गणपती गेले की ‘चैन पडेना आम्हाला’ या आपल्या मन:स्थितीतून बाहेर येऊन आपल्याला नवरात्रीचे वेध लागायला लागतात. हिंदू परंपरांमधल्या या सणांचे मला भारी अप्रूप आहे. ते कधी आम्हाला मोकळे-ढाकळे ठेवत नाहीत. एक सरतो तर दुसरा पुढे सरकतो. स्टेशनवर ‘जानेवाली गाडीचा’ शेवटचा डब्बा पुढे गेल्याक्षणी त्याच रुळावर पुढच्या गाडीचा ‘एमु’ (EMU) दिसल्यावर जसा आनंद होतो तसाच हा प्रकार. त्यामुळे ‘बाप्पा मोरया’ संपतो न संपतो तोच गरबा घुमायला लागतो.
माझ्या लहानपणचं पुण्यातलं नवरात्र आणि आजचं यात मला जमीन-अस्मानाचा फरक जाणवतो. तेव्हा गरब्याचा घुमवटा नव्हता. आमच्या बंगल्यातून चतु:श्रृंगीचे दिवे दिसायचे आणि ते दिवे पाहून आई दिवसाच्या रहाटगाडग्याला प्रारंभ करायची. आता मात्र महिषासूरमर्दनिचा हा उत्सव सण न राहता मॅनेज करायचा एक इव्हेन्ट झाला आहे. तेव्हा फुलांचे हार, देवीचा नवेद्य (कधी कधी तर चक्क सामिष! जय हो देवी), पूजेचं तबक, निरांजन, आरती संग्रह आणि घंटा यांची सत्ता होती. आता डी.जे., कॅराओके, मंडप, इलेक्ट्रिकच्या माळा आणि चणिया-चोळीचे राज्य आहे. फुलवाले, इलेक्ट्रिशियन, डी.जे., रेडिओ जॉकी, लेडीज टेलर, साडी दुकानदार, मॅचिंगवाले, घागरा स्पेशालिस्ट आणि गायनॅकॉलॉजिस्ट यांना नवरात्रीच्या दिवसांत आणि नंतर काही दिवस बोलायलाही फुरसत नसते असे ऐकिवात येते. ऐकावे ते नवलंच. बरं देवी अंबामाता; संतोषी मातेपासून; आई जरी-मरी; जाखादेवी; विंध्यवासिनी आणि बंगाली बाबूंची, जीभ बाहेर काढून त्वेषाने असुरनि:पात करणारी महिषासूरमर्दनि कोणत्याही रूपात शोभूनच दिसते. त्यामुळे देखाव्यात व्हरायटीला स्कोप. तिला रोज नव्या रंगाची साडी आणि तो रोजचा बदलणारा रंग वृत्तपत्रातून ‘उद्याचा रंग’ म्हणून आज जाहीर झाला की सर्वत्र त्या रंगाची पखरण होते. हॉस्पिटल्स आपली हिरवी शिस्त बाजूला ठेवतात. शासकीय-निमशासकीय कार्यालयांतील खाकी रंगही दहा-अकरा दिवसांच्या ‘ई.एल.’ वर जातो आणि वर्तमानपत्रातून तांबडय़ा- निळ्या- पिवळ्या- हिरव्या- मोरपंखी- चंदेरी रंगांची इंद्रधनुष्यी ल्यायलेली पाने लागू लागतात. मरगळ झटकली जाते; मनाला मोहर येतो आणि सण साजरा होतो. पण मला मात्र आज नवरात्रीचा वेगळ्या अंगाने विचार करायचा आहे.
या नऊ रात्रीत मला नव्या नऊ शपथा घ्यायच्या अन् द्यावयाच्या आहेत..
१) गर्भधारणा स्त्रीवर लादणार नाही. तिची मान्यता आणि मानसिक तयारीशिवाय मातृत्वाचे ओझे तिच्यावर टाकणार नाही.
२) वंशाला केवळ दिवाच नाही तर दिव्याला एक ‘वात’ लागते हे विसरणार नाही.
३) स्त्री गर्भ अव्हेरणार नाही, तर त्याचा सन्मानच करीन.
४) मुलगी झाली म्हणून सुतकी चेहरे दाखविणार नाही. त्यांची नावे ‘नकोशी’, ‘वंचना’, ‘विखारी’, ‘कर्मजली’, ‘अवदसा’, ‘अमावस’ अशी ठेवणार नाही.
५) तिला परक्याचं धन न मानता स्वत:च्या मर्मबंधाची ठेव मानेन.
६) तिला सुदृढ, सुशिक्षित, सुसंस्कारित, सुगृहिणी आणि सुजाण स्वावलंबी नागरिक बनवेन.
७) स्त्री-पुरुष भेदाभेद झालाच तर ‘Ladies first’ हे केवळ सद्वचनात न राहता सदाचरणात आणेन.
८) स्त्री ही केवळ माता-पत्नी-वहिनी-कन्या एवढीच नसते तर ती कार्यालयातली सहचरी; ऑपरेशन थिएटर्समधली सहयोगी; पदश्रेणीतील सीनिअरही असू शकते हे लक्षात ठेवेन.
९) स्त्रीलाही स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगण्याचा हक्क आहे. अविवाहित, घटस्फोटित, विभक्त, विधवा आणि सिंगल पेरेंट ही समाजाने स्वत:च्या सोयीसाठी लावलेली विशेषणे आहेत हे उमजून घेईन.
शांती, तृप्ती, मर्यादा, सातत्य, सहनशीलता, समजूतदारपणा, सौजन्य, क्षमाशीलता आणि शक्ती म्हणजे नवरात्राचे नऊ गुण ल्यायलेलं स्त्री रूप होय. अलंकार आणि आक्रमकता दोन्हीही गोष्टी सहजतेने वागविणे स्त्रीलाच शक्य आहे. नवरात्रीच्या या नऊ दिवसांत उत्सव साजरा करताना स्त्रीला खऱ्या अर्थाने समजून घेऊ या आणि घरोघरच्या मातेश्वरींपुढे नतमस्तक होऊ या.
lokrang@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा