प्रा. मं. गो. राजाध्यक्ष
काही वर्षांपूर्वी ‘श्वास’ या मराठी चित्रपटाला राष्ट्रपती सुवर्णपदक मिळाले आणि प्रत्येक मराठी माणसाचे मन अभिमानाने फुलून आले. पाठोपाठच ‘श्वास’ला ऑस्करच्या परदेशी चित्रपट विभागातील पारितोषिकासाठी भारत सरकारकडून शिफारस केली गेल्यानंतर साऱ्या भारतीयांचे लक्ष ‘श्वास’कडे लागून राहिले. पण या चित्रपटाला ऑस्कर नामांकन यादीतही संधी मिळाली नाही. वास्तविक आजच्या काळात चित्रपट हे प्रभावी माध्यम तंत्रज्ञानात एवढे पुढे गेले आहे की लेखन, दिग्दर्शनासोबतच छायाचित्रण, संकलन, स्पेशल इफेक्ट्स, प्रकाशयोजना अशा सर्वच बाबतींत तो सर्वोत्तम असायला हवा. आजच्या स्पर्धात्मक जगात त्या तोडीचाच चित्रपट काढला तरच ऑस्करची अपेक्षा ठेवणे रास्त.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अशावेळी आठवण येते ती भारतीय चित्रपटसृष्टीत उच्चांक गाठणाऱ्या आणि ८४ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या प्रभात फिल्म कंपनीच्या ‘संत तुकाराम’ या चित्रपटाची! बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीतून बाहेर पडून व्ही. शांताराम, व्ही. जी. दामले, के. आर. धायबर, एस. फत्तेलाल आणि एस. बी. कुलकर्णी यांनी कोल्हापुरात ‘प्रभात फिल्म कंपनी’ स्थापन केली. १९३३ साली तिचे पुण्यात स्थलांतर झाले. १९३२ मध्ये ‘अयोध्येचा राजा’ हा पहिला चित्रपट प्रभातने काढला. बोलपटांच्या आरंभीच्या काळात पौराणिक चित्रपटांवर जास्त भर असे. परंतु चाकोरीतील पौराणिक चित्रपटाऐवजी एक वेगळी कथा घेण्याचे प्रभातने ठरवले. त्यात चमत्कार असले तरी ते वास्तवाशी साधम्र्य असणारे असतील. आणि त्यासाठी एकच विषय शांतारामबापूंच्या नजरेसमोर आला. तो होता ‘संत तुकाराम’! स्वबळावर मानवरूप धारण करून अवतरलेल्या या चैतन्यावर आधारीत पटकथा लिहिण्याची जबाबदारी स्वीकारली शिवरामपंत वाशीकर यांनी.

दिग्दर्शन करण्याचे ठरले विष्णुपंत गोविंद दामले आणि शेख फत्तेलाल या जोडीने. केशवराव भोळे यांचे सुमधुर संगीत आणि शांताराम आठवले यांची गीते. आजच्या काळातही टवटवीत वाटावे असे व्ही. अवधूत यांचे छायाचित्रण. एकूण हा सर्व माणिकांचनयोगच जुळून आला होता. यात मुख्य भूमिकेसाठी कोणाला घ्यावे याबद्दल विचार सुरू झाला. तेव्हा त्या काळातले कीर्तनकार विष्णुपंत पागनीस यांचे नाव पुढे आले. मात्र, त्यांच्याबद्दल दामले-फत्तेलाल थोडे साशंकच होते. कारण विष्णुपंतांनी नाटकांमधून स्त्री-भूमिका निभावल्या होत्या. कोल्हापूर येथे महाराष्ट्र फिल्म कंपनीतही त्यांनी कामे केली होती. स्त्रीपार्टी नट असल्याने स्वाभाविकच त्यांच्या हालचाली बायकी थाटाच्या होत असत. परंतु पुढे तुकारामाच्या भूमिकेसाठी त्यांची निवड योग्यच होती हे त्या दोघांनाही मान्य करावे लागले.

