राम खांडेकर

नरसिंह रावांनी जगाचा निरोप घेतला तरी ते दोन महत्त्वाचे आदर्श वा मार्गदर्शक तत्त्वे पुढील पिढय़ांकरता आणि येणाऱ्या राज्यकर्त्यांसाठी मागे ठेवून गेले. त्यातले पहिले तत्त्व म्हणजे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापती ही घटनात्मक पदे कोणत्याही पक्षाची व्यक्ती भूषवत असली तरी पदग्रहण केल्यानंतर ती त्या पक्षाची न राहता जनतेची सेवक असते आणि म्हणून तिने आपली जबाबदारी नि:पक्षपातीपणे पार पाडायची असते. दुसरे तत्त्व- विरोधी पक्षांचे सदस्य हे केवळ विरोधक असतात; शत्रू नसतात. त्यांच्याशी सदैव संवाद साधत आणि चर्चा करून त्यांचे सहकार्य मिळवले तर देशाच्या विकासास गती मिळू शकते.

नरसिंह रावांचे विरोधी पक्षांशी नेहमीच जिव्हाळ्याचे संबंध राहिले. यासंबंधी देशाच्या इतिहासात प्रथमच घडलेल्या एका महत्त्वपूर्ण घटनेचा उल्लेख करायला हवा. एकदा संयुक्त राष्ट्रांमध्ये एका विषयावर चर्चा करण्यासाठी भारतीय प्रतिनिधी मंडळ पाठवावयाचे होते. साधारणपणे त्याचे नेतृत्व पंतप्रधान वा परराष्ट्रमंत्री किंवा सत्ताधारी पक्षातील व्यक्ती करत असते. परंतु नरसिंह रावांनी त्यासाठी विरोधी पक्षनेते अटलबिहारी वाजपेयी यांची निवड करून सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला. अटलजींनी आपल्या वक्तृत्वाने संयुक्त राष्ट्रांमध्ये छाप पाडली. या परिषदेला जाण्यापूर्वी अटलजी नरसिंह रावांना भेटण्यासाठी आले होते. संबंधित विषयाबाबत चर्चा झाल्यावर नरसिंह राव त्यांना म्हणाले, ‘‘वाजपेयीजी, परदेशात जाताच आहात तर तिथे प्रकृतीचीही निष्णात डॉक्टरांकडून पूर्ण तपासणी करून घ्या. परतण्याची घाई करू नका. मी भारतीय राजदूतांना तशा सूचना दिल्या आहेत. इथे तुम्हाला त्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे प्रकृतीची हयगय होते.’’ माणुसकीचे असे उदाहरण क्वचितच आढळते.

दुसरी गोष्ट.. विरोधी पक्षांचे अनेक नेते  नरसिंह रावांना सतत भेटत असत. वाजपेयी साधारणत: दोन-तीन आठवडय़ांतून एकदा त्यांना अवश्य भेटत असत. ही भेट दोन पक्षाध्यक्षांची नसे, तर दोन विचारवंतांची, साहित्यिकांची असे. वाजपेयी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी नरसिंह रावांचेच धोरण पुढे चालू ठेवले, त्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे.

नरसिंह रावांना आणखी पाच वर्षांचा कार्यकाळ मिळाला असता तर देशांतर्गत दुर्लक्षित अशा अनेक घटकांचा विकास झाला असता. उदाहरणार्थ, आसामसारख्या दुर्गम भागांतील आदिवासींचा. आसामात अशी अनेक गावे आहेत, जिथल्या लोकांना दोन पदार्थही धडपणे शिजवता येत नाहीत. ज्ञानदीपही त्यांच्या जीवनात कधी उजळला नाही. महाराष्ट्रातील अनेकजण घरदार सोडून या लोकांच्या आयुष्यात बदल घडावा यासाठी तिथे स्थायिक झाले आहेत. अनेक राज्यांत आदिवासी क्षेत्राचा समावेश आहे. नरसिंह रावांनी अशा सहा-सात ठिकाणी जाऊन तिथल्या लोकांबरोबर तीन-चार तास घालवून त्यांचे वास्तव समजून घेतले. या आदिवासींच्या आहाराचा भाग असलेल्या कंदमुळे-बोरांचा मनसोक्त आस्वादही त्यांनी घेतला आणि मलाही घ्यायला लावला. या लोकांना विकासाच्या गंगेत समाविष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी काही योजनाही आखल्या होत्या.

