ज्या कुष्ठरुग्णांचं अस्तित्वच समाजाने नाकारलं होतं अशा लोकांनी आपल्यासारख्याच इतरही वंचित घटकांना सोबत घेऊन जगाच्या नकाशावर स्वतंत्र अस्तित्व असलेलं स्वत:चं एक गाव- ‘आनंदवन’ निर्माण केलं. आनंदवनाचा ६७ वर्षांचा विलक्षण प्रवास रेखाटणारे सदर..
बाबांचे वडील देवीदास तथा बापूजी आमटे यांच्याकडे जमीनजुमला, पैसाअडका, मालमत्ता प्रचंडच! मध्य प्रांतातल्या चांदा जिल्ह्यतील वरोरा गावाजवळ असलेल्या गोरजा या खेडय़ात त्यांची ४५० एकरांवर वडिलोपार्जित जमीन होती. त्यामुळे शेतीचं उत्पन्नही भरघोस होतं. बापूजी तत्कालीन ब्रिटिश सरकारच्या पदरी स्थानिक पातळीवर ऑडिटर म्हणून कार्यरत असल्याने आमटे परिवाराचे वास्तव्य प्रामुख्याने चांदा, अमरावती, नागपूर यांपैकी एका ठिकाणी असायचं. प्रतिष्ठेबाबत बापूजींच्या कल्पना परंपरागत होत्या. प्रत्येकाने आपल्या पायरीप्रमाणे वागावं असं त्यांचं ठाम मत होतं. याउलट बाबांना बापूजींच्या प्रतिष्ठेच्या कल्पनांबद्दल तीव्र आक्षेप होता. त्यामुळे त्यांचं अगदी लहान वयापासूनच वडिलांच्या पारंपरिक नियमांविरुद्ध युद्ध सुरू झालं.
लहानपणापासून बाबांना कुस्तीची खूप आवड होती. बापूजींच्या प्रतिष्ठेला हे साजेसं नव्हतं. पण जमीनदाराचा एकुलता एक लाडका मुलगा असल्यामुळे गावच्या तालमीतील वस्ताद लोक कुस्तीतील अनेक डावपेच मोठय़ा आपुलकीने बाबांना शिकवत. जोर-बैठका, मल्लखांब अशा विविध प्रकारच्या कसरती करून बाबांनी लहान वयातच उत्तम शरीरसंपदा कमावली होती. मजबूत स्नायू, धिप्पाड बांधा आणि धाडसी वृत्ती यामुळे पंचक्रोशीतील लोक बाबांना ‘छोटा बजरंग’ म्हणत असत.
वरोरा गावच्या ग्रामदेवतेचा मोठा उरुस दर मार्च महिन्यात भरत असे. त्यातील सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे कुस्त्यांचा फड. त्या फडात भाग घेण्यासाठी बाबांनीही नाव नोंदवलं होतं. त्यावेळी बाबांचं वय असेल जेमतेम बारा-तेरा वर्षांचं. आमटे जमीनदारांचा मुलगा कुस्ती खेळतोय म्हणून प्रेक्षकांमध्ये प्रचंड कुतूहल होतं. फडात भाग घेणाऱ्या पैलवानांच्या वयाप्रमाणे, बांध्याप्रमाणे जोडय़ा लावण्यात आल्या. बाबांचा प्रतिस्पर्धी मात्र वयाने आणि वजनाने बाबांपेक्षा वरचढ होता. दोघेही सर्वस्व पणाला लावून खेळू लागले. बऱ्याच झटापटीनंतर बाबांना प्रतिस्पध्र्याची पाठ जमिनीला टेकवण्यात यश आलं आणि सारा आखाडा ‘छोटा बजरंग’च्या जयजयकाराने दुमदुमून गेला. त्यावेळचे राजकीय पुढारी व नामवंत डॉक्टर असलेले डॉ. खरे यांनी बाबांचा सत्कार केला आणि चांदीचं पदक बाबांना देऊ केलं. पण ते तसं न स्वीकारता बाबांनी चक्क आपल्या उघडय़ाबंब छातीवर टोचून लावण्यास सांगितले! डॉ. खरे काही क्षण थबकले; पण बाबांचा निग्रह पाहून त्यांनी खिशातून सिगारेट लायटर काढला आणि त्या पदकाची सेफ्टी पिन र्निजतुक करून बाबांच्या छातीच्या त्वचेमध्ये ते पदक लावलं. पुढील आयुष्यात जो अगदी जगावेगळा आयुष्यक्रम बाबा आक्रमणार होते त्याची जणू ही नांदीच होती. कुठलीही शारीरिक वेदना सहजगत्या झेलण्याचा त्यांचा असामान्य गुण त्या उरुसात प्रथम समोर आला.
