आनंदवनात स्वयंसेवक म्हणून आलेली देशोदेशीची माणसं, त्यांनी केलेलं पहिल्या पक्क्या इमारतींचं बांधकाम या आनंदवनाच्या सुरुवातीच्या दिवसांतील घटना. या घटनेनंतर एकटय़ांनी एकत्र येत सुरू झालेल्या आनंदवनाच्या ध्येयवादी प्रवासात सहप्रवासी म्हणून बाहेरील जग, धीम्या गतीने का होईना, संमीलित होऊ लागलं. त्यावेळी माझं वय असेल साडेसहा-सात. आमच्या बालपणीच्या काळातील काही घटना ठळकपणे आठवतात, तर काही प्रसंग धूसरपणे डोळ्यापुढे उभे राहतात. त्यातल्या काही घटना, काही प्रसंग सांगावेसे वाटतात. काही गमतीजमती आहेत, तर काही जीवावर बेतलेले प्रसंगही आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
इंदू काय किंवा बाबा काय, आनंदवनातील सर्वच जण दिवस-रात्र कार्यमग्न असत. त्यांचे अविरत कष्ट पाहण्यातच आमचं बालपण पार पडलं. बाबांनी कधी जांभई दिल्याचं, टेबल-खुर्ची मांडून ऑफिस थाटल्याचं माझ्याच काय, कुणाच्याच स्मरणात नाही. जमेल तशी कामं करत मी आणि प्रकाश इतरांचा कामाचा भार हलका करण्याचा प्रयत्न करत असायचो. आम्ही लहान असतानाच्या आठवणींतलं आनंदवन एका विस्तारत चाललेल्या कुटुंबासारखं होतं. त्यात होती कष्टाचे ढीग उपसणारी माणसं.. सतत काहीतरी नवं करून बघण्याच्या आकांक्षेने भारलेली, एकमेकांना आधार देत वाटचाल करणारी, नव्याने आलेल्या प्रत्येकास आत्मीयतेने सामील करून घेत सांभाळणारी..
आम्ही दोघं भाऊ अगदी जंगलातल्या प्राण्यांसारखे होतो. रानटीच म्हणा ना! इंदूने आमच्यासाठी खायला-प्यायला काही ‘स्पेशल’ केलं, आमचे लाड पुरवले असं काहीच मला आठवत नाही. आम्ही कधी दुकानंच पाहिली नव्हती. त्यामुळे बाहेर पडल्यावर प्रत्येक गोष्ट हवीशी वाटायची. याविषयी इंदू तिच्या ‘समिधा’ या आत्मचरित्रात लिहिते, ‘‘माझ्या मुलांचं बालपण निघून गेलं. म्हणजे असंच गेलं. मुलांना कधी बिस्किटाचा पुडा मिळाला नाही. सहा आण्यांचा पुडा नाही घेऊ शकलो. स्वेटर्स नव्हते कधी. माझे ब्लाऊज घालून पोरं निजायची थंडी वाजते म्हणून. म्हणजे इथपर्यंत सोसलं. पण मला कधी वाईटही वाटलं नाही. मी नागपूरला गेले होते. तिथं मुलांनी दुकान पाहिलं. ते तुटून पडले. हे उघडा, ते बघा, पेपरमिंटच्या बरण्या उघडून बघा. लाज वाटली मला. हे काय आता! ‘हे घेऊन दे’, ‘ते घेऊन दे’ असा हट्ट करायला लागली. तोपर्यंत दुकानच पाहिलं नव्हतं कधी मोठं.’’ एकदा ‘तपोवन’चे सर्वेसर्वा शिवाजीराव पटवर्धन यांच्या अमरावतीच्या घरी बाबा आम्हाला घेऊन गेले. त्यांच्या घरातील खाऊ भरलेले डबे पाहिले आणि ‘हे विश्वचि माझे घर’ या तत्त्वाचे पालन करणाऱ्या आम्हा दोघा भावांनी फडताळावर चढून सगळे डबे साफ करून टाकले! बाबांना फार शरमल्यासारखं झालं.
लहानपणी मला आणि प्रकाशला खेळायला मित्रच नव्हते. कारण आनंदवनात कुष्ठरुग्णांसमवेत राहणाऱ्या मुलांशी मैत्री करायला कुणाचे आई-बाप परवानगी देणार? आम्ही बाबांकडे हट्ट करायचो- ‘‘बाबा, आम्हाला मित्र विकत आणून द्या.’’ मग बाबा म्हणायचे, ‘‘आपल्याकडे पैसे नाहीत. कुठून विकत आणू मित्र?’’ त्यावर आम्ही म्हणायचो, ‘‘नागपूर रोड किंवा चंद्रपूर रोड विकून टाका आणि त्या पैशातून मित्र विकत घेऊन या!’’ आम्ही दोघं वरोऱ्याच्या नेताजी विद्यालयात जाऊ लागलो तशी नारायण हक्के या आमच्या वर्गातील मुलाशी आमची चांगलीच गट्टी जमली. आनंदवनाशेजारच्या चिनोरा गावचा नारायण आमच्याच वयाचा; पण प्रतिकूल परिस्थितीमुळे अशक्त आणि खुरटलेला होता. चिनोऱ्यात नारायणच्या वडिलांची थोडीफार कोरडवाहू शेतजमीन होती. घरची गुरं तो आनंदवनात चारायला आणत असे. आणि फावल्या वेळात आमचं खेळणं, मारामाऱ्या वगैरे उद्योग चालत. एक दिवस आम्ही नारायणला इंदूकडे घेऊन गेलो आणि ‘हा आमचा मित्र’ अशी त्याची ओळख करून दिली. आम्हाला दोघांना अखेर कोणीतरी मित्र मिळाला याने इंदू आणि बाबांना हायसं वाटलं. नारायणच्या घरची परिस्थिती बेताचीच होती. इंदूला नारायणविषयी खूपच कणव वाटे. त्याला आनंदवनात घरी कायमचं ठेवून घ्यावंसं तिला वाटू लागलं. एके दिवशी मनाचा हिय्या करत इंदूने बाबांकडे हा विषय काढला. नारायणच्या आई-वडिलांची हरकत नसेल तर नारायणला आमच्या सोबतीने राहू द्यायला बाबांचीही हरकत नव्हती. इंदूने नारायणच्या आईला आनंदवनात बोलावून घेत तिच्यापुढे हा विषय मांडला आणि लवकरच आमच्या मोठय़ा बंधूराजांच्या रूपात नारायणचं आमच्या घरी आगमन झालं. खेळताना नारायणचं आणि माझं सख्य फार काळ टिकत नसे. आमची गुद्दागुद्दी झाली की तो मला सारखी घरी निघून जायची धमकी देत असे. असं झालं की मी त्याची बॅग आणि कपडे कोठीघरात लपवून ठेवत असे.
आनंदवनात येणाऱ्या पाहुण्यांची आम्ही ‘आवडते’ आणि ‘नावडते’ अशी विभागणी केली होती. कुणी ‘नावडते’ पाहुणे आले की त्यांच्यासमोरच आम्ही निर्लज्जपणे बाबांना विचारायचो, ‘‘बाबा, हे केव्हा जाणार आहेत?’’ आणि जे पाहुणे आवडायचे- म्हणजे जे आमच्याबरोबर धुडगूस घालण्यात सामील व्हायचे, त्यांनी जाऊ नये म्हणून त्यांच्या चपला आम्ही लपवून ठेवत असू.
‘प्रसादा’ची परंपरा तर आमच्या पाचवीला पुजलेली होती. विनोबाजींनी दिलेल्या पैशातून बाबांनी एक गाय घेतली होती. तिचं नाव- नर्मदा. इंदूला आधी गाईचं दूध काढायची सवय नव्हती म्हणून एका कुष्ठमुक्त सहकाऱ्याच्या मदतीने गाईचे मागचे दोन पाय बांधले आणि मला ती म्हणाली की, तू तिच्या गळ्याखाली थोडं खाजवत उभा राहा; तोपर्यंत मी दूध काढते. मी तसं करायला सुरुवात केली रे केली आणि गाईने मला थेट शिंगावर घेऊन लांब भिरकावून दिलं. मला चांगलाच ‘प्रसाद’ मिळाला. पण पुढे हीच नर्मदा आमच्या सर्वाच्या इतकी सवयीची झाली, की इंदूने हाक मारल्या मारल्या शेपूट वर करून कुठूनही धावत येत असे. साप, विंचू, इंगळ्या यांचा प्रसादही आम्हाला सुरुवातीच्या दिवसांत अनेकदा मिळाला होता. घराच्या जोत्यात, डाळीच्या पिंपात, कपडय़ांत- अगदी म्हणाल तिथे विंचू-इंगळ्यांचे वास्तव्य असे. एका रात्री प्रकाशला मोठ्ठा काळा विंचू चावला आणि लगेचच दुसऱ्या रात्री मला. दोघंही तुडुंब सुजलो होतो. काही औषधही हाताशी नव्हतं. अशा किती काळरात्री इंदूने कशा जागून काढल्या, हे तिचं तिलाच माहीत. हेच काय कमी होतं म्हणून त्याच आठवडय़ात तिलाही दोन वेळा विंचवांचा प्रसाद मिळाला. बाबांनाही दोन वेळा साप चावला होता आणि शर्टात लपून बसलेल्या विंचवांचा प्रसाद मिळाला होता. एकदा तर माकडाने त्यांना नखशिखांत फोडून काढलं. पण बाबांनी इंजेक्शन घेण्यास नकार दिला. सुदैवाने काही झालं नाही. अर्थात हे झालं प्राण्यांकडून मिळणाऱ्या प्रसादाचं. माझ्या उपद्व्यापी स्वभावामुळे मला बाबांकडून हातांचा आणि कधी कधी काठय़ांचा प्रसाद मिळत असे, तो वेगळाच!