दुसरा वर्ग म्हणजे शेतकरी; जो गेल्या काही वर्षांपासून हालअपेष्टा भोगतो आहे. एकदा रावांनी महाराष्ट्र व उत्तर प्रदेशातील काही शेतकरी खासदारांना बोलावून शेतकऱ्यांच्या विकासासाठी त्यांना संघटित कसे करता येईल, याबद्दल आपले विचार मांडले. त्यावर साधकबाधक चर्चा करून काही योजना आखण्यास त्यांनी सुचविले होते.

तिसरा मुद्दा- सौरऊर्जेचा! कितीही विद्युतगृहे उभारली तरी देशातील दुर्गम भागात वीजपुरवठा करणे शक्य होत नाही. त्यामुळे  सौरऊर्जेशिवाय पर्याय नाही, हे ध्यानात घेऊन त्यादृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले होते.

नरसिंह राव पंतप्रधान झाले तरी त्यांना माणुसकीचा कधीच विसर पडला नव्हता. बारीकसारीक गोष्टी त्यांच्या नजरेस आणताच त्यावर ते ताबडतोब कारवाई करीत. १९९५ च्या २४ सप्टेंबरला एका वर्तमानपत्रात बातमी प्रसिद्ध झाली होती- ‘शहीद हमीद की विधवा पत्नी पती की मजार (थडगे) पर जाने को तरस रही है. तीस साल बाद भी उनकी विधवा पत्नी के लिए यह एक सपना बना हुआ है.’ नव्या पिढीच्या  माहितीसाठी सांगावेसे वाटते की, हवालदार अब्दुल हमीद याने १९६५ च्या भारत-पाक युद्धात पाकिस्तानी सेनेला सळो की पळो करून सोडले होते आणि त्या धुमश्चक्रीत तो शहीद झाला होता. त्यासाठी हमीदला मरणोत्तर ‘परमवीर चक्र’ देण्यात आले होते. त्याची समाधी भारत-पाक सीमेवरील खेमकरण सेक्टरमध्ये आहे. त्याच्या पराक्रमाचे गुणगान आजही गायले जाते. नरसिंह रावांना ही बातमी दाखवताच त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांची मानसिकता लक्षात घेऊन तातडीने यासंदर्भातील व्यवस्था रेल्वेने नव्हे, तर हेलिकॉप्टरने करण्याच्या सूचना दिल्या. आणि हमीदची पत्नी रखुलनबी ही त्यांचे चार नातेवाईक आणि एका मौलवीसह हमीदच्या समाधीला व त्याच्या युनिटला भेट देऊन आली. एवढेच नव्हे, तर पुढे जाऊन नरसिंह रावांनी तिच्या घराच्या दुरुस्तीसाठी आणि दैनंदिन गरजा भागवण्यासाठी नियमित आर्थिक मदत देण्याच्या सूचना कॅन्टोन्मेंट बोर्डाला दिल्या.

त्याच वर्षी २६ जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या  आणखी एका बातमीने नरसिंह रावांचे लक्ष वेधून घेतले होते. बातमी अशी की.. ‘हॉकीसम्राट ध्यानचंद यांच्या पत्नीची बिकट आर्थिक परिस्थिती पाहून हॉकी फेडरेशनने एक लाखाचा धनादेश तिला पाठवला होता, पण तो वटवला गेला नाही.’ ध्यानचंदच्या पत्नीने कोणताही अर्ज केलेला नसतानाही केवळ ही बातमी वाचून नरसिंह रावांनी आपल्या पंतप्रधान निधीतून ताबडतोब एक लाखाचा धनादेश ध्यानचंद यांच्या पत्नीला पाठवला होता.

क्रांतिकारक भगतसिंगांचे साथीदार आणि त्यांच्याबरोबर तुरुंगात शिक्षा भोगलेले स्वातंत्र्यसैनिक शिव वर्मा वयाच्या ९३ व्या वर्षी हलाखीचे दिवस काढत आहेत, हे कळताच नरसिंह रावांनी त्यांना ताबडतोब आर्थिक साहाय्य पाठवले होते. अशी अनेक उदाहरणे देता येतील. परंतु प्रश्न पडतो तो हा, की लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी, राज्य सरकारचे स्थानिक प्रशासक यांच्या लक्षात या गोष्टी का येत नाहीत?

