या लेखात काही हिंदी तसेच मराठी गाण्यांच्या संदर्भात सरगमच्या वैशिष्टय़पूर्ण प्रयोगांमुळे त्यातील भावांची अभिव्यक्ती कशी अतिशय तरल, आशयगर्भ समृद्धीनं व्यक्त झालीय, याविषयी मला जाणवलेलं मी तुमच्यापुढे मांडणार आहे..
सर्वप्रथम मला आठवतंय ते ‘साऊंड ऑफ म्युझिक’ या चित्रपटातील मारिया (ज्युली अँड्रूज) हिने मुलांबरोबर गायलेले ‘डो रे मी’ हे गाणं. त्या नटखट, वांड मुलांचं मन जिंकून त्यांना गाणं शिकवताना मारिया अतिशय रंजक आणि सोप्या पद्धतीनं संगीताच्या मुळाक्षरांची ओळख आणि त्यांचा गाण्याच्या रचनेतला प्रयोग समजावत त्यांच्यासह गाऊ लागते. हे सगळं इतकं सुंदर आहे, की ते अनुभवूनच बघावं. त्यातला स्वराक्षरांचा अद्भुत प्रयोग तर लाजवाब. ते श्रेय संगीतकार रिचर्ड रॉजर्स यांचं. ‘परिचय’ या हिंदी चित्रपटाकरिता याच गाण्यावर आधारीत ‘सारे के सारे गामा को लेकर गाते चले.. पापा नहीं है धानी सी दीदी.. दीदी के साथ है सारे..’ असे गीतकार गुलजारकृत सारी स्वराक्षरं गुंफलेल्या या गीताला सुंदर सुरांनी नटवत आशाबाई भोसले, किशोरकुमार आणि बालचमूंच्या समूहस्वरात पंचमदा (आरडी बर्मन) यांनी धमाल बांधलं आहे.
काही गाणी ही रागाधिष्ठित बंदिशीवजा रचली गेल्यानं त्यात सरगमचा वैविध्यपूर्ण प्रयोग झालेला दिसतो. ‘शिवभक्त’ या पौराणिक हिंदी चित्रपटामध्ये संगीतकार चित्रगुप्त यांनी केवळ तराण्याचे (अर्थहीन अक्षरसमूहातून साकारलेले) बोल आणि सरगम यांचाच प्रयोग करून बांधलेलं. ‘(दिम ता).. ताना देरे ना’ हे गाणं लताबाईंच्या अमृतस्वरांतून विलक्षण गारुड घालतं. तर लताबाईंनीच ‘छाया’ चित्रपटाकरता गायलेल्या संगीतकार सलील चौधरींच्या ‘छम छम नाचत आई बहार’ या खरोखरीच बहारदार नृत्यगीतातल्या चमत्कृतीपूर्ण सरगमनं विस्मयचकित व्हायला होतं. पण ‘बुढ्ढा मिल गया’ या चित्रपटातल्या मन्ना डेसाहेबांनी गायलेल्या आणि आर. डी. बर्मन ऊर्फ पंचमदांनी संगीतबद्ध केलेल्या खमाज रागावर आधारीत ठुमरीवजा ‘आयो कहॉं से घन:श्याम’ या अप्रतिम गाण्यात वापरलेली सरगम ही ठुमरीतल्या शृंगारातली नजाकत दाखवत अध्धा तालातल्या मात्रांबरोबर लडिवाळ, नखरेल अंदाजानं उलगडते.. ‘सजधज तुमरी का कहू रसिया’ या ओळीनंतर येणारी मनभावन सरगम शब्दापलीकडलं काही सांगून जाते. हेच तत्त्व ‘दिल ही तो है’ चित्रपटातल्या आशाबाईंनी अमर केलेल्या ‘निगाहें मिलाने को जी चाहता है’ या बेमिसाल कव्वालीमध्ये आढळते. या कव्वालीतल्या लयकारीयुक्त सरगमीतून नायिकेच्या प्रणयभावातली अधीर उत्कटता अतिशय तरलतेनं व्यक्त झालीय. काही गाण्यांमध्ये संगीतकारांनी गाण्याच्या मुखडय़ामध्ये अर्थवाही शब्दांऐवजी सरगमचा फार सुंदर प्रयोग केलाय. उदा. ‘सारे गरे सानी.. तिनक तीन तानी’ (चित्रपट- ‘सरगम’, संगीतकार- सी. रामचंद्र, गायिका- लताबाई आणि सरस्वती राणे), ‘निसागमपनिसारेग.. आ आ रे मितवा’ (चित्रपट- ‘आनंदमहल’, संगीतकार- सलील चौधरी, गायक- येसुदास). तर ‘सारेगम पऽ पऽपऽपऽ प प पप ध म रे.. गा रे मेरे संग मेरे साजना’ (चित्रपट- ‘अभिनेत्री’, संगीतकार- लक्ष्मीकांत-प्यारेलाल, गायक- लताबाई व किशोरकुमार) या गाण्याच्या मुखडय़ातला व अंतऱ्यातला सरगमचा विलक्षण प्रयोग गाण्यातला खटय़ाळ शृंगार रंगवतो. ‘छुपके छुपके’ चित्रपटाकरिता थोरले बर्मन- सचिनदांनी ‘सा रे ग म’ या चार स्वरांची अत्यंत कल्पक आणि मजेदार गुंफण करून ‘सारेगामा मसारेग गसारेम मगरेसा’ अशी मुखडय़ाची पहिली ओळ, तर ‘पधपम मपमग रेपमग मगरेसा’ अशी दुसरी ओळ अप्रतिम रचलीय. इतकी सुंदर, की इथे एरवी गीतातल्या अर्थवाही शब्दांची उणीव जराही भासत नाही. सरगमच्या अप्रतिम प्रयोगातून बर्मनदांनी या गाण्यातून निर्मिलेला हास्यरस एकमेवाद्वितीयम्च.
