|| राम खांडेकर
तो दिवस होता २७ मे १९६४. वेळ दुपारची. सूर्य आग ओकत होता. रस्त्यावर सामसूम होती. अचानक मोटारींचे, स्कूटरचे हॉर्न सतत वाजत असल्याचा आणि रस्त्यावरील वर्दळ वाढल्याचा भास झाला म्हणून मी बंगल्यातून बाहेर येऊन पाहतो, तो दूर दूपर्यंत गाडय़ा पार्क करून लोक पंतप्रधान निवासाकडे.. ‘तीन मूर्ती’कडे जात होते. कुतूहलाने चौकशी केली तेव्हा अतिशय धक्कादायक आणि देशाला शोकसागरात बुडवणारी बातमी कळली : पंडित नेहरू गेले.. आपल्या लाडक्या नेत्याचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी ती गर्दी झाली होती.
चीनच्या अकल्पित आक्रमणामुळे भारतीय सैन्याची झालेली दुर्दशा आणि नंतर झालेल्या चौकशीत परराष्ट्र नीतीवर ठेवला गेलेला ठपका नेहरूंच्या वर्मी लागला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत गेली होती. परंतु ते असे आकस्मिकरीत्या जातील याची कुणालाच कल्पना नव्हती. याचं कारण १५ दिवसांपूर्वीच यशवंतराव काही अधिकाऱ्यांसह आधुनिक शस्त्रास्त्रांच्या खरेदीसाठी अमेरिकेला गेले होते. यशवंतराव दिल्लीबाहेर गेले की बंगल्याची आणि वेणूताई असल्या तर त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी माझ्यावर येई. आणि निश्चिंत मनाने यशवंतराव प्रवासास जात. दर महिन्याला कमीत कमी १२-१३ दिवस आणि शनिवार-रविवारसहित परदेश दौरा असला तर आठ ते पंधरा दिवस माझा मुक्काम बंगल्यावरच असे. या काळात दोन मैलांवर घर असूनही आम्हा पती-पत्नीचा संवाद केवळ टेलिफोनवरच होत असे. थोडक्यात, हा माझ्या नोकरीचा एक भाग होता आणि आम्ही तो आनंदाने स्वीकारला होता. विषयांतर झाले तरी, बंगल्यावर का राहावे लागत होते, याचा खुलासा आवश्यक आहे.
त्याचे असे झाले की, यशवंतरावांसोबत दिल्लीला गेल्यानंतर आमचा मुक्काम त्यांच्याच बंगल्यावर एका बेडरूममध्ये होता. नाश्ता, जेवण वगैरे सर्व तिथेच. तिथूनच ऑफिसला जायचे व परत बंगल्यावर यायचे, ही दिनचर्या. दिल्लीला जाण्याच्या आनंदापुढे रोटी-कपडा-मकान याची माणसाला गरज असते याचा मला पूर्ण विसर पडला होता. आठ-दहा दिवसांनी मात्र याची आठवण झाली तेव्हा डोळ्यांसमोर काजवे चमकले. यशवंतरावांच्या बंगल्यावर किती दिवस राहायचे म्हणून निवारा शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले. नवीन कॅबिनेट मंत्र्यांच्या दोन खासगी कर्मचाऱ्यांना ‘आऊट ऑफ टर्न’ सरकारी क्वार्टर देण्याचा नियम असल्याने हा प्रश्न फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवडय़ात सुटला. त्यावेळी संरक्षण खात्याला महत्त्व आले असल्यामुळे आम्हाला कार्यालय व बंगल्यापासून साधारणत: दीड-दोन मैलावर असलेल्या लोधा कॉलनीत वन बेडरूमचे क्वार्टर मिळाले. क्वार्टरचे इंग्रजांच्या वेळचे बांधकाम पाहून मनात आले- बांधकाम करावे तर इंग्रजांनीच! काही दिवसांतच यशवंतरावांच्या सामानासोबत मुंबईहून माझेसुद्धा सामान (एक सोफासेट, एक लोखंडी पलंग, गोदरेज कपाट) आले होते. ते क्वार्टरवर घेऊन गेलो. तोवर यशवंतराव ‘१, रेस कोर्स रोड’ या बंगल्यात राहायला गेले होते. त्यांना आपली अडचण होऊ नये म्हणून मी क्वार्टरमध्ये राहण्यास जायचे ठरवले होते. वेणूताईंना हे कळले तेव्हा त्यांनी यशवंतरावांच्या कानावर ही गोष्ट घातली. रात्री जेवण झाल्यानंतर त्यांनी मला बोलावून घेतले. ‘क्वार्टरमध्ये गेल्यावर जेवणाचे काय करणार? स्वयंपाक करता येतो का तुम्हाला? दिल्लीची, इथल्या लोकांची तुम्हाला माहिती तरी आहे का?’ वगैरे अनुत्तरित करणारे प्रश्न विचारून- ‘‘एकटे आहात तोपर्यंत इथेच राहायचे. पुन्हा असा विचार करू नका. तुम्हाला काही अडचण होत असेल तर सांगा,’’ असं त्यांनी बजावलं. मुंबईहून आपल्यासोबत आणलेल्या व्यक्तीची सर्वतोपरी जबाबदारी आपली आहे याची जाणीव त्यांना होती. अशी आपुलकी राज्यकर्त्यांमध्ये क्वचितच आढळते.
