ते १९८० साल होतं. उन्हाळ्याचे दिवस. इंदूची आजारी आई आनंदवनात अंथरुणाला खिळून होती. अखेर एके दिवशी तिला मृत्यूनं गाठलं. इंदूच्या माहेरची मंडळी गोळा झाली होती. पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू होती.

पारा ४५ अंशापुढे चढला होता. तेवढय़ात एक जीप आनंदवनात येऊन थांबली. त्यात चार अर्भकं होती. जेमतेम पाच-सात दिवसांची असतील! ‘गोकुळ’ प्रकल्पाचं अपील वाचून अकोल्याच्या सिव्हिल सर्जनमार्फत त्यांना आनंदवनात धाडलं गेलं होतं. भर उन्हाळ्यात त्या तान्ह्य़ा बाळांना जीपमधून आणल्याचं बघून इंदू प्रचंड संतापली. पण सरकारी मुलाजिमांना त्याची फिकीर नव्हती. ते आले तसे पंधरा मिनिटांत निघूनही गेले. नंतर इंदू म्हणाली, ‘‘माझी आई तर गेली. तिच्या पार्थिवाला स्नान घालून दुसरी साडीच नेसवायची आहे. पण आता ते राहू दे. स्मशानभूमी काय, आनंदवनातच आहे. घेऊन जाणारी माणसं पण आपलीच आहेत. जातील घेऊन नंतर. काही घाई नाही..’’ असं म्हणत तिने पदर खोचला. त्या चारही अर्भकांना घरात आणलं आणि प्रत्येकाला स्वत: न्हाऊमाखू घातलं. हे सर्व पार पाडून मगच तिने आईच्या देहाला अंघोळ घालून साडी नेसवली आणि लोकांना म्हणाली, ‘‘आता आईला घेऊन जा.’’ अशा अनेकविध घटना असतील, प्रसंग असतील; पण इंदूची कर्तव्यनिष्ठा कधी ढळली नाही की कठीण प्रसंगात ती कधी विचलितही झाली नाही. इंदूच्या अविश्रांत कष्टांचे, तिने समर्थपणे एकहाती पार पाडलेल्या जबाबदाऱ्यांचे ऋण बाबांनी नेहमीच मान्य केले आहे. ते म्हणत, ‘‘इंदू नसती तर हा बाबा आमटे आज जसा आहे तसा असूच शकला नसता. And I am not ashamed to make this eternal confession before society.’’

BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Manoj Jarange On Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Case : “आरोपींना मोकाट फिरू देणार असाल तर…”, मनोज जरांगेंची सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया
What Nitesh Rane Said?
Ladki Bahin Yojana : “दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्या मुस्लिम कुटुंबांना लाडकी बहीण योजनेतून वगळा”, आमदार नितेश राणेंची मागणी
Bharat Gogawale, Bharat Gogawale minister desire,
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
Koyta Ganga, Pimpri-Chinchwad, Koyta Ganga news,
पिंपरी-चिंचवडमध्ये कोयता गँगाचा पुन्हा उच्छाद
diarrhea, Badlapur, girl died diarrhea Badlapur,
अतिसाराने चिमुकलीचा मृत्यू, बदलापुरातील दुर्दैवी घटना, अंधश्रद्धेचा संशय

इंदूचं जे जगणं होतं ते कायमच इतरांसाठी होतं. तिच्या पूजाअर्चा, उपवास, व्रतवैकल्यं चालायची ती कुणावरही अशुभाची छाया पडू नये म्हणूनच. त्यामुळे निरीश्वरवादी बाबांनी इंदूच्या देवांना कधी पूजले नसेल, पण तिच्या श्रद्धेला कधी आक्षेप घेतला नाही वा विरोधही केला नाही. माझ्या मते, फक्त बाबाच नव्हे, तर आमची ही संस्था दुर्धर प्रसंगांतून, आव्हानांतून तरली ती इंदूच्या मातृत्वामुळे. मी नेहमी म्हणतो की, मातृत्व हे २४ ७ ७ असतं! कारण त्यात ‘कर्तव्य’ नसतं, ‘जबाबदारी’ असते. आई कधी मुलाला नोटीस देत नाही, की माझी रोजची कामाची वेळ संपली, आता तुझं तू बघ. इंदूचं मातृत्वही असंच होतं. शिवाय ते केवळ मायेपुरतं मर्यादित नव्हतं, तर पुढे उभं ठाकणारं प्रत्येक संकट स्वत: पुढे जाऊन झेलत इतरांना त्याची झळ पोहोचू न देणारंही होतं. केवळ आनंदवनातील लोकांसाठीच इंदू ‘आई’ होती असं नाही, तर तिच्याबद्दल ‘आई’ म्हणून तीव्र ओढ असणारे समाजात हजारोंच्या संख्येत आहेत. आपल्या मातृत्वाचा हा ओलावा निर्माण करण्याची अनोखी शक्ती तिच्यात होती. आनंदवन ही संस्था म्हणून न घडता एक कुटुंब म्हणून घडलं त्यास इंदूचा मातृसंस्कार कारणीभूत आहे.