सरगमचा गाण्याच्या संगीतखंडातला प्रयोग हाही विविध पद्धतीनं झालेला आढळून येतो. ‘जिया ले गयो रे मोरा सावरिया’ (चित्रपट- ‘अनपढ’, संगीतकार- मदनमोहन, गायिका- लता मंगेशकर), ‘पवन दीवानी.. ना माने..’ (चित्रपट- ‘डॉ. विद्या’, संगीतकार- सचिनदेव बर्मन, गायिका- लता मंगेशकर), ‘केहना है क्या..’ (चित्रपट- ‘बॉम्बे’, संगीतकार- ए. आर. रेहमान, गायिका- चित्रा) या गाण्यांतल्या अंतऱ्यापूर्वीच्या संगीतखंडात ‘बॉम्बे’ची नायिका मुस्लिम असल्यानं ए. आर. रेहमाननं स्वत: कव्वालीबाजात हार्मोनियम व तबल्याच्या साथीत गायलेली जोशपूर्ण सरगम केवळ सरगम न उरता नायिकेच्या व्यक्तिरेखेला ठळक करते.
असाच सुंदर प्रत्यय सचिनदा बर्मन यांनी ‘बम्बई का बाबू’ या चित्रपटाकरिता संगीतबद्ध केलेल्या ‘दीवाना मस्ताना हुवा दिल..’ या गाण्याच्या अगदी सुरुवातीच्या संगीतखंडात दिलाय. ‘पमगऽ मरेग पम गम’ या सरगमपाठोपाठ छोटासा आलाप आणि पुन्हा ‘सानीधपमगरेसा नीऽ नीऽ नीऽ’ अशा सरगमीतून ‘दीवाना मस्ताना हुवा दिल..’ हा मुखडा अवतरतो. आशाबाई आणि रफीसाहेबांनी गाण्यातली नायक-नायिकेची मस्तीखोर छेडछाड आणि शंृगार शब्दांबरोबरच या सरगमगायनातून अफलातून पेश केलाय.
सरगमचा विलक्षण नाटय़मय वापर ‘मुनीमजी’ या चित्रपटातल्या ‘घायल हिरनिया मैं बन बन डोलू..’ या गाण्यात सचिनदा बर्मनसाहेबांनी केलाय. नायिका वनविहार करताना स्वत:ची प्रणयोत्सुक भावना गाण्यातून व्यक्त करताना पक्ष्याच्या कूजनाशी सरगमीतून संवाद करते. पण पुढे अचानक तिच्या समोर साक्षात् वाघ उभा ठाकल्यावर तिची वळलेली बोबडीही सरगमच्या अडखळत्या, तर कधी अतिजलद उच्चारीत गायनातून अतिशय नाटय़पूर्णतेनं प्रकट होते आणि भयाची भावना एरवी अर्थहीन असलेल्या सरगमद्वारा बेहतरीनरीतीनं मुखरित होते. सचिनदांच्या प्रतिभेला लाख लाख सलाम! त्यांच्याच प्रतिभेचं आणखी एक उदाहरण म्हणजे ‘गाईड’ या चित्रपटातल्या ‘मोसे छल किये जा.. देखो हा सैया बेइमान’ या गाण्याच्या अंतऱ्यामध्ये ‘समझा के मैं तो हारी.. धमकाया दीनी गारी..’ यातली गारी (गाली = शिवी) ‘नीनी नीनी रेरे गग मम पप धऽनी साऽऽ साऽऽ साऽऽ’ अशा सरगममधून त्यांनी अत्यंत प्रत्ययकारी पद्धतीनं साकारलीय. शेवटच्या तीन ‘साऽऽ’द्वारा केलेला प्रियकराचा धिक्कार.. आजपर्यंत इतक्या सुंदर पद्धतीनं शिवी दिलेली मी कधीही ऐकली नव्हती. क्या बात है सचिनदा! भीषोण शोन्दोर!
सरगमीतून उत्कट भावाविष्काराची अतिशय उत्तम उदाहरणं म्हणजे मराठी रसिकांच्या मर्मबंधातल्या ठेवी असलेली दोन गाणी.. पहिलं संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांनी स्वरबद्ध केलेलं, आशाबाईंच्या अमृतस्वरांनी भिजलेलं ‘जिवलगा.. राहिले रे दूर घर माझे..’ या गाण्यात अंतऱ्यापूर्वीचा संगीतखंड म्हणून आशाबाईंनी गायलेली सरगम ओढणाऱ्या पावलांची कासाविशी सांगणाऱ्या तबल्याच्या ठेक्याबरोबर लयकारी करत जी रसिकश्रोत्याला व्याकूळ.. विव्हळ करते, त्याबद्दल संगीतकार आणि गायिका दोघांनाही दाद द्यायला हवी. दुसरा असाच सुंदर प्रयोग म्हणजे पंडित जितेंद्र अभिषेकीबुवांनी संगीतबद्ध केलेलं आणि गायलेलं ‘ययाती आणि देवयानी’ या नाटकातलं पद. ‘सर्वात्मका सर्वेश्वरा..’ यातली शेवटची सरगम म्हणजे ईश्वराप्रति संपूर्ण समर्पणाची भावना व्यक्त करणारी अलौकिक रचना आहे.
‘सरगम’ चित्रपटाकरिता गाणी लिहिताना पी. एल. संतोषी या गीतकारानं एका गाण्यात सरगमचे गुणगान फार सोप्या, सुंदर शब्दांत केलंय..
‘बडा जोर है सात सुरों में.. बहते आसू जाते है थम
जब दिल को सताये गम.. तू छेड सखी सरगम’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा