साठीच्या दशकाच्या पूर्वार्धात बाबा आमटेंच्या मनात एक अभिनव प्रयोग साकारत होता- ‘वर्कर्स युनिव्हर्सिटी’चा! या प्रयोगामागची प्रेरणा होते सानेगुरुजी. याविषयी बाबा लिहितात, ‘‘सानेगुरुजी म्हणजे महात्मा गांधी, विनोबा भावे, कार्ल मार्क्स, रवींद्रनाथ टागोर यांच्या विचारांचे उन्नत संकर (Advanced Hybrid), धडपडणाऱ्या पावलांचा वत्सल पथदर्शक, त्यांच्या संवेदनांचा सल्लागार, विवेकाचा वाटाडय़ा, जाणिवांचा जाणकार, स्वप्नांचा सहकारी अन् भविष्यांचा भागीदार! दुर्दैवाने गुरुजी स्वतची ताकद ओळखू शकले नाहीत आणि त्यांनी देहत्याग केला. गुरुजींबद्दल जेव्हा पाश्चात्य माणसाशी मी बोलतो तेव्हा तो भारावतो व म्हणतो, ‘एवढा मोठा माणूस जगाला कसा माहीत नाही?’ — ‘एक सागर राहून गेला नम्रतेच्या नशेत सान’ हेच याचे उत्तर! तेव्हा, या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही अशा एका संताला आत्महत्या करावी लागली तर याचं प्रायश्चित्त माझ्या युवा पिढीने घेतलं पाहिजे. सानेगुरुजींच्या मोलकरणीला समाजाच्या सर्वात वरच्या थरावर आणून उभे करण्याचा, त्यांच्या शेतकऱ्याच्या पाठीचा कणा ताठ करण्याचा आणि धुळीत पडलेल्या भग्नमूर्तीची पुनप्रतिष्ठा करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांच्या विचारांच्या खांद्यावर उभे राहून त्यांचा ‘नवा प्रयोग’ नव्याने सुरू करण्याचा हा प्रयत्न आहे.’’
आनंदवनाच्या आत्मनिर्भरतेतून जागतिक संदर्भात कुष्ठरोग्यांच्या इतिहासाने एक क्रांतिकारक वळण गाठलं असलं तरी बाबा अस्वस्थ होते. रोगी शरीरात निरोगी मन बाबांना आनंदवनात दिसलं, तसं युवकांच्या निरोगी शरीरात वैफल्याने भरलेलं, रोगी मनही त्यांना दिसत होतं. त्यांच्या मते, पुरातन श्रद्धास्थाने धडाधड कोसळली होती व नवीन उभी राहिली नव्हती; होती ती फक्त ठिगळे आणि मलमपट्टय़ा! ‘शिक्षण म्हणजे माणसाच्या अभिव्यक्तीला वाट करून देणारी प्रक्रिया’ असं बाबा म्हणत. प्रचलित शिक्षणव्यवस्थेविषयी त्यांची मतं तीव्र स्वरूपाची होती. ते म्हणत, ‘‘विद्यापीठातून बाहेर पडणारा पदवीधर हा नुसता योजक (Planner) असतो. त्याचे डोके तयार झालेले असते; पण हात अकर्मण्य असतात. तंत्रशाळांतून बाहेर पडणाऱ्या कारागिराचे हात कुशल असतात, पण तो नुसता उपयोजक (Performer) असतो. या कार्यान्वयामागील योजनेशी त्याचा संबंध नसतो. अपंग बुद्धिजीवी आणि आंधळा श्रमजीवी असे कृत्रिम आणि विषम विभाजन त्यामुळे होते! दुसरं असं की, परावलंबनामुळे सरकारी अनुदानाशिवाय या शिक्षणसंस्था जिवंत राहू शकत नाहीत. केव्हातरी कुणीतरी घालून दिलेली चाकोरी गिरवीत राहणे, ही त्यांच्या आयुष्याची इतिकर्तव्यता होते आणि या जरठ व्यवस्थेत असंख्य प्रतिभा आपले सत्व हरवून गोल छिद्रातल्या चौकोनी खुंटय़ा होऊन बसतात! याशिवाय, लोकसंख्येचा एक फार मोठा भाग उत्पादनकार्यापासून दीर्घकाळ अलग राहतो. शेतकऱ्याचा मुलगा शिक्षणासाठी शहरात येऊन आपल्या वातावरणापासून एकदम तोडला जातो. त्याचे पाय परत खेडय़ाकडे वळत नाहीत. शेतीला श्रेष्ठ प्रतिभा आणि कर्तृत्व यापासून वंचित करणे, हा आजच्या शिक्षणाचा सर्वात मोठा दोष आहे असे मला वाटते.’’