उन्हाळ्यात तापमान ४५-४६ अंश सेल्सिअसपुढे गेलं की आनंदवनात प्रचंड वादळं होत. असाच एक दिवस. त्या दिवशी बाबा काही कामानिमित्त नागपूरला गेले होते. दुपारी तीन-चारच्या सुमारास इंदू नेहमीप्रमाणे गाईचं दूध काढण्यासाठी गेली. अध्र्या-पाऊण तासात प्रचंड अंधारून आलं आणि भयानक वादळाला सुरुवात झाली. मी आणि प्रकाश आमच्या झोपडीत होतो. वाऱ्याच्या प्रचंड झोताने गाईंसाठी केलेल्या तात्पुरत्या शेडचे पत्रे उचलले गेले व फर्लागभर दूर शेतात जाऊन पडले. वाऱ्याचा जोर वाढतच चालला होता. इंदूने काढलेल्या दुधाच्या बादल्या जमिनीवर आडव्या होऊन दूध मातीत मिसळलं होतं. इंदूला आमची दोघांची खूप काळजी वाटत होती. पण वादळात झोपडीकडे चालत जाणंही अशक्य होऊन बसलं होतं. झाडांच्या फांद्या, झोपडय़ांची कौलं, पत्रे- जे वाटेत आडवं येईल त्याला भिरकावून देत निसर्गाचं तांडवनृत्य सुरू होतं. देवाचा धावा करत ती बसून राहिली. इकडे वादळामुळे जशा घराच्या कुडाच्या भिंती गदागदा हलू लागल्या तसा लिंपलेल्या भिंतीचा चुना खाली पडू लागला आणि कौलं टपाटपा खाली पडू लागली. प्रसंगावधान राखत आम्ही दोघं लगेच नेवारीच्या खाटेखाली जाऊन लपलो आणि वादळ शांत होईपर्यंत तसंच बसून राहिलो. वादळ शमताक्षणी इंदूने झोपडीकडे धाव घेतली. तिला दिसली ती नेवारीची बाज- जिच्यावर झोपडीची कौलं आणि भिंतीचा चुनाच नव्हे, तर भिंतीचा काही भागही पडून त्याचा ढीग झाला होता. आपली पोरं भिंत पडून खाली दबली, या विचाराने तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. पण हळूच बाजेखालून रांगत आम्ही दोघं बाहेर पडलो तसा तिचा जीव भांडय़ात पडला. आम्हाला दोघांना जवळ घेऊन कितीतरी वेळ ती सुन्न होऊन तशीच बसून होती.
बाबांचं मात्र काहीतरी वेगळंच असायचं. अशी वादळं यायची तेव्हा बाबा इंदूला म्हणत, ‘‘हं चल, फिरायला चल.’’ विजांचा गडगडाट. सुनसान रस्ता. लोक घराची दारं बंद करून बसायची. आणि आम्हा दोघांना घरात ठेवून बाबा इंदूला त्या वादळात फिरायला घेऊन जायचे. याबद्दल इंदू पुढे एका मुलाखतीत म्हणाली होती, ‘‘मग काय करायचं? ही सवयच होऊन गेली मला. वादळाबरोबर जगायची!’’
१९५५ साली रेणुकाच्या जन्माने आम्हाला हक्काची लहान बहीण मिळाली आणि इंदूच्या मते- आम्ही दोघं भाऊ जरा माणसाळलो. कधी बाबा, तर कधी इंदू तिला न्हाऊमाखू घालत तेव्हा आम्ही जमेल तशी मदत त्यांना करत असू. लहानपणापासूनच रेणुका अत्यंत शिस्तीची आणि प्रचंड कामसू आहे. रेणुका मला ‘दादा’ म्हणते. तिचं माझ्यावर निरतिशय प्रेम. अडचणीच्या अनेक प्रसंगांत तिने मला कधी प्रेमाने बोलून, तर कधी फटकारत सावरून घेतलं. मी नेहमीच म्हणतो की, माझ्या तोंडाचं ‘सॉफ्टवेअर’ खराब आहे, मला फार कमी वेळा सुसंगतपणे बोलता येतं. त्यामुळे बहुतांश वेळा माझ्या बोलण्यामुळे गैरसमजच होतात. माझं अंतरंग जाणणारी फार थोडी माणसं आहेत; रेणुका त्यांच्यातली एक. अर्थात ती आजही मला स्पष्ट म्हणते, ‘‘दादा, तुझं सगळं चांगलं आहे; पण बोलणं रानटी ते रानटीच!’’ आणि आता माझं वय पण सत्तर झालंय. तेव्हा एक्स्पायरी डेट झाल्यामुळे बोलणं सुधारण्याची शक्यताही नाहीच!
बघा, मला सुसंगतपणे बोलता येत नाही तसं सुसंगतपणे लिहिता पण येत नाही याची तुम्हाला एव्हाना खात्री पटली असणारच! १९५५ वरून मी थेट २०१७ वर हनुमान उडी मारली. अर्थात, कामाबद्दलचं लिहिण्याच्या रगाडय़ात असा एखादा ब्रेक आनंददायी पण ठरू शकतो म्हणा!
विकास आमटे vikasamte@gmail.com