चित्रीकरण सुरू होण्यापूर्वी विष्णुपंत देहूला गेले आणि त्यांनी तुकाराम महाराजांच्या समाधीवर मस्तक टेकून त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यांच्या सोबत होत्या त्यांची पत्नी जिजाई ऊर्फ आवलीची भूमिका करणाऱ्या गौरी. गौरी या मूळच्या अभिनेत्री नव्हत्या. त्या कंपनीतल्या एक कामगार. अधूनमधून त्यांना एक्स्ट्राचे काम मिळत असे. सालोमालो या खलपुरुषाच्या भूमिकेसाठी निवडले गेले काका भागवत. तुकारामाचे भावूक आणि सोशीक व्यक्तिमत्त्व पागनीसांनी अत्यंत चोखपणे निभावले. संत तुकारामांच्या अभंगांमध्ये चपखल बसतील असे अभंग शांताराम आठवले यांनी लिहिले होते. ‘आणिक दुसरे मज नाही आता’ या अभंगाने संत तुकाराम बोलपट सुरू होतो आणि विष्णुपंत पागनीस हे संत तुकाराम म्हणून प्रत्यक्ष पडद्यावर अवतीर्ण होतात. संत तुकाराम कसे होते याचे प्रत्यक्ष दर्शनच त्यांच्या रूपाने प्रेक्षकांना होते. हा अभिनय आहे याची पुसटशी शंकाही कोणाला येत नसे.

संपूर्ण थिएटर भक्तिरसाने भारावून जात असे. प्रत्येक भजनागणिक प्रेक्षक तल्लीन होऊन भक्तिरसात न्हाऊन निघत. विष्णुपंतांनी तुकाराम महाराज साकारले ते या व्यक्तिरेखेशी पूर्णत: समरस होऊन. त्यांच्या चेहऱ्यावरील सात्विक भाव, त्यांचे धीरगंभीर असे अंत:करणापासून प्रकटणारे संवाद, त्यातून उमटणारे पडसाद या सर्वच गोष्टी चित्रपटाला पोषक ठरल्या. तसेच त्यांचा भावगंभीर आवाज या भूमिकेला अतिशय पोषक ठरला. शेताची राखण करताना मचाणावर बसून, हातामध्ये चिपळ्या घेऊन ‘सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती’ हा अभंग साध्या-सोप्या बोलीत तुकाराम महाराज म्हणू लागतात तेव्हा सर्व शेतकरी त्यांच्यासोबत भजनात रमून जातात. केशवराव भोळ्यांच्या संगीताची ही कमाल आहे. तुकारामांना साथ देणाऱ्या जिजाई ऊर्फ आवलीची भूमिका करणाऱ्या गौरी या प्रभात फिल्म कंपनीत एक दुय्य्म काम करणाऱ्या कर्मचारी आहेत यावर विश्वास ठेवणे कठीण होते, इतका सहज सुलभ अभिनय त्यांनी केला आहे. तिच्या माहेरची मंगळाई ही म्हैस तिच्या कौतुकाची असते. तिला आंघोळ घालून, खायला-प्यायला घालून तिची उत्तम सरबराई त्या करतात. पांडुरंगाने आपल्या नवऱ्याला आपल्या नादी लावल्यामुळे ती सतत त्याला ‘काळ्या’ म्हणून त्याची संभावना करत असते. पण आपल्या साध्याभोळ्या, सरळ स्वभावी नवऱ्याला कोणी काही बोलले की चवताळून उठणारी, मुलांची काळजी घेणारी आवली पिकलेल्या फणसाप्रमाणे होती. बाहेरून काटेरी आणि आतून रसाळ. नवऱ्याच्या पोटात भाकरी गेल्याशिवाय तिच्या तोंडी घास जात नसे.

तुकारामाच्या भूमिकेत पागनीस जेव्हा संवाद बोलू लागतात तेव्हा ते संवाद राहत नाहीत, तर त्यांच्या अंतरात्म्यातून उमटलेले ते भावनिक बोल होतात. त्यांचे कीर्तन चालू असताना शिवाजी महाराज त्यांच्या भेटीला येतात. मोगलांना हे समजल्यावर ते महाराजांना पकडण्यासाठी हल्ला करतात. त्यावेळी तुकाराम महाराजांनी प्रत्यक्ष पांडुरंगाला विचारलेल्या जाबातून त्यांची विठ्ठलावरची भक्ती दिसून येते. ‘‘काय? शिवबाला पकडण्यासाठी यवन इकडे येताहेत? पांडुरंगा, तुझे कीर्तन चालू असताना तुझ्या भक्तांवर हा प्रसंग यावा ना! ते काही नाही. देवा, तू जरी आम्हाला दूर लोटलंस तरी आम्ही भक्त काही तुला सोडणार नाही..’’ असे म्हणून ‘फुटो हे मस्तक, तुटो हे शरीर, नामाचा गजर सोडू नये’ अशी आळवणी करीत ते विठ्ठलनामाचा गजर करू लागतात. पुढे शिवबा सुरक्षित आहे हे कळल्यावर पांडुरंगाने आपले ब्रीद राखलं म्हणून ते ‘वानू किती रे सदया विठुराया, दीनवत्सला’ असे म्हणून त्याची स्तुतीही करतात. त्यावेळी त्यांच्या डोळ्यातील अपार भक्तिभाव बरेच काही सांगून जातो. हे सर्व घटना-प्रसंग अगदी वास्तव वाटतात.

