच्याही शेतीत काम करायला सांग..’ अशी शिष्टाई करण्यास सांगत असतात. असो..

पुढे आम्हाला शासनाकडून आमच्या जमिनीलगतच आणखी त्र्याण्णव एकर जमीन मिळाली. ही जमीन म्हणजे आम्हाला आधी मिळालेल्या जमिनीच्या तुकडय़ापेक्षाही ‘सर्वार्था’ने कठीण असा भूप्रदेश असल्याने आजवर तिच्यात गुंतवणूक करणं आम्हाला शक्य झालं नव्हतं. पण आता ती वेळ आली आहे. कारण लवकरच एक नवा अध्याय आमच्या ‘सामाजिक कृती आणि पर्यावरण संवर्धन केंद्रा’ला जोडला जातो आहे! त्याबद्दल लेखमालेअंती सांगेनच. सध्या थांबतो.

vikasamte@gmail.com

Story img Loader