बाबा आमटेंना मिळालेल्या आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कारादरम्यान घडलेला किस्सा. राष्ट्रपती भवन. दरबार हॉल. १९९९ सालचा जानेवारी महिना. त्या दिवशी तापमान असेल ५-६ डिग्री सेन्टीग्रेड. बाबांचा पोशाख मात्र नेहमीचाच. खादीची बनियन आणि चड्डी. कंबरेला पट्टा. पंतप्रधान अटलजी मला बाजूला घेत म्हणतात, ‘‘विकास, तेरे बाप को ठंड नहीं लगती क्या?’’ मी त्यांना म्हणालो, ‘‘नहीं अटलजी, ये पैलवान आदमी है!’’

पुढे बाबांना राष्ट्रपती भवनातच आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यादरम्यान आणखी एक प्रसंग घडला. भारताने नुकतीच पोखरणमध्ये अणुचाचणी केली होती. अणुकार्यक्रमाचे जनक डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम या पुरस्कार सोहोळ्यास उपस्थित होते. पुरस्कार सोहोळ्यादरम्यान त्यांच्याकडे जात बाबांनी त्यांना सुनावलं, ‘‘Dr. Kalam, we don’t need bombs, we need toilets! ‘National Highways’ have become national toilets! If you say we are a nation of Mahavir, Buddha, Guru Nanak and Gandhi, we don’t need bombs!’’ डॉ. कलाम अचंब्याने पाहतच राहिले! (आजच्या परवलीच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’ची नीव बाबांनी कधीच रचली होती.)

D Gukesh How Much Prize Money Did Indian Grandmaster Win After Winning World Chess Championship
D Gukesh Prize Money: करोडपती झाला विश्विविजेता गुकेश, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानंतर किती मिळाली बक्षिसाची रक्कम?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Shailendra kumar bandhe Success Story
Success Story: शिपायाची नोकरी ते अधिकारी, इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याचा प्रेरणादायी प्रवास
Donald Trump
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प घेणार ऐतिहासिक निर्णय! जन्मताच अमेरिकेचे नागरिकत्व बहाल करणारा कायदा बदलणार
Nair Hospital Dental College received prestigious Pierre Fauchard Academy award for societal contribution
नायर रूग्णालय दंत महाविद्यालयाचा अमेरिकास्थित ‘पिएर फॉचर्ड अकॅडमी’तर्फे सन्मान!
Revealing Interview Yuval Noah Harari Problem Crisis Artificial Intelligence
सशक्तदेखील स्वत:ला ‘बळी’ म्हणवतात, ही आजची समस्या!
Loksatta kutuhal The journey of artificial intelligence in India
कुतूहल: भारतात कृत्रिम बुद्धिमत्तेची वाटचाल
aamir khan got award red sea films
आमिर खानने अनेक वर्षानंतर लावली अवॉर्ड शोला हजेरी, मिळाला ‘हा’ आंतरराष्ट्रीय पुरस्कार

‘मेरा बाप पैलवान आदमी था..’ असं मी कायम म्हणतो याचं कारण- जसे बाबांनी अनेक प्राणघातक हल्ले, अपघात, आजारपणं पचवली, तशी त्यांनी विधायक कार्य असो वा संघर्ष- ‘ठाम भूमिका’ ही घेतलीच. त्यांनी कधीही कचखाऊ  धोरण अवलंबलं नाही. त्यामुळे बाबांचं शारीरिक अस्तित्व संपल्यानंतर माणसं रडली निश्चित; पण खचली मात्र नाहीत. ब्लड कॅन्सरशी लढता लढता बाबांनी ९ फेब्रुवारी २००८ ला पहाटे पावणेपाचच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. बाबांच्या या अखेरच्या आजारपणात रात्रीचा दिवस करत उपचार करणारे डॉ. विजय पोळ आणि विलास मनोहर त्यावेळी बाबांसोबत होते. बाबांची मनोभावे सेवा करणारे देवानंद सलामे, कमल उमरोटकर होते. इंदू, रेणुका, मी आणि भारतीही आनंदवनातच होतो. प्रकाश-मंदा लोकबिरादरी प्रकल्पावर. आमची पोरं बाहेर होती. रात्रीपर्यंत सर्वजण आले. तो पूर्ण दिवस, रात्र आणि दुसऱ्या दिवशी सकाळीसुद्धा बाबांना बघण्यासाठी लोकांची रीघ कायम होती. दोन किलोमीटरची माणसांची रांग. कुठलाही आवाज नाही. फक्त बाबांना बघून हात जोडण्याची आस असलेली, सर्वदुरून आलेली ही माणसं. हजारोंची गर्दी लोटली होती.

