ऐंशीचं दशक म्हणजे देशातला एक धगधगता कालखंड. या काळात भारतीय एकात्मतेच्या संकल्पनेलाच घरघर लागली होती. पंजाब खलिस्तानवाद्यांच्या विळख्यात ओढला गेलेला होता. ‘ऑपरेशन ब्लू स्टार’, पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या, दिल्लीतील शिखांचे शिरकाण आणि त्यानंतर सुरूझालेले मृत्युतांडव.. अशा घटनांनी अख्खा देश हादरून गेला होता. काश्मीर आणि ईशान्येकडील राज्यांमध्येही फुटीरतावादी चळवळी फोफावू लागल्या होत्या. देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा पाईक होण्याची, देशातील समता, बंधुता अखंडित ठेवण्याची प्रतिज्ञा घेणारा युवाच बिथरला होता. खरोखरच परिस्थिती एवढी बिकट होती, की बाबा तळमळून म्हणाले, ‘‘माझ्या प्रकाशाच्या शाळेतील मुलांच्या त्या आंधळ्या डोळ्यांच्या पापण्यांना प्रकाशाची कवाडे पाहायची जिद्द आहे, मग त्याच्या हजारपट जिद्द तरुणांच्या या उघडय़ा डोळ्यांत का असू नये? आज माझ्या आवतीभोवती मी जेव्हा कणखर देहाच्या आत वास करणारी कमकुवत मनं पाहतो, तेव्हा माझ्या डोळ्यांत अश्रू येतात. आज स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सदतीस वर्षांनंतरसुद्धा आपल्या हृदयांत सलोख्याचं, बंधुभावाचं बीज रुजू शकलेलं नाही. आपल्या स्वप्नांची चिता पेटलेली बघावी लागणं, हे आजच्या पिढीचं दुर्दैव आहे. ‘भारत जोडो’चं आवाहन एवढय़ासाठीच करण्यात आलं आहे की- ‘भारताची पुढे आणखी शकलं झाली, कारण तेथील युवा पिढीला कुणी वेळीच सावधान केलं नव्हतं’, अशी नोंद इतिहासात करण्याची वेळ आपल्यावर येऊ नये!’’
१९८५ हे ‘आंतरराष्ट्रीय युवावर्ष’ म्हणून आणि १९८६ हे ‘आंतरराष्ट्रीय शांतता वर्ष’ म्हणून संयुक्त राष्ट्र संघटनेने घोषित केलं होतं. पण भारतातली तत्कालीन परिस्थिती याच्या अगदीच विपरीत होती. १९८५ सालच्या उन्हाळ्यात सोमनाथमध्ये संपन्न झालेल्या श्रम-संस्कार छावणीत बाबांनी ‘भारत जोडो’ची संकल्पना मांडली. बाबा म्हणाले, ‘‘ब्रिटिश साम्राज्याविरुद्धचा लढा त्या मानानं सोपा होता, कारण आपला शत्रू कोण हे सुस्पष्ट होतं. परंतु आजची राष्ट्रीय एकात्मतेच्या चळवळीची वाट अतिशय बिकट आहे, कारण आपला शत्रू अदृश्य आहे. तो तुमच्या-आमच्यातच दडलेला आहे.’’ याच श्रम-संस्कार छावणीत ‘भारत जोडो अभियाना’चा पाया रचला गेला. समाजातले प्रश्न सोडवण्यामध्ये देशातली युवाशक्तीच महत्त्वाची भूमिका बजावेल, याबद्दल आश्वस्त असलेल्या बाबांनी देशातल्या तरुणाईला साद घालत ‘भारत जोडो अभियाना’च्या झेंडय़ाखाली एकत्र केले आणि १९८५-८६ मध्ये कन्याकुमारी ते काश्मीर (रीं ३ रल्ल६) आणि १९८८-८९ मध्ये अरुणाचल प्रदेशमधीलइटानगर ते गुजरातमधील ओखा (रल्ल६ ३ रीं) अशा दोन सायकल यात्रा काढल्या. याशिवाय, मधल्या कालावधीत बाबांनी ‘पीस बाय पीस मिशन’ अंतर्गत अख्खा पंजाब सहा वेळा पिंजून काढत ‘शांती के लिये मानव – मानव के लिये शांती’ हा नारा बुलंद केला.
