गेल्या काही दिवसांत वसंत लिमये यांनी लिहिलेले ‘लॉक ग्रिफीन’ नावाचे पुस्तक वाचले. कादंबरी आहे. स्कॉटलंड, नासा, वॉशिंग्टन, काश्मीर अशा वेगवेगळ्या ठिकाणांमधून या कादंबरीचा प्रवास होतो. कथानक तर वाचकाला खिळवून ठेवतेच, पण मला सर्वात भावले ते वेगवेगळ्या ठिकाणांचे, तेथले रस्ते-रचना, खाणाखुणा यांचे लेखकाने केलेले वर्णन. आपण कादंबरीच्या नायकाबरोबर त्या त्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित आहोत, याचा भास किंवा प्रत्यय वाचकाला देण्याची क्षमता असलेले वर्णन, हे या पुस्तकाचे खरे शक्तिस्थळ आहे. विश्वास पाटील यांचे ‘पानिपत’ वाचताना अंगावर उभा राहणारा शहारा ज्यांनी अनुभवलाय त्या सर्वाना ‘लॉक ग्रिफीन’ झपाटून टाकेल यात शंकाच नाही. अशी पुस्तके भाषा आणि वाङ्मय समृद्ध करतात हेच खरे. मला या लेखांकामधून लेखकाच्या आणि पर्यायाने आपल्या सर्वाच्या विशेष पैलूंवर नजर टाकायची आहे.
कॉलेजच्या दिवसांमध्ये इंग्रजी पुस्तके वाचतानाArthur Hailey  या प्रख्यात इंग्रजी लेखकाचे लिखाण वाचण्याचे व्यसन लागले आणि मग ‘Hotell, ‘Airportl, ‘Hospitall, ‘Flight into Dangerl’ आणि अशा असंख्य कादंबऱ्या अधाशासारख्या वाचल्या गेल्या. ‘हॉस्पिटल’चे वर्णन वाचताना हॅले आपल्याबरोबरच काम करतो आहे का, असे वाटायचे; तर ‘एअरपोर्ट’ वाचताना तो एखाद्या एअरलाइनचा सदस्य वाटायचा. गोष्टी नित्यनेमाने आपल्या सर्वाच्या अवतीभोवती नेहमीच घडतात. त्या आपल्याला दिसतात, पण आतपर्यंत पोहोचत नाहीत. निरीक्षणशक्ती, तरल ग्राहकता, स्मरण करणे, नोंदी ठेवणे आणि पुन्हा त्या बिनचूक आपल्या लेखनाला पूरक अशा संदर्भात नमूद करणे हे सारे गुणविशेष अशा सिद्धहस्त लेखकांना अवगत होतात, हेच खरे!
एखादे पुस्तक लिहायचे तर त्या विषयाचा तळ गाठणे आवश्यक. म्हणजे काम काही १५-२० दिवसांचे नाही, तर किमान दोन-तीन वर्षांचा गृहपाठ आवश्यक ठरतो. भौगोलिक निरीक्षणे, तत्कालीन राजकीय पटलावर गुंफून वाचकांची उत्कंठा वाढविणारे लिखाण करणे हे खरे कौशल्य. कॅनव्हास जितका मोठा तितकी लेखकाची जबाबदारी मोठी. दर्जा टिकवावयाचा, सातत्य राखायचे, संदर्भ सांभाळायचे आणि उत्कंठा वाढवीत न्यावयाची ही तारेवरचीच कसरत आहे. पुस्तकाची एक जातकुळी असते. प्रवासवर्णनाचा बाज वेगळा आणि कादंबरीचे बेअरिंग निराळे. प्रवासवर्णनात स्थळचित्रे येतात, पण कादंबरीत त्या त्या स्थळांना व्यक्तिरूप पात्र होते. ती स्थळे त्या कादंबरीत आवश्यक ती पाश्र्वभावनिर्मिती करतात आणि कथेला पुढे नेतात. सिनेमॅटोग्राफीमध्ये फ्लॅशबॅक वापरणे एक वेळ सोपे, कारण तेथे प्रेक्षकाला प्रत्यक्ष ‘दृश्यता’ असते. लिखाणात मात्र लेखक वाचकाला त्याचे बोट धरून काही वर्षे मागे घेऊन जातो, भूतकाळाची मुशाफिरी घडवितो आणि पुन्हा वर्तमानात आणून सोडतो. ‘लॉक ग्रिफीन’सारखी पुस्तके विद्यापीठात ‘कसे लिहावयाचे’ याचा वस्तुपाठ  बनवीत आणि या
case study च्या अभ्यासातून, त्या लेखकाच्या प्रत्यक्ष भेटीतून लेखन कसे घडले याचा विद्यार्थ्यांना पाठ मिळावा, असे मला वाटते.
तात्पर्य काय, आपण समाजात वावरताना ‘बोलणे कमी आणि पाहणे अधिक’ करणे आवश्यक आहे. दिसणे, पाहणे, न्याहाळणे, निरीक्षणे या साऱ्या क्रिया शरीरशास्त्राच्या दृष्टीने एकाच ज्ञानेंद्रियाशी निगडित असल्या तरी त्यांच्या अंतर्भूत अर्थात अनेक योजनांचा फरक आहे. आपल्याला उत्तम लिखाण करावयाचे असेल तर एकेक पायरी वर चढणे आवश्यक ठरावे आणि हे प्रयत्नपूर्वक जोपासावे लागेल. शालेय जीवनापासूनच त्याचा प्रारंभ करावा लागेल, हे सुजाण पालकांनी आपल्या पाल्याच्या व्यक्तिमत्त्व विकासाकडे लक्ष देताना आवर्जून प्रत्यक्षात आणावे लागेल.
एखादे चांगले पुस्तक जो आनंद देते, तो अवर्णनीयच असतो. ते जगण्यासाठी प्रेरणा देते, उत्साह देते, मरगळ झटकायला मदत करते आणि पादाक्रान्त करण्यासाठी नवी क्षितिजे दाखविते. पण हे सारे होण्यासाठी आपण लिहिते होणे गरजेचे तस्मात् ‘पेर्ते व्हा, पेर्ते व्हा’सारखे म्हणावेसे वाटते ‘लिहिते व्हा..’
लिहिल्याने होत आहे रे, आधी लिहिलेच पाहिजे..
.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा