‘आनंदवनाच्या पुढील कामांची दिशा काय? आनंदवनाला पुढल्या २५ वर्षांत तुम्ही कुठे बघता?’ वगैरे प्रश्न बऱ्याचदा विचारले जातात. त्या सर्वाना मला सांगावंसं वाटतं की, ‘सहृदयता’ हे आनंदवनाचं मूलतत्त्व, शक्ती आणि आत्मा आहे! ते कायम ठेवून कालानुरूप बदलणं हीच आनंदवनाची आजवरची दिशा. आणि पुढेही तीच कायम असेल. गेल्या ६८ वर्षांतली आनंदवनाची वाटचाल अनेक संकटांनी, आव्हानांनी व्यापलेली असली तरी या वाटचालीचा वेग कधी मंदावला तर नाहीच, उलट तिचा परीघ कायम विस्तारतच राहिला. तसंच हा विस्तार Organic पद्धतीने होण्याचं आणखी एक कारण म्हणजे आनंदवन हा एक ‘सामूहिक आविष्कार’ याबद्दल कमालीची स्पष्टता. मी कायमच सांगत असतो, ‘‘Anandwan is not Baba Amte & Sons Private Limited!!’’ ‘प्रभूचे हजारो अदृश्य हातच सामान्यांतल्या असामान्य जिद्दीद्वारे असे कार्य घडवून आणू शकतात,’ असं जेव्हा बाबा आमटे म्हणतात तेव्हा त्यामागे आनंदवनाचा आविष्कार हा कुण्या एकटय़ादुकटय़ा व्यक्तीचा नसून संघटनशक्तीचा आहे ही विशुद्ध भावना त्यामागे असते. एखादा उपक्रम संपला असं आनंदवनात कधीच झालं नाही. म्हणजे सुरू झालेले उपक्रम सुरूच असतात आणि त्यांत नव्या उपक्रमांची सातत्याने भर पडत असते. मरगळ, उदासीनता हे शब्द आनंदवनाच्या डिक्शनरीतच नव्हते. आनंदवनाच्या वाटचालीचं फलित हेच की, इथल्या कार्याबद्दल ऐकून, वाचून इथे भेट देणारी बहुतेक मंडळी ‘आनंदवनात’ आणि ‘आनंदवनामार्फत’ आणखी कुठली नवी कामं सुरूझाली, हे जाणून घेण्याच्या उत्सुकतेने येत असतात!

तळागाळातल्या आम आदमीचा खरा विकास साधला जावा, ‘इंडिया’ आणि ‘भारत’ यांतील दरीवर सेतुबंधन साधले जावे, ही प्रत्येक सुजाण नागरिकाची अंतरीची इच्छा असते.

local body government
राज्यात पुन्हा योजना, उद्घाटनांचा धडाका
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Local fishermen save life of couple stuck in rough sea in ratnagiri
दाम्पत्याला भाट्ये समुद्रात खेळणे पडले महागात; स्थानिक मच्छीमारांनी वाचविले प्राण
Satavahana settlement remains were found at Tekabhatti four kilometers from Chivandagaon Gondpipari taluka
चंद्रपूर जिल्ह्यात सातवाहनकालीन वस्तीचे अवशेष; कधी होते मोठे शहर, आज आहे गर्द वनराई…
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra News : मंत्रिमंडळ विस्तारासाठी हालचालींना वेग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तातडीने दिल्ली दौऱ्यावर
centre attempts to revive farm reforms unveils draft policy
शेतीमालाच्या विक्री धोरणाबाबत केंद्राची पुन्हा घाई; सूचना, हरकतींसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी
Wildfire at foot of Sula mountain Environmentalists and farmers control on fire
सुळा डोंगर पायथ्याला वणवा; पर्यावरणमित्र, शेतकऱ्यांकडून नियंत्रण
restoration work of Tuljabhavani temple is underway under supervision of Archaeological Department
तुळजाभवानी मंदिराला मिळणार पुरातन झळाळी, जीर्णोध्दाराचे काम पुरातत्व खात्याच्या निगराणीखाली वेगात सुरू

देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी गावांमध्ये परिवर्तनाची गरज आहे. आज आनंदवनाला ‘स्मार्ट व्हिलेज’ बनवण्याचं स्वप्न साकारतं आहे तो याच परिवर्तनाचा भाग. आमच्या लेखी ‘स्मार्ट व्हिलेज’ची मुख्य ध्येयं म्हणजे स्थिरता, गुणवत्ता, कार्यक्षमता, शांतता, मानवता आणि स्त्री-पुरुष समानता. याशिवाय शाश्वत आवास, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन, पायाभूत सुविधांचा विकास, डिजिटल सेवांची सोय, पर्यावरणपूरक तंत्रज्ञान, शून्य-कार्बन अर्थव्यवस्था, प्रशासनात जनतेचा सहभाग, ज्ञान-प्रसार, इत्यादी बाबींचा यात अंतर्भाव असतो. यातली बरीच उद्दिष्टं आनंदवनाने बऱ्याच अंशी साध्य केली असली तरी प्रत्येक बाबतीत शिखर गाठण्याचे प्रयत्न सुरूआहेत. उपरोक्त विषयांतील तज्ज्ञ व्यक्ती आणि स्वयंसेवकांनी आम्हाला मदत करायला सुरुवातही केली आहे. यापुढेही अशा मंडळींच्या सहकार्याची आम्हाला नितांत गरज आहे. आणि या दृष्टीने कामात सामील होऊ  इच्छिणाऱ्या प्रत्येकाचं स्वागतच आहे. याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यतील आर्थिक आणि सामाजिकदृष्टय़ा मागास असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये पोषणविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘प्रोजेक्ट हिमोग्लोब’ राबवला जातो आहे. दिव्यांग मुलांना सशक्त आणि समृद्ध बनवण्यासाठी आनंदवनात ‘निजबल सशक्तीकरण केंद्र’ स्थापन झालं आहे.

गेल्या पाच वर्षांपासून आनंदवनात ‘स्त्रीषु’ या प्रकल्पांतर्गत ‘महिलांचे मासिक पाळी व्यवस्थापन’ या विषयावर विविध उपक्रम राबवण्याचं काम सुरू आहे. त्या अनुषंगाने प्रशिक्षण कार्यशाळा आणि जाणीवजागृती उपक्रम राबविले जातात. आनंदवनातील दिव्यांग महिलांमध्ये या विषयाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी विविध प्रकारच्या माध्यमांचा वापर करून काही विशेष उपक्रम प्रभावीपणे राबवण्यात आले. ‘दिव्यांग महिलांमधील मासिक पाळीचे व्यवस्थापन किती कष्टदायक असू शकते’ याबद्दल विस्ताराने जाणून घेण्यासाठी सप्टेंबर २०१६ मध्ये एक राज्यव्यापी अभ्यास दौरा काढण्यात आला. १८ जिल्ह्यंत विशेष मुलींसाठी काम करणाऱ्या ४२ संस्थांमधल्या १४ वर्षांवरील जवळपास ३०० दिव्यांग मुलींच्या मासिक पाळीविषयीच्या सवयी, ज्ञान व दृष्टिकोनाचा आणि त्यांना येणाऱ्या अडचणींचा सखोल अभ्यास करण्यात आला. यातून ज्या समस्या पुढे आल्या त्यांचं निराकरण करण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. दिव्यांगत्वाचे चार मुख्य प्रकार असतात. यात मासिक पाळीच्या दिवसांत सगळ्यात जास्त अडचणी मतिमंद मुलींना आणि विशेषत: त्यांच्या सहाय्यकर्त्यांना जाणवतात. ते चार दिवस या मुलींसाठी व त्यांचा सांभाळ करणाऱ्या व्यक्तींसाठी कसे सुलभ करता येतील, याकरिता पुढील काळात विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. ‘स्त्रीषु’ टीमला पुण्याच्या माई मंगेशकर हॉस्पिटलच्या वैद्यकीय संचालक डॉ. सुप्रिया कुर्लेकर यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभतं आहे.