या सर्व पाश्र्वभूमीवर बाबांच्या मनाने घेतलं की, श्रमाश्रम, आनंदवन, मुक्तिसदन इत्यादी जीवनविषयक प्रयोगांतून परिणत झालेलं एक नवं अभियान उभारावं.. जेथे कार्यकर्तृत्व आणि उत्पादनक्षमता एकवटलेली असेल. हे अभियान म्हणजेच ‘वर्कर्स युनिव्हर्सिटी’ किंवा ‘श्रमिक-कार्यकर्ता विद्यापीठ’! त्यांना खात्री होती की, नवनिर्मितीची एक नि:शब्द शक्ती आनंदवनाप्रमाणे ‘वर्कर्स युनिव्हर्सिटी’च्या वातावरणातच उत्पन्न होईल आणि या वातावरणातून नवी शेती, नवा सहकार, नवे उद्योग, नवे शिक्षण आणि नवे राजकारण यांचे अग्रदूत- ‘साहेब’ म्हणून नव्हे, तर ‘कप्तान’ म्हणून काम करणारे नवे नेते वर्कर्स युनिव्हर्सिटी समाजाला देईल! ‘विज्ञान व भारतीय जीवन यांचा समन्वय साधत भारताच्या कृषिप्रधान समाजव्यवस्थेला आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कृषि-औद्योगिक व्यवस्थेचे रूप देणे’ हा या प्रयोगाचा मूलभूत उद्देश. ‘अध्ययनातून अर्जन’ (Earning through Learning) असं या प्रयोगाचं स्थूल स्वरूप होतं. उदाहरणार्थ, डेअरी आणि संबंधित प्रक्रिया उद्योगाच्या युनिटमधून ज्ञानार्जनही होईल आणि उत्पादनाच्या माध्यमातून दुग्ध-तंत्रशाळेचे अध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी यांचा खर्च भरून निघेल, किंवा वीस मजुरांच्या आठ तास कामातून जे निर्माण होते ते पन्नास मुलांच्या नियोजित गतियुक्त श्रमदानातून निर्माण होईल आणि या जोडश्रमांतून जी निर्मिती होईल, त्यातून विद्यार्थ्यांचा शिक्षण व निर्वाह खर्च भरून निघू शकेल. ‘Education for Action in Action’ अशी बाबांची मांडणी होती! शेती, शेतीपूरक उद्योग, मॉडर्न टेक्नॉलॉजी आणि सहकार या नवसमाजरचनेच्या पायाभूत तत्त्वांच्या आडव्या-उभ्या धाग्यांनी हे नवशिक्षणाचं वस्त्र विणलं जाईल असं ते म्हणत. वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न रुग्णालय, सहकारी शैक्षणिक अधिकोष, साहित्यिक सहकारी संस्था, मुद्रण महाविद्यालय इत्यादी प्राथमिक स्वरूपाच्या सहकारी संस्थांच्या पायावर उभी उच्च, उच्चतर सहकारी संस्था अशी पिरॅमिडसारखी उभारणी बाबांच्या मनात होती. भारताच्या नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष अशोक मेहता, सहकारमहर्षी व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. धनंजयराव गाडगीळ तसंच काही प्रख्यात पाश्चात्य अर्थतज्ज्ञांचाही बाबांच्या या महत्त्वाकांक्षी योजनेस पाठिंबा होता.
