या लेखमालेदरम्यान आजवर काही माणसं आपल्याला सविस्तर भेटली, तर काही नुसती डोकावून गेली. पण अशी शेकडो, हजारो माणसं आहेत ज्यांचा उल्लेख मी इच्छा असूनही करू शकलो नाही. यातली काही संस्थेच्या प्रकल्पात राहणारी होती (आहेत), काही येऊन-जाऊन राहणारी, काही देशातून-परदेशातून पाहुणे म्हणून आलेली, तर काही कधीच न येतासुद्धा कायमची जुळलेली. कुणी आपलं आयुष्य आनंदवनाच्या कामात झोकून दिलं, कुणी आयुष्याचा काही भाग इथे व्यतीत करत मोलाचं योगदान दिलं, कुणी आनंदवनाची ओळख विविध माध्यमांतून जनमानसापर्यंत पोहोचवली, तर कुणी आर्थिक योगदान देत सहकार्य केलं. पण यातला समान धागा आहे तो ‘सहृदयते’चा! कारण सहृदयता हाच आनंदवनाचा आत्मा आहे. म्हणून मी म्हणेन की, ही सगळी माणसं आनंदवनाची नव्हे, तर सहृदयतेची ‘Brand Ambassadors’ आहेत.

माझ्या काही सहकाऱ्यांचा परिचय मी याआधी करून दिला होता. पण त्यांच्याव्यतिरिक्तसुद्धा असे कित्येक ‘ऌेी-ॠ१६ल्ल’ एकखांबी तंबू होते/ आहेत- ज्यांनी कायम पडद्यामागे राहत आपलं आयुष्य इथे ओतलं. त्यात सुतारकाम विभागात अविरत राबणारे कुष्ठमुक्त नामदेव तागड, धोंडबा सणस, गोविंदा पिठोरे, प्रभाकर मिस्त्री आहेत, डेअरीत पाच दशकं कार्यरत असलेले कुष्ठमुक्त दर्याजी ढेंगे आहेत, कुष्ठरोगामुळे दोन्ही हातांची जवळपास सगळी बोटं वाकडी झाली असूनही सुबक, वळणदार अक्षर असलेला, महारोगी सेवा समितीचे दैनंदिन हिशेब, खतावणी, बँकेचे व्यवहार, संस्थेचं अंदाजपत्रक, संस्थेच्या कार्यकारिणीचे ठराव इत्यादी गोष्टी आज वयाच्या ७४ व्या वर्षीही समर्थपणे हाताळणारा दिनकर सिर्सिकर आहे, कुठलंही व्यावसायिक प्रशिक्षण नसताना आनंदवन-सोमनाथचं इलेक्ट्रिक फिटिंग, मोटार रिवाइंडिंग, प्लंबिंग डिपार्टमेंट उभं करणारे पुंडलिक बहादुरे, बापूराव वाघमारे आहेत, मजुरी करताना वयाच्या १९ व्या वर्षी थ्रेशर मशीनमध्ये आपला उजवा हात गमावल्याने संधी-निकेतनमध्ये १९७९ साली प्रशिक्षणासाठी दाखल झालेला, श्रमदानात आपल्या एका हाताने मणामणाचे दगड उचलत बाबांना सुखद धक्का देणारा, अंध, कर्णबधिर विद्यालयांतील मुलांची काळजी वाहणारा, गेली कित्येक वर्ष संस्थेच्या जमिनीच्या नोंदींची, व्यवहारांची कामं, धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कामं, वकिलांकडील कामं अशा किचकट गोष्टी सहजपणे हाताळणारा नरेंद्र देवघरे आहे, तीन-तीन, चार-चार दशकं बाबा-इंदू, आनंदवनातील आम्ही सगळे यांची सुखरूप वाहतूक करणारे, शिवाय लाकूड, लोखंड, वाळू, सिमेंट, अन्नधान्य आदी माल ट्रकमधून प्रकल्पांतर्गत वाहून नेणारे कुष्ठमुक्त भास्कर भोईर, महादेव कोंद, इनायतखान पठाण, प्रभाकर समुद्रे, रामदास मेश्राम, विनायक, दयाराम आहेत, आनंदवनाचा वाहन दुरुस्ती विभाग तीस-पस्तीस वर्ष सांभाळणारे श्रीकांत गद्रे आहेत, आनंदवन, सोमनाथ, लोक-बिरादरीतील रहिवाशांच्या, पाहुणे मंडळींच्या उदरभरणाचं कष्टाचं काम करणारे रामसिया व रामलखन पटेल, भगवानदीन, बिंजू, हरी रामटेके, अशोक, ज्ञानेश्वर, प्रमोद, चंद्रभान, अशोक, कुंजबिहारी आहेत.

ulta chashma Eknath shinde
उलटा चष्मा : ‘फिरते’बिरते काही नकोच!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
d y chandrachud
D. Y. Chandrachud : प्रार्थनास्थळांबाबतच्या निर्णयावर माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी…”
after Devendra Fadnavis elected as cm Nagpur is waiting for Devendra fadnavis Arrival at Ramgiri
‘रामगिरी’ला ‘देवा’भाऊची प्रतीक्षा; आता लवकर या…
Sane Guruji , book Sane Guruji Jeevan Gatha,
‘साने गुरुजींची जीवनगाथा’ आता ‘श्रवणीय’
restoration work of Tuljabhavani temple is underway under supervision of Archaeological Department
तुळजाभवानी मंदिराला मिळणार पुरातन झळाळी, जीर्णोध्दाराचे काम पुरातत्व खात्याच्या निगराणीखाली वेगात सुरू
rekha lata mangeshkar
“देवा पुढल्या जन्मी…”, रेखा यांनी सांगितला लता मंगेशकरांबद्दलचा ‘तो’ किस्सा; म्हणाल्या, “मला त्यांनी…”
Veteran cartoonist Shi da Phadnis debuting at 100 shared his life journey expressing I wanted to be a Phadnis
‘मला शि. द. फडणीस व्हायचे होते’ शंभरीत पदार्पण केलेल्या शिदंची भावना

सुरुवातीच्या काळात- म्हणजे सुमारे १९७३ ते १९८३ पर्यंत सर्व पत्रांची उत्तरं मी लिहून वा टाईप करून स्वत:च देत असे. नंतर नंतर मात्र ते एकटय़ाला अशक्य व्हायला लागलं. कारण आनंदवनाची ओळख जसजशी जगाला होऊ  लागली तसतसा येणाऱ्या पत्रांचा भारही प्रचंड वाढू लागला. माझा हा भार हलका केला १९८४ पासून माझ्या मदतीला आलेल्या केतकर काका, कर्नल रेगे, फिलीप जॉर्ज, अविनाश साठे, रमेश कोठारे, जोशी, राजन या मंडळींनी. त्यानंतर काही वर्ष हे काम लोक-बिरादरीतून आनंदवनात आलेल्या, मराठी-इंग्रजी वाचनाचा भरपूर साठा, सुवाच्य अक्षर, सुंदर लेखणी असलेल्या सीताकांत प्रभूने सांभाळलं. इंदूच्या ‘समिधा’ या आत्मकथेचं शब्दांकन प्रभूनेच केलं! प्रभूकडून पत्रव्यवहाराची ‘बॅटन’ सांभाळली १९९० साली आनंदवनात कार्यकर्ता म्हणून दाखल झालेल्या बेळगावच्या माधव कवीश्वर यांनी. अत्यंत कष्टाळू वृत्तीच्या कवीश्वरांनी आजवर तीन लाखांवर मराठी-इंग्रजी पत्रं निश्चितच हातावेगळी केली आहेत. आज प्रभू आनंदवनात येणाऱ्या ढीगभर पाहुण्यांचा भार वाहतो, तर कवीश्वर ढीगभर पत्रांचा भार वाहतात. वाहनदुरुस्ती, ट्रॅक्टर चालवणे, ड्रायव्हिंग, ऑफिस ऑटोमेशन अशा माझ्या आवडीच्या क्षेत्रांत माझे साथीदार होते नंदू देवगडे आणि विजय जुमडे. नंदू सोमनाथमध्ये टनाने भातपिकाच्या राशी उभ्या करणाऱ्या कुष्ठमुक्त मारोती व शांता देवगडे यांचा मुलगा, तर विजू शंकरभाऊ-सिंधूमावशीचा. ऐंशी-नव्वदच्या दशकात आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक टाईपरायटर, भलीमोठी झेरॉक्स मशीन, ऑफसेट प्रिंटिंग मशीन वगैरे गोष्टी होत्या. कुठलंही पूर्वप्रशिक्षण नसताना नंदूने हे सर्व लीलया सांभाळलं. तर सोमनाथमधल्या वाहनांची- विशेषत: ट्रॅक्टर व शेती- अवजारांची दुरुस्ती करण्याचं काम विजूने अनेक वर्ष एकहाती केलं. याशिवाय दोन्ही भारत जोडो अभियानांच्या यशस्वीतेतही नंदू आणि विजूचा मोलाचा वाटा होता. कधी नव्या मशिनरी बसवण्याचे काम, कधी ड्रायव्हिंग, तर कधी शेती नांगरणे असे पडेल ते काम करणाऱ्या ‘ऑल-राऊंडर’ नंदू-विजू यांनी ‘आनंदवनाच्या दुसऱ्या पिढीचे शिलेदार’ अशी स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली.

ज्याँ बुले या स्विस-फ्रेंच लेखकाने साठीच्या दशकात आनंदवनावर एक कविता लिहून तिच्या प्रती स्वित्र्झलडमध्ये वाटल्या. कविता वाचून तिथल्या कितीतरी लोकांनी आनंदवनाला भरघोस मदत पाठविली होती. शिवाय ‘Les Derniers Les Premiers’ हे फ्रेंच भाषेतलं पुस्तकही त्यांनी बाबांवर लिहिलं. पुढे BBC चे वरिष्ठ पत्रकार Graham Turner समशीतोष्ण प्रदेशातील फॉरेस्ट फाìमगचे प्रणेते Robert A. de J. Hart यांनी लेखांद्वारे बाबा आमटे या व्यक्तीची आणि त्यांच्या कार्याची ओळख जागतिक व्यासपीठावर नेली. याशिवाय साठ-सत्तरच्या दशकापासून आनंदवनाशी जुळलेल्या युरोपस्थित मारियाना, हेन्रिएट्टा, अ‍ॅनेट या कायम आनंदवनाचा एक भाग होऊन राहिल्या. यांनी आपापल्या देशात निधी उभा करत वर्षांनुवर्ष आनंदवनातल्या प्रवृत्तींना अर्थसाहाय्य केलं. ऑर्थर तार्नोवस्की यांची सेबॅस्टियन आणि ल्यूसियन ही दोन्ही मुलं आपल्या वडिलांचा वारसा चालवत संधी-निकेतनमधील उपक्रमांना आर्थिक साहाय्य करत असतात. गेल्या एक दशकापासून आनंदवनाशी जुळलेले आणि अमेरिकेत आनंदवनाचं प्रतिनिधित्व करणारे चंदा आणि रवी आठले सातत्याने संस्थेच्या विविध उपक्रमांसाठी निधीची उभारणी करत असतात.

१९८१ पासून संपूर्ण टाटा ग्रुपने त्यांचा ट्रस्टस् आणि कंपन्यांमार्फत महारोगी सेवा समितीच्या प्रकल्पांना आरोग्य, शेती, पाणी, बांधकाम, वाहने इत्यादी क्षेत्रांत आजवर भरघोस मदत केली आहे. जेआरडींनी सुरू केलेला हा मदतयज्ञ डॉ. रूसी लाला, डॉ. एम. एस. स्वामिनाथन, डॉ. दवे, प्रमोदिनी समर्थ, सॅम पालिया, रतन टाटा, डॉ. एन. ए. सूनावाला, मुकुंद गोरक्षकर, प्रवीण कडले यांनी तसाच अखंड सुरू ठेवला. ‘स्विस-एड’नंतर महारोगी सेवा समितीच्या वाटचालीत मोठं योगदान होतं स्वित्र्झलडच्याच ‘नॉव्हेल प्लॅनेट’ या संस्थेचं. एका संस्थेला फक्त एकदाच मदत देण्याचा त्यांचा नियम होता. पण त्यास मोडता घालत सतत २० वर्ष ‘नॉव्हेल प्लॅनेट’ने मुख्यत्वे संस्थेच्या प्रत्येक प्रकल्पातील हॉस्पिटल्स, शाळा, गोडाऊन्स इत्यादी बांधकामांमध्ये अर्थसाहाय्य दिलं. शिवाय ‘नॉव्हेल प्लॅनेट’च्या माध्यमातून दरवर्षी आमच्याकडे येणारे तरुण-तरुणी कुष्ठरुग्णांच्या जखमा बांधण्यापासून बांधकामाचा पाया खोदण्यापर्यंत सर्व कामं विनातक्रार करत!

राजकारणापलीकडे जात आनंदवनाच्या कार्यात सहभागी असलेली राजकारणातील मंडळीही अनेक आहेत. प्रामुख्याने इंदिराजी, यशवंतराव चव्हाण, जॉर्ज फर्नाडिस, वसंत साठे, इंद्रकुमार गुजराल, डॉ. मनमोहन सिंग, शरद पवार, नितीन गडकरी, दिग्विजयसिंग, आर.आर. पाटील, बाळासाहेब थोरात, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार ही सगळी नावं. यांतल्या प्रत्येकाने आनंदवनाच्या यशस्वी वाटचालीत वेळोवेळी आपला अमूल्य सहभाग नोंदवला. केवळ बाबांच्या आणि इंदूच्या आजारपणातच नव्हे, तर संस्थेतील प्रत्येक आजारी व्यक्तीच्या मदतीला वेळोवेळी धावून आलेल्या डॉक्टर मंडळींच्या योगदानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. वरोऱ्याचे डॉ. संतदास सैनानी यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा मुंबईचे डॉ. गिंडे, डॉ. अरविंद बावडेकर, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख, पुण्याचे डॉ. जगताप, नागपूरचे डॉ. संजय उगेमुगे, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, डॉ. बाबा पाटील, डॉ. उदय माहोरकर, डॉ. जोगळेकर यांनी कायम राखली.

इंदूच्या लहान बहिणी- म्हणजे आमच्या दोन्ही मावश्या (नागपूरची बेबीमावशी आणि दिल्लीची सुमामावशी) यांनीही आनंदवनासाठी प्रचंड खस्ता खाल्लय़ा. कित्येक प्रसंगी दिवसचे दिवस यांची घरं म्हणजे आनंदवनाची कार्यालयंच बनून जात. सुमामावशीचे यजमान कृषीशास्त्रज्ञ डॉ. मनमोहन सदाफळ यांनीही संस्थेत शेतीचे नवे प्रयोग राबविण्यासाठी, पाणलोटाची कामं करण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केलं. नागपूरचे प्रभाकर व मीनाताई झांटय़े, विवेक व नीला फडणीस, मनोहर तारकुंडे प्रभृती आनंदवनाच्या तिन्ही पिढय़ांशी संलग्न आहेत. या मंडळींनी वारंवार केलेल्या दिलदार मदतीमुळेच आनंदवनाचा पाया भक्कम आहे.

२००३ मध्ये काही महिन्यांसाठीच आनंदवनात आलेला पुण्याचा सी. ए. केदार बापट याने आपल्या ज्ञानाचा उपयोग करत आनंदवनातील हस्तलिखित हिशेबांमध्ये सुटसुटीतपणा आणला. पुढे २००७ साली एका कार्यक्रमानिमित्त आनंदवनात आलेला ठाण्याचा सी. ए. विवेक रानडे आनंदवनाशी कायमचा जुळला. त्याने वारंवार इथे येत सर्व हस्तलिखित हिशेबांचा पसारा पूर्णपणे संगणकीकृत करून नवा अध्याय रचला. आनंदवनाच्या शाश्वत निधीउभारणीच्या प्रयत्नांतही विवेकचा मोलाचा वाटा होता. केदार आणि विवेकने मजबूतपणे रचलेल्या पायामुळे आनंदवनाची आर्थिक आघाडीवरील वाटचाल सुकर झाली. आज वाढत चाललेल्या कामांमुळे सतत वाढत्या हिशोबांच्या पसाऱ्याच्या रखरखावासोबतच वेगाने बदलत चाललेले कायदे आणि त्यामुळे आनंदवनापुढे सतत उभी ठाकणारी नवनवी आव्हानं पुण्याचे जगदीश पुराणिक आणि त्यांच्या सहकारी दीपा अथनी समर्थपणे पेलत आहेत.

आनंदवनाच्या आप्तांच्या तीन पिढय़ा आनंदवनाशी जोडल्या गेल्याचीही काही अनोखी उदाहरणं आहेत. पुण्याचे अ‍ॅड. सदाशिव व डॉ. लताताई परांजपे, भाई नायडू आणि सुधाताई लोढा यांचे परिवार त्यांपैकीच. परांजपे काका-काकूंचं घर म्हणजे इंदू-बाबांचं आणि आमचं सर्वाचं हक्काचं निवासस्थान आणि आनंदवनाचं संपर्क कार्यालयही! गेल्या तीन दशकांहून अधिक काळ आपल्या अथक परिश्रमांतून परांजपे कुटुंबीयांनी पुण्यातील जनमानसात आनंदवनाच्या कार्याची ओळख रुजविण्याचं कार्य केलं आहे. सत्तरीच्या दशकातील मित्रमेळाव्यापासून आनंदवनाशी एकरूप झालेले नायडू कुटुंबीय भाईंचा वारसा समर्थपणे पुढे नेताना लोकांना आनंदवन प्रवृत्तीची ओळख करून देण्यासाठी झटत आहेत. सुधाताई लोढा यांची तर कहाणीच वेगळी! त्यांची मुलगी डॉ. मनीषा पहिल्या भारत जोडो अभियानातील सायकलयात्री. अखंड उत्साहाचा झरा असणाऱ्या सुधाताईंची मुलं-सुना, मुली-जावई, नातू-नातसून असे सर्वजण आनंदवनात तन-मन-धनाने शरीक आहेत! याशिवाय आनंदवनाच्या प्रत्येक उपक्रमात स्वत:ला झोकून देणारे नागपूरचे प्रा. दिलीप पेशवे आहेत, पुण्याचे शिल्पेश गंभिरे, रमण शिंदे, महेंद्र रणपिसे आहेत, ठाण्याचा सुयोग मराठे आहे, नाशिकची अ‍ॅड. क्षमा संगमुळी आहे. मित्रमेळाव्यात आलेले आणि व्यवसायाने उद्योजक असलेले मुंबईचे नरेंद्र मेस्त्री आणि त्यांचा परिवार आनंदवनाशी नव्वदच्या दशकापासून कायमचा जुळला. तेव्हापासून नरेंद्र संस्थेचा विश्वस्तही आहे. मुंबईमधली संस्थेची कामं सांभाळणं, कामासाठी आलेल्यांची सोय करणं, ‘आनंदवन मित्र मंडळा’च्या माध्यमातून आनंदवनासाठी निधी उभारणं, नवनव्या लोकांना आनंदवनवारी घडवून आणणं असा नरेंद्रचा प्रवास अव्याहतपणे सुरू आहे. आनंदवनाचे आप्त स्व. डॉ. नीतू मांडके व त्यांच्या पत्नी डॉ. अलकाताई मांडके, शिरीष-अंजली गानू यांची मुंबईची घरं, तर दादा-प्रभाताई चाफेकर यांचं पुण्याचं घर म्हणजे आमच्यासाठी हक्काची निवासस्थानंच. या सर्वाच्या निरपेक्ष प्रेमाशिवाय आणि मदतीशिवाय मुंबई-पुणं सर करणं आम्हाला शक्य झालं नसतं.

आजवर आनंदवनावर लिहिली गेलेली पुस्तकं बाबा-इंदू आणि प्रामुख्याने त्यांच्या संघर्षांवर आधारित होती. शिवाय त्यांत बऱ्याच त्रुटीही होत्या. पण आनंदवन ही समाजव्यवस्था सामूहिक प्रयत्नांचं फलित आहे, समाजाने ‘नाकारलेल्या’ माणसांनी ‘साकारलेल्या’ प्रयोगांची ही गाथा आहे, हे वास्तवार्थाने पुढे आणलं ते माझं ‘आनंदवन प्रयोगवन’ हे पुस्तक शब्दांकित आणि प्रकाशित करणाऱ्या सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी आणि गौरी कानेटकर या त्रयीने. आनंदवन हे केवळ सुखी, नांदतं गावच नाही, तर त्याहीपलीकडे गावखेडय़ांच्या सर्वंकष विकासाचं जितंजागतं उदाहरणही आहे, हे चित्र आज मराठी माणसापुढे येण्यासाठी या मंडळींचे अथक परिश्रम कारणीभूत आहेत.

२०१० नंतरच्या काळात आनंदवनापुढे आर्थिक आघाडीवर मोठी आव्हानं उभी ठाकली होती. २००९ च्या दुष्काळाचा मोठा फटका शेतीउत्पन्नाला बसला होता. सव्वा कोटीचं शेतीचं वार्षिक उत्पन्न घसरून १५ लाखांवर आलं होतं. त्यात कुष्ठरुग्णांसाठी मिळणारं शासकीय अनुदान १५ रुपये प्रतिरुग्ण प्रतिदिन एवढं अत्यल्प होतं! (आणि ही परंपरा १९९३ पासून कायम होती.) आनंदवनच नव्हे तर महाराष्ट्रात कुष्ठक्षेत्रात कार्यरत सर्व स्वयंसेवी संस्थांच्या अनुदानात वाढ करण्यात यावी यासाठी आनंदवन प्रयत्नशील होतं. शिवाय आर्थिक स्थैर्यासाठी ‘शाश्वत निधी’च्या उभारणीसाठीही आमचे प्रयत्न सुरू होते. यासाठी आनंदवनाचा आवाज बनलं ‘लोकसत्ता’!  गिरीश कुबेर यांनी लोकसत्तेचे संपादक म्हणून नुकतीच सूत्रं स्वीकारली होती. त्यांनी ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून कुष्ठरुग्णांसाठी स्वयंसेवी संस्थांना मिळणाऱ्या अल्प शासकीय अनुदानाचं वास्तव लोकांपुढे मांडलं. त्यामुळे सरकारदरबारी खळबळ तर माजलीच, पण या बातमीने राज्य सरकार कुष्ठरुग्णांना अनुदान देतं, हे वास्तव महाराष्ट्राच्या तत्कालीन आरोग्यमंत्र्यांना प्रथमच कळलं! त्यानंतर यासंदर्भात पाठपुरावा करण्यासाठी कुबेर स्वत: माझ्या मुलांना घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडेही गेले. पुढे सहा-आठ महिन्यांतच हे अनुदान वाढून ७० रुपये झालं आणि आनंदवनासकट कुष्ठक्षेत्रात कार्यरत संस्थांना मोठा दिलासा मिळाला. शाश्वत निधीच्या उभारणीतही ‘लोकसत्ता’चं योगदान मोलाचं ठरलं. ‘Idea Exchange’ आणि नंतर ‘सर्व कार्येषु सर्वदा’ या उपक्रमांच्या माध्यमातून ‘लोकसत्ता’नं जनमानसाला आनंदवनाची नव्याने ओळख करून दिली. यातनं कोटभर रुपये उभे राहिलेच; शिवाय हजारो सुहृदही आनंदवनाशी कायमचे जोडले गेले. ‘आनंदवन’ आणि ‘लोकसत्ता’ परिवाराचं हे मैत्र आजही कायम आहे. मूर्ती लहान, पण कीर्ती महान असा आमचा मित्र व ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुनंदन लेले याने एकहाती प्रयत्नांतून क्रिकेट क्षेत्रातील दिग्गजांना आणि काही कंपन्यांना एकत्र करत आनंदवनाच्या शाश्वत निधीत पुढे दीड कोटीची भर घातली! ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी ‘चिमणराव ते गांधी’ हा Export Quality नाटय़प्रयोग (कारण हा प्रयोग प्रभावळकर फक्त विदेशातच सादर करतात!) फक्त आनंदवनासाठी म्हणून पुण्यात दोन वेळा सादर केला आणि यातनं उभी झालेली मोठी रक्कम आनंदवनाच्या शाश्वत निधीस अर्पण केली. हे सारं जुळवून आणलं पुण्याच्या परांजपे कुटुंबाच्या दुसऱ्या पिढीचे वारसदार डॉ. मंदार परांजपे यांनी.