व्यापारी लखूभाई पाठक प्रकरणात सहआरोपी ठरवले गेल्यानंतर पक्षाची नामुष्की होऊ नये म्हणून नरसिंह रावांनी अनेकांचा विरोध असूनही कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. इतरांच्या दृष्टीने ही घटना नरसिंह रावांनी स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखीच होती. लवकरच नरसिंह रावांना तसा अनुभवही आला. कारण पक्षाचे अनुभवी, वरिष्ठ नेते म्हणून मोठय़ा विश्वासाने नरसिंह रावांनी सीताराम केसरी यांना अध्यक्ष केले होते. मात्र, केसरींनी केवळ चारच दिवसांत आपले खरे दात दाखवण्यास सुरुवात केली. दिल्ली दरबाराची ही परंपराच आहे. नरसिंह रावांना केसरी यांनी जणू  वाळीतच टाकले. काँग्रेसची बरीच भुते केसरींच्या सेवेत हजर झाली आणि नरसिंह रावांना काँग्रेस कार्यकारिणीतून बाहेर कसे काढता येईल, या विचाराने त्यांनी प्रयत्न सुरू केले. १९९७ च्या मार्चमध्ये काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीस प्रकृती बरी नसल्यामुळे नरसिंह राव जाऊ शकत नव्हते. त्याबाबत त्यांनी पक्षाध्यक्ष केसरींना लिहिलेले पत्र घेऊन मी ते देण्यासाठी पक्ष कार्यालयात गेलो. तर तिथे पत्रकार, टीव्ही कॅमेरामन, फोटोग्राफर यांचा घोळका होता. केसरींचे बरेच भाटही तिथे हजर होते. केसरींना पत्र देऊन मी बाहेर आलो तर मला विचारणा झाली की, ‘‘नरसिंह रावांनी राजीनामा पाठवला का?’’ मी विचारले, ‘‘कशासाठी? ते येऊ शकत नाहीत म्हणून ते पत्र होते.’’ हे ऐकताच केसरींच्या चमच्यांनी मला धक्काबुक्की सुरू केली. काही कॅमेरामन, फोटोग्राफर यांच्या लक्षात ही गोष्ट येताच त्यांनी मला घेरून पुढील अनुचित घटना टाळण्यासाठी माझ्याशी बोलण्याचे नाटक करत मला तिथून बाहेर काढले आणि ताबडतोब तिथून निघून जाण्यास सुचवले.

केसरींच्या वागणुकीमुळे आणि खुर्चीला सलाम करण्याच्या काँग्रेसजनांच्या अंगवळणी पडलेल्या परंपरेमुळे नरसिंह राव हळूहळू एकटे पडत गेले. पक्षातील काही मोजकी मंडळी सोडली तर इतर नेते त्यांच्याकडे फिरकेनासे झाले. महत्त्वाचे म्हणजे दिल्लीतील निरनिराळ्या देशांचे राजदूत मात्र अधूनमधून त्यांना भेटत असत. त्यांना या हिऱ्याची किंमत माहीत होती. नरसिंह रावांचा बहुतेक वेळ संगणकावर आत्मकथन लिहिण्यात जात असे. याच काळात त्यांनी आपल्या आत्मचरित्राचा पहिला भाग ‘इनसाइडर’ लिहून प्रकाशित केला. नंतर त्याचे अनेक भाषांत भाषांतर झाले. हे पुस्तक मराठीतही ‘अंतस्थ’ या नावाने प्रसिद्ध झाले. परंतु त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील महत्त्वाचा असा दुसरा भाग मात्र प्रकाशित होऊ शकला नाही, हे भारतीय इतिहासाचे दुर्दैव!

१९९८-९९ साली लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका झाल्या. त्यावेळी केसरींनी नरसिंह रावांना तिकिटाबद्दल विचारलेही नाही. नरसिंह रावांना वनवासात पाठवायचे खरे कारण होते- केसरींना पडणारी पंतप्रधानपदाची स्वप्ने! हे पद आता आपल्याला जणू मिळणारच आहे, या आनंदात त्यांची वाटचाल सुरू होती. परंतु त्यांचे हे स्वप्न स्वप्नच राहिले. त्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला. त्यामुळे गेली चार-पाच वर्षे सत्तेसाठी प्रचंड आतुरलेले आणि त्याकरता सोनिया गांधी यांनी पक्षाचे नेतृत्व स्वीकारावे यासाठी पडद्याआडून सतत प्रयत्नशील असलेले काँग्रेसजन अधिकच सक्रीय झाले आणि सोनिया गांधी यांनी कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व करण्याचे मान्य केले. केसरींना इतक्या अपमानास्पदरीतीने कॉंग्रेसच्या पक्षाध्यक्षपदावरून काढले गेले, की ते ती जखम आयुष्यभर विसरू शकले नसतील.

