बाबा आमटेंनी तारुण्यात जशी उत्कटतेने चित्रपट समीक्षा केली, तसेच त्यांनी फोटोग्राफी, संगीत, नृत्य-दिग्दर्शन, नर्तनकला या क्षेत्रांतही प्रावीण्य मिळवलं. भारतातील आधुनिक नृत्याचे जन्मदाते, विश्वप्रसिद्ध नर्तक आणि नृत्य-दिग्दर्शक उदय शंकर (भारतीय शास्त्रीय संगीताला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे विख्यात सतारवादक भारतरत्न पं. रविशंकर यांचे थोरले बंधू) यांच्या नृत्यदलात बाबांनी काही काळ नृत्य-दिग्दर्शक म्हणून कामही केलं होतं! बाबा नेहमी म्हणत, ‘‘मी मुळात एक कलाकार आहे. माझ्या या कलासक्तीमुळेच मला कुष्ठरुग्णांच्या रूपातील मानवीय खंडहरांमध्ये सौंदर्य शोधण्याची प्रेरणा मिळाली.’’ अगदी मायकेलएंजेलोने कोरलेल्या सुंदर पुतळ्याचं हास्यही बाबांना मोहित करत नसे. ते म्हणत, ‘‘ The smile on the face of a statue sculpted by Michelangelo is a Frozen smile.’’ बाबांच्या मते, ज्या मुलांच्या ओठांना कधी आपल्या मातेच्या स्तनाचा स्पर्श झाला नाही, ज्यांना आपले आई-बाप कोण हे माहीत नाही, अशा मुलांच्या भकास चेहऱ्यांवर जो हास्य फुलवतो तोच ‘खरा’ कलाकार!

असे अनेक खरे कलाकार आहेत- ज्यांनी आनंदवनातील कुष्ठरुग्ण, अंध, अपंग, कर्ण-बधिरांच्या वेदनेशी नातं जोडत त्यांच्या आयुष्यात रंग भरले. ही परंपरा बाबांशी पत्रमत्री असलेल्या हॉलीवूडच्या सिनेतारका नॉर्मा शिअरर, ग्रेटा गाबरे यांच्यापासून सुरू झाली. पु. ल. देशपांडे, पं. कुमार गंधर्व, पं. वसंतराव देशपांडे, बा. भ. बोरकर प्रभृती वर्षांनुवर्ष वार्षिक मित्रमेळाव्यात आनंदवनातील रहिवाश्यांच्या सामूहिक लग्नसोहळ्यांत मंगलाष्टकं म्हणत. एकदा पं. वसंतराव देशपांडे म्हणाले, ‘‘एरवी एकेक स्वर शोधण्यासाठी गायकांना खूप प्रयास पडतात. पण आनंदवन पाहिले आणि मला एकदमच संपूर्ण सप्तक सापडल्यासारखे वाटले!’’ या लग्नसोहळ्यांत मंडपाचं डेकोरेशन ‘भारताचे पिकासो’ म्हणून ओळखले जाणारे विष्णू चिंचाळकर गुरुजी करत असत. ‘‘मला आनंदवनात कलेची ‘चौथी मिती’ गवसली!,’’ असं ते म्हणत. पस्तीस वर्षांत २७ वेळा आनंदवनला येणाऱ्या पुलं आणि सुनिताबाईंनी वैयक्तिक संपर्कातून, लेखणीच्या माध्यमातून आनंदवनाचं काम हजारो लोकांपर्यंत पोहोचवलं. ‘आनंदवनात पर्यटक म्हणून या आणि परिवर्तित होऊन जा..’ या पुलंच्या आवाहनाला प्रतिसाद देत आनंदवनाला भेट देणाऱ्यांची प्रभावळ फार मोठी आहे.

Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
eknath khadse devendra fadnavis
उलटा चष्मा : पांढरे निशाण…
pune water planning delayed due to absence of Guardian Minister
Pune Water planning : पालकमंत्री नसल्याने पाणी नियोजन लांबणीवर
water supply Bandra area, Bandra,
मुख्य जलवाहिनीतून गळती, वांद्रे परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम
Adinath Kothare Manjiri Oak
“डोळ्यातून पाणी आलं…”, आदिनाथ कोठारेचे ‘पाणी’ चित्रपटासाठी कौतुक करत मंजिरी ओक म्हणाल्या, “ही तुझी पहिली फिल्म …”
Ratnagiri, CNG tanker Ratnagiri, gas leak tanker Ratnagiri, Ratnagiri,
रत्नागिरीत सीएनजी टँकरमधून मोठ्या प्रमाणात वायू गळती

मित्रमेळावा ही एक पर्वणीच असे. मात्र, एरवी आनंदवनातील कुष्ठमुक्त बांधवांचे मनोरंजन करणार कोण? मग ही माणसं साठच्या दशकापासून आपली आपणच नाटकं बसवू लागली. चिनी-पाकिस्तानी आक्रमणाच्या काळात या मंडळींनी नाटक करून स्वयंप्रेरणेने देशाच्या सैनिक कल्याण निधीला दोन-पाच हजार रुपयांची मदतही दिली होती! त्याच दरम्यानची एक घटना.. वरोऱ्यात त्याकाळी सिनेमा थिएटर नव्हतं. टुिरग टॉकीज असत. पण आनंदवनातल्या कुष्ठमुक्त व्यक्तींना तिथे कोण प्रवेश देणार? मग एकदा एका टुरिंग टॉकीजवाल्याने त्यांच्यासाठी सिनेमाचा ‘पेशल’ शो अरेंज केला! आम्हालाही जरा आश्चर्यच वाटलं! आनंदाने १०-१५ माणसं सिनेमा पाहायला गेली. सिनेमा संपला आणि बाहेर येऊन पाहतात तर काय- टॉकीजवाल्याची माणसं हातात फिनाईलने भरलेल्या बकेट्स घेऊन उभी होती! त्यांनी अख्खं थिएटर फिनाईलने धुऊन काढलं. ही गोष्ट जेव्हा पुलंच्या कानी पडली तेव्हा ते खूप संतापले आणि अस्वस्थही झाले. ते बाबांना म्हणाले, ‘‘बाबा, समाजमनाचा महारोग दुरूस्त होईल तेव्हा होईल, पण आनंदवनातल्या कुष्ठरुग्ण बांधवांना यापुढे असा अपमान सहन करावा लागणार नाही.’’ पुलंनी १९७४ साली एक लक्ष रुपयांचं योगदान पु. ल. देशपांडे फौंडेशनतर्फे आनंदवनाला दिलं आणि ‘मुक्तांगण’- म्हणजेच कुष्ठरुग्णांचं हक्काचं व्यासपीठ असलेल्या सांस्कृतिक सभागृहाची वास्तू आनंदवनात दिमाखाने उभी राहिली. त्यानंतर मित्रमेळावा, लग्नसोहळे, संगीताचे कार्यक्रम,

नाटकं अशा सगळ्या गोष्टी मुक्तांगणातच आयोजित होत असत.