बाबा म्हणत, ‘‘आनंदवन हे समृद्धीचं बेट होऊ  नये. समाजातल्या इतर वंचित, उपेक्षित घटकांच्या विकासासाठी आनंदवनाने सतत प्रयत्नशील राहिलं पाहिजे.’’ याच जबरदस्त प्रेरणेतून आनंदवनातील कुष्ठमुक्त बांधवांनी अंध, अपंग, कर्णबधिर, अनाथ, बेरोजगार ग्रामीण युवा, अन्यायग्रस्त आदिवासी, अल्पभूधारक शेतकरी अशा इतर वंचित घटकांना आनंदवनाच्या परीघात सामावून घेतलं. ‘‘कामांना अंत नाही. असलाच तर तो आपल्या कार्यशक्तीला आहे!’’ हे बाळकडू बाबांनी प्रत्येकाला पाजल्याने ‘अस्वस्थता’ हाच आनंदवनाचा स्थायीभाव बनला. नवनवी आव्हानं शोधण्याचा आणि स्वीकारण्याचा आनंदवनाचा यत्न कायम सुरू असतो. महाराष्ट्रातल्या आर्थिकदृष्टय़ा मागास, दुष्काळग्रस्त प्रदेशांमधील समस्यांवर उत्तरं शोधण्यासाठी जानेवारी २०१६ पासून सुरू झालेलं ‘आनंदवन समाजभान अभियान’ हा याचाच एक भाग. अकोला, यवतमाळ, बीड, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यंतल्या मागास व दुष्काळी भागांमध्ये शेती, जलसंधारण, रोजगारनिर्मिती आणि स्वयंसेवी संस्थांचे सशक्तीकरण या क्षेत्रांत ‘आनंदवन समाजभान अभियाना’चं काम सुरू आहे. शेतकरी आत्महत्येने पोळलेल्या भागांतील तरुण-तरुणींना व्यवसाय प्रशिक्षणाच्या माध्यमातून मिळत असलेला स्वयंरोजगार असो, दुष्काळी भागांतील शेतीची बांधबंदिस्ती असो, चर खोदणं, गाळाने बुजलेले नाले, तलावांचं खोलीकरण-रुंदीकरण, टायर बंधाऱ्यांचं बांधकाम अशी जलसंधारणाची कामं असो, निवासी शाळेच्या उभारणीतून भटक्या समाजातील चिमुकल्यांना लाभलेलं स्थैर्य असो; अशी अनेकविध लोकोपयोगी कामे गेल्या दोन वर्षांत पार पडली आहेत. मला इथे आवर्जून सांगावंसं वाटतं की, सुवर्णाताई दामले यांनी विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी स्थापन केलेल्या ‘प्रकृती’ या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने या कुटुंबांतील सदस्यांना ‘आनंदवन समाजभान अभियाना’च्या माध्यमातून आज दिलं जाणारं व्यवसायाभिमुख प्रवृत्तीचं प्रशिक्षण असो; किंवा डवरी-गोसावी या भटक्या समाजातील मुलांचं जग समाजात स्थिर व्हावं असं स्वप्न उराशी बाळगत सोलापूर जिल्ह्यतील बार्शीच्या महेश आणि विनया निंबाळकर या ध्येयवादी जोडप्याने ‘आनंदवन समाजभान अभियाना’च्या सहकार्यातून एका माळरानावर नुकतंच उभं केलेलं ‘स्नेहग्राम’ विद्यालय असो; मुळात ही कामं उभी राहिली ती ‘लोकसत्ता’च्या ‘चतुरंग’ आणि ‘लोकरंग’ या पुरवण्यांमध्ये सदर कामांविषयी २०१६ मध्ये छापून आलेल्या सविस्तर लेखांच्या आधारेच! सामाजिक कर्तव्यभावनेतून काम करणााऱ्या संस्था आणि समाजातील दातृत्व यांना जोडणारा दुवा म्हणजेच ‘सर्वकार्येषु सर्वदा’ हा उपक्रम आणि त्याशिवाय तळागाळात काम करणारी माणसं आणि त्यांचे प्रयत्न यांवर अखंड प्रकाशझोत टाकणारे लेख.. ही परंपरा कायम राखत सहवेदना जपणाऱ्या आणि जगणाऱ्या ‘लोकसत्ता’ परिवारास दु:खितांच्या आशीर्वादाचा सुगंध मिळेल, हे नक्की! आजच्या ‘मार्केटिंग’च्या जमान्यात ‘लोकसत्ता’ मात्र मूल्यांशी तडजोड न करता एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे विधायक पत्रकारितेचा आधारस्तंभ बनून उभा आहे.

‘आनंदवन समाजभान अभियाना’च्या माध्यमातून गावखेडय़ांना भेडसावणाऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधत असताना असं लक्षात आलं की, इतर समस्यांसोबत पाण्याची समस्या प्रत्येक ठिकाणी ‘सामायिक’ आहे. या समस्येचं मूळ नेमकं कशात दडलं आहे याचा शोध घेताना आम्ही अग्रगण्य भूजलतज्ज्ञ डॉ. हिमांशू कुलकर्णी यांनी स्थापन केलेल्या ‘अ‍ॅक्वाडॅम’ या पुणेस्थित स्वयंसेवी संस्थेच्या संपर्कात आलो. ‘अ‍ॅक्वाडॅम’च्या मार्गदर्शनातून पाणी समस्येचं नेमकं मूळ तर ध्यानात आलंच; खेरीज हा विषय प्राथमिकतेने हाताळण्याची गरज आहे याची जाणीवही झाली. याचं कारण या समस्येवर उपाय करण्यासाठी आपल्या हातात वेळ फारच कमी उरला आहे. आणि भयाण असलं तरी हे वास्तव आहे! ‘तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होईल’ हा अंदाज खरा ठरू शकेल अशी स्फोटक परिस्थिती आज खरोखरच निर्माण झाली आहे. मात्र, ‘पाणी काय, ते तर आहेच!’ या मानसिकतेतून पाण्याला गृहीत धरलं जातं. खरं तर कायम ‘केंद्रस्थानी’ असावा असा हा विषय कायम ‘दुर्लक्षिला’ जातो याचं कारण पाणी नेमकं ‘किती’ आहे आणि ‘कुठे’ आहे, याविषयी फारच कमी जागृती आहे. किंबहुना, अज्ञानच जास्त आहे. जगातील एकूण पाण्याचं विवरण लक्षात घेतलं तर त्यातलं ९९% पाणी मानवजातीसाठी वापरायोग्यच नाही! आणि उरलेल्या जेमतेम १% वापरायोग्य पाण्यापैकी केवळ १ भाग पाणी ‘पृष्ठजला’च्या (Surface Water) रूपात- म्हणजे ‘दिसणारे’ आहे. तर उर्वरित ९९ भाग पाणी ‘भूजला’च्या (Groundwater) रूपात आहे. थोडक्यात, ‘दृष्टीआड’ आहे! आणि आपण भारताच्या वार्षिक भूजल उपशाकडे नजर टाकली तर लक्षात येतं की, सुमारे चार कोटी विहिरी आणि बोअरवेल्सच्या माध्यमातून आपला देश २५१ अब्ज घनमीटर भूजल उपसा करतो; जो जगाच्या एकूण वार्षिक भूजल उपशाच्या २५% पेक्षा अधिक आहे! ‘पेयजल आणि घरगुती वापरासाठी भारताचे भूजलावरील अवलंबित्व ८०%, तर ‘कृषी-सिंचना’साठी ६५% एवढे प्रचंड आहे! हे सगळं फारच भीतीदायक आहे. पण आज पाण्यापेक्षा दुर्भिक्ष जास्त आहे ते याविषयीच्या गांभीर्याचं आणि इच्छाशक्तीचं! त्यामुळे ‘Hydro-Schizophreniac’ झाल्यासारखा बेसुमार आणि अर्निबध भूजल उपसा सुरू आहे. उभे-आडवे बोअर घेऊन भूगर्भाची चाळण करत पाणी उपसण्याची अभूतपूर्व अशी स्पर्धाच जणू! अति-खोलवरून केल्या जाणाऱ्या उपशामुळे भूजलाच्या ढासळत्या गुणवत्तेचा प्रश्नही दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. शिवाय भूजलविज्ञानाचा किंचितही अभ्यास न करता पाणलोट क्षेत्रविकासाच्या नावाखाली आणि स्वयंघोषित जलतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली चर खोदणे, नाले उकरणे, बंधारे बांधणे असे प्रकार बेफामपणे सुरू आहेत. डॉ. हिमांशु कुलकर्णी पोटतिडिकेने सांगत असतात, ‘‘आज सर्वत्र तातडीने लोकसहभागातून भूजलाचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. तसेच भूजलाचा साठा आणि वहन करणाऱ्या भूगर्भीय रचना आणि त्यांची क्षमता यांबद्दल माहिती करून घेणेही अत्यावश्यक आहे.’’ पण दुर्दैवाने याकडे लक्ष देण्यास कुणाला वेळ नाही आणि ती प्राथमिकताही नाही. यावरून आपल्या असं लक्षात येतं की, पाण्याबाबतच्या या समस्या मानवनिर्मित आहेत. म्हणजे त्या सोडवणं आपल्याला नक्कीच शक्य आहे. यासाठी जसे शासकीय पातळीवर धोरणात्मक निर्णय आवश्यक आहेत, तशीच पाणी वापरणाऱ्या प्रत्येकात सामंजस्य व सहकार्याची भावना रुजणंही नितांत गरजेचं आहे. भूजलाच्या व्यवस्थापनाचे आणि पाणलोट क्षेत्रविकासाचे कार्यक्रम भूजलविज्ञानाचा आधार घेत लोकसहभागातून राबवले गेल्यास समस्या सहज सुटू शकतात. यादृष्टीने भूजलाच्या शाश्वत आणि समन्यायी व्यवस्थापनासाठी सर्वसमावेशक केंद्रीय कायदा लागू होण्यासाठी प्रयत्न करणे, प्रत्येक राज्यातल्या किमान एका पाणलोट क्षेत्रातील गावामध्ये लोकसहभागातून भूजल व्यवस्थापनाचा कार्यक्रम राबवणे, भारतातील प्रत्येक गावाची लोकसंख्या, क्षेत्रफळ, पडणारा पाऊस, झऱ्यांची संख्या, विहिरी-बोअरवेल्सची संख्या व खोली, शेतीपिकांची माहिती, कोरडवाहू-बागायती क्षेत्र, सार्वजनिक पाणीपुरवठय़ाचा स्रोत, पाण्याची गुणवत्ता ही माहिती संकलित करणे, भूजल हे एक ‘मर्यादित’ आणि ‘सामूहिक’ संसाधन आहे याबाबत विविध माध्यमांमार्फत देशपातळीवर जनजागृती करणे, प्रशिक्षण कार्यशाळांच्या माध्यमातून ‘भूजल कार्यकर्ते’ तयार करणे असा पाच कलमी कार्यक्रम राबवण्याचं आनंदवनाने ठरवलं आहे. ‘आनंदवन भूजल- शाश्वत सहयोग’ हा नवा आयाम आता आनंदवनाच्या कार्याला जोडला जातो आहे.