नरसिंह रावांना खरे तर आता कशातही रस उरलेला नव्हता. सरकारचा कारभार ज्या पद्धतीने आणि ज्या दिशेने चालला होता तो पाहून ते अतिशय कष्टी झाले होते. त्यांनी पहिल्यांदाच २००१ मध्ये वर्तमानपत्रांतून सरकारच्या धोरणांवर टीका करणारे लेख लिहून आपले मन मोकळे केले. यापैकी एका लेखात ते म्हणतात- ‘आज देशासमोर अनेक महत्त्वाचे प्रश्न असताना सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची विक्री घाईने का केली जात आहे? हे तर दैनंदिन गरजांचे बिल भागवण्यासाठी घर विकण्यासारखेच आहे! उदारीकरण वाईट नाही; गरज आहे ती ते चांगल्या प्रकारे हाताळले जाण्याची.’

थोडक्यात, भारतीय दर्शन, संस्कृती, भाषा, साहित्य आणि न्यायशास्त्राचा अभ्यास असणारे, तसेच सतत देशाच्या सर्वागीण विकासाचा, तळागाळातील जनतेचा, पक्षाचा विचार करणारे, लक्ष्मीचे नव्हे तर सरस्वतीचे पूजन करणारे नरसिंह राव मनाने आता खचले होते. त्यांना सर्वच क्षेत्रांतील दुर्दशा बघवत नव्हती. आणखी एका गोष्टीचे शल्य त्यांना बोचत होते. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी दोन-तीन दिवस आधी ते हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे पोर्चमध्ये उन्हात बसलेले असताना त्यांनी मला बोलावले आणि विनोदाने म्हणाले, ‘‘खासगी सचिवांनी आपल्या चलतीच्या काळात पैशाअडक्याची तरतूद करण्याची पद्धत दिल्लीत प्रचलित आहे. नाही तर तुम्ही!’’ परंतु नंतर त्यांनी आपल्या अंत:करणातील यातना बोलून दाखवली.. ‘‘ज्यावेळी लोक मला पैसे आणून द्यायचे तेव्हा मी घेतले नाहीत. आणि आज मला सहा वर्षे चाललेल्या खटल्यासाठी वकीलच काय, त्याच्या सहकाऱ्यांना एक पैसाही देता येत नाहीये. काय ही माझी अवस्था!’’ खरोखरच वकिलांना पैसे न देता आल्यामुळे त्यांच्या उपकाराच्या ओझ्याखालीच नरसिंह रावांनी जगाचा निरोप घेतला होता, हे सत्य आहे. पंतप्रधानपदी असताना त्यांनी स्वत:साठी एक इंचभरही जमीन घेतली नाही की दहा बाय दहाची साधी खोलीही घेतली नाही. त्यांच्या बँक खात्यातली पुंजीही बेताचीच होती. आश्चर्य म्हणजे ज्या उद्योगपतींना त्यांनी जागतिकीकरण आणि आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारून सुगीचे दिवस आणले, जगात प्रतिष्ठा मिळवून दिली, त्यांच्यापैकी एकानेही पुढे नरसिंह रावांकडे ढुंकूनदेखील पाहिले नाही. ही खरी शोकांतिका होती!