पहिल्या भारत जोडो अभियानाची सुरुवात सानेगुरुजींच्या जयंतीदिनी २४ डिसेंबर १९८५ रोजी झाली. एक पायलट जीप, एक मोटारसायकल आणि सामानसुमान लादलेले तीन ट्रक्स, बाबांची अॅम्ब्युलन्स-कम-बस आणि बारा राज्यांतून सामील झालेले शे-दीडशे सायकलस्वार तरुण-तरुणी असा हा जथा. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर असं १०७ दिवस ५०४२ किलोमीटर मार्गक्रमण करत, गावोगावी भाषणं, गटचर्चा, गाणी, वृक्षारोपण, पथनाटय़ं यांद्वारे प्रभावीपणे राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत ९ एप्रिल १९८६ रोजी जम्मूमध्ये अभियानाची सांगता झाली. दुसरं भारत जोडो अभियान १ नोव्हेंबर १९८८ ला अरुणाचल प्रदेशमधील इटानगर इथून सुरू झालं आणि ईशान्य भारतातील सात राज्य, नंतर सिक्कीम, पश्चिम बंगाल, ओरिसा, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान असा ७५४६ किलोमीटरचा प्रवास करत गुजरातमधील ओखा येथे २६ मार्च १९८९ ला समाप्त झालं. अभियानांत जशी मुदलवन, जेकब, संजय साळुंखे, विद्याव्रत नायर, डॉ. मनीषा लोढा, अतुल शर्मा, सुषमा पद्मावार, सुनिता देशपांडे, सुभाष रोठे, छोटू वरणगावकर, साधना कुलकर्णी, नफिसा कोलंबोवाला, गोरख वेताळ, अनिकेत लोहिया, दगडू लोमटे, डॉ. अशोक बेलखोडे, अनिल हेब्बर ही मंडळी होती; तसा एक पाय नसूनही कुबडीच्या आधाराने पहिल्या अभियानात ५०४२ किलोमीटर सायकल हाकणारा बाबा सूर्यवंशी होता. अभियानादरम्यान वडिलांचा मृत्यू होऊनही, देशाच्या दारुण परिस्थितीपुढे वडिलांच्या निधनाचं दु:ख फिकं मानत अभियान पूर्ण करणारा द्वारकानाथ होता. असाध्य आजारामुळे मृत्यूशी झुंजत असतानाही जिद्दीने सामील झालेला कर्नाटकचा रामानंद शेट्टीही होता. दुर्दैवाने अभियानादरम्यान दुखणं बळावल्याने रामानंद वाचू शकला नाही, पण पसरलेला जाती-धर्मभेदाचा अंधकार दूर करणाऱ्या प्रकाशकिरणाचं काम करून गेला. अभियानांच्या संयोजनात आणि व्यवस्थापनात यदुनाथजी थत्ते, चंद्रकांत शहा, एकनाथजी ठाकूर, राजगोपाल सुंदरेसन यांची मोलाची भूमिका होती. विख्यात वृत्तचित्र निर्माते सिद्धार्थ काक यांनी पहिल्या अभियानात साडेतीन महिने सोबत करत एका सुंदर माहितीपटाची निर्मिती केली होती.
मी दोन्ही अभियानांच्या किंवा ‘पीस बाय पीस मिशन’च्या तपशिलात जाऊ शकत नाही, कारण हा प्रवास खूपच मोठा आहे. त्यामुळे मी दोन ठळक प्रसंग सांगतो..
