बाबा आमटेंनी गावखेडय़ातील कष्टकरी वर्गाची दुरवस्था जशी जवळून अनुभवली होती, तशीच तरुणपणी केलेल्या भटकंतीत मध्य भारतात पसरलेल्या दंडकारण्यातील भामरागडच्या दुर्गम भागात राहणाऱ्या माडिया गोंड आदिवासी बांधवांच्या जीवनाचे दर्शनही घेतले होते. तथाकथित सुसंस्कृत समाजाकडून पिढय़ान् पिढय़ा नाडल्या गेलेल्या आदिवासींच्या कथा आणि व्यथा तेव्हापासूनच बाबांच्या मनात घर करून बसल्या होत्या. स्वातंत्र्याची दोन दशके उलटून गेल्यावरही भूक आणि उपासमारीच्या यातना भोगणारा हा समाज बाबांना सतत बेचन करत होता.

१९७० चा डिसेंबर महिना. मी आणि प्रकाश फायनल एमबीबीएसची परीक्षा देऊन आनंदवनात आलो होतो. आपण सहलीला जातो आहोत, असं सांगून बाबांनी इंदू, आम्ही दोघं, रेणुका अशा आठ-पंधरा जणांना भामरागडच्या जंगलात चक्क दोन दिवसांच्या मुक्कामी नेलं! आनंदवन-भामरागड अंतर २५० कि. मी.! पण नद्या-नाले ओलांडत आम्हाला पोहोचायलाच लागले दोन दिवस! शेवटचे ६५ कि. मी.- म्हणजे आलापल्ली गावापासून पुढे तर रस्ता म्हणून नव्हताच. माडिया गोंड आदिवासींची परिस्थिती खरोखरच भीषण होती. रस्ता, स्वच्छ पाणी, वीज, दवाखाना, शिक्षण यातलं काहीही नव्हतं! अंगावर कपडे नाहीत. मुलं कुपोषित. रोगांची व्याप्ती प्रचंड. जगण्याची साधनं म्हणजे जंगलातील कंदमुळं, प्राण्यांची शिकार आणि अल्प प्रमाणात भातशेती- एवढीच. अननसाचा ‘अ’, आगगाडीचा ‘आ’, इडलिंबूचा ‘इ’सुद्धा माहीत नसलेले हे आपलेच समाजबांधव! ‘चार पाया’च्या प्राण्याला न घाबरणारी ही माणसं आम्हा ‘दोन पाय’वाल्यांना पाहून (वनखात्याच्या, बांबू कंत्राटदारांच्या कृपाशीर्वादाने!) घाबरून पळत सुटत. शोषणाची परिसीमा काय असू शकते, हे आम्हाला तिथे जाऊन जाणवलं! निघताना बाबा आम्हाला म्हणाले, ‘‘आनंदवन आता मार्गी लागलं आहे. आता इथे काम करावं अशी माझी इच्छा आहे.’’ भामरागड परिसर सर्वच मूलभूत सुविधांपासून वंचित असला तरी इथला आदिवासी गांजला होता तो रोगराई आणि कुपोषणामुळे. त्यामुळे इथे प्रमुख गरज होती ती निवासी डॉक्टरची. प्रकाश बाबांना उत्स्फूर्तपणे म्हणाला, ‘‘या दुर्गम भागात या वयात तुम्ही हे काम सुरू करायचं ठरवत आहात. मग मीपण तुमच्यासोबत आहे!’’ आमच्या रेणुकानेही प्रकाशसोबत राहून काम करण्याचा मनोदय व्यक्त केला.

sarva karyeshu sarvada | prathana foundation ngo
सर्वकार्येषु सर्वदा:आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांमधील निराधारांच्या मदतीसाठी पाठबळाची गरज
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
prarthana foundation information in marathi
सर्वकार्येषु सर्वदा : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचा, वृद्धांचा निवारा
Sakkardara lake, Nagpur, unsafe,
नागपूरच्या प्रसिद्ध सक्करदरा तलाव परिसर सर्वसामान्यांसाठी असुरक्षित, काय आहेत कारणे?
suicides farmers Vidarbha, suicides farmers,
आठ महिन्यांत ६९८ आत्महत्या, विदर्भातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था
Farmer suicide, Nashik, debt, Farmer suicide news,
नाशिक : शेतकऱ्याची कर्जामुळे आत्महत्या
AntarSingh Arya appeal regarding tribals in Yuva Samvad nashik news
आदिवासींना वाचविण्याची युवापिढीवर जबाबदारी; युवा संवादमध्ये अंतरसिंग आर्या यांचे आवाहन
Three from Bramhapuri appointed as sub-inspectors of police
चंद्रपूर : ब्रम्हपुरीतील तिघांची पोलीस उपनिरीक्षकपदी वर्णी, हलाखीच्या परिस्थितीवर मात

अन्यायाने, पिळवणुकीने दडपल्या गेलेल्या या आपल्या देशबंधूंची, एकांतात पहुडलेल्या त्यांच्या आदिसंस्कृतीची युवाशक्तीने सन्निध जात ओळख करून घ्यावी अशी बाबांची इच्छा होती. या दुर्गम भागात माडिया गोंडांच्या विकासासाठी एक ‘Integrated Rural Development Program’ राबवण्याचं त्यांच्या मनाने घेतलं. त्यासाठी बाबांना पोलादी निश्चयाची, सर्वार्थी निर्भय असलेली तरुणांची सेना हवी होती. बाबा म्हणत, ‘‘जेथे माझे मन भरारी घेते, पण व्याधीग्रस्ततेमुळे शरीर पोहोचू शकत नाही तेथे ज्यांचे शरीर झेपावू शकते, पण मन पोहोचत नाही त्यांना जावेसे वाटणे, हा या अभियानाचा हेतू आहे. भामरागडला नागर आणि आरण्यक संस्कृतींचा संगम घडवून आणायचा तर असे भगीरथ पाहिजेत- की जे वादळवाऱ्याशी टक्कर देत स्तूपासारखे अविचलपणे उभे राहतील. काळजीच्या आणि चिंतेच्या आठय़ा कपाळावर पडल्या तर पडू देत; पण माझ्या हृदयावर त्या मी कधीच पडू देणार नाही, असे म्हणणारे तरुण येथे हवे आहेत!’’ सोमनाथच्या आंतरभारती श्रमसंस्कार छावणीला आलेल्या तरुणांना बाबांनी आवाहन केलं. त्यास तरुणांनी भरघोस प्रतिसाद दिला आणि १९७१ च्या एप्रिल महिन्यात बाबा-इंदूच्या सोबतीने आंतरभारती साहसयानाची ३५ युवकांची पहिली संघटित फेरी पामुल-गौतमी, पर्लकोटा, इंद्रावती या नद्यांनी वेढलेल्या भामरागडच्या जंगलात निघाली. शिरुभाऊ लिमये, अजित मळकर्णेकर, नागेश हटकर, कुमार शिराळकर, दीनानाथ मनोहर, अनिल थत्ते.. अशी बरीच मंडळी. सोबत यदुनाथजी थत्ते, दामूभय्या वेले, जर्मनीचा आल्फ्रेड नॉस आणि आमचा नारायण पण. भामरागडसोबतच लाहेरी, कुवाकोडी या आजूबाजूच्या भागांत फिरत, श्रमदान करत, थरारक प्रसंग झेलत या मंडळींनी माडियांच्या जीवनातलं एक-एक दालन अगदी जवळून अनुभवलं. १२ दिवसांच्या या साहसयानाने भामरागडच्या भूमीत होऊ घातलेल्या नव्या प्रकल्पाची नीव रचली. बाबांच्याच शब्दांत सांगायचं तर, ‘‘लांबदूरच्या आदिमानवापर्यंत, त्याच्या वस्तीपर्यंत आम्ही जात नाही आणि ते तुमच्या-आमच्यापर्यंत पोचू शकत नाहीत. आम्हाला जाणून घेण्यासाठी ते उत्सुक असतात. त्यांना उत्कंठा असते. आमच्याशी हितगुज करावेसे त्यांना वाटते. या अज्ञाताच्या भूमीवर प्रगतीच्या कल्पनांचे बियाणे घेऊन आपल्याला जायचे आहे. आपल्या आवाजाचा प्रतिध्वनी शोधण्यासाठी त्यांनी बाहेर पडायचे आहे. दुहेरी संवाद निर्माण करण्यासाठी एक ‘सर्किट’ जोडायचे आहे. सोमनाथच्या कार्यक्रमांच्या रेषांत हीही एक रेषा आहे- दोन टोके सांधणारी. तिचे नाव आहे : ‘लोक-बिरादरी’ (People’s Brotherhood) !’’