नरसिंह रावांच्या मृत्यूची बातमी समजताच दोन सरकारी दूत (तेही मराठी!) माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, ‘‘नरसिंह रावांच्या मुलांना सुचवा, की त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारांसाठी हैदराबादला न्या.’’ यामागे महत्त्वाचे कारण असे होते की, नरसिंह रावांचा ‘न’ जरी दिल्लीत राहिला तरी त्यांच्या कर्तृत्वाच्या इतिहासाने नेहरू-गांधी घराणे पडद्याआड जाण्याची धास्ती काही मंडळींना वाटत होती. यामुळेच काँग्रेस अधिवेशनानिमित्त प्रकाशित होणाऱ्या स्मरणिकेत नरसिंह रावांच्या नावासोबत फोटोऐवजी रिकामी चौकट असे. मी त्या सरकारी दूतांना स्पष्टच सांगितले, ‘‘नरसिंह रावांची मुलं माझं ऐकतीलच याची खात्री नाही. त्यामुळे ते काम तुम्हालाच करावं लागेल.’’ मृतदेह येईपर्यंत ही मंडळी तीन-चारदा तरी येऊन गेली. शेवटी मी त्यांना म्हटलं, ‘‘रावांचा मृतदेह आल्यानंतर, मुलांचा शोक थोडा कमी झाल्यावर आलात तर यासंबंधात त्यांच्याशी बोलता येईल.’’ कोणत्याही माजी राष्ट्रपती व पंतप्रधानांना अंत्यसंस्कारांसाठी राजघाट परिसरात जागा द्यायची नाही असा निर्णय तेव्हाच्या मंत्रिमंडळाने घेतला होता. परंतु ती काही दगडावरची रेघ नव्हती. पुढे वर्षभरातच माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन यांचे निधन झाले तेव्हा याच मंत्रिमंडळाने त्यांचे अंत्यसंस्कार राजघाट परिसरात करण्यास परवानगी दिली होती. हा निर्णय घेणारे पंतप्रधान होते डॉ. मनमोहन सिंग. ज्यांना मानाचे स्थान नरसिंह रावांनीच मिळवून दिले होते. मात्र, ते यावेळी मूक दर्शक होऊन हे सगळं पाहत होते.

नरसिंह रावांची मुलं सुरुवातीला थोडी नाखूश होती, परंतु मग नाइलाजाने हैदराबाद येथे अंत्यसंस्कार करण्याचे त्यांनी मान्य केले. मृतदेह ‘९, मोतीलाल नेहरू मार्ग’ येथे आल्यावर औपचारिकता म्हणून बरेच व्हीआयपी येत होते. अंत्यदर्शनासाठी दिल्लीकरांची गर्दी होईल म्हणून सेवादलाने आपले स्वयंसेवक उभे केले होते. परंतु तास-दीड तासात फारसे कोणी फिरकले नाही. त्यामुळे ही मंडळी निघून गेली. या कृतघ्नतेला काय म्हणावे? सोनिया गांधींचा आपल्यावर रोष ओढवू नये म्हणून फारसे काँग्रेस कार्यकर्तेही आले नाहीत. विमानतळाकडे रवाना होण्यापूर्वी काही क्षणांकरिता नरसिंह रावांचा मृतदेह काँग्रेस मुख्यालयात श्रद्धांजलीसाठी नेण्यात आला. परंतु कहर म्हणजे तिथेही मृतदेह कार्यालयात न नेता बाहेरच ठेवण्यात आला होता. ही नरसिंह रावांच्या पार्थिवाची विटंबना होती की भारतीय संस्कृतीची? रामायणात रावण मृत्यूशय्येवर असताना रामाने लक्ष्मणाला सांगितले होते, ‘वैर हे रणांगणावरच्या माणसाशी असते, मृतदेहाशी नाही.’ त्यानंतर रावणाचा मृतदेह सन्मानाने लंकेत पाठवण्याची व्यवस्था केली गेली होती. ही आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. पण तिची जाण असेल तर ना! नरसिंह रावांचे पार्थिव हैदराबादला अग्नीच्या स्वाधीन केल्यानंतर त्यांचा उजवा हात व मेंदूचा भाग जळला नव्हता. ही बाब तिथल्या रक्षकाने लक्षात आणून दिल्यावर आणखी लाकडे रचण्यात आली. नरसिंह रावांनी आयुष्यभर याच हाताने व मेंदूने सरस्वतीची पूजा केली होती. त्यास स्पर्श करण्याचे धाडस अग्नीलासुद्धा झाले नसावे. वर्तमानपत्रांनी मात्र या घटनेचे वर्णन ‘निष्काळजीपणा’ या सदरात केले.

