‘वर्कर्स युनिव्हर्सिटी’ची संकल्पना सांगणारी बाबा आमटेंची मुलाखत साधना प्रकाशनाने २६ डिसेंबर १९६४ रोजी- म्हणजेच बाबांच्या ५० व्या जन्मदिवशी एका पुस्तिकेच्या रूपात प्रकाशित केली. त्यात बाबा म्हणतात :
‘‘करुणालयाला निर्मितीच्या कुरुक्षेत्राचे स्वरूप मिळाले! पीडितांचे एक पराक्रमी साम्यकुल- इस्रायली कार्यकर्त्यांच्या शब्दांत ‘किबुत्झ ऑफ द सिक’- तेथे उभे राहिले. आपले खुंट पसरून भीक मागणाऱ्या हातांत जेव्हा स्वत:चा सर्व खर्च भागवून दूरस्थ आप्तांनाही पैसे पाठवण्याची कुवत आली, सुमारे अडीचशे वैयक्तिक ‘बचत खाती’ आनंदवनाच्या पोस्टात उघडण्यात आली, तेव्हाच कुष्ठकार्याच्या क्षेत्रात एक युगांतर घडून आले!’’
साठीच्या दशकात आनंदवनात शेती, उद्योग, बांधकाम, शिक्षण, व्यवसाय प्रशिक्षण अशा विविध आघाडय़ांवर अनेक नवनवे प्रकल्प उभे राहत होते. खरं तर औपचारिक शिक्षणाच्या क्षेत्रात आनंदवनाने पहिलं पाऊल टाकलं ते ‘आनंद निकेतन महाविद्यालया’च्या रूपाने नव्हे, तर १९६१ साली सुरू झालेल्या ‘आनंद बुनियादी विद्यालया’च्या रूपाने! बाबांनी कुष्ठरुग्णांच्या लग्नांना- लग्नाआधी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करावी, या अटीवर संमती दिली होती. असं असलं तरी आनंदवनात उपचारांसाठी दाखल होणारे असेही काही कुष्ठरुग्ण परिवार होते- ज्यांना आधीपासून मुलंबाळं होती. त्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न होता. वाढत्या वयाच्या या मुलांना इतर मुलांप्रमाणे शिक्षण मिळावं यासाठी बाबांनी ‘आनंद बुनियादी विद्यालय’ नावाने प्राथमिक शाळा सुरू केली. शाळेचे मुख्याध्यापक होते डहाके गुरुजी. कुष्ठरोगाच्या उपचारासाठी आनंदवनात दाखल झालेले डहाके गुरुजी पेशाने शिक्षकच होते. आध्यात्मिक विचारांच्या डहाके गुरुजींनी आनंदवनातल्या कुष्ठरुग्ण परिवारांतील मुलांच्या अनेक संस्कारित पिढय़ा घडवल्या.
आनंदवनातला ‘हातमाग’ उद्योग साठीच्या दशकाच्या सुरुवातीला सुरू झाला. सावजी माऊलीकर, महादेव पवनीकर, मंजुळाबाई बारापात्रे अशी कोष्टी समाजातली काही कुष्ठरुग्ण मंडळी आनंदवनात होती. त्यांच्या अंगी विणकामाची कला उपजतच होती. बाबांनी लगेचच पाच हातमाग मागवले आणि हा उद्योग सुरू झाला. सुरुवातीच्या काळात आनंदवन, सोमनाथ आणि अशोकवनातल्या रहिवाशांची मुख्यत्वे धोतर आणि नऊवारी साडय़ा-लुगडय़ांची संपूर्ण गरज या हातमाग उद्योगाने भागवली. याशिवाय पंचे, चादरी, आसनं इत्यादी वस्तूसुद्धा निर्माण होत असत. या मंडळींच्या मार्गदर्शनाखाली पुढे अनेक कुशल कारागीर तयार होत गेले आणि निवासी लोकसंख्या पुढे जशी वाढत गेली तसतशी हातमागांची संख्याही वाढत गेली.
‘मुद्रण’ हा पण साठीच्या दशकात सुरू झालेला एक महत्त्वाचा उद्योग. त्यावेळी वरोऱ्यात ‘सरस्वती पिंट्रिंग प्रेस’ नावाचं एक अगदी छोटं मुद्रणालय होतं. बाकी या भागात चांद्याशिवाय कुठेच पिंट्रिंग प्रेस नव्हता. आनंदवनाच्या वाढत्या व्यापामुळे रजिस्टर्स वगरे बरीच लागत असत. शिवाय नुकत्याच सुरू झालेल्या आनंद निकेतन महाविद्यालयातील चार प्रवृत्तींसाठी मोठय़ा प्रमाणात छापील साहित्याची गरज निर्माण झाली होती. ही सर्व गरज अंतर्गतच भागवली तरी बराच पसा वाचू शकेल; शिवाय मुद्रण व्यवसायाच्या माध्यमातून वरोरा आणि आसपासच्या परिसरातून छपाईची कामेही मिळू शकतील असा बाबांचा दुहेरी उद्देश होता. बाबांनी ५० हजार रुपयांचं भांडवल टाकून पेपर कटिंग मशीन, ट्रेडल मशीन, पफरेरेटिंग मशीन, सिलिंडर मशीन, पंचिंग मशीन, वायर स्टिचिंग मशीन, छपाईचे खिळे इत्यादी साहित्य विकत घेतलं आणि नागपूरचे दिवाकर मोहनी यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदवनात ‘मुद्रण निकेतन’ची सुरुवात झाली. मोहनी यांनी १९६६ च्या पहिल्या तुकडीमध्ये २२ कुष्ठरुग्णांना कम्पोझिंग, बाइंडिंग, प्रिंटिंगमध्ये प्रशिक्षित केलं. आंध्र प्रदेशातून आलेला गंगारेड्डी तोटावार हा आमचा कुष्ठमुक्त कार्यकर्ता यांच्यातलाच एक. मोहनींनी खूप मेहनत घेत पहिली चार वर्ष प्रिंटिंग प्रेसला आकार दिला आणि त्यानंतर पुढली चार वर्ष ही जबाबदारी गोपाळ शहा यांनी तितक्याच समर्थपणे सांभाळली. नंतर पुढे प्रिंटिंग प्रेसची धुरा बाबांनी पूर्ण तयार झालेल्या गंगारेड्डीच्या खांद्यावर टाकली. त्याने बाबांचा विश्वास सार्थ ठरवत अनेकांना प्रशिक्षित केलं. आनंदवनाची छपाईची अंतर्गत गरज पूर्ण करणाऱ्या प्रिंटिंग प्रेसला गंगारेड्डीच्या कुशल व्यवस्थापनामुळे सरकारी कार्यालयं, इतर शाळा-कॉलेजांमधूनही मोठय़ा प्रमाणात ऑर्डर्स मिळू लागल्या. साने गुरुजींच्या विचारांनी प्रेरित असलेल्या ‘आंतर-भारती’ या मासिकाची छपाईसुद्धा ‘मुद्रण निकेतन’मध्येच होत असे. प्रा. रमेश गुप्ता हे ‘आंतर-भारती’चे संपादक होते. ‘ज्वाला आणि फुले’ नावाने प्रकाशित झालेलं बाबांचं मुक्तशैलीतील चिंतनही प्रा. गुप्ता यांनीच शब्दबद्ध केलं.
आनंदवनातील कुष्ठमुक्त सहकाऱ्यांमधूनच बाबांनी पॅरामेडिकल वर्कर्स तयार केले असले तरी निवासी डॉक्टर काही मिळाला नव्हता. महाराष्ट्रातूनच नव्हे, तर परराज्यांतूनही कुष्ठरुग्ण मोठय़ा संख्येने येऊ लागले होते. हे बघता आनंदवनात पूर्णवेळ डॉक्टर असणं निकडीचं झालं होतं. आणि ही गरज आम्हा दोघा भावांमध्ये इतकी भिनली होती, की प्रकाश आणि मी पुढे डॉक्टरकीसाठी प्रवेश घ्यायचा हे जणू मूलभूतरीत्याच ठरलेलं होतं! प्रकाशला तसंही डॉक्टर व्हायचंच होतं; पण यंत्र, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची लहानपणापासून प्रचंड आवड असल्याने मला डॉक्टर होण्यापेक्षा इंजिनीअर होणंच जास्त आवडलं असतं. मात्र, आम्ही दोघांनी डॉक्टर झालं पाहिजे, ही बाबांची आंतरिक इच्छा होती. (जरी त्यांनी ती कधी प्रत्यक्ष बोलून दाखवली नसली तरीही आम्हाला ते जाणवत होतंच.) शिवाय आनंदवनातली परिस्थिती आणि हक्काच्या डॉक्टरची निकड बघता मी वेगळा विचार करणंही शक्य नव्हतं. अखेर इंजिनीअर होण्याच्या ऊर्मीला मोडता घालत मी प्रकाशसोबत नागपूरच्या ‘गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज’मध्ये १९६६ साली ‘एमबीबीएस’ला प्रवेश घेतला. पुस्तकांचा खर्च वाचावा म्हणून आम्ही भाऊ सुरुवातीपासून एका इयत्तेत शिकलो. आमची मेडिकलची पुस्तकंही कमलाताई होस्पेट यांचे मानसपुत्र पुण्याचे जवाहर कोटेचा यांनी डॉ. कुमार सप्तर्षी आणि डॉ. अनिल अवचट यांच्याकडून आणून दिली होती. मेडिकलला गेल्यावर आम्हाला आयुष्यात पहिल्यांदाच फुलपॅन्टस्, जोडे, सायकली आणि घडय़ाळं मिळाली. पण काही दिवसांनी कॉलेजमध्ये आमचं रॅगिंग झालं, त्यावेळी आमच्या सायकली विहिरीत फेकून दिलेल्या आढळल्या. सुरुवातीला वर्षभर आम्ही नागपूरला रामकृष्ण मिशनच्या विवेकानंद हॉस्टेलला राहायचो. त्यानंतर मातृसेवा संघाच्या एका हॉलमध्ये एक वर्ष काढलं. (तिथे दिवसभर ऑफिसची कामं चालत!) त्यानंतरचं शिक्षण आम्ही आमच्या महाविद्यालयाजवळील हनुमाननगर या भागात तिसऱ्या मजल्यावरील एका छोटय़ाशा भाडय़ाच्या खोलीत राहून पूर्ण केलं. घरामागे विहीर होती. तिथनं बकेटने पाणी वर आणावं लागतं असे. पण बरसातीत पाणी आणणं अशक्य होऊन बसे. मग आम्ही वरनंच बकेटला दोर बांधून ६०-७० फूट खाली विहिरीतून पाणी काढत असू. आम्ही खाणावळीत जेवायचो. त्यामुळे कधीतरी वेगळे पदार्थ खावेसे वाटे. मग खाणावळीत खाडे करून जे पैसे वाचले त्यातून आम्ही एकदा डोसा खायला गेलो. पण हे नेमकं कोणीतरी पाहिलं आणि बाबांना सांगितलं. त्याचं त्यांना खूप दु:ख झालं. वैद्यकीय शिक्षणापूर्वी आनंदवनाबाहेरील जगाशी कधीच संबंध न आलेले आम्ही दोघं भाऊ त्या जगाचा एक भाग बनून अशा प्रकारे टक्केटोणपे खात खात डॉक्टर बनलो.
इकडे १९६४ पासून आनंदवनातील शेतीची जबाबदारी सांभाळली ती नारायणने. इंदू त्याला ‘आनंदवनाचा कृषिमंत्री’ म्हणायची! हळूहळू आनंदवनातील शेतीचा आवाका वाढत होता. गहू, ज्वारी, तांदूळ, मका, कापूस घेतला जाऊ लागला. मूग, हरबरा अशी कडधान्यं पिकू लागली. भुईमूग, सूर्यफूल, जवस अशा तेलबियांचं उत्पन्न निघू लागलं. एवढं, की आनंदवनासाठी लागणारं खाद्यतेल आम्हाला या उत्पादनामधूनच मिळायचं! तेव्हा आनंदवनात तेलाची घाणीही होती. अण्णासाहेब सहस्रबुद्धे नेहमी म्हणत, ‘‘आनंदवनातल्या शेतीत किती ‘रुपयां’चं धान्य पिकलं हे महत्त्वाचं नाही, किती ‘टन’ धान्य पिकलं हे महत्त्वाचं!’’ आनंदवनाच्या शेतीतलं विपुल (Quantitative) आणि दर्जेदार (Qualitative) उत्पादन हे बाबांच्या दृष्टीने आत्मनिर्भरतेचं अन् पुरुषार्थाचं प्रतीक होतं. एकदा तुकडोजी महाराज आनंदवनात आले होते, तेव्हा बाबा त्यांना म्हणाले, ‘‘तुमच्या मांडीपेक्षा आमचा मुळा जाड आहे!’’ त्याकाळी जी सरकारी कृषी प्रदर्शनं भरत, त्यांतील स्पर्धेत भाग घेण्यासाठी बाबा आनंदवनातला भाजीपाला, गोधन पाठवत असत. तेव्हा या प्रदर्शनांमध्ये बहुतांश वेळा पहिल्या तिन्ही क्रमांकाचं पारितोषिक आनंदवनाच्याच उत्पादनांना मिळत असे! त्यामुळे नंतर नंतर असं झालं की, स्पर्धेत भाग न घेता केवळ प्रदर्शन म्हणूनच बाबांनी शेती उत्पादनं पाठवायला सुरुवात केली! ‘Only for Exhibition and not for Competition!!’असा बोर्ड बाबा तिथे लावत.
