ज्या कुष्ठरुग्णांचं अस्तित्वच समाजाने नाकारलं होतं अशा लोकांनी आपल्यासारख्याच इतरही वंचित घटकांना सोबत घेऊन जगाच्या नकाशावर स्वतंत्र अस्तित्व असलेलं स्वत:चं एक गाव- ‘आनंदवन’ निर्माण केलं. आनंदवनाचा ६७ वर्षांचा विलक्षण प्रवास रेखाटणारे सदर..
एखादी गोष्ट स्वीकारली की त्यात अंतिम टोक गाठायचं हा बाबा आमटेंचा स्वभाव. प्रवृत्तीचं तरी टोक, नाही तर निवृत्तीचं तरी टोक! मध्यम मार्ग नाहीच! बाबांनी एके ठिकाणी म्हणून ठेवलं आहे, ‘जीवनाचा कण-कण आणि क्षण-क्षण उपभोगण्यासाठी माझी अगदी बाल्यापासून धडपड आहे. अंधारातले व प्रकाशातले, रूढ भाषेत पवित्र व पापी, दुष्ट आणि सज्जन, बेछूट आणि व्रतस्थ, भणंग आणि समृद्ध असे जीवन मी मनसोक्त पाहिले व भोगले आहे. असे करताना प्रत्येक शिखर गाठायचे असा माझा हव्यास असे. शिखर गाठल्यावर तेथे थांबायचे नाही आणि नवी शिखरे धुंडाळायची हे ब्रीद होते. कारण शिखरावर थांबणे म्हणजे पतनाचा प्रारंभ.’
बाबांना डॉक्टर व्हायचं होतं. पण त्यांनी वकीलच व्हावं, या वडिलांच्या दुराग्रहापोटी स्वत:चं मन मारून ते वकील बनले. तत्कालीन मध्य प्रांतातल्या छत्तीसगढ विभागातील दुर्ग या गावी माजी आमदार आणि वकील विश्वनाथ तामस्कर यांच्या क्रिमिनल लॉ फर्ममध्ये ज्युनिअर वकील म्हणून नोकरी करण्यास त्यांनी सुरुवात केली. पण फौजदारी दाव्यांतील अशील, वकील, साक्षीदार इत्यादींची वृत्ती आणि एकूण व्यवहार उबग आणणारा असल्यामुळे वकिली व्यवसायाबद्दल बाबांच्या मनात तेढ निर्माण झाली. ते म्हणत, ‘‘एकीकडे पंधरा मिनिटांच्या युक्तिवादासाठी मला पन्नास रुपये मिळतात आणि दुसऱ्या बाजूला बारा तास मोलमजुरी केल्यावर एका मजुराला फक्त बारा आणे मिळतात. एखादा अशील माझ्याकडे अतिप्रसंग केल्याची कबुली देऊन मी त्याला त्या गुन्ह्य़ातून निर्दोष सिद्ध करावं म्हणून गळ घालतो आणि भरीस भर म्हणजे त्याची निर्दोष मुक्तता झाल्याप्रीत्यर्थ होणाऱ्या मेजवानीस मी हजर राहिलं पाहिजे अशीही अपेक्षा व्यक्त करतो.’’ बाबांनी त्यांच्या वडिलांकडे वकिली सोडून देण्याचा विचार बोलून दाखवला. पण वडिलांचं म्हणणं होतं की, बाबांनी फौजदारी दाव्यांपासून लांब राहावं आणि फक्त दिवाणी दावे स्वीकारावेत; पण वकिली सोडू नये. अखेर १९३९-४० च्या सुमारास बाबा दुर्ग सोडून वरोरा गावी वकिली करण्यासाठी आले. बाबांनी वरोरा गावी यायचं अजून एक कारण म्हणजे ‘एकीकडे वकिली करता करता वरोऱ्याजवळ गोरजा येथे असलेल्या वडिलोपार्जति इस्टेटीची देखभाल करणेही होईल’ अशी त्यांच्या वडिलांची भावना होती.
यादरम्यान एका जीवघेण्या प्रसंगाला बाबांना सामोरं जावं लागलं. काही कामानिमित्त ते वरोऱ्यावरून वध्र्याला जाण्यासाठी ट्रेनने निघाले होते. ते ४०-४१ साल असावं. दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटलं होतं. सनिकांची देशभरात मोठय़ा प्रमाणावर हालचाल सुरू होती. अशीच एक ब्रिटिश सनिकांची शस्त्रधारी तुकडी ग्रॅन्ड ट्रंक एक्स्प्रेसच्या एका कंपार्टमेंटमध्ये बसून वरोरा स्टेशनात आली. वरोरा हे वॉटरिंग स्टेशन असल्याने तिथे ग्रॅन्ड ट्रंक एक्स्प्रेस जास्त वेळ थांबत होती. एक नवपरिणीत जोडपं त्या सनिकांसाठी आरक्षित कंपार्टमेंटमध्ये बसताना बाबांनी बघितलं. ट्रेनला खूप गर्दी असल्याने बाबासुद्धा त्या कंपार्टमेंटमध्ये चढू लागले तेव्हा एका सनिकाने त्यांना अडवलं. बाबा त्याला विनंतीपूर्वक म्हणाले, ‘‘त्या जोडप्याला तर तुम्ही जागा दिलीत. मला पण बसू द्या. मी वध्र्यालाच उतरणार आहे.’’ पण तो सनिक त्यांच्यावर खेकसत म्हणाला, ‘‘तुम्हाला या डब्यात पाय ठेवू देणार नाही.’’ पण त्याला न जुमानता बाबा जबरदस्तीने त्या डब्यात शिरले आणि ट्रेन सुरू झाली. बाबांना तेव्हा लक्षात आलं, की ती इतकी सुंदर नवरी पाहूनच खचाखच भरलेल्या आरक्षित डब्यात सनिकांनी त्या जोडप्याला प्रवेश दिला असणार. काही वेळाने एका सनिकाने त्या नववधूची शाब्दिक छेड काढणं सुरू केलं. विरोध करायचा सोडून तिचा नवरा घाबरून संडासात जाऊन लपला आणि आतून कडी लावून घेतली. नंतर त्या सनिकाने अंगचटी जात तिला स्पर्श करायला सुरुवात केली, तशी ती मदतीसाठी जोरजोरात ओरडू लागली. जेव्हा हे सगळं बाबांच्या ध्यानात आलं तेव्हा बाबांनी त्या सनिकाला समजावण्याचा प्रयत्न केला; पण तरीही तो ऐकेना. तेव्हा ते चवताळले आणि त्या सनिकाला म्हणाले, ‘‘खबरदार! माझ्या बहिणीला हात लावशील तर!’’ पण तो सनिक उपहासाने म्हणाला, ‘‘तुझी कसली रे बहीण? ती तर तुझ्याआधीच बसली इथे येऊन.’’ बाबा संतापून म्हणाले, ‘‘नाही.. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी तिच्या अंगावर कुणालाही हात टाकू देणार नाही.’’ आणि असं म्हणतच बाबांनी त्या सनिकाला ठोसे लगावले. ते पाहताच इतर सनिक बाबांवर तुटून पडले आणि त्यांना लाथा-बुक्क्यांनी, बंदुकांच्या दस्त्यांनी बेदम मारहाण करू लागले. पण कुस्त्यांचे फड गाजवलेले बाबा ब्रिटिश सोजिरांचा प्रतिकार करत राहिले आणि अक्षरश: रक्ताच्या थारोळ्यात पडूनही त्या अबलेचं रक्षण करत राहिले. तेवढय़ात वर्धा स्टेशन आलं तसं त्या सनिकांनी बाबांना डब्याबाहेर फेकून दिलं. मात्र, त्याही अवस्थेत बाबा उठले आणि तिथले सर्कल इन्स्पेक्टर सोहनलालजी नाहर यांच्याकडे जाऊन सगळी हकीगत सांगितली. वकील असलेल्या बाबांना ते ओळखत होते. त्यांनी लगेच गाडी थांबवून धरली आणि ‘‘तो डबा मी ‘डिटेन’ करीन,’’ असं आश्वासन बाबांना दिलं. तेव्हा तिथले पोलीस अधीक्षक- जे ब्रिटिश होते- सोहनलालजींना धमकावत म्हणाले, ‘‘फ्रंटवर जाणाऱ्या सनिकांना असं रोखून धरता येणार नाही.’’ यावर सोहनलालजी चिडून म्हणाले, ‘‘स्टेशनच्या ‘लॉ आणि ऑर्डर’चा ‘इन-चार्ज’ मी आहे.’’ त्यांनी तो डबा रोखून धरत तक्रार दाखल केली, चौकशीचे आदेश दिले आणि मग बाबांना दवाखान्यात भरती केलं. ती नववधू बाबांचे पाय आसवांनी धूत होती. स्टेशनवरच्या गर्दीपुढे नवऱ्याला म्हणाली, ‘‘अरे, जा मुडद्या.. तुझ्याशी नांदण्यापेक्षा पुढल्या गाडीखाली मी जीव देते!’’
खरोखर विश्वास बसणं अवघड आहे, पण ब्रिटिशकाळात ब्रिटिश सनिकांच्याच ‘कोर्ट मार्शल’ची ऑर्डर निघाली आणि पाच-सहा महिन्यांनी बाबांच्या नावे वरिष्ठ ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्याचं चक्क क्षमेचं पत्र आलं! मात्र, आपलं कर्तव्य चोखपणे बजावणाऱ्या सोहनलालजींना ब्रिटिश सरकारने सेवेतून निलंबित केलं.
वर्तमानपत्रांतून गांधीजींना या प्रसंगाबद्दल समजलं. जेव्हा बाबांची त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट झाली तेव्हा या प्रसंगासंबंधी अिहसेचा प्रश्न उभा राहिला. तेव्हा बाबा गांधीजींना म्हणाले, ‘‘मी त्या सनिकाला समजावून सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्याला त्याच्या बहिणीची आठवण करून दिली. पण तरी तो ऐकेना म्हणून मी त्याची मानगूट पकडून त्याच्या कानशिलात एक ठेवून दिली.’’ हे ऐकून गांधीजींनी बाबांचं अभिनंदन केलं आणि म्हणाले, ‘‘बराबर है, ये शूरों की अिहसा है. तू तो ‘अभयसाधक’ है. हमे ऐसेही नौजवानों की जरुरत है.’’ पुढे गांधीजींनी ‘हरिजन’ या साप्ताहिकात ही घटना स्वत:च्या शब्दांत कथित केली.
या प्रसंगाबद्दल पुलं लिहितात, ‘बाबांच्या आईने लहानपणी त्यांना दुधाऐवजी धाडसच पाजलेले दिसते! या माणसाला भीतीचा स्पर्शच नाही. या माणसाने आयुष्यात नरभक्षक वाघांपासून ते नरराक्षस गुंडांपर्यंत कुणाकुणाशी कसा कसा मुकाबला केला याचा वृत्तांत ‘टारझन’च्या कथेपेक्षाही अधिक रोमांचकारी आहे.’
या प्रसंगानंतर ‘अभयसाधक’ ही उपाधी बाबांना जोडली गेली ती कायमचीच. मात्र, ‘या उपाधीला मी पात्र आहे की नाही?’ हे पडताळून पाहण्यास भाग पाडणारा प्रसंग लवकरच बाबांच्या समोर उभा ठाकला. बाबांच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या त्या प्रसंगाबद्दल मी पुढे विस्ताराने लिहीनच.
विकास आमटे vikasamte@gmail.com