राव यांचा मृतदेह बंगल्याबाहेर गेल्यानंतर त्यांच्या मुलीने व जावयाने (जो आयपीएस अधिकारी होता!) सर्व खोल्यांना कुलूप लावून मलासुद्धा बंगल्याबाहेर जाण्यास सांगितले. ‘आता दिल्लीबाहेरचे अनेक व्हीआयपी येतील. तसेच मला वर्तमानपत्रांसाठी लेख लिहायचे आहेत आणि सर्व कागदपत्रे, टाईपरायटर इथेच असल्याने मला इथे राहणे गरजेचे आहे,’ असे मी त्यांना म्हटले. पण माझे काहीच ऐकून न घेता ते मला धाकदपटशा दाखवून तिथून बाहेर काढू बघत होते. खरे तर मला तिथून बाहेर काढण्याचा अधिकार फक्त पंतप्रधान कार्यालयाला होता. परंतु नको तो तमाशा नको म्हणून मी घरी निघून आलो. त्यांची समजूत अशी होती की, माझ्या कपाटात नरसिंह रावांचे लाखो रुपये आहेत. हे जोडपे त्याआधीच्या सहा-सात वर्षांत दिल्लीत कधीच फिरकले नव्हते. जिथे नरसिंह रावांकडे वकिलांना देण्यासाठीही तेव्हा पैसे नव्हते, तिथे ते माझ्याजवळ कुठले पैसे ठेवतील, याची या  जोडप्याला कल्पना नव्हती. काही वर्तमानपत्रांतून ही बातमी प्रसिद्ध झाल्यावर या कुटुंबाचीच बदनामी झाली होती.

धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची दोन मुले आणि मुली ‘९, मोतीलाल नेहरू मार्गा’वर पॅकर्स, कुली व ट्रकसहित आले. रावांची दोन्ही मुले सज्जन होती. त्यापैकी प्रभाकर राव तर नरसिंह रावांचा मदतनीसच होता. त्यांच्या शेवटच्या दुखण्याच्या काळात तो सदैव दिल्लीत होता. नरसिंह राव शेवटच्या आजारपणात दवाखान्यात असताना रात्री साडेदहा वाजता त्यांचा मला फोन आला, ‘‘तुम्ही कुठे आहात?’’ मी म्हणालो, ‘‘घरी आहे.’’ तर ते म्हणाले, ‘‘तुम्ही घाबरता कशाला? तुमचे काही वाईट होणार नाही. शेवटपर्यंत तुमचे चांगलेच होईल. विश्वास ठेवा.’’ त्यानंतर ते पाच-सात मिनिटे असंबद्धपणे बोलत राहिले. मी प्रभाकर रावांना फोन करून घडला प्रकार सांगितला. त्यानंतर ते ताबडतोब रुग्णालयात गेले.

तर- सामानाचे सर्व पॅकिंग मुलींच्याच देखरेखीखाली होत होते. मुलांना त्याच्याशी काही देणेघेणे नव्हते. पण मुलींची लालसा मात्र इतकी तीव्र होती, की माझ्या स्टोअर रूमचे कुलूप माझ्याकडे त्याची किल्ली न मागता त्यांनी ते तोडले. शिवाय गोदरेजच्या कपाटांची कुलपेही त्यांनी तोडली.

नरसिंह रावांची पहिली पुण्यतिथी त्यांचे शेवटचे वास्तव्य असलेल्या याच बंगल्यात साजरी करण्याचा माझा मानस होता. म्हणूनच मी नरसिंह रावांच्या निधनानंतर दिल्लीतील मुक्काम वाढवला होता. पुण्यतिथीच्या कार्यक्रमास पंतप्रधान हजर राहणार होते. पण ऐनवेळी त्यांनी येणे टाळले. कारण बहुधा ‘वरून’ कान उपटले गेले असावेत! पहिल्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमासही मोजकेच काँग्रेसजन हजर होते. त्यातही कृतघ्नपणा इतका, की २३ डिसेंबरला रावांची पुण्यतिथी होती आणि २० डिसेंबरला बंगला सोडण्याबाबतची नोटीस बंगल्यात आणून न देता दारावर चिटकवली गेली.