मुक्तांगणच्या वास्तूत सादर झालेला पहिला नाटय़प्रयोग म्हणजे भक्ती बर्वे यांचं ‘ती फुलराणी’! त्यानंतर मुक्तांगणात नाटय़प्रयोगांची शृंखलाच सुरू झाली. धि गोवा हिंदू असोसिएशनचे रामकृष्ण नायक तसेच मोहनदास सुखटणकर, अरुण काकडे, जयदेव-रोहिणी हट्टंगडी, माधवकाका साखरदांडे, अरविंद-सुलभा देशपांडे यांच्या प्रयत्नांतून गुरू आचार्य पार्वतीकुमार यांचा ‘दुर्गा झाली गौरी’ हा सुप्रसिद्ध नाटय़ाविष्कार बघण्याची संधी समस्त आनंदवनवासीयांना मिळाली. शंभरच्या वर कलाकार मंडळी असलेला हा प्रयोग प्रथमच मुंबईबाहेर- आणि तोही थेट आनंदवनात सादर झाला! सतीश दुभाषी, डॉ. श्रीराम लागू, चंद्रकांत गोखले, प्रभाकर पणशीकर, नाना-निलू पाटेकर, मामा तोरडमल, कमलाकर-लालन सारंग, रिमा लागू अशा कितीतरी दिग्गज कलाकारांनी मुक्तांगणात नाटकं सादर केली. पं. जसराज, पं. राजन-साजन मिश्रा यांनीही आपल्या कलेचं सादरीकरण आनंदवनात केलं. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी दीनानाथ मंगेशकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त २४ एप्रिल १९८४ रोजी किशोरकुमार, पं. हृदयनाथ मंगेशकर, सुरेश वाडकर, नितीन मुकेश अशा दिग्गजांना एकत्र करत मुंबईच्या सीसीआय स्टेडियमवर आनंदवनाच्या मदतीसाठी एक विशाल संगीतरजनी आयोजित केली. त्यातनं उभी राहिलेली ३४ लक्ष रुपयांची रक्कम त्यांनी बाबांच्या हाती सुपूर्द केली. आनंदवनातील सर्व पाइपलाइन्स आणि रस्त्यांचं जाळं विणलं गेलंय ते याच बहुमोल मदतीतून. गजलसम्राट जगजितसिंग, गुलझार, विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, राणी वर्मा, वंदना गुप्ते, प्रदीप-रजनी वेलणकर, मधुरा वेलणकर, शिवाजी साटम, मृणाल कुलकर्णी, पल्लवी जोशी, दिलीपदादा जाधव, निर्मिती सावंत, पंढरीनाथ कांबळे, अशोक-निवेदिता सराफ, विनय येडेकर, संजय-असिता नार्वेकर, आनंद इंगळे, मंगेश कदम, उमेश कामत-प्रिया बापट, विभावरी देशपांडे, चिन्मय मांडलेकर, स्पृहा जोशी, सुहिता थत्ते, समीरा गुजर, सचिन खेडेकर, वामन केन्द्रे, सायली पानसे, सुगंधा लोणीकर, राहुल देशपांडे, अनुराधा मराठे, सलील कुलकर्णी, संदीप खरे, अजय-अतुल अशा नाटय़-सिने-संगीत क्षेत्रांतल्या कितीतरी मंडळींनी आनंदवनातील वेदनेशी नातं जोडण्याची ही परंपरा कायम राखली आहे. आनंदवन परंपरेचा पाईक असणाऱ्या नानाचं व समस्त पाटेकर परिवाराचं आनंदवनाशी १९७९ सालापासून असलेलं हक्काचं मत्र आजही तितकंच घट्ट आहे.

नव्वदच्या दशकाच्या शेवटाला मला आनंदवनातून शिक्षण-प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या अंध, अपंग, कर्ण-बधीर मुलांच्या बाबतीतला एक वेगळाच प्रश्न सतावत होता, तो म्हणजे या मंडळींच्या समाजातील पुनर्वसनाचा! खेडेगावांत शौचालयाभावी शौचास बाहेर जावे लागणाऱ्या अंध, कर्ण-बधीर मुलींची छेड काढल्याच्या, त्यांच्या शारीरिक व्यंगामुळे लोकांनी त्यांना हीन वागणूक दिल्याने मनावर खोल परिणाम झाल्याच्या घटना मला अस्वस्थ करत होत्या. यावर नेमकं काय करावं या विचारात मी पडलो होतो. या मुलामुलींच्या कलागुणांना वाव देऊन काही करता येईल का, असा एक विचार माझ्या मनाला स्पर्शून गेला. आमच्या अंध विद्यालयातील संगीतशिक्षक घनश्याम गायधने, पंढरीनाथ वासनिक, कृष्णराव शिरसाट यांनी, तसेच कर्ण-बधीर विद्यालयातील दीपक शिव, नागेश्वर गेडाम यांनी गीत, संगीत, वादन, नृत्याचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजवले होते. आनंदवनातल्या विविध कार्यक्रमांमध्ये या शाळांची मुलं आपल्या कला सादर करत. निवासी कुष्ठमुक्त आणि संधीनिकेतनमधील प्रशिक्षणार्थ्यांमध्येही उपजत कलागुण असलेले काही होते. कुणाला गोड गळ्याचं वरदान होतं, कुणी ढोलकी विशारद होतं, तर कुणी तबला-पेटी विशारद. मी सदाशिव ताजने, गजानन वसू, हाडाचा कलाकार असलेला आणि नुकताच संधीनिकेतनमध्ये प्रशिक्षक म्हणून दाखल झालेला तरुण रवींद्र नलगिंटवार या माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा केली. आम्ही आनंदवनातील कुष्ठमुक्त, अंध, अपंग, कर्ण-बधीर, आदिवासी मंडळीची मोट बांधायचं निश्चित केलं. पुलं, वसंतराव, कुमारजींच्या आशीर्वादाने बहरलेला आनंदवनाचा स्वर विस्तारला आणि उभा राहिला एक सशक्त आविष्कार- ‘स्वरानंदवन’! १४ जुलै २००२ हा ‘स्वरानंदवन’ वाद्यवृंदाचा स्थापना दिवस. आनंदवनातील बालतरूच्या पालखीसाठी गदिमांनी रचलेल्या ‘मुक्तांगणात या रे’ या गाण्याने स्वरानंदवनची सुरुवात झाली. ‘स्वरानंदवन’ हे नाव दिलं आनंदवनाचे मित्र अशोक हांडे यांनी. स्वरानंदवनच्या उभारणीत हांडे यांनी त्यांच्या वाद्यवृंदातली काही वाद्यं तर दिलीच; शिवाय बहुमोल असं मार्गदर्शनही केलं. अमेरिकेच्या ‘Share n Care Foundation’ने स्वरानंदवनकरिता वाद्यं घेण्यासाठी मोठी मदत दिली. टाटा मोटर्सने दिलेल्या दोन बसेस आणि ‘केसरी’चे केसरीभाऊ पाटील यांनी दिलेल्या एका बसच्या माध्यमातून आनंदवनातील रुग्णांच्या आवाजासोबतच स्वरानंदवनच्या दिव्यांग कलावंतांचे दूरवरचे प्रवास सुकर झाले. स्वरानंदवनला दलाई लामा यांचेही आशीर्वाद लाभले. दलाई लामा १९९० आणि २००२ साली असे दोन वेळा आनंदवनात दोन-तीन दिवस मुक्कामी होते. आनंदवनातील कुष्ठमुक्त, अंध, अपंग, कर्ण-बधीर बांधवांस जवळ घेऊन त्यांची आपुलकीने विचारपूस करणाऱ्या दलाई लामांनी धर्मातील नियमांना तिलांजली देत स्वरानंदवनचा संपूर्ण प्रयोग ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभवला! त्यानंतर लगेचच काही दिवसांत ‘धर्मस्थल’ बाहुबली संस्थानचे सर्वेसर्वा पद्मभूषण डॉ. डी. वीरेंद्र हेगडे आणि त्यांच्या पत्नी यांनीही हा प्रयोग बघितला.