पहिल्या भारत जोडो अभियानादरम्यान अमृतसरला बाबा सुवर्णमंदिरात एक दिवस मुक्कामी होते. सुवर्णमंदिर म्हणजे खलिस्तानवाद्यांची गुहाच. बाबांच्या सोबत फक्त विलास मनोहर होता (दोन्ही भारत जोडो अभियाने आणि नंतरही बराच काळ विलास कायम बाबांच्या साथीला भक्कमपणे उभा होता). इतरांची व्यवस्था सुवर्णमंदिराच्या बाजूच्या धर्मशाळेत केली होती. सकाळी सुवर्णमंदिरात बाबांना भेटायला चार तरुण खलिस्तानवादी शीख विद्यार्थी आले. त्यांनी बाबांशी चर्चा करत सद्य:स्थितीबद्दल बाबांची मतं जाणून घेतली. त्याचदिवशी संध्याकाळी खालसा कॉलेजमध्ये एका कार्यक्रमात बाबांचं भाषण ठेवण्यात आलं होतं. सकाळी भेटून गेलेल्या त्या तरुणांमधला एक जण कॉलेजमध्ये भाषण द्यायला उभा झाला. कंबरेची तलवार उपसत धार्मिक घोषणा देत त्यानं आधी काही वाक्यं पंजाबीत उच्चारताना बाबांचा संत असा उल्लेखही केला आणि मग अचानक बाबांकडे तलवार रोखत हिंदीत बोलू लागला, ‘‘जेव्हा सरकार शीख तरुणांवर गोळ्या झाडत होतं, पंजाबमधील स्त्रियांवर जेव्हा अत्याचार होत होते तेव्हा हे संत कुठे होते?’’ या अनपेक्षित घटनेमुळे उपस्थित सर्वच जण अस्वस्थ झाले; फक्त बाबाच तेवढे शांत होते. तो तरुण थांबला आणि बाबांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली, ‘‘हातात नागडी तलवार परजत बोलणारा सळसळत्या रक्ताचा रांगडा तरुण या देशात आहे याचा मला मनस्वी आनंद आहे. पंजाबमधील माताभगिनींवर झालेल्या अत्याचारामुळे तो पेटून उठला आहे, हे पाहून माझ्या मनात युवांविषयी आशा जागृत झाली आहे.’’ मग भारत जोडो अभियानाची संकल्पना, पंजाबमधली अशांतता, भयभीत जनता यावर बाबा तासभर बोलले. भाषणाच्या अखेरीस त्या तरुणाकडे बघत बाबा म्हणाले, ‘‘जगाला तलवार दाखवणारे आजपर्यंत खूप होऊन गेले, पण सारे नामशेष झाले. आज खालसा कॉलेजमधल्या तरुणांना मी एकच नारा देत आहे- ‘हाँथ लागे निर्माण में, नही मांगने, नही मारने’..’’ एकदम टाळ्यांचा कडकडाट झाला. आपण बाबांना धमकावले तरी बाबांनी त्यावर अशी प्रतिक्रिया द्यावी हे पाहून त्या तरुणाच्या डोळ्यांतून घळघळा अश्रू वाहू लागले.
दिवंगत भीष्मराज बाम (आय. पी. एस.) यांचा आनंदवनाचा स्नेह १९७५ पासूनचा. बामसाहेबांनी राज्यातच नव्हे, तर केंद्रीय गुप्तचर खात्यातही महत्त्वाच्या पदांवर काम केलं होतं. भारत जोडो अभियान आणि पंजाबमधील यात्रांमध्ये ते बऱ्याच वेळा येऊनजाऊन बाबांसोबत होते. त्यांनी बाबांवर ‘संस्मरणे महामानवाची’ असा एक मृत्युपश्चात लेख लिहिला होता. त्यात बाबांच्या पंजाबमधल्या ‘पीस बाय पीस मिशन’ दरम्यान घडलेल्या प्रसंगाविषयी ते लिहितात-
‘‘बाबांनी पंजाबमध्ये शांतियात्रा काढली तेव्हा त्यांनी पत्रकार परिषदेत सांगून टाकले, की त्यांना आतंकवाद्यांना भेटायचे आहे आणि या मुद्दय़ाला प्रसिद्धी देण्याची विनंती केली. पत्रकार हसायला लागले. ते म्हणाले, ‘‘मी आतंकवादी आहे असे कोण उघडपणे सांगेल?’’ बाबा म्हणाले, ‘‘तुम्ही छापा तर खरे.’’ मग हे वृत्त छापले गेले. दोन दिवसांनी एक मुलगी येऊन बाबांना भेटली आणि तिने विचारले, ‘‘तुम्हाला खरंच आतंकवाद्यांना भेटायचं आहे? मग तुम्ही उद्या सकाळी डी.आय.जी. अटवाल यांचा खून झाला त्या जागेवर एकटे येऊन उभे राहा. बरोबर कोणी असता कामा नये. एक माणूस येऊन तुमच्या कपाळावर फुलीची खूण करील. त्याच्याबरोबर तुम्ही जा. म्हणजे आतंकवादी तुम्हाला भेटतील.’’ बाबा इतर सर्वाच्या विरोधाला न जुमानता एकटेच तिथे गेले. एका माणसाने येऊन फुलीची खूण केल्यावर बाबा त्याच्यासोबत गेले. सुवर्णमंदिराच्या परिसरातच त्यांना एका खोलीत नेण्यात आले. तिथे शीख आतंकवाद्यांचे पाचही पुढारी हजर होते आणि काही युवक नंग्या तलवारी घेऊन पहारा करीत होते. भिंतीवर इंदिराजींचा मारेकरी बेअंतसिंग याचे एक मोठे छायाचित्र लावलेले होते. त्या पुढारी मंडळींनी बाबांना सांगितले की, ‘‘हा आमचा हिरो आहे. त्याला तुम्ही आधी सलाम करा, म्हणजे मग आम्ही तुमच्याशी बोलू.’’ बाबांनी उत्तर दिले, ‘‘ज्या माणसाने एका नि:शस्त्र, वृद्ध स्त्रीला गोळ्या घालून ठार मारले, त्याला मी हिरो मानायला तयार नाही. मी तर त्याला भ्याड समजतो.’’ खोलीतले वातावरण एकदम तापले. त्या तरुणांनी बाबांच्या छातीवर, मानेवर, गळ्यावर नंग्या तलवारी टेकल्या. आताच तुला खतम करतो, अशा धमक्या द्यायला सुरुवात केली. बाबा जराही डगमगले नाहीत. ते म्हणाले, ‘‘मी मरायला घाबरत असतो तर इथे एकटा आलो असतो का? तुम्ही खुशाल मला ठार मारा. पण मी सलाम करणे शक्य नाही.’’ तलवारी शरीरावर टेकलेल्या असतानाच बाबांनी त्यांच्याशी अर्धा तास वादविवाद केला. ते म्हणाले, ‘‘तुम्ही करता आहात ते बरोबर आहे हे मला पटवून द्या. मला पटले तर मीसुद्धा बंदूक घेऊन तुमच्या बाजूने लढायला उभा राहीन.’’ त्या आतंकवाद्यांना नवलच वाटले. काही वेळ वाद झाल्यावर तलवारी बाजूला करण्यात आल्या. त्यांची तक्रार अशी होती, की सरकार अलगाववाद्यांशीसुद्धा बोलणी करीत होते, पण यांना मात्र गोळ्या घालण्यात येत होत्या. थोडय़ा चर्चेनंतर वातावरण निवळले. त्या सर्वानी आणि बाबांनी संयुक्त निवेदन काढण्याचे ठरले. बाबांनाच एक वही-पेन्सिल देण्यात आली. बाबांनी उभ्याउभ्याच चर्चेतले मुद्दे लिहायला सुरुवात केली. तेवढय़ात खलिस्तान विद्यार्थी परिषदेचा प्रमुख गुरबक्षसिंग हा तेथे आला. तो पक्का पाकिस्तानी आयएसआयचा माणूस होता. त्याने संयुक्त निवेदनाची कल्पना मोडीत काढली. त्याने सांगितले की, ‘‘आमचे निवेदन आम्ही काढू. बाबांचे बाबांनी वेगळे काढावे.’’ मग बाबांकडून वही परत घेऊन लिहिलेले कागद तेवढे फाडून त्यांना देण्यात आले. एक बहाद्दर माणूस म्हणून बाबांचे कौतुक करून त्यांच्या तोंडात प्रसादाची खडीसाखर घालून त्यांना निरोप देण्यात आला. मी दिल्लीला नुकताच बदलून आलो होतो. बाबा पंजाबहून दिल्लीला परत आल्यावर नेहमीप्रमाणे सकाळी फिरताना बाबांनी सगळी हकिकत सांगितली. माझ्या अंगावर काटाच आला. मी बाबांना विचारले की, ‘‘हे सरकारला कळवायला हवे असे वाटते, मी कळवू का?’’ बाबा म्हणाले, ‘‘अवश्य कळवा.’’ त्यांनी ते वहीचे कागदसुद्धा माझ्या हवाली केले. मी रीतसर रिपोर्ट लिहून पाठवून दिला. ते कागदही रिपोर्टसोबत लावले. त्या रिपोर्टने बरीच खळबळ माजली. मला एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बोलावून विचारले, ‘‘हे सगळे खरे असेल?’’ मी म्हटले, ‘‘एक अक्षरही खोटे किंवा अतिशयोक्तीचे असणार नाही. गंमत म्हणूनही खोटे बोलणे बाबांना जमत नाही. मी बाबांना खूप जवळून ओळखतो.’’ काही महिन्यांनंतर त्या प्रसंगात हजर असलेले दोघे पोलिसांच्या हातात सापडले. विचारपूस करताना, ‘बाबा आमटे’ हे नाव उच्चारल्याबरोबर ते उठून उभे राहिले. त्यांनी कानाला हात लावून सांगितले, ‘‘ऐसा शेर हमने देखाही नही; उसे मौतकी जराभी डर नही है!’’
भारत जोडो अभियान आणि पंजाबमधील शांतियात्रांवरून प्रसारमाध्यमांकडून बाबांवर टीकेचा भडिमारही झाला. पण बाबांची भूमिका ठाम होती, की प्रश्न कुष्ठरोगाचा असो वा राष्ट्रीय एकात्मतेचा, समाजातले जे प्रश्न आपल्याला अस्वस्थ करतात त्यांच्या सोडवणुकीसाठी जो मार्ग योग्य वाटेल तो धरून मी चालत राहीन. बेडर बाबांनी भारत जोडो अभियानांदरम्यान आणि पंजाब भेटींच्या काळात सुरक्षा व्यवस्था साफ नाकारली होती. पंजाबचे तत्कालीन पोलीस महानिरीक्षक जे. एफ. रिबेरोंचं बाबांवर खूप प्रेम. ते म्हणत, ‘‘जर बाबा आमटे यांच्यासारखी अनेक माणसं निर्माण झाली तर जगात कुठल्या समस्याच राहणार नाहीत; पण दुर्दैवाने अशा व्यक्ती अभावानेच आढळतात. याउलट, भीतीच्या छायेत जगणारी माणसं बहुसंख्य पण निष्क्रिय असतात. यांच्यातील प्रत्येकाला आपण आज समाजात पसरवल्या गेलेल्या हिंसाचाराविरुद्ध कृती करण्यासाठी प्रेरित करू शकलो तरी त्यातून बरंच काही साध्य होऊ शकेल.’’
‘भारत जोडो अभियान’ आणि पंजाबमधील ‘पीस बाय पीस मिशन’चं साध्य हेच, की एक सौहार्दपूर्ण वातावरण तयार करण्याचा संदेश प्रभावीपणे सर्वदूर पोहोचला. प्राप्त परिस्थितीत हाच एक सुयोग्य मार्ग आहे; दुसरे मार्ग परिस्थिती जास्त जास्त चिघळवतील, याची जाणीव जनमानसाला आणि सरकारलाही झाली. किमान हे तरी लक्षात आलं-
‘लहू का रंग एक है..
अमीर क्या गरीब क्या, बने है एक खाकसे,
तो दूर क्या करीब क्या, लहू का रंग एक है..
जो एक है तो फिर न क्यों, दिलोंका दर्द बाँट ले,
जिगर की प्यास बाँट ले, लबों का प्यार बाँट लें,
लगा लो सबको तुम गले, विषमता की वजह क्या,
लहू का रंग एक है..’
– विकास आमटे
vikasamte@gmail.com