जांपॉल सार्त् या फ्रेंच नाटककाराचं एक प्रचंड गाजलेलं नाटक आहे- ‘No Exit’… ‘बंद दरवाजे.’ दिल्लीला माझं वास्तव्य असताना हे नाटक मी इंग्रजीतून बसवायला घेतलं होतं. नाटकात तीनच पात्रं आहेत. दृष्ट लागावी असा संच मला मिळाला होता. गारसँच्या भूमिकेसाठी हबीब तन्वीर, इनेझसाठी हबीबची बायको मॉनिका आणि एस्तेलसाठी मधुर जाफरी. कुणाच्यातरी गच्चीमध्ये आमच्या तालमी चालत, एवढं आठवतं. हे नाटक वेगवेगळ्या अडचणींमुळे रंगमंचावर येऊच शकलं नाही. (खरंच दृष्ट लागली!) माझ्या मनात मात्र ते कायमचं घर करून राहिलं. त्याचा कथाविषय असा : तीन मृतात्मे नरकात पोहोचतात. सेवक त्यांना एका साध्या, बंदिस्त खोलीत आणून सोडतो. नरक म्हणजे उकळत्या तेलाची कढई, तापलेल्या लालबुंद सळ्या, अक्राळविक्राळ चाबूकधारी यापैकी काहीच नव्हतं. ‘तुम्ही तिघांनी या खोलीत राह्य़चं. दरवाजा कायम बंद राहील. हाच तुमचा नरक,’ असं सांगून सेवक निघून जातो. हळूहळू त्या तिघांच्या लक्षात येतं की, सक्तीचा हा लादलेला सहवास हाच त्यांचा नरकभोग आहे. Hell is other people. इतरेजनांचा सहवास हाच नरकवास! मानवजातीबद्दल केवढा हा दारुण निराशावाद!
‘आलबेल’ भाग २
गच्चीवर केलेल्या त्या तालमींना चाळीसएक वर्षे लोटून गेली. तेव्हापासून मी ‘No Exit’ची किती पारायणं केली असतील त्याची गणती नाही. दरवेळेला नव्याने मी सार्त्रच्या लेखनसामर्थ्यांने प्रभावित होत असे. पण त्याचबरोबर असंही वाटत राही, की हा मनुष्यप्राण्याबद्दल इतका उद्विग्न, इतका कडवट का? माणसानं माणसाला नेहमी खाली लोटावं का? एकमेकांना हात देऊन वर खेचणारी माणसंही आहेतच की! माणुसकीचा स्नेहमंत्र जपणारी कितीतरी माणसं सभोवताली आढळतात. आम मानव.
तर काही कारणास्तव बंदिवासात एकत्र कोंडून राहिलेली अशी साधी माणसं एकमेकांचे तारणहार नाही होऊ शकणार? का नाही? आणि मग ही आनंददायी संकल्पना खोल मनामध्ये साठून राहिली.. रुजत राहिली.. आणि मग खूप वर्षांनी तिला अचानक अंकुर फुटला. तीन पात्रांचं एक संपूर्ण नाटक पालवलं. ते मी पाच दिवसांत लिहून काढलं. म्हणजे हे नवीन नाटक लिहायला म्हटलं तर मला चार दिवस लागले, म्हटलं तर चाळीस वर्षे!
एक तुरुंगाची कोठडी. खुनाच्या आरोपाखाली असलेल्या कैद्यांसाठी राखलेली. पडदा वर जातो तेव्हा कोठडीत दोन कैदी दिसतात. एक आपल्या दगडी बंकरवर भकास बसून आहे, तर दुसरा सूर्यनमस्कार घालतो आहे. थोडय़ा वेळाने गार्ड तिसऱ्या इसमाला घेऊन येतो. त्याला आत लोटतो आणि दाराला कुलूप लावून निघून जातो. नवा आलेला कैदी बाप्पा पांडुरंग बेंद्रे. बाप्पागुरुजी. बाप्पांनी पन्नाशी ओलांडली आहे. मध्य महाराष्ट्रामधल्या एका घनदाट जंगलात ते आदिवासी मुलींसाठी शाळा चालवतात. ही शाळा वास्तविक त्यांच्या बहिणीने आणि मेहुण्यांनी सुरू केलेली असते. बाप्पांचे वास्तव्य आधी मुंबईला असते. पण एका भीषण आगीमध्ये त्यांची पत्नी दगावते आणि मुलीचे डोळे जातात. तेव्हा मुंबई सोडून ते आश्रमशाळेत येतात. वनवास पत्करतात. हेतू हा, की आपल्या वाढत्या अंध मुलीला सुरक्षा मिळावी आणि विधवा बहिणीलाही थोडी मदत व्हावी. बाप्पा सुसंस्कृत आणि विद्वान आहेत. सुभाषिते, दाखले आणि म्हणींनी नटलेली त्यांची भाषा अलंकृत आहे. त्यांना नाटय़संगीताचे पण अंग आहे. मधूनच ते नाटकातले एखादे पद छेडतात.
सदा साधा, सरळ आणि भावुक तरुण आहे. रागाच्या भरात खून केल्याच्या आरोपावरून तो सजा भोगतो आहे. तो बी. ए.- बी. एड्. आहे. बाप्पांच्या शाळेचं वर्णन ऐकून त्याच्यातला शिक्षक जागा होतो. तुरुंगातून सुटल्यावर आश्रमशाळेला भेट देण्याची इच्छा तो बोलून दाखवतो.
भैरव भुस्कुटे सरळसरळ ‘सुपारी मारेकरी’ आहे. तो अलिप्त, स्वत:मधे गर्क असतो. बोललाच, तर तुटक, नाही तर उर्मटपणाने. त्याला क्रिकेटचे वेड आहे. सतत कोठडीत ‘बोलिंग’ करत इकडून तिकडे धावत राहतो. आल्या-गेल्या गार्डला चालू मॅचचा क्रिकेट स्कोर विचारीत राहतो. केव्हातरी कोठडीच्या वरच्या बाजूच्या खिडकीकडे पाहून तो जिवाच्या आकांताने हंबरडा फोडतो.
बाप्पा ‘मुक्कामी’ आल्या आल्या सदाशी हात मिळवून ओळख करून घेतात. भैरवला त्याचे नाव विचारताच तो तोंड फिरवतो. मग बाप्पा पिशवी खुंटीला टांगून आपल्या चौथऱ्यावरती बसतात. विसावतात आणि गाणं गाऊ लागतात.. ‘परवशता पाश दैवे..’ गाणे रंगात येते, तोच भैरव त्यांच्या पुढय़ात उभा ठाकतो.
भैरव : ए ए ऽऽऽ गप्! का उगाच कोकलतोय्स?
बाप्पा : (गोंधळून गाणं थांबवीत) ओ ऽऽ सॉरी.
सदा : (रागावून) का रे? इतकं चांगलं गाणं ऐकलंस कधी? गुळाची चव हवी ना!
भैरव : सवय नाही आपल्याला चांगल्याचुंगल्याची. जीव घाबरल्यागत होतो.
सदा : बाप्पा, गा हो तुम्ही.बाप्पा : नाही. राहू दे. सूर विरून गेले. हरवले.. सापडतील. (भैरव बाप्पांपुढे उभाच आहे. टक लावून.)
भैरव : भैरव. भैरव भुईफोड.. नाव आपलं!
बाप्पा : भैरव भुईफोड? जरा कपोलकल्पित वाटतं.
भैरव : (न समजून) अँ? काय वाटतं?
बाप्पा : खोटं!
भैरव : खोटंच आहे ते. स्क्रीन-नेम घेतलं आहे मी. माझं खरं नाव गुळचॅट आहे अगदी. भुसे. मुकुंद भुसे. बेकार! भुसभुशीत. आपल्या धंद्याला साजत नाही.
आणि इथपासून भैरवचा तणाव थोडा ढिला होऊ लागतो. बाप्पांचा सहवास आणि सदाचा मित्रभाव यांच्या प्रभावामुळे त्याच्यातला माणूस हळूहळू जागा होतो. बाप्पांचे वाचन दांडगे असल्यामुळे आपल्या साठय़ामधून नित्यनव्या गोष्टी, किस्से ते सोबत्यांना ऐकवतात. ‘No Exit’ चे कथानक ऐकल्यावर दोघे हरखून जातात.
सदा : विलक्षण!
बाप्पा : आता त्या तिघांच्या जागी आपण आहोत म्हणा ना.
सदा : फरक एवढाच, की आपण जिवंत आहोत. जिवंतपणी नरकवास वाढून ठेवला आहे आपल्या नशिबात. कसं?
बाप्पा : छे छे. आपण गुण्यागोविंदाने राहिलो तर या खोलीचं नंदनवन करता येईल आपल्याला. स्वर्ग. (सदा, भैरव खदखदा हसतात.)
सदा : ही कोठडी नंदनवन? स्वर्ग..? माफ करा बाप्पा. स्वर्गाबद्दलच्या कल्पना जरा वेगळय़ा होत्या माझ्या. प्यायला अमृत (हातातला चहाचा पेला पाहतो.) आणि भोवती सुंदर अप्सरा. रागवू नका, पण तुम्हा दोघांना रंभा-उर्वशी समजायचं, हे जरा अवघडच आहे.
पण खरोखरच त्या कोठडीतील घुसमट थोडी निवळते. भैरवची बोलिंग, सदाचे सूर्यनमस्कार आणि बाप्पांचे गायन यांच्या जोडीला अधूनमधून थट्टामस्करीचे पडसाद ऐकू येतात. तिघे आपापली कर्मकहाणी, आपापल्या गुन्ह्य़ाचा कबुलीजबाब एकमेकांना ऐकवतात.
बाप्पा आपल्या आश्रमशाळेचं मोठय़ा अभिमानाने वर्णन करतात. निसर्गकन्यांच्या जोडीने त्या गर्द वनश्रीमध्ये अंध सगुणा शिकते आहे.. उमलते आहे. पण नंदनवनात साप शिरतो. तालुक्यात एक नवा समाजकल्याण अधिकारी बदलून येतो. लाचखाऊ आणि लंपट. बाप्पा खंबीर उभे असल्यामुळे त्याचे काही चालत नाही. तो संधीच्या शोधात राहतो. अखेर ती गवसते. शाळेच्या कामासाठी बाप्पांना दहा दिवस दिल्लीला जावं लागतं. परत येतात, तो हाहाकार संस्थेत. बरोबर गुंड आणून रोज एकेका मुलीला या लांडग्याने घरी नेऊन विटाळलेलं असतं. मोफत वाचनालयामधून मासिकं न्यावीत तसा तो आश्रमातून आलटूनपालटून मुली घेऊन जातो. बाप्पा निर्भयपणे तक्रार नोंदवतात. जोरात चौकशी सुरू होते. ‘..तर मी सापाच्या शेपटीवर पाय दिला.’ पुढचा वृत्तान्त D.V.D. चित्रणाद्वारे मागे पडद्यावर उमटतो.
आपल्या छोटय़ा खोलीमध्ये सगुणा पलंगावर बसून झेंडूच्या माळा गुंफते आहे. खिडकीमधून एक इसम डोकावतो. तिला एकटी पाहून त्याचे डोळे लकाकतात. तो आत येतो. दाराला कडी लावतो. सगुणाच्या खांद्यावर हात ठेवतो. हा बाप्पा नाही, हे तत्काळ उमजून ती धास्तावते. दोघांची झटापट होते. त्यात ती खिडकीवर आदळते. काचेचे तावदान फुटते. तो इसम सगुणाला पलंगावर ढकलतो. झेंडूची फुलं उधळतात. एवढय़ात बाप्पा खिडकीमधून फुटलेल्या काचांच्या महिरपीमधून हे दृश्य पाहतात. सगुणाची केविलवाणी धडपड चालू आहे. तकलादू दरवाजावर लाथ मारून बाप्पा ते केव्हाच फोडतात आणि सुसाट आत घुसतात. त्यांच्या रक्तबंबाळ हातामध्ये अणकुचीदार काचेची कटय़ार आहे. पिसाट आवेशाने ते इसमावर वार करतात. पुन्हा, पुन्हा, पुन्हा..
सदाची सजा भोगून संपत आली आहे. पुढच्या महिन्यात तो सुटणार असतो.
बाप्पा : अरे वा! वाट पाहत असतील
बायका-पोरं.
सदा : पोरं नाहीत मला. बायको होती. ती वारली.
बाप्पा : अरेरे!
सदा : खून झाला तिचा.. मीच केला.
भैरव : (काल्पनिक बॉल फेकतो.) विकेट!
सदा : लाखात एक होती मधुरिमा.. किती सुंदर क्षण आठवावेत?
आणि मग या सुंदर क्षणांचा छायापट पडद्यावर उलगडत जातो. वैवाहिक जीवनाचे भावस्पर्शी, बोलके क्षण. या चलत्चित्रमालिकेचे शेवटचे दृश्य एका शोभेच्या उपकरणांच्या दुकानात घडते. मधुरिमाला एक सुंदर समई खूप भावते. पण किमतीचे लेबल पाहून दोघं समई परत ठेवून देतात.
नोकरीनिमित्त सदाला सतत दौरा असतो. अशावेळी घरी कंटाळा येतो म्हणून मधुपण नोकरी धरते. त्यांचा लग्नाचा दुसरा वाढदिवस येऊन ठेपतो, पण नेमका सदाचा दौरा उपटतो. काय करणार? जिवाचा आकांत करून तो दौऱ्यावरचे काम आटपून मोठय़ा उत्साहाने लवकर परत येतो. बायकोला गोड धक्का द्यावा म्हणून तिला आवडलेली समई शोभेच्या कागदात गुंडाळून त्याने आणली आहे. खोलीचे दार उघडताच त्याला नको ते दृश्य दिसते. मधुरिमा कुणा परक्या इसमाच्या बाहुपाशात आहे. तो इसम त्वरित पळ काढतो. क्रोधाने वेडापिसा झालेला सदा समई बायकोच्या डोक्यात घालून तिची हत्या करतो.. आणि पोलीस चौकीत दाखल होतो.
भैरवची कहाणी वेगळीच आहे. बालपणी तो एक गोड आणि सालस मुलगा म्हणून ओळखला जाई. कुणाची पोरं सांभाळ, कुणाचे पाय चेप, कुत्र्यामांजरांना दवापाणी कर- अशी कामे आवडीने करायचा. त्याच्या शब्दांत- ‘म्हणजे मस्त छोटी फॅमिली होती आमची. सिनेमात दाखवतात नं, तश्शी. आन् मग फिल्लमसारखंच झालं की! नशीब डाऊन झालं. बाबाला झटका आला. पॅरालिटिकचा. र्अध अंग लुळं पडलं. कुस्ती खेळणारा सहा फुटी मर्द गडी बिछान्यावर उताणा पाहावेना. पार घसरण सुरू झाली. बाबाची नोकरी गेली, तशी आमची शाळा बंद! आईनं धुण्याभांडय़ाची कामं धरली. आधी बाप जगत नाही म्हणून नशिबाला कोसलं.. मग मरत नाही म्हणून. आईचे हाल बघवंनात.. बारा वर्षांचा होतो. मग एका रात्रीत बाप्या झालो. ठरवलं! बाबाची सुटका करायची. त्याला फुल चार डोस झोपेच्या गोळय़ा चारल्या.. एका रात्रीत खेळ खल्लास. दादा एव्हाना गुन्हेगारीच्या गाळात खोल गचकांडय़ा खात होता.. मग मी पण हजर झालो.. दादापाठी. एक-दोन वर्षांत गँगवॉरमध्ये कुणी दादाला उडवला. माझ्या मांडीवर तडफडून मेला तो. आपला वारसा आणि पिस्तूल देऊन गेला जाताना.. बस्स! मग आपली लाइन ठरली. काडतूस कलाकार! सुपारी किलर. ठय़ू: ठय़ू: ठय़ू: ..’
आणि मग आपल्या कामगिरीची रसभरीत जंत्री भैरव ऐकवतो. त्याचं पहिलं सावज भावाला ठार करणारा मारेकरी (‘पत्त्याच्या अड्डय़ावर टिपलं साल्याला.’) मग चालत्या लोकलमध्ये उडवलेला हिऱ्यांचा एक व्यापारी, नाइट क्लबमधल्या एका नाचणारीची ऐन नाचाच्या गिरकीत घेतलेली फिरकी, दोन बिल्डरच्या लफडय़ात एकाची सुपारी घेऊन केलेला दुसऱ्याचा खून, पुढे दहा दिवसांनी खून झालेल्याच्या मुलानं दिलेली सुपारी- पहिल्याला उडवायला. मग काय? एकाच मामल्यात डबल कमाई!
सदा : पण तू आधी ज्याचे पैसे घेतलेस, त्यालाच उडवलंस? अरे, काही इमान आहे की नाही?
भैरव : इमान? एका कंत्राटापुरतं इमान. आमच्या धंद्यात ‘जनम जनम का साथ’ नसतो साहेब. हा करार, हा मुडदा. ही रोकड, हा सलाम! बिल्डर लॉबीमधले दोन गुंड उडवले म्हंजे समाजकार्यच की!
बाप्पा : अरे, हा आधी बोलत नव्हता तेच बरं होतं.
सदा : फुल्ल ड्रामा करतोय भैरव. थरारनाटय़.
भैरव : म्हटलं ना? कलाकार आहे आपण.
सदा : कलाकार? कसाई म्हण. आपल्या हत्याकांडांचं वर्णन करताना तुझं काळीज कसं नाही गोठलं?
भैरव : काळीज असेल, तर गोठणार! आणि तू कोण मला बोलणार? तू दुधाची आंघोळ करतोस काय? तुम्ही दोघांनी बी खून केला आहे. बाप्पांनी मुलीच्या बचावापायी खून केला.. तू भावनेच्या भरात खून केला.. मी थंड डोक्यानं खून केला.. पण सव्र्याचा निकाल तोच की. होत्याचा नव्हता केला आपण. जित्या माणसाला सपाट केलं. तेव्हा आपण तिघं सेम टु सेम!
बाप्पा : (खिन्न हसून) एका माळेचे मणी!
तर नाटकात अशी ही तीन पात्रं आहेत. नट निवडताना जराही तडजोड करायची नाही, निवड चोख करायची- असा माझा कटाक्ष होता. बाप्पांसाठी पन्नाशीच्या घरामधला, सुसंस्कृत वाटेल असा आणि शास्त्रोक्त गाण्याचे अंग असलेला कलाकार हवा होता. ही अवघड अपेक्षा होती. पण माझ्या डोक्यात बसवलेला कॉम्प्युटर आता कामी आला. सुमारे दहा वर्षांपूर्वी माझ्या ‘साज’ या चित्रपटाच्या संदर्भात मी एका गायक नटाच्या शोधात होते. तेव्हा मी श्रीकांत दादरकरांना भेटले होते. ती भेट माझ्या चांगलीच लक्षात राहिली होती. दादरकरांनी खडय़ा आवाजात दोन-तीन पदं म्हटली होती आणि संवादपण भावपूर्णरीत्या पेश केले होते. ती तेव्हाची भूमिका त्यांनी नाही केली (रघुवीर यादव अखेर निवडला गेला.), पण त्यांची प्रतिमा ठामपणे कॉम्प्युटरमध्ये नोंदवली गेली होती. आता आम्ही परत भेटलो. त्यांना पाहिलं आणि मनात म्हटलं, ‘हेच बाप्पा!’ सुसंस्कृत. प्रशांत व लोभस व्यक्तिमत्त्व.. आणि शिवाय नाटय़संगीताची उत्तम जाण. त्यांच्या संगीत वर्गाच्या कार्यक्रमाच्या वेळा सांभाळण्याचं मी कबूल केलं आणि बाप्पा पक्के झाले. सदासाठी तिशीचा भावनाप्रधान नट हवा होता. अभिनयनिपुण आणि शिस्त पाळणारा. तिघा-चौघांकडून एकच नाव सुचवले गेले. उमेश जगताप. उमेश खरा नाटकप्रेमी होता. अनेक हौशी नाटय़संस्थांमधून त्याने महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या. तोही सदा म्हणून मेळ्यामध्ये सामावला. राहता राहिला भैरव. भैरवच्या भूमिकेसाठी खूप शोध करावा लागला. मला हवा तसा नट मिळेना. ‘भाडोत्री मारेकरी’ म्हणून तो भीतीदायक तर वाटला पाहिजे; पण जोडीला त्याचे व्यक्तिमत्त्व आकर्षक, छाप पडेल असेही असले पाहिजे- असा माझा काहीसा विचित्र (विसंगत?) आग्रह होता. अखेर असा नट मिळाला. मिलिंद शिंदे. मिलिंद शिंदे हे माझ्यासारखेच NSD चे माजी छात्र होते, तेव्हा साहजिकच ही जमेची बाजू ठरली. त्याखेरीज अनेक मराठी चित्रपटांमधून महत्त्वाच्या भूमिका केल्यामुळे त्यांचे नाव सुपरिचित होते. त्यांच्या ‘दिलेल्या’ तारखा सांभाळून तालमी आणि प्रयोग करायचे असं आमचं ठरलं. संच तर छान जमला!
नाटकाला नावही छान, समर्पक सापडलं. तुरुंगाच्या आवारामधून रात्री गस्त घालताना आपला दंडुका आपटत गार्ड ‘आऽऽलबेल’ अशी आरोळी ठोकत जातो. ‘आलबेल’ हा ‘All is well’चा भ्रष्ट मराठी अवतार. ‘सगळं ठीकठाक’!
दीपा गेहलोत ही NCPA ची प्रमुख कार्यक्रम नियोजिका होती. आपल्या जबाबदारीबद्दल ती प्रचंड जागरूक होती. प्रेक्षकांना नित्य नवे आणि दर्जेदार देण्याचा तिचा अखंड प्रयत्न असे. दीपा मुंबईची एक नावाजलेली सिनेपरीक्षक आणि जाणकार होती. तिची माझी खूप जुनी दोस्ती. चहाच्या टेबलावर गप्पा मारताना मी तिला ‘आलबेल’ची माहिती दिली आणि मग NCPA च्या छत्राखाली ते सादर करण्याबद्दल आमची चर्चा झाली.
मराठी नाटक- तेही माझे ‘आलबेल’ करण्याची कल्पना आम्हा दोघींना रोचक, रोमांचक वाटली. तो निश्चितच एक धाडसी उपक्रम ठरणार होता. किती धाडसी, याची कल्पना तेव्हा कुणालाच आली नाही. (भाग-१)
‘आलबेल’
जांपॉल सार्त् या फ्रेंच नाटककाराचं एक प्रचंड गाजलेलं नाटक आहे- 'No Exit'... ‘बंद दरवाजे.’ दिल्लीला माझं वास्तव्य असताना हे नाटक मी इंग्रजीतून बसवायला घेतलं होतं.
आणखी वाचा
First published on: 17-08-2014 at 06:43 IST
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sartres play no exit as band darwaze in marathi