स्वातंत्र्यप्राप्तीसाठी विविध पातळ्यांवर सुरू असलेल्या संघर्षांचा तो काळ होता. क्रांतिकारकांबाबत त्या काळात जनतेत विशेष प्रेम होतं. बाबांचं क्रांतिकारकांकडे ओढलं जाणंही स्वाभाविक होतं. उत्कटता, समर्पणाची भावना, साहसी वृत्ती, ‘सशस्त्र क्रांतीशिवाय स्वातंत्र्य नाही’ या तत्त्वावर विलक्षण श्रद्धा, कुठलाही त्याग करण्याची तयारी हे क्रांतिकारकांचे स्वभावविशेष बाबांना भावले, कारण त्यांच्या स्वभावातही हे गुण प्रकर्षांने वसत होते. आपल्यापेक्षा वयाने सहा र्वष मोठय़ा असणाऱ्या शिवराम हरी राजगुरूंशी बाबांचे घनिष्ठ संबंध होते. पिस्तुलं लपवणं, गुप्त चर्चा, गुप्त संदेशांचं वहन, गुप्त संघटना इत्यादी कार्यात बाबा पुरते गुंतले होते. लाला लजपतराय यांच्या हत्येचा बदला म्हणून चंद्रशेखर आझाद, भगतसिंग आणि राजगुरू यांनी लाहोर येथे साहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्त ब्रिटिश अधिकारी जे. पी. सॉन्डर्स याची १९२८ च्या डिसेंबरमध्ये गोळ्या झाडून हत्या केली आणि ते भूमिगत झाले. त्यावेळी बाबा राजगुरूंना आपल्या घरी थेट मुक्कामासाठीच घेऊन आले. मात्र, सरकारी नोकरीत असलेल्या आणि ब्रिटिश सत्तेला वचकून असलेल्या बापूजींना ही गोष्ट रुचली नाही. ‘माझी नोकरी जाईल. नोकरी गेली तर घरात सहा मुली आहेत, त्यांची लग्नं कशी होणार?’ इत्यादी कारणांनी त्यांनी बाबांच्या या कृतीला प्रखर विरोध केला. पण बाबांची आई त्यांच्या या निर्णयाच्या बाजूने ठामपणे उभी राहिली. संतापून ती बापूजींना म्हणाली, ‘ब्रिटिश सरकारची चाकरी करणारे तुम्ही आमटे घराण्यातील पहिले आणि शेवटचे गुलाम असाल!’
चंद्रशेखर आझाद, भगतसिंग यांनी स्थापन केलेल्या ‘हिन्दुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’ या क्रांतिकारी संघटनेशी असलेल्या बाबांच्या संबंधांबाबतची एक आठवण त्यांचे जवळचे मित्र- ज्येष्ठ साहित्यिक वामनराव चोरघडे यांनी नोंदवून ठेवली आहे. नागपूरमध्ये कॉलेजात शिकत असताना बाबांच्या मनावर सशस्त्र क्रांतीच्या विचारांचा जबरदस्त पगडा होता त्या काळातील ही आठवण आहे. वामनराव ‘जडणघडण’ या आत्मचरित्रात लिहितात.. ‘‘बाबा त्यावेळी कॉलेजात जात होता. तो एका कॉलेजात, मी दुसऱ्या कॉलेजात. त्याच्या आणि माझ्या स्वभावात, वृत्तीत कसलेही साम्य नव्हते. आज बाबा खूप बदललेला आहे. खूप निवळला आहे. त्याच्या मनाच्या स्फटिकाला पैलू पडले आहेत. पण त्यावेळी बाबा म्हणजे नुसती आग होता. माझ्या खोलीत यायचा तो एखाद्या लांडग्यासारखा. बोलायचा नाही. त्याच्या-माझ्या संबंधासाठी जणू बोलण्याची गरजच नव्हती. झडप घालून त्याला हवी असलेली वस्तू उचलायचा आणि उडी मारून खिसे रिकामे करायचा. त्यात कधी सुरे असत, कधी पिस्तुले! ‘ही जपून ठेवायला हवीत..’ असा कुणाला तरी उद्देशून हुकूम करायचा. एके दिवशी त्यानं खिशातून दोन पिस्तुलं काढून समोर टाकली. काही बोलला नाही. मी ती पिस्तुलं चोरकपाटात टाकत त्याला विचारलं, ‘‘अरे बाबा, जेवणबिवण झालं का?’’