..१० जानेवारी २००६ रोजी मी दिल्ली सोडली. ती सोडताना ४३ वर्षे वास्तव्य केलेल्या वन बीएचके फ्लॅटची आणि गेली जवळपास १६-१७ वर्षे स्वयंपाकघराच्या खिडकीत एक कावळा त्याच्यासाठी ठेवलेले फरसाण खाण्यासाठी वर्षांचे बाराही महिने खिडकी उघडताच येत असे त्याची आठवण मनात तेवत राहिली. फरसाण टाकण्यासाठी उशीर झाला की तो कावळा चोच मारत असे. मी लोकांना नेहमीच सांगतो- ‘जिवंतपणीच मला अनेकदा कावळा शिवला आहे, तर पिंडाला कावळा शिवण्यासाठी धार्मिक विधी कशासाठी?’ आम्ही दोघांनीही हाच निर्णय घेतला होता. माझ्या पत्नीच्या निधनानंतर कोणतेही धार्मिक विधी न करता त्या रकमेत थोडी भर टाकून आम्ही ती एका वृद्धाश्रमास दिली. तिच्या मृत्यूदिनी तिथल्या वृद्धांना जेवण देताना जो आनंद आम्हाला त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो, तो धार्मिक विधींत कधीच मिळण्याची शक्यता नाही. तो कावळा आमच्या कुटुंबातलाच एक झाला होता. सवडीने जेव्हा मी पुढील व्हरांडय़ात उभा राहून दात घासत असे तेव्हा तो माझ्या अगदी जवळ येऊन बसत असे. जाणाऱ्या-येणाऱ्यांना त्याचं आश्चर्य वाटत असे.

नागपूरला आल्यानंतर पत्नीने मला तीन अटी घातल्या होत्या. तिने माझ्यासाठी ज्या यातना सोसल्या, त्या पाहता त्या मला मान्य कराव्याच लागल्या. पहिली- घरात राजकारणाच्या गप्पा आणि राजकारण्यांचा सहवाससुद्धा नको. दुसरे म्हणजे पत्रकारांना घरात प्रवेश व मुलाखती देऊ नये. आणि तिसरी- राजकारणाशी संबंधित लेख लिहायचे नाहीत, ही! वाचकहो, यामुळेच माझी पत्नी ३ नोव्हेंबर २०१६ ला शेवटचा निरोप घेऊन गेल्यानंतर ही लेखमाला लिहिण्याचे साहस मी केले आहे.

नागपूर हे ३० लाख वस्तीचे शहरवजा गाव आहे. मी कोण आणि काय होतो, याच्याशी कोणालाच- अगदी आमच्या जवळ राहणाऱ्यालाही देणेघेणे नाही. मी आज मिळणाऱ्या पेन्शनमध्ये सुखशांती आणि समाधानाने आयुष्य व्यतीत करीत आहे. माझ्यासारख्या सर्वसाधारण, मध्यमवर्गीय कुटुंबातील माणसाला पंतप्रधानांचे खासगी सचिव म्हणून काम करायचे भाग्य मिळाले यापेक्षा अधिक काय हवे! जीवनाचे सार्थक झाले. परदेशात भारतीय प्रतिनिधी मंडळाचा सदस्य म्हणून गेल्यानंतर पंतप्रधान जेव्हा त्या देशाच्या पंतप्रधानांना, त्यांच्यासोबतच्या प्रतिनिधी मंडळाला ‘ही इज मिस्टर खांडेकर.. माय प्रायव्हेट सेक्रेटरी’ अशी ओळख करून देत असत तेव्हा अंगावर मणभर मांस चढल्याचा आनंद होत असे.

वाचकहो, इथेच आपला ऋणानुबंध संपला. अर्थात लेखमालेपुरता! माझ्या सर्वच लेखांचे असंख्य वाचकांनी- ज्यात डॉक्टर, इंजिनीअर, वकील, विद्यार्थी, प्रशासनातील व्यक्ती आदींनी- भरभरून स्वागत केले. ई-मेल, टेलिफोन करून, तर काहींनी प्रत्यक्ष भेटून कौतुक केले. अनेकांनी भेटण्याची इच्छाही व्यक्त केली. या असंख्य वाचकांच्या अभिप्रायांबरोबरच आपुलकी, जिव्हाळा, सद्भावना व सदिच्छांचा महापूरच आला होता गेल्या वर्षभराच्या काळात!  खरं तर या लेखमालेसाठी मी बरेच साहित्य गोळा केले होते, परंतु वाचकांची आवड लक्षात घेऊन मनात साठलेले अनुभवच स्मरणशक्तीला ताण देऊन माझ्या डायरीच्या आधारे लिहिण्याचे ठरवले. त्याला इतका प्रचंड प्रतिसाद मिळेल असा स्वप्नातही विचार केला नव्हता. वाचकहो, आपल्यामुळे माझ्या समाधानात आणखी अमूल्य भर पडली. याबद्दल मी तुमचा सदैव ऋणी असेन!

ram.k.khandekar@gmail.com

(समाप्त)

Story img Loader