या योजनेस मूर्त रूप देण्यासाठी- म्हणजेच जिथे शेती, प्रक्रिया उद्योग आणि संलग्न शैक्षणिक संस्थांची शृंखला उभी करता येईल यासाठी किमान दोन-तीन हजार एकर सलग जमीन आवश्यक होती. बाबांनी महाराष्ट्र सरकारकडे रीतसर अर्ज केला आणि १९६६ साली चांदा जिल्ह्यतल्याच मूल या तालुक्याच्या ठिकाणाजवळील मारोडा खेडय़ालगत १९२४ एकर जंगल जमीन महारोगी सेवा समितीला मिळाली. ही जमीन ताडोबाच्या जंगलाला खेटून असल्याने इथलं जंगल म्हणजे प्राण्यांचं माहेरघरच. सुरुवातीला बाबा आपल्या सहा कुष्ठमुक्त सहकाऱ्यांसह सोमनाथच्या जंगलात दाखल झाले. त्यांचा मुक्काम उघडय़ावरच होता! त्यांनी जमिनीचा इंच न् इंच पिंजून काढला. आणि मग दिवस-रात्र एक करत जंगलसफाईचं काम सुरू झालं. बाबा स्वत: स्वयंपाक करून सर्वाना जेवू घालत. काही दिवसांनी झोपडय़ा उभ्या राहिल्या आणि इंदू, आम्ही दोघं भाऊ आणि इतर कार्यकत्रे तिथे जाऊ-येऊ लागलो. इंदूच्या कष्टांना सीमाच नव्हती. स्वयंपाकाची जबाबदारी तर होतीच; पण सुरुवातीच्या काळात विहीर नसल्याने राहण्याच्या ठिकाणापासून दोन मलांवर असलेल्या सोमनाथ मंदिरातल्या गोमुखातून ती डोक्यावर पाण्याचे गुंडं वाहून आणत असे.
बाबांना ‘वर्कर्स युनिव्हर्सिटी’साठी मिळालेल्या जमिनीपकी ईशान्येकडील सुमारे ७०० एकर जमीन अतिक्रमित होती. बाबांना जमीन मिळाली, अपार कष्टांतून जंगलसफाई सुरू झाली, शेतीचे बांध घातले जाऊ लागले, तोपर्यंत कुणी काही बोललं नाही. पण त्यानंतर मारोडय़ाच्या स्थानिक पुढाऱ्यांकडून शेतकऱ्यांना पुढे करत अचानक एक जनआंदोलन उभं केलं गेलं. त्यांचा आक्षेप होता, की जमीन अतिक्रमित असली तरी शेतकऱ्यांच्या मालकीचीच आहे. कारण गेली अनेक वर्ष ते ती कसत आहेत. आणि बाबांच्या प्रस्तावित योजनेमुळे त्यांच्या पोटावर पाय येणार आहे. ‘वर्कर्स युनिव्हर्सटिी’च्या माध्यमातून खरं तर आसपासच्या १८ गावच्या शेतकऱ्यांना आणि बेरोजगार तरुणांना सोबत घेऊन शेती आणि डेअरीच्या विकासाची कामं करायची असं बाबांच्या मनात होतं. पण शेतकरी तर अज्ञानी होतेच; आणि दुर्दैवाने ‘वर्कर्स युनिव्हर्सिटी’ची दिशा आणि तिचा स्थानिक शेतकऱ्यांना होणारा दूरगामी फायदा यांचा या नेत्यांनी विचार केला नाही. आश्चर्याची बाब म्हणजे काही सर्वोदयी नेत्यांचाही या आंदोलनाला पाठिंबा होता. बाबांना गरीब शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती होती. पण शेतकऱ्यांच्या नावाखाली ज्या धनाढय़ लोकांनी जमिनीचे पट्टे अतिक्रमित केले होते त्यांना बाबांचा सक्त विरोध होता. नवनवे आरोप, मागण्या यांचं सत्र बराच काळ सुरू होतं आणि मार्ग काही निघत नव्हता. अनेक ज्येष्ठ व्यक्ती आणि सरकारनेही हात टेकले. सगळ्याच्या मुळाशी प्रामुख्याने होती ती कुष्ठरोगाबद्दलची पराकोटीची घृणा! पाण्याच्या साठवणुकीसाठी बाबांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जंगलातल्या तवागोंदी परिसरात पाणी अडविण्यासाठी एक बांध घातला होता आणि तिथून वाहणाऱ्या उमरी नाल्यावर रहदारीसाठी एक कच्चा पूल बांधला होता. उमरी नाला खाली मारोडा गावाकडे वाहत जात असे. त्यामुळे हे पाणी कुष्ठरोगी अडवतील, वापरतील तर कुष्ठरोगाच्या जंतूंनी पाणी ‘दुषित’ होईल, हा पण एक आक्षेप होताच!
एके दिवशी सत्याग्रहाच्या नावाखाली स्थानिक नेते कुदळी, फावडी, लाठय़ाकाठय़ा, कुऱ्हाडी, पहारी घेतलेल्या हजारोंच्या जमावासह ढोलताशांच्या गजरात घोषणा देत सोमनाथवर चाल करून आले आणि उमरी नाल्याचा पूल तोडायला त्यांनी सुरुवात केली. पुलाच्या एका बाजूला हजारोंचा सशस्त्र, हिंसक जमाव; तर दुसऱ्या बाजूला नि:शस्त्र बाबा, ४०-५० कुष्ठरोगी आणि सब-इन्स्पेक्टर मिश्रांच्या नेतृत्वाखाली फक्त १२ पोलीस! पण बाबा डगमगले नाहीत. बेडरपणे ते चक्क पुलाच्या मधोमध मांडी ठोकून बसले आणि नेत्यांना म्हणाले, ‘‘सशस्त्र सत्याग्रह’ मी पहिल्यांदाच अनुभवतो आहे! हा पूल आणि तवागोंदीचा बांध तोडायचा असेल तर तुम्हाला आधी माझ्या मृतदेहावरून जावं लागेल!’’ एव्हाना जमावाने तुफान दगडफेक सुरू केली. मग कुष्ठरुग्ण सहकारी आणि पोलिसांनी बाबांभोवती कोंडाळं केलं. जमावातल्या एकाने फावडय़ाचा दांडा थेट बाबांच्या दिशेने भिरकावला. पण मिश्रा यांनी तो शिताफीने अडवत अनर्थ टाळला. कुष्ठमुक्त नाना भुसारी यांनी असाच एक बाबांच्या दिशेने भिरकावलेला दगड स्वतच्या अंगावर झेलत बाबांचे प्राण वाचवले. कुष्ठरुग्ण अक्षरश: पुलावर आडवे पडून तो तुटण्यापासून वाचवत होते. पण पोलिसांच्या आवाहनाला दाद न देता नेतेमंडळी जोरजोरात घोषणा देत जमावाला भडकवीत होती. एवढय़ात वाहनांचा प्रतिध्वनी जंगलात घुमू लागला आणि पोलिसांची अतिरिक्त कुमक येत असल्याचं लक्षात येताच नेत्यांचं अवसान गळालं. ‘‘आपलं आजचं आंदोलन इथेच थांबवू. ‘अहिंसक सत्याग्रहा’च्या माध्यमातून आपण ‘विजयी’ झालो आहोत!’’ अशा वल्गना करत त्यांनी जमावासह परतीची वाट धरली. इकडे बाबा आणि त्यांचे कुष्ठरुग्ण सहकारी जखमी झाले होते. सात पोलिसांनाही जबर मार बसला होता.
या घटनेनंतर अखेर विनोबाजींनी मध्यस्थी केली आणि त्यांचा मान राखत बाबांनी ५५३ एकर उपजाऊ जमीन सरकारला परत दिली. तसंच उमरी नाल्याचं पाणी न अडवता, वापरता मोकळं सोडण्याचं आश्वासनही दिलं. तरीही आंदोलक समाधानी नव्हते. मग आणखी १५२ एकर जमीन शेतकरी कुटुंबांच्या हवाली केली गेली आणि वाद शमला. अखेर वाटय़ाला १२१९ एकर जमीन उरली. पण बाबांची ‘वर्कर्स युनिव्हर्सिटी’ची विशाल योजना एवढय़ा कमी जागेत प्रत्यक्षात येणं अशक्य होतं. त्यामुळे संघर्ष मिटला तरी त्यात ‘वर्कर्स युनिव्हर्सिटी’च्या भव्य संकल्पनेची आहुती पडली.
सानेगुरुजींचं अधुरं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असलेले बाबा या सगळ्या घटनाक्रमाने व्यथित नक्कीच झाले; पण खचले नाहीत. संघर्षांदरम्यानही ‘वर्कर्स युनिव्हर्सिटी’चा पाया असलेल्या ‘मॅनपॉवर ट्रेनिंग सेंटर’ या योजनेची पायाभरणी बाबांनी सुरू केली होती आणि ‘लोकसशक्तीकरणा’चा एक नवा प्रयोग आधीच सुरू झाला होता.
विकास आमटे vikasamte@gmail.com