‘‘हं.’’
‘‘काय जेवलास?’’
‘‘ही रिकामी पिस्तुलं इथे टाकली नं, त्यातल्या दोन गोळ्या कामी आल्या. उरलेल्या गोळ्या मी गिळून टाकल्या.’’
‘‘म्हणजे?’’
‘‘अरे, माझ्या हाती ती लागली तेव्हा त्यात दोन गोळ्या नव्हत्या. कुठेतरी सार्थकी लागल्या असाव्या!’’
‘‘योगवासिष्ठाच्या सूत्राप्रमाणे तो बोलत असे. मी त्याला प्रचंड भीत असे. एकदा बाबा माझ्या कॉलेजात आला. मी संस्कृतच्या वर्गात बसलो होतो. व्हरांडय़ात उभा राहून त्याने जोराची शिंक दिली. ती माझ्या ओळखीची होती. सर शिकवीत होते. पण त्यांच्यापेक्षा बाबाला मी जास्त भीत होतो. मी निमूटपणे वर्गाबाहेर आलो. बाबाने एक पुस्तक माझ्या हाती दिलं नि मुकाट सटकला. पुस्तकामुळे आमचा कुणाला संशय आला नाही. कसले पुस्तक म्हणून मी उघडून पाहिले. पुस्तकात चिठ्ठी होती. गिचमिड लिहिले होते, ‘राजगुरू नागपुरात आला आहे. तू ताबडतोब आपल्या खोलीवर जा. मी त्याला घेऊन तिथे येतो.’ मी कपाळावरचा घाम पुसला आणि खोलीवर पोचलो. तेवढय़ात राजगुरूला घेऊन बाबा आला आणि मला हुकमी स्वरात म्हणाला, ‘‘हा राजगुरू! ती पिस्तुलं, सुरे, काडतुसं सारं काढ!’’ भिंतीतल्या चोरकपाटात कपडय़ात गुंडाळून ठेवलेली सारी शस्त्रं मी भराभर काढून दिली. ‘‘शाब्बास!’’, राजगुरू बोलला, ‘‘पोलीस माझ्या मागावर आहेत. बहुतेक पकडतील. भगतसिंग, सुखदेव सापडलेत. कदाचित फाशीही होईल! आमच्यानंतर हे कार्य तुम्ही चालवा.’’ माझ्या डोळ्यात पाणी उभं राहिलंच, पण बाहेर पडताना चक्क डोळे पुसणारा बाबा मला दिसला. सतत आग ओकणाऱ्या बाबात एवढं हळवेपण असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. असा हा बाबा!’’
मला वाटतं, माणसातील धाडसाचा प्रत्यय हा फक्त स्वसंरक्षणासाठी केलेल्या कृतीतूनच येतो असे नाही. इतरांवर होणाऱ्या अन्यायाचा निर्भीडपणे प्रतिकार करणं असेल, किंवा स्वत:च्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडत एका पूर्णपणे वेगळ्या, आव्हानात्मक आयुष्याला सामोरं जाणं असेल, यासाठीसुद्धा प्रचंड धाडस लागतं. ते धाडस बाबांमध्ये जात्याच होतं. ते म्हणतात, ‘I crave to discover new challenges & accept them.’ आणि खरोखरच त्यांनी आयुष्यभर अनेक खडतर आव्हानं लीलया पेलली.
विकास आमटे vikasamte@gmail.com