१०-१५ वर्षांपूर्वीची एक घटना. पन्नाशीतली एक कुष्ठरुग्ण बाई झाडाखाली बसून ढसढसा रडते आहे हे बघून आठवडी बाजाराला सायकलने निघालेला आनंदवनाचा कार्यकर्ता सुधाकर कडू तिच्याकडे जात आस्थेने चौकशी करतो, ‘‘मावशे, काऊन रडून राहिली गं? काय झालं?’’ काहीच न बोलता हातातलं पोस्टकार्ड ती सुधाकरकडे देते. पत्र तिच्या मुलाचं असतं. त्यात लिहिलेलं असतं, ‘‘आई, आनंदाची बातमी आहे. छोटय़ा ताईचं लग्न ठरलं आहे. पण तुझ्या नावाची आता कुटुंबाच्या ‘रेकॉर्ड’वर नोंद नाही. त्यामुळे तू पत्र पाठवू नकोस, फोन करू नकोस किंवा गावाकडे लग्नाला येण्याचा प्रयत्नही करू नकोस. जमलं तर पुढे कधीतरी आम्हीच आनंदवनात येऊन तुला भेटून जाऊ.’’ मन हेलावून टाकणारा हा मजकूर वाचून सुधाकरला स्वत:चा भूतकाळ आठवतो. सुधाकरच्या बाबतीत तरी वेगळं काय घडलं होतं? कुष्ठरोगाची लागण झाल्यामुळे केवळ कुटुंबानेच नव्हे, तर साऱ्या गावाने त्याला बालवयातच बहिष्कृत केलं होतं. ‘कुष्ठरुग्णांचं आयुष्य मरणापेक्षा भयाण आणि कबरीपेक्षा भयंकर असतं’ असं म्हणतात. ते का, याचं उत्तर आपल्याला अशा प्रसंगांतून मिळतं. अशी थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल ११ लक्ष कुष्ठग्रस्त माणसं आजवर आनंदवनाच्या संपर्कात आली! सध्या शरीरात लागण होणाऱ्या कुष्ठरोगावरील लसीच्या क्लिनिकल ट्रायल्स सुरू आहेत. पण ‘मनाचा महारोग’ होऊ  नये म्हणून कुठली लस द्यावी? किंवा मनाला झालेल्या महारोगास दुरुस्त करण्यासाठी कुठली औषधं द्यावीत, हे प्रश्न अनुत्तरितच आहेत. असो..

माझं दीर्घकाळचं स्वप्न आहे- ‘आनंदवनाला संपवण्याचं!’ मी जेव्हा असं म्हणतो तेव्हा माझ्यावर खूप टीका होते. पण मला विचारायला आवडेल, की ही कुष्ठरुग्ण बाई किंवा सुधाकर कडू किंवा ही ११ लक्ष कुष्ठग्रस्त माणसं आनंदवनाच्या संपर्कात आली ती ‘Choice’ नव्हता म्हणूनच ना? मानहानीचे, बहिष्काराचे डंख कुटुंबाने, समाजाने दिले नसते तर ही माणसं इथे का आली असती? ज्या समाजात आनंदवनासारख्या ‘सामाजिक तुरुंगा’ची वेगळी गरजच उरणार नाही अशा ‘सर्वसमावेशी’, ‘सहृदय’ समाजाचं स्वप्न जर मी पाहत असेन तर त्यात माझं काही चुकलं का? पण सद्य:स्थितीत तरी हे स्वप्न स्वप्नच राहील असं वाटतंय. जागतिक आरोग्य संघटनेचा २०१५ चा अहवाल म्हणतो, ‘‘India accounts for 60% of the world’s ‘New’ leprosy cases!’’आणि या नव्याने सापडलेल्या केसेस १,२७,००० एवढय़ा प्रचंड आहेत! म्हणजे दुर्दैवाने यात आपल्या देशाची आघाडीच आहे. National Health Profile नुसार, २०१६ मध्ये या संख्येत आणखी ७९,००० केसेसची भर पडली! अर्थात काहीही झालं तरी आनंदवन खचून जाणार नाही आणि कधी थांबणारही नाही. आनंदवनासारखे सामाजिक तुरुंग नव्याने निर्माण होऊ  नयेत यासाठी आणि ‘मनाचा महारोगविरहित’ समाज निर्माण करण्यासाठी आनंदवन कायम प्रयत्नशील राहील.

आता माझी आणि आमच्या पिढीची ‘Expiry Date’ झाली आहे! आनंदवनाची पुढची पिढी संस्थेचे हिशेब, अंतर्गत व्यवस्थापन, प्रकल्पांतर्गत सुरू असलेले, महाराष्ट्रात ठिकठिकाणी सुरू असलेले आणि देशपातळीवर नव्याने सुरू होणारे विविध उपक्रम अशा बऱ्याच गोष्टी सांभाळते आहे. पुढच्या पिढीत आमची पोरं, माझ्या सहकाऱ्यांची पोरं, स्वयंसेवक असे सर्वच आहेत. ‘सार्वजनिक संस्थांचे संचालन’ या पुस्तकात बाबांनी समूहजीवनाविषयी फार महत्त्वाचं लिहून ठेवलंय. ते असं- ‘‘कुठल्याही सामूहिक जीवनात (Community Living) एकमेकांच्या व्यक्तित्वांचे व मनोगंडांचे कोपरे घासले जातात. मनाचे नायटेही उघडे पडतात. आपले दोष इतरांना जाणवायला लागल्यावरच त्यांची जाणीव आपल्याला अस्वस्थ करते आणि ते दूर करण्याची प्रक्रिया आपोआप सुरू होते. स्वत:चाच ‘मानसिक थर्मामीटर’ लावून आपला ‘नैतिक ताप’ मोजता येत नाही! समूहातच ते निश्चितपणे कळू शकेल. समूहजीवनावर माझी अपार श्रद्धा आहे ती यामुळेच.’’  Team Work means kMore Wel and kLess Mel’ हा बाबा-इंदूचा संस्कार जपत आमच्या पिढीने वाटचाल केली. ‘उज्ज्वल उद्यासाठी’ हाच संस्कार आनंदवनाची पुढची पिढीसुद्धा कायम राखेल, ही अपेक्षा. आमच्या सदिच्छा तर कायम त्यांच्यासोबत आहेतच! अलविदा..

‘जहाजाबरोबर स्वत:ला बुडवून घेणारे कर्णधार जेथे असतात

तेथेच बुडता देश वाचवणाऱ्या नाविकांच्या पिढय़ा जन्म घेतात..

वाट पाहणाऱ्या किनाऱ्यांना

आणि लाटांच्या उग्र कल्लोळाला कळू द्या :

मी अजून जहाज सोडलेले नाही!’

बाबा आमटे

vikasamte@gmail.com

(समाप्त)

Story img Loader