साहसयानातील अजित, नागेश यांनी भामरागडला काम करायची तयारी दर्शवली. लगोलग बाबांनी या भागात जमीन मिळावी यासाठी शासनाकडे अर्ज केला. हा भाग वनविभागाच्या अखत्यारीत होता. त्यामुळे आधी जमीन वनखात्याकडून महसूल विभागाकडे हस्तांतरित होणे गरजेचे होते. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक बाबांचे वर्गमित्र. त्यांनी वेगाने सूत्रं फिरवली आणि भामरागडच्या जंगलातल्या ‘हेमलकसा’ या छोटय़ा खेडय़ाजवळ (भामरागड गावाच्या अलीकडे दोन कि. मी.) १९७३ च्या शेवटाला ‘महारोगी सेवा समिती, वरोरा’ला ५० एकर जमीन मिळाली. ही जागा म्हणजे निबिड अरण्यच! बिबटे, अस्वले, विषारी साप अशा वन्यप्राण्यांचा सहवासही भरपूर. मी, नागेश, राज सुलाखे आणि चौदा कुष्ठमुक्त बांधवांना सोबत घेत बाबा हेमलकसाला पोहोचले आणि जंगलसफाईचं काम सुरू झालं. दिवस होता २३ डिसेंबर १९७३. ‘लोक-बिरादरी प्रकल्प, हेमलकसा’चा स्थापना दिवस! काही दिवसांनी अजितही जॉइन झाला. राहण्यासाठी झोपडय़ा उभारल्या जाऊ लागल्या. हेमलकसाच्या आजूबाजूच्या आदिवासी पाडय़ांवर, वस्त्यांवर जाऊन बाबा खुणांच्या भाषेत का होईना, त्यांच्याशी संवाद साधत त्यांचा विश्वास संपादन करू लागले. मीही तिथे मुक्कामी असताना आदिवासींच्या वैद्यकीय तपासण्या आणि औषधोपचार करू लागलो. कुणी कुपोषित, कुणी प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले, तर कुणी शेकोटीजवळ झोपलेले असताना भाजल्याने जखमी झालेले असत.

त्यावेळी प्रकाशचा नागपूरला ‘सर्जरी’त हाऊस-जॉब सुरू होता. तिथे प्रकाशची ओळख झाली डॉ. मंदाकिनी देशपांडेशी. आमच्याच कॉलेजमध्ये एमबीबीएसला असणारी मंदा आमच्या एक र्वष पुढे होती. पण या दोघांची ओळख मात्र झाली नंतर हाऊसजॉब करताना. मंदाही ‘अ‍ॅनस्थेशिया’मध्ये हाऊसजॉब करत होती! ओळख झाली, स्वभाव जुळले आणि जोडीदाराची निवडही झाली. भामरागडला काम करण्याच्या आपल्या निर्णयाची प्रकाशने तिला कल्पना दिली. पण तो भाग पाहिलेला नसतानाही कसलेच आढेवेढे न घेता अगदी सहजतेने मंदाने हे आयुष्य स्वीकारायचं ठरवलं. २४ डिसेंबर १९७२ रोजी आनंदवनात दोघांचं लग्न अतिशय साध्या पद्धतीने पार पडलं. १९७२ च्या भीषण दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर लग्नात गोडधोड वगरे काहीच नव्हतं. हाऊसजॉब संपवून प्रकाश १९७४ च्या मार्चमध्ये लोक-बिरादरीत दाखल झाला आणि पाठोपाठ डिसेंबरमध्ये मंदाही आली. जगापासून पूर्णपणे तुटलेल्या आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्याचं खडतर आव्हान स्वीकारत प्रकाश आणि मंदा या दुर्गम भागात ठाण मांडून बसले. त्यांनी आरोग्यसेवा तर सुरू केलीच; पण निरक्षरता, दारिद्र्य, बेरोजगारी, अंधश्रद्धांच्या विळख्यात सापडलेल्या आदिवासींच्या इतर प्रश्नांशीही लढा सुरू केला. नर्सिगचं प्रशिक्षण पूर्ण केलेल्या, जात्याच मेहनती रेणुकाचीही त्यांना प्रत्येक बाबतीत मोलाची साथ होती. दळणवळणाच्या साधनांअभावी दूरवरून पायपीट करत येणाऱ्या रुग्णांवर प्रकाश, मंदा, रेणुकानं आपलं सगळं कसब पणाला लावत, मूलभूत साधनसामग्रीचा अभाव असतानाही आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने हिवताप, मोतिबिंदू, सर्पदंश, प्राण्यांच्या हल्ल्याने किंवा शेकोटीमुळे भाजल्याने झालेल्या जखमा आणि इतर रोगांवर यशस्वी उपचार केले आणि आदिवासी बांधवांचा विश्वास संपादन केला. हळूहळू आदिवासींची भाषाही या सर्वाना अवगत होत गेली.