केळीच्या पानात गुंडाळून आणि वरनं मीठ टाकून आपलं दफन केलं जावं, ही बाबांची इच्छा होती. त्याला दोन वैज्ञानिक कारणं होती. बाबा म्हणत, ‘‘एका मृतदेहाचं दहन करायला जेवढी लाकडं लागतात तेवढय़ात हजार माणसांचा तीन-चार दिवसांचा स्वयंपाक होऊ  शकतो!’’ (हा विचार अहमदाबादच्या ‘सद्विचार परिवारा’ने रुजवला होता. म्हणून बाबा-इंदूने त्यांचे फॉम्र्स भरत दहनाऐवजी दफन जाणीवपूर्वक स्वीकारलं होतं.) दुसरं म्हणजे ‘पशूपंछी भोजन करे, तन भंडारा होएँ’ या संत कबिरांच्या दोह्यप्रमाणे, मर्त्य शरीरावर पशुपक्ष्यांचा, किडय़ामुंग्यांचा अधिकार असतो. तेव्हा मृतदेह त्यांच्या हवाली केला जावा; जेणेकरून हे शरीर भंडाऱ्याप्रमाणे विरून जाईल! त्याप्रमाणे बाबांच्या देहाचं दफन केलं गेलं. ही तीच अनाम कुष्ठरुग्णांच्या स्मरणशिलेची जागा- जिथे बाबांच्या जिवाला जीव देणारे त्यांचे शेकडो कुष्ठमुक्त सोबती वास करत होते.

९ फेब्रुवारी काय किंवा १० फेब्रुवारी- आनंदवनाला सुट्टी नव्हती. त्या दिवशीही काम सुरूच होतं. पॉवरलूम्स तशाच धडधडत होत्या. हातमाग खट्खट् आवाज करत चादरी-टॉवेल्स विणत होते. वेल्डिंग मशीन्स चरचर आवाज करत जोडणी करत होत्या. आनंदवन थांबलं नव्हतं. २०१४ हे बाबा आमटेंचं जन्मशताब्दी वर्ष होतं. हे वर्ष कसं ‘साजरं’ करणार, याबाबत नेहमीच कुणी ना कुणी विचारत. अशी विचारणा करणाऱ्यांना मी सांगत असे की, आनंदवनात साजरं होतं ते ‘कार्याचं गुणात्मक विस्तृतीकरण’! समाजातील जास्तीत जास्त दुर्बल घटकांपर्यंत कार्याचा विस्तार हाच आमच्यासाठी सोहोळा. आनंदवनाच्या इतिहासात कधी कुणाची जयंती, पुण्यतिथी साजरी झाल्याचं मला स्मरत नाही. आणि भविष्यातही असं होणं नाही.

बाबा आमटे या व्यक्तीशी किती माणसं जोडली गेली होती याचा प्रत्यय आम्हाला ते गेल्यानंतर आला. बाबांना श्रद्धांजली वाहणाऱ्या सुमारे तीन लक्ष तारांचा खच आनंदवनात पडला! अक्षरश: पोती भरभरून तारा येत होत्या. असं काय होतं बाबांमध्ये ज्याने ही माणसं त्यांच्याकडे ओढली गेली आणि कायमची जोडली गेली? यात जशी राजकारण, प्रशासन, उद्योग, कला, संगीत, साहित्य, पत्रकारिता, विज्ञान-तंत्रज्ञान, अध्यात्म या क्षेत्रांतली नावाजलेली मंडळी होती, तशीच देश काय आणि विदेश काय, समाजातल्या प्रत्येक स्तरातली लाखो सर्वसामान्य माणसंही होती. या अनुषंगाने मला काही छोटे-मोठे प्रसंग आठवतात ते सांगतो.

ते बहुधा १९५९ साल असावं. जबलपूरच्या ‘नवभारत’ दैनिकात साहाय्यक संपादक म्हणून काम करणारी चंद्र मोहन जैन नावाची एक व्यक्ती आनंदवनात येते आणि काम बघून प्रभावित होत बाबांना म्हणते, ‘‘बाबा, आपके हाथों को सेवा कि खुशबू आती है.’’ परत जाऊन जैन ‘नवभारत’मध्ये बाबांबद्दल विस्तृत लेख लिहितात. या लेखावरून जैन यांचा दैनिकाच्या मालकाशी वाद होतो. मालक म्हणतात, ‘‘तू माझं दिवाळं काढणार! राजकारण, हत्या, भानगडी यांच्या बातम्या सोडून असे विधायक कार्याविषयीचे लेख छापून आले तर माझं दैनिक लवकरच बंद पडेल.’’ यावर जैन उत्तरतात, ‘‘जगात खून, आत्महत्या, अत्याचार यांव्यतिरिक्त चांगल्या गोष्टीही खूप घडत असतात. बाबा आमटेंनी आपलं आयुष्य कुष्ठकार्यासाठी वेचलं आहे. या माणसाचं काम सर्वांपर्यंत पोहोचलंच पाहिजे. बाबा आमटेंविषयी छापल्यामुळे दैनिकाचं सक्र्युलेशन वाढणार नाही हे मला माहिती आहे. पण काळजी नसावी. मी बाहेर पडतो. तुम्ही तुमचं सक्र्युलेशन वाढवा,’’ असं म्हणत तत्क्षणी ते आपला राजीनामा मालकाच्या तोंडावर फेकतात. हीच चंद्र मोहन जैन नावाची व्यक्ती पुढे जाऊन सुप्रसिद्ध आध्यात्मिक विचारक बनते.. ज्यांना आपण सर्व ‘रजनीश-आचार्य- भगवान- ओशो’ म्हणून ओळखतो.

जेआरडी टाटांना बाबांविषयी प्रचंड स्नेहादर होता. मणक्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान बाबा मुंबईला असताना जेआरडींनी त्यांची भेट घेतली. ते बाबांना म्हणाले, ‘‘मी आनंदवनाला काय मदत करू शकतो?’’ बाबा उत्तरले, ‘‘मी आपला ऋणी आहे. पण आनंदवनाला मदतीची गरज नाही. उलट, समाजाने नाकारलेल्या ज्या माणसांच्या कष्टांतून आनंदवन उभं राहिलं आहे, त्यांच्यात आज समाजातल्या मूलभूत समस्यांवर मात करण्याची जिगर आहे!’’

२०१३ च्या जूनमध्ये मी आणि माझा मुलगा कौस्तुभ एका कामासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना भेटायला दिल्लीला गेलो होतो. महाराष्ट्र भवनातून आम्ही दोघं ऑटोरिक्षा घेऊन ७, रेस कोर्स रोडला पोहोचलो. आता ऑटोरिक्षामधनं ७, रेस कोर्स रोडला येणारी माणसं कदाचित विरळाच असतील. कारण गेटवरच्या सुरक्षारक्षकांच्या चेहऱ्यावर तरी तेच भाव होते! ‘‘क्या है?’’ असं विचारताच मी माझं व्हिजिटिंग कार्ड दिलं. कार्ड आत काय गेलं, मिनिटभरातच सगळे पहारे खटाखट बाजूला झाले आणि काय चाललंय याचा थांगपत्ता लागण्याआधीच आम्ही पंतप्रधानांच्या ‘Special Protection Group’चे प्रमुख चतुर्वेदी यांच्या कार्यालयात पोहोचलोसुद्धा! चतुर्वेदी मला विनंतीवजा शब्दांत म्हणाले, ‘‘विकासजी, आपको यदी कोई परेशानी ना हो तो क्या आप मुझसे दस मिनिट बात कर सकते है?’’ मला झेपलंच नाही. मी म्हणालो, ‘‘जी हाँ, क्यूं नहीं?’’ गप्पा सुरू झाल्या. चतुर्वेदी म्हणाले, ‘‘बाबांचं ‘भारत जोडो अभियान’ सुरू असताना मी विद्यार्थीदशेत होतो. अभियानादरम्यान बिहारमध्ये बाबांचं भाषण मी ऐकलं होतं. त्याच्या नोंदी आजही माझ्या डायरीत आहेत. बाबांच्या ‘ज्वाला और फूल’ (‘ज्वाला आणि फुले’चा हिंदी अनुवाद) या काव्यसंग्रहातल्या कविता मला तोंडपाठ आहेत!’’ हे ऐकून आम्ही चाटच पडलो. पहारे का बाजूला झाले याचं उत्तर मिळालं. अर्थात आम्हाला बसणारे धक्के अजून संपले नव्हते. काही मिनिटांनी चतुर्वेदींच्या कार्यालयातून आम्ही प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे गेलो. वाटलं, आता तपासतील, मग तपासतील. पण कुणीच आमची झडती वगैरे घेतली नाही. पाच मिनिटं एका रूममध्ये बसलो. एवढय़ात बाजूच्या खोलीचा दरवाजा उघडला गेला आणि आवाज आला, ‘‘आईये.’’ दरवाजा खुद्द पंतप्रधानांनी उघडला होता! आम्ही आत गेलो. सुमारे अर्धा तास मनमोहन सिंगजींशी विविध विषयांवर चर्चा झाली. मी त्यांना आनंदवन भेटीचं निमंत्रण दिलं आणि उभा राहून त्यांच्या पाया पडणार एवढय़ात ते खाली वाकत चक्क माझ्याच पाया पडले. मी गडबडून गेलो. ओशाळत त्यांना म्हणालो, ‘‘ये आपने क्या किया?’’ मला जवळ घेत ते म्हणाले, ‘‘ये बाबा के लिये है, उनको पहुँचा देना!’’ मी सद्गदित झालो. आम्ही परत निघतानाही खोलीचं दार पुन्हा त्यांनी स्वत:च उघडलं होतं!

‘पंजाब केसरी’ दैनिकाचे मुख्य संपादक विजयकुमार चोपडम पंजाबातल्या घुमान येथे आयोजित अ. भा. मराठी साहित्य संमेलनात बाबांचा गौरवपूर्ण उल्लेख करताना म्हणतात, ‘‘संत नामदेवांनंतर पंजाबशी उत्कटतेने जुळलेली बाबा आमटे ही एकमेव मराठी व्यक्ती आहे!’’

गाडीवर आनंदवनाचं नाव वाचून वाहतूक पोलीस कधी कधी आनंदवनाची गाडी अडवत. (आजही अडवतात.) आणि ‘का अडवली?,’ असं विचारलं की म्हणत, ‘‘बाबांना, साधनाताईंना कधी पाहू किंवा भेटू शकलो नाही, निदान आनंदवनातील माणसांना भेटून ती अपूर्ण इच्छा पूर्ण झाल्याचं समाधान लाभावं म्हणून थांबवली गाडी!’’ यावर आपण काय बोलणार?

बाबांच्या भूमिकेशी फारकत घेणारेही अनेक होते, पण बाबांनी आपल्या भूमिकेशी तडजोड केली नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे टीकाकारांचा त्यांनी कधीही दु:स्वास केला नाही. त्यामुळे बाबांपासून दूर गेलेली माणसंही पुन्हा त्यांच्याशी जोडली गेली. इंदिराजींचा आणि बाबांचा परिचय साठीच्या दशकापासूनचा. बाबांनी आणीबाणीविरोधात व काही शासकीय धोरणांविरोधात भूमिका घेतल्याने यात तणाव निर्माण झाला असला तरी इंदिराजींच्या मनातला बाबांविषयीचा आदर कमी झाला नव्हता. १९८३ साली त्यांनी आनंदवनाला भेट दिली होती. काही मिनिटांची ही प्रस्तावित भेट चक्क एक तास लांबली!

बाबा म्हणत, ‘‘Great heroes of history are nothing to me.

The ‘Uncommon determination’ in the ‘Common man’ is my ideal. I do not want to be a great leader. I want to be a man who goes around with an oil-can, offering help wherever needed. To me, the man who does this is greater than any holy man in a saffron robe. The mechanic with the oil-can is my ideal in life…’’ याच तत्त्वाने बाबा आयुष्य जगले. त्यामुळे जी सगळी माणसं त्यांच्याशी जोडली गेली त्याचं हेच कारण होतं, की बाबा आमटे हा ‘साधा’ माणूस होता, सर्वासाठी ‘Accessible’ आणि ‘Approachable’ होता. प्रत्येकाला आपलासा वाटणारा होता. सामान्य माणसांतल्या असामान्यत्वाचं मूल्य जाणणारा आणि जपणारा होता. बिघडलेल्या यंत्रास तेलपाणी करून ठीक करत पुढे वाटचाल करणारा ‘मेकॅनिक’ बाबांसाठी आदर्श होता. न्याय्य हक्कांसाठी लढत अंधाराकडून उजेडाकडे प्रवास करणाऱ्यांबद्दल आपण नेहमी भाष्य करत असतो. पण ‘बाबांचा प्रवास हा उजेडाकडून अंधाराकडे जाणारा आहे,’ असं कुणीतरी म्हटलं होतं. मलासुद्धा ही मीमांसा चपखल वाटते, याचं कारण समाजाने नाकारलेल्या कुष्ठरुग्ण बांधवांना बाबांनी अंध:कारातून प्रकाशाकडे आणलं आणि पुन्हा पुन्हा नवे अंधारे कोपरे धुंडाळून सामाजिक न्यायाची प्रकाशवाट उजळ करण्यासाठी ते सतत कार्यमग्न राहिले.

देवाविषयी त्यांच्या मनात विलक्षण करुणा! ते म्हणत, ‘‘ईश्वर माझा पेशंट आहे. तो आजारी आहे. कारण तो चालत नाही, बोलत नाही, दीनदुबळ्यांचं त्याला ऐकू येत नाही. उपचारांची गरज त्याला आहे! शिवाय तो प्रचंड बिझी आहे. अंतरिक्षात एवढय़ा सूर्यमालिका आहेत. त्यांची जबाबदारी त्याच्यावर आहे. तेव्हा त्याचं काम त्याला करू द्यावं, आपलं आपण करावं.’’ एकूणात काय, तर ‘देव’ या व्यवस्थेकडे सगळं सुपूर्द करून आपली जबाबदारी झटकत निष्क्रिय आयुष्य जगणं त्यांना अमान्य होतं. बाबा आमटे हा ‘घाईतला’ माणूस होता. त्यांना टेबल, ऑफिस असं काहीच नव्हतं. त्यांनी कधी जांभई दिल्याचं माझ्याच काय, कुणाच्याच स्मरणात नाही! तसंच पुनर्जन्म वगैरे गोष्टींवर बाबांचा विश्वास नव्हता. ‘‘मी एका आयुष्यात अनेक आयुष्यं जगलो. I am affluent in affection which society has showered on me. जगाचा निरोप घेताना मी पूर्णपणे समाधानी आहे,’’ असं ते म्हणत.

बाबांना ‘अफाट नैतिक शक्तीचं धगधगणारं बलाढय़ इंजिन’ असं संबोधणाऱ्या कवी कुसुमाग्रजांनी बाबांवर ‘संत’ नावाची कविता केली होती. त्यातला काही अंश..

 

सोमनाथच्या सूर्यद्रोही जंगलात

भूमीच्या गर्भात पाय खोचणाऱ्या विराट वृक्षावर

अपराजित कुऱ्हाड मारणारा तू –

वणव्याच्या समोर घनघोर पाऊस होणारा

दु:खाच्या समोर फक्त निर्भेळ माणूस होणारा

दुबळ्या दयेच्या चिखलातून माणुसकीला बाहेर काढणारा तू –

 

अरे आम्ही आहोत असे करंटे

की आमच्या पेठेत लागतात पताका फक्त मंत्री आले तर

सोनेरी अंबारीचे ऐरावत जेव्हा रस्त्याने झुलू लागतात

तेव्हा आमचे हिशेबी हात जुळून येतात छातीवर

आणि तुझ्यासारखे संत

ऐहिकाच्या प्रपंचातील ईश्वरी अंशाचे रखवालदार

निघून जातात गस्त घालीत अंधारात

उद्ध्वस्त मनांच्या मोहल्लय़ातून

आसवांच्या दलदलीतून

दु:खानं उसवलेल्या दुनियेवर अमृताचं सिंचन करीत..

हे यात्रिका,

विस्कटलेल्या शरीरांचा

चुरगळलेल्या आत्म्यांचा जत्था घेऊन तू तुझ्या मार्गानं जा

मागे वळून पाहू नकोस

जो हिशेब कधी केला नव्हतास तो यापुढेही करू नकोस

तुला साथसोबत आम्ही करणार नाही

आमच्या दिवाणखानी दिव्यांचा प्रकाश तुझ्या रात्रीवर पडणार नाही

तुझ्या अलौकिक वेदनेसाठी आम्ही रडणार नाही

आमच्या जयघोषांच्या जमावातही तू राहणार आहेस एकटा

दक्षिण ध्रुवावरील बर्फासारखा अगदी एकटा

पण असेच एकाकीपण लाभले होते ख्रिस्ताला

ज्याच्या हाताचा ठसा मला दिसतो आहे तुझ्या हातावर

असेच एकाकीपण लाभले होते बुद्धाला

ज्याच्या प्रज्ञेचे किरण मला दिसताहेत तुझ्या पथावर

हीच तुझी सोबत आणि हेच तुझे संरक्षण..

‘जेथे जाशी तेथे.. तो तुझा सांगाती

चालवील हाती- धरोनिया..’

vikasamte@gmail.com

Story img Loader