इंदूच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे पैलू परिस्थिती आणि प्रसंगानुरूप उलगडत गेले. सतत मायेची पखरण करणारी इंदू अवघड प्रसंगी कुशल प्रशासकाच्या रूपात कणखरपणे उभी राहत असे. अगदी बाबांचा विरोध पत्करावा लागला तरी ती आपल्या भूमिकेपासून ढळत नसे. तिचं हे रूप बहुतेकांना विस्मयचकित करून जात असे. कुष्ठरुग्णांनाही सहजीवनाची ओढ असते, ते नैसर्गिक मानवी भावनांना पारखे झालेले नसतात, कुष्ठरोग झाला म्हणून त्यांना प्रेमापासून आणि शारीरिक गरजांपासून वंचित ठेवता कामा नये, ही भूमिका घेत इंदूने बाबांना कुष्ठरोग्यांच्या विवाहासंबंधीचं महारोगी सेवा समितीचं धोरण बदलायला भाग पाडलं. लग्नाआधी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करावी, या अटीवर बाबांनी बऱ्या झालेल्या कुष्ठरुग्णांच्या लग्नांना संमती दिली. अशा प्रकारे इंदूने कुष्ठरुग्णांना ‘Right to Companionship’ आणि ‘Right to Sexuality’ हे न्याय्य अधिकार मिळवून दिले.

इंदू आनंदवनात असो की इतर कुठल्या प्रकल्पावर- दिवाळीच्या, इतर सणवाराच्या दिवशी असलेलं गोडधोडाचं जेवण संस्थेतील रहिवाशांच्या आधी शेतीत वा बांधकामावर काम करणाऱ्या बाहेरच्या मजुरांना व त्यांच्या पोराबाळांना मिळावं याकडे तिचा सदैव कटाक्ष असे. आनंदवनात येणारी पाहुणे मंडळी असोत किंवा कुणी मंत्री असो; आधी त्यांच्या ड्रायव्हरला, मदतनीसाला चहा-नाश्ता-जेवण द्या, अशी सूचना इंदू आनंदवनच्या कार्यकर्त्यांना येणाऱ्या पाहुण्यांपुढेच देत असे. यात गल्लत झाली तर मात्र कुणाची खैर नसे. अन्नपाण्याची नासाडी ती कधीच खपवून घेत नसे. आनंदवनात शस्त्रक्रिया शिबिराला भेट द्यायला आलेल्या महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्यांनी ताटात अन्न टाकलं म्हणून इंदूने त्यांना खडे बोल तर सुनावलेच; त्याचबरोबर टाकलेलं अन्न खायला लावून मगच त्यांना ताटावरून उठू दिलं!

बाबांचे विचार गगनभरारी घेणारे होते. त्यांची स्वप्नं आकाशाशी स्पर्धा करणारी असत. त्याचवेळी इंदू मात्र पायाखालची जमीन घट्ट धरून ठेवण्याची भूमिका अदा करत असे. या दोघांची जोडी ‘Macro’ आणि ‘Micro’ यांची आगळी एकरूपता असणारी होती.. परस्परपूरकत्वापलीकडची! बाबा आमटे हा माणूस क्षणोक्षणी तुफानं निर्माण तरी करत असे किंवा निर्माण झालेल्या तुफानांना निर्भीडपणे सामोरा तरी जात असे. बाबा पेटायचे ते कापरासारखे सर्वागाने पेटायचे. इंदूने हा बाबा नावाचा झंझावात सशक्तपणे ओंजळीत सामावून घेतला. आनंदवन, सोमनाथ, लोक-बिरादरी, भारत जोडो अभियान, नर्मदा आंदोलन अशा बाबांच्या वर्धिष्णू आयामांत इंदूने स्वत:ला बेहोशपणे झोकून देत स्वत:ची समीधा अर्पण केली. आयुष्यातला प्रत्येक पडाव पार करताना तिची प्रचंड फरफट, ओढाताण झाली. पण तिच्या मनात याबद्दल कदापि किंतु नव्हता. फुललेल्या दोन पळसांकडे बघून पु. ल. देशपांडेंनी त्यांचं वर्णन करताना म्हटलं होतं, ‘‘हा तर ज्वालांचा आणि फुलांचा मनोहर संयोग. अगदी बाबा आणि साधनाताईंसारखा!’’ इंदूला पितृतुल्य असलेले ज्येष्ठ कवी बा. भ. बोरकर यांनी इंदूबद्दल लिहून ठेवलं होतं- ‘‘कसे उत्तुंग वादळ तुझ्या मुठीत मावले, पिता असूनही तुझी मी वंदितो पाउले..’’

बाबांचा शीघ्रकोपी स्वभाव आणि संतापाचा उद्रेक आम्ही जवळून अनुभवला आहे. त्यामुळे ‘मी जमदग्नीसोबत संसार केला आहे,’ असं जेव्हा इंदू अगदी सहजपणे सांगते तेव्हा त्यात कुठलंही काव्य नसतं; असतो तो फक्त खरेपणा! ‘कामं बव्हंशी बाबांनीच केली, मी फक्त बाबांच्या साथीला उभी होते,’ हे सांगताना ती बाबांशी सहजरीत्या एकरूप होते. तिच्या ‘समीधा’ या आत्मकथेतही प्राधान्याने वावर आहे तो बाबांचाच. दुसऱ्याला आपलं असामान्यत्व बोचू नये यासाठी ती सतत प्रयत्नशील राहिली. ज्येष्ठ समाजचिंतक नरहर कुरुंदकर जेव्हा जेव्हा इंदू आणि बाबांना भेटत असत; तेव्हा ते बाबांना उभ्या उभ्या नमस्कार करीत, तर इंदूला मात्र कायम साष्टांग दंडवत घालीत. एवढंच नाही तर ते बाबांना सांगतही असत, ‘‘आनंदवनाच्या कार्याचे श्रेय साधनाताईंचे आहे. या कृतज्ञ जाणिवेपोटीच मी त्यांचे चरण वंदितो.’’

इंदूच्या प्रतिक्षण समर्पणाची जाण बाबांनी आयुष्यभर राखली. आयुष्यात भाषण देण्याच्या प्रत्येक प्रसंगात- मग ते आनंदवनात असो, भारत जोडो अभियानात असो, संसदेत असो वा राष्ट्रपती भवनात- आपल्या भाषणाची सुरुवात बाबा ‘‘सौभाग्यवती साधना..’’ अशीच करत. राष्ट्रपती भवनात ‘आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार’ स्वीकारताना सगळे ‘Protocols’ बाजूला सारत बाबांनी भाषणात राष्ट्रपतींऐवजी ‘सौभाग्यवती साधना’ हेच नाव प्रथम उच्चारलं आणि मगच ‘आदरणीय राष्ट्रपतीजी’ असं संबोधन केलं. उपस्थितांना आश्चर्याचा धक्काच बसला. पण भाषणाची सुरुवात करताना ‘सौभाग्यवती साधना’ हा बाबांकडनं प्रत्येक वेळी होणारा नामोल्लेख कुणाला आश्चर्याचा धक्का देण्यासाठी नसून, आयुष्यभर सर्व सोसाटय़ांचा धीरोदात्तपणे सामना करत खंबीर साथ देणाऱ्या इंदूप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असे, याबद्दल बहुतेकजण अनभिज्ञ असत.