शांताराम आठवले यांनी लिहिलेली गीते तर संत तुकारामांच्या अभंगांत इतकी चपखल बसली आहेत, की भक्तिभावाने तल्लीन होऊन तुकाराम जेव्हा ‘आधी बीज एकले, बीज अंकुरले, रोप वाढले’ हा अभंग गाऊ लागतात तेव्हा प्रेक्षकांचीही मने त्यासोबत डोलू लागतात. त्याकाळी कित्येक लोक हा अभंग तुकारामाच्या गाथेत कोठे आहे याचा शोध घेत असत. शांताराम आठवले यांच्या काव्याचा अन् लेखनकौशल्याचा हा कळसाध्याय होता. जेव्हा शिवाजी महाराज त्यांना नजराणा पाठवतात तेव्हा तुकाराम महाराज तो नम्रपणे परत पाठवून आपला निरोप कळवितात..

‘आम्ही तेणे सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे येरवित्त धन, ते मज मृत्तिकेसमान
कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी
म्हणता हरीचे दास, तुका म्हणे मज ही आस’
..आणि हे ऐकल्यावर शिवाजी महाराजांचेही मन अध्यात्माकडे वळू पाहते. पण त्यांना तुकाराम महाराज क्षात्रधर्माची आठवण करून देऊन राजधर्म पाळण्याची विनंती करतात.

प्रत्येक माध्यमाचे स्वत:चे एक कार्य असते. चित्रपट माध्यमालाही ते आहे. प्रभातने ते उत्तमरीत्या हाताळले. वास्तविक पाहता चित्रपट हा दिग्दर्शकाच्या नावाने ओळखला जातो. पण ‘संत तुकाराम’ हा चित्रपट दिग्दर्शक दामले-फत्तेलाल यांचा आहे, पटकथाकार शिवरामपंत वाशीकरांचा आहे, संगीतकार केशवराव भोळ्यांचा आहे, कॅमेरामन व्ही. अवधूत, कला- दिग्दर्शक एस. फत्तेलाल, गीतकार शांताराम आठवले, संकलक ए. शेख, ध्वनी- शंकरराव दामले या सर्वासर्वाचा तो आहे. तसाच तो विष्णुपंत पागनीस यांचाही आहे. त्यांनी मुखातून केवळ ‘पांडुरंग.. पांडुरंग’ असे शब्द जरी काढले तरी त्यातील गोडव्याने वातावरण मंगल आणि भावुक होत असे. भक्तिभावाने ओथंबलेले त्यांचे ते शब्द थेट प्रेक्षकांच्या अंत:करणात जाऊन भिडतात. टाळ-मृदंगाच्या गजरात त्यांनी भक्तिभावाने गायलेले अभंग त्यांच्या मुखावर उमटलेले दिसतात.

१२ डिसेंबर १९३६ रोजी मुंबईच्या सेंट्रल सिनेमामध्ये प्रदर्शित झालेला प्रभातचा हा चित्रपट प्रारंभीच्या तुतारीच्या मंजूळ स्वरापासून ते शेवटच्या वैकुंठगमनाच्या दृश्यापर्यंत प्रेक्षकांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. अनेकदा या तुकारामाला थिएटरमध्ये प्रेक्षक दंडवतही घालीत असत. तंत्रज्ञानाचा विचार करता कैक वर्षे पुढे असलेल्या, कमीत कमी खर्चात व वेळेत तयार झालेल्या या बोलपटास जागतिक मान्यता मिळाली ती १९३७ साली! व्हेनिस येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये पहिली भारतीय एंट्री म्हणून हा चित्रपट दाखविण्यात आला. जगातील तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून ‘संत तुकाराम’ची निवड करण्यात आली. कीर्ती आणि पैसा तर अमाप मिळालाच. या चित्रपटाच्या निर्मितीला हातभार लागला होता तो कलासक्त मने, हात आणि डोळ्यांचा! त्यातूनच ही अजरामर कलाकृती जन्माला आली होती.

