ज्या कुष्ठरुग्णांचं अस्तित्वच समाजाने नाकारलं होतं अशा लोकांनी आपल्यासारख्याच इतरही वंचित घटकांना सोबत घेऊन जगाच्या नकाशावर स्वतंत्र अस्तित्व असलेलं स्वत:चं एक गाव- ‘आनंदवन’ निर्माण केलं. आनंदवनाचा ६७ वर्षांचा विलक्षण प्रवास रेखाटणारे सदर..
गौतमबुद्ध, येशू ख्रिस्त, कार्ल मार्क्स, रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, विनोबा भावे, साने गुरुजी, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, शिवराम हरी राजगुरू, सुखदेव थापर, खुदिराम बोस, कन्हैयालाल दत्त या युगपुरुषांचा बाबा आमटेंवर विलक्षण प्रभाव होता. टागोर, गांधीजी, राजगुरू, विनोबाजी यांचा प्रत्यक्ष सहवासही बाबांना घडला. ज्या वयात माणसाची वैचारिक जडणघडण होत असते, त्यातील प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर बाबांच्या आयुष्यात आलेल्या या वेगवेगळ्या विचारधारांच्या सुयोग्य संगमातून त्यांचं व्यक्तिमत्त्व उजळत गेलं.
पण बाबांच्या आयुष्यातील चार-पाच र्वष अशीही होती, जेव्हा बाबा वैचारिक शून्यावस्थेत गेले होते. याची सुरुवात ‘हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’ या क्रांतिकारी संघटनेच्या अस्तापासून झाली. १९३१ च्या दरम्यान संघटनेच्या बहुतेक साऱ्या सदस्यांची धरपकड झाली. चंद्रशेखर आझाद यांना पोलिसांशी लढता लढता वीरगती प्राप्त झाली. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली. या तिघा तरुणांच्या फाशीने बाबा हादरले. कारण सशस्त्र क्रांतीचा आणखी एक प्रयत्न फसला होता. राजगुरूंशी तर बाबांचे घनिष्ठ संबंध होते. बाबांचं वय त्यावेळी जेमतेम सोळा-सतरा वर्षांचं होतं. अशा अवस्थेतच नागपुरात बी. ए.चं शिक्षण पूर्ण करून बाबा लॉ कॉलेजात दाखल झाले.
या काळात बाबांचं राहणीमान एखाद्या जहागीरदाराला शोभेल असं होतं. उंची कपडे, क्लबमध्ये जाणं, आलिशान स्पोर्ट्स कार बाळगणं, शिकार करणं, चित्रपट परीक्षणं लिहिणं, नृत्यदिग्दर्शन, संगीत, इ. विषयांत बाबांनी मुक्त संचार केला. मात्र, त्यात ‘उत्कटता’ या त्यांच्या स्वभावविशेषासोबत निकराचा ‘आत्मशोध’ही होता. पॉप सिंगर मुमताजच्या कलकत्त्यात आयोजित संगीताच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी आपल्या रेसर कारने आठशे किलोमीटर प्रवास करून जाणारे बाबा- १९३५ साली क्वेट्टा येथील विनाशकारी भूकंपानंतर आणि १९३६ च्या बंगालच्या भीषण चक्रीवादळानंतर मदतकार्यासाठीसुद्धा तितक्याच उत्कटतेने धावून गेले. बाबांनी कोणतीही गोष्ट बेतानं वा अंदाज घेत केली नाही. परिणामांची पर्वा न करता प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जायचं; पण जर एखाद्या गोष्टीतील फोलपणा लक्षात आला तर गाठलेल्या परिसीमेपासून परत फिरायचं. मग तितक्याच उत्कटतेनं दुसरा प्रयोग सुरू.
माझ्या याआधीच्या लेखात नमूद केल्याप्रमाणे १९३९-४० च्या सुमारास बाबा दुर्ग येथील वकिली सोडून मध्य प्रांतातल्या चांदा जिल्ह्यतील वरोरा या गावी वास्तव्यास आले होते. दरम्यानच्या काळात वरोऱ्यापासून ६० मलांवर असलेल्या वध्र्याजवळ गांधीजींनी सुरू केलेला ‘सेवाग्राम’ आश्रम हा देशाच्या राजकारणाचं केंद्र बनला होता. गांधीजींनी कुटिरोद्योग, खादी, सूतकताई, बुनियादी शिक्षण अशा विविध कल्पना अमलात आणायला सुरुवात केली होती. त्या, त्या विषयातील तज्ज्ञ सेवाग्रामात येऊन राहू लागले. बाबांना या सर्वाची ओढ वाटू लागली. बाबांवर गांधीजींच्या विचारांची पकड बसली. बाबांच्या सेवाग्रामच्या खेपा वाढल्या. अंगावर खादी आली. घरात चरखा चालू लागला. एकूणच बाबांचं आयुष्य आरपार बदलून गेलं. आगगाडीच्या डब्यात गोऱ्या सोजिरांनी एका नवपरिणीतेची छेड काढलेली पाहून चवताळून त्या सोजिरांना शिंगावर घेत बाबांनी तिच्या अब्रूचं रक्षण केल्याची घटना याचदरम्यान घडली होती. या घटनेनंतर बाबा गांधीजींच्या जास्त जवळ गेले. त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद होऊ लागला. बाबा स्वत:ची अस्वस्थता गांधीजींजवळ व्यक्त करू लागले. गांधीजींचे आचार आणि विचार या दोन्हींमुळे बाबांची एक स्वतंत्र विचारधारा आकार घेऊ लागली. बाबा गांधीजींविषयी म्हणत, ‘‘या महात्म्यात केवढा Arrogant Confidence होता! एका मिठाच्या पुडीने ब्रिटिश साम्राज्यास साता समुद्रापार फेकून देण्याचा, चरखा वापरून मँचेस्टर बंद पाडण्याचा तो ‘उद्दाम आत्मविश्वास!’’ कदाचित आपलं Fighting Spirit’ रचनात्मक संघर्षांतून सिद्ध करण्याची गांधीजींची ही पद्धत जात्याच लढाऊ वृत्तीच्या बाबांना भावली असणार!
बाबांच्या आयुष्यातील असे काही प्रसंग मला या ठिकाणी सांगावेसे वाटतात- ज्यामधून त्यांच्या जडणघडणीवर गांधीजींच्या विचारांचा, भावनांचा आणि वर्तनाचा असलेला प्रभाव स्पष्टपणे जाणवतो.
फाशीआधी राजगुरूंना भेटण्याची परवानगी त्यांच्या आईला नाकारण्यात आली. हे जेव्हा राजगुरूंना कळलं तेव्हा ते म्हणाले, ‘‘मी तर माझ्या विशाल भारतमातेचे प्रत्यक्ष दर्शन घ्यायला निघालो आहे; माझ्या जन्मदात्या आईला भेटण्याचा लोभ आता मला राहिला नाही.’’ जेलरने रोजनिशीत केलेल्या नोंदीत असं नमूद केलं आहे.. ‘‘फाशीच्या आदल्या रात्री राजगुरू चक्क घोरत होते! He was snoring, he was sleeping like a log of wood! फाशीवर जाताना ‘वंदे मातरम्’ म्हणत राजगुरूंनी फाशीच्या दोराचं चुंबन घेतलं. पुढे एकदा या घटनेचा दाखला देत बाबांनी गांधीजींना प्रश्न केला, ‘‘बापू, तुम्ही राजगुरूंच्या जागी असता तर हे सगळं करू शकला असता का?’’ त्यावर गांधीजींनी बाबांकडे कबुली दिली, ‘‘नाही. कदाचित मी हे करू शकण्यास धजावलो नसतो.’’ या प्रसंगाबद्दल बाबा लिहितात, ‘‘ज्यांच्याशी तीव्र मतभेद आहेत, त्यांच्याविषयीसुद्धा एवढा मोठा उदार दृष्टिकोन ठेवणं ही गांधीजींची वृत्ती माझ्या मनावर खोल परिणाम करून गेली.’’
अजून एक अतिशय महत्त्वाचा प्रसंग बाबांच्या शब्दांतच सांगतो.. ‘‘आम्ही काही लोक सेवाग्राम आश्रमात पालकाची भाजी चिरत बसलो होतो. त्या काळात दोन पशांत चांगली दीड शेर पालक मिळत असे. आश्रमातील जमीन शेणाने सारवलेली असे. सिमेंट फ्लोअिरगचा तर प्रश्नच नव्हता. कीड लागलेली दोन पानं मी बाजूला जमिनीवर काढून ठेवली आणि चिरलेली भाजी एकत्र करून आचाऱ्याच्या हातात दिली. गांधीजी एका कोपऱ्यात बसून आमचं निरीक्षण करत होते. ते शांतपणे उठले. त्यांनी ती जमिनीवरील पानं उचलली आणि कीड लागलेला भाग हळूच काढून टाकत बाकी चांगला भाग वेगळा केला. मग एका मातीच्या भांडय़ात थोडं पाणी घेत त्यात पोटॅशचा एक कण टाकला. तो चांगला पालक त्यात टाकून नीट धुऊन घेतला आणि आचाऱ्याला दिला. गांधीजी त्यावेळी मौनात होते. त्यांनी कागद घेत त्यावर एक ओळ लिहिली- ‘‘आपण समाजाच्या पशांवर जगतो.’’ मौन सुटल्यावर मी त्यांना विचारलं, ‘‘बापू, तुम्ही जेवणार होतात. शेणाने सारवलेल्या जमिनीवर पानं पडलेली होती. मग तुम्ही ती किडलेली पालकची पानं का उचलली?’’ यावर गांधीजी म्हणाले, ‘‘अरे, भाजी जमिनीतच पिकते. आपण शेणखतही वापरतो. आणि मी तर वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगत ती पानं आधी पोटॅशने र्निजतुक केली, मगच आचाऱ्याला दिली. आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेव. आपण लोकाश्रयावर जगतो. त्यामुळे लोकांनी दिलेल्या मदतीचा कायम सदुपयोग व्हायला हवा. मदतीचा अपव्यय म्हणजे आपल्याला मदत करणाऱ्या सुजनांचा अपमान आहे. समाजातर्फे केली जाणारी सर्व प्रकारची मदत पुरेपूर वापरली गेली पाहिजे.’’ बाबा पुढे म्हणतात, ‘‘मला कोणत्याही पुस्तकातून प्रेरणा मिळाली नाही, पण त्या दोन पालकाच्या पानांमधून मला खूप मोठी शिकवण मिळाली. How to stretch public money to maximum length ही जाणीव करून देणारा गांधीजींचा Invisible Presence मला आयुष्यभर जाणवत राहिला.’’
‘ज्वाला आणि फुले’ नावाने १९६४ साली प्रकाशित झालेल्या आपल्या मुक्तशैलीतील चिंतनात बाबा गांधीजींविषयी लिहितात-
‘गांधी : एका युगाचा चेहरा
ज्याच्या नजरेला तो जगत असलेल्या शतकाची
हिंस्त्र स्वप्ने कैद करू शकली नाहीत;
आणि इतिहासाच्या दर्पणात
ज्याच्या समर्पणाचीच प्रतिमा
भविष्यातील पिढय़ांना दिसेल, असा.
गांधीमाहात्म्य सांगून गांधी सांगता येणार नाही.
आणि उद्याच्या पिढय़ांना त्याची ओळख पटण्यासाठी
क्वचित कॉम्प्युटर लागेल!
पण काळाच्या भाळावर उमटलेली
ही तप्त युगमुद्रा
कोणत्याही इतिहासाला पुसून काढता येणार नाही!’
विकास आमटे vikasamte@gmail.com