‘बाबा आमटे : एक विज्ञानयोगी’ या लेखात पुलं लिहितात, ‘‘बाबांच्या निर्भयपणाचे आता चोहीकडे कौतुक आहे. पण आपल्या तान्ह्य पोरांना घेऊन गावाबाहेर त्यक्त, बहिष्कृत अशा अवस्थेत दोन-दोनशे, चार-चारशे महारोग्यांच्या संगतीत राहणाऱ्या साधनाताईंपेक्षा दक्षप्रजापतीचा महाल सोडून स्मशानवासी, नररुंडधारी, बंभोलानाथाशी संसार करणारी गौरी आणखी काय निराळी होती? हातभर दाढी वाढवून उघडय़ाबंब देहाने वावरणाऱ्या या पहाडाएवढय़ा भणंगाशी लग्न करताना आपण हातात हिरव्या चुडय़ाच्या जोडीला दारिद्य्राचा वसा घेत आहोत, हे त्या जाणत होत्या. मला या जोडप्यात शिवपार्वतीचे दर्शन झाले आहे. मुरलीधर आमटे नावाचा सर्वसंगपरित्यागी, साहसी, कलाप्रिय, बुद्धिमान तरुण आणि ज्या घुले घराण्यात चांगले आठ महामहोपाध्याय झाले, अशा व्युत्पन्न कुळातली आणि जिला रेशमाशिवाय दुसऱ्या सुताची वसने लेवू दिली नाहीत असल्या धनत्तर वडिलांची इंदू घुले नामक कन्यका ही दोन्ही व्यक्तिमत्त्वे मिळून ‘बाबा आमटे’ या नावाचे अद्वैत वावरते. भारतीय संस्कृतीत आम्ही शिवपार्वती, सीताराम, राधाकृष्ण, विठ्ठलरखमाई असे प्रकृतिपुरुषांचे संपूर्ण मीलन झालेले व्यक्तिमत्त्व आदर्श मानीत असतो. पूर्णत्वाची आमची कल्पना अर्धनारीनटेश्वराची आहे. पुरुषाच्या पराक्रमाला स्त्रीची करुणा लाभली नाही तर त्या पराक्रमाचे क्रौर्यात रूपांतर होते. वादळवाऱ्यातून, आगवणव्यातून बाबांच्या जोडीने चाललेली त्यांची पत्नी खऱ्या अर्थाने त्यांची सहधर्मचारिणी आहे.’’ तर हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामिनाथन म्हणतात, ‘‘असं अद्भुत जोडपं या पृथ्वीतलावर होऊन गेलं हे समजायला अजून पाचशे वर्ष लागतील.’’ दलाई लामा इंदू-बाबांचं ‘Buddhist Couple of India’ असं आदरार्थी संबोधन करत.

कुणीतरी म्हणून गेलं, ‘‘आजवर आनंदवनाच्या कार्याच्या प्रकाशात बाबा एकटेच उजळून निघाले; पण त्या उजळण्यासाठी आयुष्यभर ज्योत होऊन जळण्याची व्रतस्थ भूमिका साधनाताईंनी निभावली, हे विसरता येणार नाही.’’ बाबांना अनेक पुरस्कारांनी गौरवलं गेलं असलं तरी बाबांशी तद्रुप झालेल्या इंदूच्या मनात कायम कृतार्थतेचीच भावना होती. कारण तिचं आयुष्य बाबांपेक्षा वेगळं असं काही नव्हतंच. आजवर लेखमालेत मी जेव्हा जेव्हा बाबा आमटेंचा उल्लेख केला, तेव्हा तिथे इंदूचं अस्तित्वही (अदृश्य का असेना!) होतंच. ही दोन्ही व्यक्तिमत्त्वं कितीही विभिन्न, विजोड असली तरी त्यांचं आयुष्य मात्र एकत्र वाहत होतं. बाबांच्या निधनानंतर दोन वर्षांनी इंदूलाही कॅन्सरने गाठलं. त्याच्याशी लढता लढता ९ जुलै २०११ च्या संध्याकाळी इंदूचं आनंदवनात निधन झालं. गांधीजींचे सामाजिक वारसदार आणि इंदूला वडिलांसमान असणारे  अण्णासाहेब सहस्रबुद्धे यांनी दिलेल्या खादीच्या साडीत आपल्या देहाचं दफन केलं जावं अशी तिची इच्छा होती. त्याप्रमाणे तिच्या देहाचं बाबांशेजारीच दफन करण्यात आलं. त्यामुळे या दोघांचं सहजीवन आजही कायम आहे. इंदू म्हणायचीच-

* sought my Lover, My Lover I could not see…

* sought my Friend, My Friend eluded me…

* sought my Husband, and I found all three…

विकास  आमटे  vikasamte@gmail.com

Story img Loader