सर्वाच्या इच्छेविरुद्ध, रूप, गुण, समृद्धीने युक्त चालत आलेली स्थळे नाकारून बाबा आमटेंसारख्या विरागी वृत्तीच्या व्यक्तीशी विवाहबद्ध होण्याचं इंदूने का ठरवलं? हा प्रश्न घुले परिवारातील सगळ्यांनाच पडला होता. त्यामुळे प्रत्येकजण तिच्यावर पुनर्विचार करण्यासाठी दडपण आणू लागला. कोणीही इंदूच्या निर्णयाचं स्वागत केलं नाही. उलट सगळ्या बाजूने होणाऱ्या विरोधामुळे इंदू अगदी वैतागून गेली आणि त्या मन:स्थितीत तिने बाबांना लिहून टाकलं की, ‘कोणाचीही आपल्या लग्नाला संमती नाही, त्यामुळे तुम्ही आता मोकळे आहात; पुढे जे होईल ते आता आपलं नशीब.’ रुढी आणि परंपरांचा इतका जबरदस्त पगडा इंदूच्या मनावर होता की बंडखोरीचा विचारही तिच्या मनाला शिवला नाही. वैतागून लिहिलेल्या या पत्राचा बाबांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. इंदूची चलबिचल त्यांना जाणवली आणि ते तडक नागपूरला घुल्यांच्या घरी दाखल झाले आणि इंदूच्या आई- दुर्गाताईंना म्हणाले, ‘‘आयुष्यात मी लग्नाचा विचार अनेक कारणांमुळे केला नव्हता. पण इंदूला पाहिल्यानंतर माझा विचार बदलला व गृहस्थाश्रमात आपण काही तरी चांगले कसब दाखवू असा माझ्या मनाचा निश्चय झाला. ज्या क्षणी मी इंदूबद्दल पत्नी म्हणून विचार आणला त्याच क्षणी मी तिच्याशी मनाने विवाहबद्ध झालो. आता मला इतर स्त्रिया माता-भगिनींसमान आहेत. जरी आमचं लग्न झालं नाही तरी मी तिच्या स्मृतीत आजन्म राहीन व माझ्या जीवनाची दिशापण बदलेन.’’ इंदू दाराआडून सर्व ऐकत होती. बाबा परत जायला निघाले तेव्हा सद्गदित होऊन पुन्हा म्हणाले, ‘‘बघा हं, मी इंदूत जीव अडकवून जात आहे. माझा पाय इथून निघत नाही! पण मला अशा जड अंत:करणाने, मनाविरुद्ध दिलेल्या निर्णयाच्या खुंटय़ाला तुम्हाला जखडून ठेवायचं नाही. आपण इतरत्र सर्वगुणयुक्त स्थळ इंदूकरता पाहण्यास मोकळे आहात. आतापर्यंत झालेल्या पत्रव्यवहाराचा मी दुरुपयोग करणार नाही. तुमची सर्व पत्रं मी परत करीन.’’ असं बोलून त्यांच्या डोळ्यातून घळघळ अश्रुधारा वाहू लागल्या. हे सगळं ऐकून इंदूला खूप दु:ख झालं. स्वत:च्या दुर्बल मनाची चीड आली. तिला वाटलं हा ‘हो’-‘नाही’चा खेळ बास झाला. मी दुसऱ्या कुणालाच वरणार नाही असा तिने निर्णय घेऊन टाकला आणि घरातल्या सर्वाना म्हणाली, ‘‘बाबांना मीही मनाने वरलं आहे; पुष्कळ आधीपासून.. तुम्हा कोणाला पसंत नसेल तर विरोध करा. पण मी मात्र बाबांसारखीच आजन्म अविवाहित राहीन.’’ इंदूचा तो अनपेक्षित अवतार पाहून दुर्गाताई स्तंभित झाल्या आणि नरमल्यासुद्धा. आणि लगेचच दुसऱ्या दिवशी सर्व घुले मंडळी आमटय़ांच्या घरी येऊन थडकली. तो दिवस होता ९ ऑगस्ट १९४६. घुले मंडळी परतली ती लग्नाचा मुहूर्त काढूनच!
संन्याशाचे लग्न
लग्नाचा मुहूर्त १८ डिसेंबरचा होता. लग्न एका आठवडय़ावर येऊन ठेपलं होतं.
Written by विकास आमटे
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 19-02-2017 at 01:10 IST
मराठीतील सर्व संचिताचे कवडसे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baba amte baba amte wife baba amte marriage