पुढे शांतारामबापू प्रभातमधून बाहेर पडले आणि त्यांनी स्वत:ची ‘राजकमल कलामंदिर’ ही संस्था सुरू केली. हळूहळू प्रभातची निर्मिती थांबून तुतारीचा नादही थांबला. प्रभातच्या ठिकाणी फिल्म आणि टेलिव्हिजन संस्था सुरू झाली. प्रभातच्या वैभवशाली परंपरेच्या स्मृती मात्र त्यांच्या अमर कलाकृतींच्या रूपाने सतत जागृत राहिल्या.

अशात पूर्वी फिल्म इन्स्टिटय़ूटचा विद्यार्थी असलेल्या आणि पुढे नामांकित छायाचित्रणकर झालेल्या तिरुअनंतपूरम्च्या सनी जोसेफ यांना १९७९ साली पुण्याच्या लॉ कॉलेज रोडवरून जात असता रस्त्यावरील कचराकुंडीत काही कागद दिसले. त्यात त्यांना ओळखीचे कागदपत्र वाटले म्हणून त्यांनी ते उचलले. त्यात एक हिरवट रंगाचा कागद होता. ४ ऑगस्ट १९३७ रोजी व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘संत तुकाराम’ हा चित्रपट महोत्सवात स्वीकारला गेल्याचे मूळ प्रमाणपत्र होते ते! या ऐतिहासिक ठेव्याचे, प्रमाणपत्राचे महत्त्व, दुर्मीळता व मूल्य याची जाणीव असलेल्या सनी जोसेफ यांना हे प्रमाणपत्र जेव्हा कचराकुंडीत मिळाले, तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यांनी ते अत्यंत प्रेमादराने स्वत:जवळ एक मौल्यवान ठेवा म्हणून जपून ठेवले. २००२ च्या डिसेंबरमध्ये केरळ येथे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या वेळी राष्ट्रीय फिल्म अर्काइव्हचे संचालक सशीधरन् यांना चहापानाच्या वेळी ही हकिकत सनी जोसेफ यांनी सांगितली. २३ मार्च २००४ रोजी स्वत: जोसेफ यांनी हा दुर्मीळ दस्तावेज आणून संचालकांच्या स्वाधीन केला. संचालकांनी मोठय़ा सन्मानाने त्या प्रमाणपत्राची स्थापना फिल्म अर्काइव्हमध्ये केली. असा हा त्या महान चित्रपटाच्या प्रमाणपत्राचा व्हेनिस ते पुणे प्रवास!

त्यानंतरही ‘संत तुकाराम’ यांच्यावर अनेक चित्रपट निर्माण झाले. काहींनी त्यांना न्याय दिला, तर काही तुकारामाच्या वेशात स्वत:च वावरले. काही परीटघडीचे कपडे घालणारे, वास्तवापासून दूर असलेले तुकाराम होते; तर काही खरोखरीच अभिनयसंपन्न होते. पण विष्णुपंत पागनीसांच्या तुकारामाची सर कोणालाही आली नाही. एक साधासुधा विषय जेव्हा त्यातील कलाकारांकडून उच्च प्रतीच्या अभिनयातून भावनात्मकतेने मांडला जातो, तेव्हा ते मानवी आविष्काराचे मौल्यवान दस्तावेज ठरते याचे हा चित्रपट म्हणजे एक उत्तम उदाहरण आहे. दामले-फत्तेलाल यांनी दिग्दर्शित केलेल्या प्रभातच्या ‘संत तुकाराम’ने मागील काही पिढय़ा आणि पुढील पिढय़ांच्याही मनात आदराचे स्थान मिळवून चित्रपट क्षेत्रात एक मानदंड निर्माण केला आहे. कारण तो अभिनयासोबत तांत्रिकदृष्टय़ाही काळाच्या कैक वर्षे पुढे होता!
rajapost@gmail.com