विकासचा ‘आणखी एक नवा प्रयोग’ म्हणून नित्यनेमाने आनंदवनाच्या काही हितचिंतकांनी यावर टीका केलीच! पण मी नेहमीप्रमाणे टीकेकडे दुर्लक्ष केलं. हा प्रयोग भारतभर पोहोचवण्याची खूणगाठ आम्ही सगळ्यांनी मनाशी बांधली. तेव्हापासून आजपर्यंत एक सहस्र प्रयोगांच्या माध्यमातून स्वरानंदवनचा प्रवास अखंड सुरू आहे. ‘आनंदवन तुमच्या द्वारी’ ही कुसुमाग्रजांची उक्ती सार्थ करत पावणेदोनशे-दोनशे शिलेदारांचा चमू असलेलं ‘स्वरानंदवन’ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तर पोहोचलंच; गोवा, आंध्र प्रदेश आणि दिल्लीही त्याने सर केलं. स्वरानंदवनचं नेमकं वर्णन करताना आनंदवनाचे आप्त पुण्याचे डॉ. मंदार परांजपे म्हणतात, ‘‘सामान्यांमधील सुप्त असामान्यत्वाचा एक हृदयस्पर्शी आविष्कार म्हणजे ‘स्वरानंदवन’! गायन, वादन, नर्तन, अभिनय आणि समर्पक निवेदन यांनी नटलेला हा कलाविष्कार ‘ऑर्केस्ट्रा’ या शब्दाच्या मर्यादेत मावणारा नाही. यात सप्तस्वरांचे इंद्रधनुष्य उभे करणारे अंध गायक-वादक आहेत. रसिकांना आपल्या गाण्याच्या तालावर डोलायला, नाचायला लावणारे अपंग आहेत. आणि स्वत:ला ऐकूही न येणाऱ्या संगीताच्या ठेक्याबरहुकूम विस्मयकारक लयबद्ध नृत्य करणारे कर्ण-बधिरही आहेत.’’

गत पंधरा वर्षांच्या काळात ‘स्वरानंदवन’ कौशल्य, तंत्र अशा अनेक आघाडय़ांवर बदलत, सुधारत आणि विस्तारत गेलं आहे. यातील काही कलावंत, वादक, मदतनीस आनंदवनात कायमचे स्थिरावले, तर कुणी लग्न झाल्यामुळे, कुणी इतर ठिकाणी काम करायची संधी मिळाल्यामुळे बाहेर पडले. हे सूत्र असंच कायम आहे. कुणी जातंय, तर कुणी येतंय असं ‘Dynamic’ स्वरूप. महत्त्वाचं म्हणजे यातली प्रत्येक व्यक्ती आज स्वाभिमानाने आयुष्य कंठत आहे. स्वरानंदवनची ही उपलब्धी दोन अर्थानी मला महत्त्वाची वाटते. पहिलं म्हणजे हातापायांनी धडधाकट असूनही सतत अस्वस्थ, बेचन, दुखी, असमाधानी असलेल्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालत हे कलावंत अपंगत्वाकडे बघण्याचा समाजाचा संकुचित दृष्टिकोन समर्थपणे बदलत आहेत, अपंग बांधवांना दया नव्हे तर त्यांचे न्याय्य हक्क मिळाले पाहिजेत, हे आत्मविश्वासाने समाजमनावर बिंबवत आहेत. दुसरं म्हणजे समाजाने ज्यांचं अस्तित्वच नाकारलं आहे अशा कित्येकांना आजवर स्वरानंदवनच्या हक्काच्या व्यासपीठामुळे आपल्या सुप्त कलागुणांचं सादरीकरण लोकांसमोर खडय़ा देहाने करता आलं. यातून त्यांच्या मनावर पसरलेलं न्यूनगंडाचं झाकोळ तर कायमचं दूर झालंच; शिवाय व्यंगांना समाजात हिणवलं जात असल्यामुळे संकोचाने सतत आक्रसून राहणाऱ्या त्यांच्या शरीरांनाही आत्मविश्वासाने सर्वत्र मुक्त संचार करता आला. यातून त्यांचं मनस्वास्थ्य आणि शरीरस्वास्थ्य दोन्ही सुधारलं. स्वरानंदवनची ओळख केवळ एक वाद्यवृंद अशी मर्यादित न राहता ‘प्रभावी उपचार करणारी रंगभूमी’ म्हणून पुढे आली. त्यामुळे मी स्वरानंदवनला ‘Therapeutic Theatre’ असंच संबोधतो. बाबा म्हणायचे, ‘‘ Let ‘Swaranandwan’ be the solution to National nervous breakdown – by Leading of this Therapeutic Theatre.’’

स्वरानंदवनचं स्वरूप नुसतं स्वरांच्या विकासापुरतं मर्यादित राहिलं नाही. आनंदवनाने पाहिलेलं आत्मनिर्भरतेचं स्वप्न पूर्ण करण्यातही स्वरानंदवन आघाडीवर आहे. स्वरानंदवनने आनंदवनाच्या उत्पन्नात आजवर काही कोटींची भर घातली आहेच; शिवाय महाराष्ट्रातील इतर स्वयंसेवी संस्थांसाठीही विनामूल्य कार्यक्रम करून कोटभर रुपये उभे केले आहेत! स्वरानंदवनमध्ये माझी भूमिका आहे मार्गदर्शकाची (आणि कधी कधी ‘कल्ला’काराचीही!). पण खरी मेहनत आहे अपंगांचं भावविश्व अनुभवातून जाणणाऱ्या आमच्या सदाशिव ताजनेची. संधीनिकेतनचा अधीक्षक असताना आणि निवृत्त झाल्यानंतरही सदाशिव जिद्दीने आणि चिकाटीने स्वरानंदवनचा गाडा पुढे हाकतो आहे. त्याचा अदम्य उत्साह पाहून भलेभलेही तोंडात बोटं घालतात! गजानन वसू आणि नंदू देवगडे या कार्यकर्त्यांनी सदाशिवला स्वरानंदवनच्या उभारणीत मोलाची साथ दिली. आज संधीनिकेतनचा अधीक्षक असलेला रवींद्र नलगिंटवार आपली जबाबदारी सांभाळत सदाशिवला साथ देतो आहे. २००२ पासून प्रशिक्षण, पुनर्वसन, स्वरानंदवनशी संलग्न गांधर्व संगीत महाविद्यालयाच्या माध्यमातून संगीत परीक्षा यांद्वारे सुमारे ८०० दिव्यांग मंडळींना ‘स्वरानंदवन’ प्रवृत्तीचा लाभ मिळाला आहे.

कोण कोण होतं वा आहे स्वरानंदवनमध्ये? यात तीन फुटांपलीकडे दिसत नाही म्हणून खेटून टीव्ही बघत माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय यांचा ‘डोला रे डोला’ हा नृत्याविष्कार हुबेहूब साकारणाऱ्या ‘माला-ज्योती’ होत्या; मोहम्मद रफी यांच्याप्रमाणे सुरेल आवाजात गाणी म्हणता म्हणता पगंबरवासी झालेले ‘महम्मद शफी’ होते; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मसाजिस्ट असलेले हरी निकम यांचे चिरंजीव कुष्ठमुक्त अरुण निकम आहेत; अपघातात दोन्ही पाय गमावल्यानंतर आनंदवनातील कृत्रिम अवयव निर्मिती केंद्रात तयार झालेले पाय लावत रसिकांना आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणारा ‘गुड्डू’ आहे; अंधत्व, मतिमंदत्व कमी होतं की काय म्हणून त्यांच्या जोडीला नुकत्याच आलेल्या अपघाती अपंगत्वास झुगारून देत ‘आपण सलग संपूर्ण असतानाही असा आनंद जागवू शकलो नाही’ याची जाणीव आपल्या गोड गळ्याने श्रोत्यांच्या मनात उभी करणारी ‘सोनू’सुद्धा आहे. शिवाय अजूनही बरेच जण आहेत. यांत ‘खरा’ कलाकार जोखणारे बाबा आमटे आहेत, पांगळ्यांच्या वेदनेशी नातं जोडणारी कलाकारांची हळवी मनं आहेत, मनाच्या कुष्ठरोगाचे समूळ उच्चाटन करण्याच्या प्रेरणा आहेत आणि पुरुषार्थाच्या सर्व प्रचलित अर्थाना फाटा देत त्याच्या सत्य व गहन अर्थाची प्रचीती देण्याची धडपड आहे.

विकास  आमटे  vikasamte@gmail.com

Story img Loader