नागेश, राज, अजित हे कार्यकत्रे वर्ष- सहा महिन्यांत परत गेले. पण या सर्वानी लक्ष्मण, रामचंद्र, शरद, गोविंद, मंजुळाबाई आणि इतर कुष्ठमुक्त बांधवांच्या सोबतीने सुरुवातीच्या काळात जंगल साफ करताना, झोपडय़ा उभारताना घेतलेल्या प्रचंड शारीरिक कष्टांना तोड नाही! लोक-बिरादरीत कोणत्याच सोयीसुविधा नव्हत्या. पाणी पण दोन कि. मी. अंतरावरील नदीवरून आणावं लागत असे. वीज नसल्याने करमणुकीची साधनं असण्याचा तर प्रश्नच नव्हता. नदीचा खळखळाट आणि जंगली प्राण्यांचे आवाज हीच काय ती श्राव्य माध्यमं. पावसाळा सुरू झाला की रस्त्यातल्या नद्यानाल्यांना पूर येत असे. मग चार-सहा महिने दळणवळण पूर्णपणे ठप्प. कधी चालत, तर कधी होडीतून प्रवास करावा लागे. खाण्यापिण्याचीही खूप आबाळ होत असे. या प्रतिकूल परिस्थितीत इंदू आणि बाबांच्या चकरा सतत सुरूच असत. हा रस्ता (मुख्यत्वे आलापल्ली ते हेमलकसा) पार करायला दोन-दोन, तीन-तीन दिवस लागत. सामानाने भरलेली जीप अनेकदा कधी नदीपात्रात, कधी रस्त्यात फसून बसे. कधी एखादी नदी, नाला वाट अडवत असे. मग पाणी ओसरेपर्यंत तिथेच मुक्काम. त्यावेळी भामरागडला कुठल्या वस्तू विकत मिळण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे बांधकाम साहित्यापासून ते औषधं, भांडीकुंडी, शिधासामग्री- सगळं आनंदवनातूनच आणावं लागत असे. मी सुरुवातीची काही र्वष ट्रक चालवत सर्व सामान पोहोचवण्याचं हे काम करत होतो. दुर्गम भागात आपली माणसं राबत असताना त्यांना काही कमी पडू नये, ही जाणीव डोक्यात पक्की होती. असे हे सुरुवातीचे दिवस होते. १९७६ मध्ये लोक-बिरादरीत एका झाडाखाली २५ विद्यार्थ्यांची आश्रमशाळा सुरू झाली आणि आदिवासींच्या आयुष्यातल्या एका महत्त्वाच्या पर्वाला सुरुवात झाली. वन्यप्राण्यांचं एक छोटं अनाथालयही प्रकाशने सुरू केलं. लोक-बिरादरीत एक ‘सीड बँक’ उघडली गेली.. ज्यातनं आदिवासींना धान आणि भाजीपाल्याच्या सुधारित वाणांचं वाटप केलं जात असे. एक किलो बियाण्याच्या बदल्यात एक किलो धान्य पीक आल्यावर परत आणून द्यायचं अशी योजना होती. या योजनेचा सरकारच्या ‘एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमा’च्या माध्यमातून पुढे बराच विस्तार झाला आणि आदिवासींच्या पोषक आहाराची सोय झाली.