साठीचं दशक संपताना आनंदवनात टीन कॅन, बांधकाम, सुतारकाम, लोहारकाम (शेतीची अवजारं बनवणं), सुधारित शेती, पशुपालन, प्रिंटिंग प्रेस, विणकाम, नर्सिग, इलेक्ट्रिकल फिटिंग, प्लम्बिंग अशा विविध प्रवृत्तींचं प्रशिक्षण दिलं जाऊ लागलं होतं. आनंदवनात ‘सुख-सदन’ नावाचे नवे कम्यून ‘स्विस एड अॅब्रॉड’च्या सहकार्याने उभे राहिले होते. आनंद निकेतन महाविद्यालय असो, आनंद अंध विद्यालय असो की सोमनाथ प्रकल्प; आनंदवनाच्या जवळपास प्रत्येक योजनेत, उपक्रमात ‘स्विस एड अॅब्रॉड’चा फार मोठा सहभाग होता. डॉ. स्नेलमन खरं तर ‘स्विस एड अॅब्रॉड’चे उच्चपदस्थ कार्यकारी अधिकारी; पण ते आणि पिअर ऑप्लिगर- दोघंही आनंदवनाशी एवढे समरसून गेले होते, की ते ‘स्विस एड’चे कमी आणि आनंदवनाचेच कार्यकत्रे जास्त वाटावेत!
ज्येष्ठ साहित्यिक आणि समाजचिंतक नरहर कुरुंदकर यांनी विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात आफ्रिकेत मोठं मानवतावादी काम उभारणारे डॉ. अल्बर्ट श्वाइट्झर आणि विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात कुष्ठरुग्णांसाठी ‘आनंदवन’ उभं करणारे बाबा यांच्यात आढळलेलं साधर्म्य आणि वेगळेपण यांचा गोषवारा घेणारा ‘दोन करुणाघन’ हा लेख लिहिला होता. त्यात आनंदवनाबद्दल समर्पक वर्णन आढळतं. कुरुंदकर म्हणतात :
‘‘महारोग्यांनी रोगग्रस्त होऊन उपचारांसाठी यावे आणि बरे झाल्यानंतर रोगी व विफल मन घेऊन तसेच बहिष्कृत म्हणून जगावे, यापेक्षा त्यांना भवितव्य आहे का नाही? बाबा आमटे म्हणणार, ‘मी विच्छिन्न व पंगू शरीराचा माणूस निर्मितीच्या कामात गुंतवून ठेवतो. हा काही अतिरिक्त मूल्य संग्रहित करण्याचा भांडवलशाही उद्योग नव्हे. बाहेर तुम्हाला वेतन रुपया मिळत असेल, तर मी दोन रुपये देतो. शासन किमान वेतन तीन रुपये करणार असेल, तर मी पाच रुपये देतो. आणि देतो म्हणजे कुठून? भीक मागून दान आणतो आणि त्यातून तुम्हाला देतो असे नव्हे. तुमच्याच श्रमांतून रोग्यांना उपचार आणि तुम्हाला स्वावलंबी जीवन उपलब्ध होईल एवढी निर्मिती करून हे वेतन मी तुम्हाला देतो. महारोग्यांच्या आणि आपले स्वावलंबी जीवन जगणाऱ्या इतर रोग्यांच्या औषधोपचाराचा खर्च देणाऱ्या प्रचंड निर्मितीक्षम वसाहती उभारून मी भकास मनाला अस्मिता आणि स्वावलंबन देतो. पिचलेल्या जीवनाला नवा अर्थ देतो. समाजालाही काही देतो. आणि हे सगळे देशाच्या तोकडय़ा साधनसामग्रीवर ओझे न टाकता.. सुप्त निर्मितीक्षमता प्रज्ज्वलित करून देतो. माणूस, मानवसमूह आणि राष्ट्र स्वाभिमानी व स्वावलंबी करीत वेदनेशी झुंज घेण्याचा हा एक भव्य प्रकल्प.’’
विकास आमटे vikasamte@gmail.com