१९८१ साली ‘इंडिया टुडे’मध्ये आनंदवनावर प्रकाशित झालेला ‘The healing touch’ हा लेख वाचून रमेश कचोलीया नावाची मुंबईच्या एका प्रायव्हेट कंपनीत काम करणारी व्यक्ती प्रभावित होते, लगोलग ट्रेनने आनंदवनात येते, बाबांना भेटून, आनंदवन पाहून प्रचंड भारावते. निघताना रमेशभाई मोठय़ा रकमेचा मदतीचा धनादेश बाबांकडे सुपूर्द करत माहितीपत्रकाची मागणी करतात. पण ‘आनंदवनाचं माहितीपत्रक’ अशी काही गोष्ट अस्तित्वातच नाही, हे ऐकून ते चक्रावतात! आज २०१७ साल! गेल्या ३६ वर्षांच्या कार्यकाळात रमेशभाई स्वत:च आनंदवनाचं माहितीपत्रक बनले आहेत. मी एवढंच सांगेन की, या माणसाने आनंदवनाला मदत करणारी किती माणसं जोडली, किती संस्था जोडल्या याची गिनतीच नाही! खरोखरच यांनी आनंदवनासाठी एवढं केलंय, की रमेशभाईंचं नाव महारोगी सेवा समितीच्या कणाकणावर कोरलं गेलं आहे. रमेशभाईंप्रमाणेच आनंदवनाचे आप्त मुंबईचे बांधकाम व्यावसायिक अरुण शेठ यांचंही आनंदवनाच्या उभारणीत फार मोठं योगदान आहे. रमेशभाई, अरुण शेठ यांच्या भगीरथ प्रयत्नांतून ‘स्वरानंदवन’चा कार्यक्रम मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात पार पडला आणि त्यातनं उभ्या झालेल्या पावणेदोन कोटी रुपयांच्या निधीतून आनंदवनात ४०० कुष्ठमुक्त महिलांचं ‘आपुलकी’ वसतिगृह साकारलं. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आमच्या मिलिंद सरनोबतने केलेली प्रचंड धावाधाव कुठल्याही मापकाद्वारे मोजता येणारी नाही. असाच आणखी एक भगीरथ प्रयत्न केला नाशिकचे बांधकाम व्यावसायिक मनोजभाई टिबरेवाला यांनी. आनंदवनाच्या शाश्वत निधीत भलंथोरलं वैयक्तिक योगदान देणाऱ्या मनोजभाईंनी २०१३ साली नाशिकमध्ये त्यांच्या मित्रमंडळींना सोबत घेत ‘स्वरानंदवन’चा कार्यक्रम आयोजित केला आणि ७५ लक्ष रुपयांचा निधी उभा केला. या निधीतून आनंदवनात रोज दोन वेळा २००० रहिवाशांचं जेवण रांधणाऱ्या आणि २० ते २२ एलपीजी सिलिंडर्सची दैनंदिन भूक असलेल्या ‘मेगा किचन’शेजारी ‘मेगा बायोगॅस प्लँट’ उभा राहिला. त्यात गजाननच्या डेअरीतून येणारं सहा टन शेण, सोबत काही किचन-वेस्ट आणि गोळा केलेलं बायो-वेस्ट फीड केलं जाऊ लागलं. त्यातनं रोज २० एलपीजी सिलिंडर्सएवढा प्रचंड बायोगॅस निर्माण होऊ  लागला. यामुळे आनंदवनाचं मेगा किचन कायमचं LPG-Free झालंच; वर वर्षांकाठी ७० लक्ष रुपयांची बचतही होऊ लागली!

आनंदवनाची आजवरची वाटचाल शक्य झाली ती केवळ अशा हजारो-लाखो ज्ञात-अज्ञात सुहृदांच्या सक्रिय पाठिंब्यामुळेच. बाबा आमटेंना अभिप्रेत असलेले हेच ते ‘प्रभूचे हजारो हात’!

विकास आमटे

vikasamte@gmail.com

Story img Loader