लोक-बिरादरीच्या उभारणीचं बाबांचं स्वप्न पूर्णत्वाला नेण्यासाठी प्रकाश, मंदा, रेणुकाच्या साथीने आयुष्य झोकून देणारी मंडळी म्हणजे विलास मनोहर, दादा पांचाळ, जगन व मुक्ता मचकले, मुकुंद व वासंती दीक्षित, गोपाळ व प्रभा फडणीस. यांच्या साथीने अशोक शंकरराव ताकमोगे, जगदीश गोडबोले, शरद कुलकर्णी, मोहन हिराबाई हिरालाल हे स्वयंसेवकही काही काळ कार्यरत होते. विलास मनोहर मूळचा पुण्याचा. त्याचा रेफ्रिजरेशनचा व्यवसाय होता. विलासचा लहान भाऊ अशोक डाव्या चळवळीतील एक प्रमुख कार्यकर्ता. अशोक शहाद्याला आदिवासींच्या हक्कांसाठी काम करत असे. १९७५ मध्ये अशोकच्या सांगण्यावरून विलास आनंदवनात आला. त्या दिवशी बाबा सोमनाथला होते. मग तो तिथनं सोमनाथला आला. बाबा नेमके त्या दिवशी लोक-बिरादरीला जायला निघाले, म्हणून विलासही त्यांच्यासोबत लोक-बिरादरीला दोन दिवस मुक्कामी जाऊन आला. पुण्याला परतला तरी तो सतत बेचनच होता. मग पुन्हा दोन महिन्यांनी तो परत आला आणि लोक-बिरादरीचाच झाला. पुढे विलास आणि रेणुकाचं लग्न झालं. दवाखान्यातलं काम असो, हिशेब सांभाळणं असो किंवा लाकडं फोडणं, प्राण्यांसाठी मटणाचे तुकडे करणं.. पडेल ते काम कसलीही तक्रार किंवा कुठलाही गाजावाजा न करता विलास करत असे. लोक-बिरादरीचा पाया रचताना विलास-रेणुकाने घेतलेले अमर्याद परिश्रम शब्दांच्या मर्यादित रचनेत बसू शकत नाहीत! शाळेची जबाबदारी आधी मुकुंदकडे होती. घरोघरी फिरून मुकुंद आणि शरदने पालकांना विश्वासात घेत त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिलं आणि मग विद्यार्थ्यांचा टक्का वाढू लागला. पुढे शाळेची सगळी जबाबदारी बाबांच्या विचारांनी भारावून जात आपली शिक्षकी नोकरी सोडून लोक-बिरादरीत दाखल झालेल्या गोपाळने घेतली. आदिवासी मुलांच्या संस्कारी पिढय़ा घडवण्यात रेणुका, मुकुंद, गोपाळ, प्रभा, दादा पांचाळ यांचा मोलाचा वाटा आहे. दादा पांचाळने प्रकल्पावर कुष्ठमुक्त कार्यकर्त्यांना सोबत घेत छोटय़ा प्रमाणावर शेतीही सुरू केली. पुढल्या काही वर्षांत लोक-बिरादरीच्या परिघात लाहेरी, नेलगुंडा, हिदूर, कोठी आणि कुडकेली अशी पाच मेडिकल सब-सेंटर्स सुरू झाली. लाहेरीची जबाबदारी मुकुंद आणि वासंतीने समर्थपणे सांभाळली. जगन नांदेडचा. दादा पांचाळप्रमाणे सोमनाथच्या श्रमसंस्कार छावणीच्या माध्यमातून दाखल झालेला. आलापल्लीनजीक नागेपल्ली या छोटय़ाशा गावाजवळ लोक-बिरादरी प्रकल्पाचा बेस कॅम्प म्हणून बाबांनी सुरू केलेल्या प्रकल्पाची जबाबदारी त्यांनी जगनकडे सोपवली. जगनने ते आव्हान पेलत बेसिक मेडिकल सव्‍‌र्हिसेस सुरू केल्या. सोबत प्रकल्पाच्या जमिनीवर शेती केली, डेअरी, पोल्ट्री उभी केली. आसपासच्या गावांमध्येही याचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. दळणवळण ठप्प असताना जगन हाच आनंदवन आणि लोक-बिरादरीमधला एकमेव दुवा. नागेपल्ली ते लोक-बिरादरी हे ६५ कि. मी. अंतर कधी निकडीचे निरोप देण्यासाठी, तर कधी महत्त्वाची औषधं आणि सामान डोक्यावर, सायकलवर लादून दुथडी भरून वाहणारे नदी-नाले पार करत, जंगलात नदीकाठी मुक्काम करत जगनने किती वेळा पार केलं आणि अन्नपूर्णेच्या रूपाने जगनची बायको मुक्ताने आजवर नागेपल्लीच्या प्रकल्पावर किती जणांसाठी जेवण रांधलं, या कष्टांची गाथा कल्पितापेक्षाही विलक्षण आहे! जगन-मुक्ताला बाबा Barefoot Multipurpose Social Mechanics असं संबोधायचे.

लोक-बिरादरीच्या पहिल्या सहा वर्षांचा कामाचा गोषवारा घेतला तर लोक-बिरादरी कॉटेज हॉस्पिटल आणि पाच सब-सेंटर्सच्या माध्यमातून महाराष्ट्रच नव्हे, तर मध्य प्रदेशातल्या बस्तर भागातील ३७६ खेडय़ांमधल्या १,०५,०२० आदिवासी रुग्णांना औषधोपचारांचा लाभ मिळाला. लोक-बिरादरी आश्रमशाळेचं क्षितीजही विस्तारू लागलं होतं. अतिशय विपरीत आणि आव्हानात्मक परिस्थितीत वाटचाल सुरू झालेल्या ‘लोक-बिरादरी’ प्रकल्पाचे नवे आयाम घेऊन पुढे भेटेनच.

विकास आमटे

vikasamte@gmail.com