दिल्लीत संसार थाटेपर्यंत- म्हणजे जवळपास एक वर्ष बंगल्यावरच राहिल्यामुळे मी चव्हाण कुटुंबाचाच एक सदस्य झालो होतो. यशवंतराव आणि कधी कधी वेणूताई दिल्लीबाहेर असताना मी बंगल्यावर असल्याने काळजी नसते, हा अनुभव आल्यामुळे नेहमीसाठी बंगल्यावरची डय़ुटी माझ्याकडे आली. ते सत्तेवर असतानाच नव्हे, तर नसतानाही काही वेळा मी आणि कधी आम्ही उभयता बंगल्यावर राहायला गेलो होतो. यानिमित्ताने मी अनुभवलेले यशवंतरावांच्या अंतरंगाचे इतरांना न दिसलेले पैलू उलगडून दाखवण्याचा मोह मला आवरता येत नाहीए.
मुंबईत यशवंतरावांकडे रुजू होऊन जेमतेम सहा महिनेही झाले नव्हते त्यावेळची गोष्ट. ‘आई आजारी असून तिचे हे अखेरचे दुखणे असावे.. तरी सवड असेल तर एक दिवस येऊन भेटून जा..’ अशा आशयाचे वडिलांचे पत्र मला आले. म्हणून मी खासगी सचिवांची परवानगी घेऊन दुसऱ्या दिवशी नागपूरला जाण्याचे ठरवले होते. सकाळी लवकर कार्यालयात जाऊन काम संपवत असताना बंगल्यावरून साहेबांनी बोलावले असल्याचा फोन आला. ‘नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्नं’ तशी काहीशी माझी स्थिती झाली होती. टॅक्सी करून बंगल्यावर गेलो. मूतखडय़ाच्या शस्त्रक्रियेमुळे यशवंतरावांना एक महिना विश्रांती घेण्यास सांगितलं गेलं होतं. साडेअकराला पोहोचूनही तीन वाजेपर्यंत त्यांनी डिक्टेशनला न बोलावल्यामुळे मी त्यांना निरोप पाठवला- ‘माझी आई आजारी आहे. मी सायंकाळच्या गाडीने नागपूरला जात आहे. त्यामुळे अधिक वेळ थांबणे मला शक्य नाही.’ खरं तर माझा हा धाडसी निर्णय ऐकून मुख्यमंत्र्यांनी चिडायला, रागवायला हवे होते. परंतु यशवंतराव ताबडतोब आले आणि त्यांनी मला डिक्टेशन दिले. आईला काय झाले म्हणून त्यांनी विचारले तेव्हा वडिलांचे पत्रच त्यांना दाखवले. ते वाचल्यानंतर मी कार्यालयात लवकर पोहोचावे म्हणून त्यांनी मला गाडीने सोडण्याची व्यवस्था केली.
काम संपवून मी घरी येऊन तयारी करून निघणार एवढय़ात कार्यालयाचा कर्मचारी नागपूरमधील ‘डेप्युटी डायरेक्टर, हेल्थ’ यांच्या नावे यशवंतरावांच्या खासगी सचिवांचे पत्र घेऊन आला. घाईत असल्याने मी ते पत्र न वाचताच खिशात ठेवून स्टेशनवर गेलो. गाडीत बसल्यावर मी ते पत्र वाचले. मुख्यमंत्र्यांतर्फे खाजगी सचिवांचे ते पत्र होते व त्यात आई बरी होण्यासाठी जे काही औषधोपचार आवश्यक आहेत ते ताबडतोब करण्याच्या सूचनावजा आदेश होता तो. ते पत्र पाहताच मेडिकल कॉलेजमध्ये स्वतंत्र रूमसहित सर्व व्यवस्था ताबडतोब झाली. दोन दिवसांत आईच्या प्रकृतीत फरकही पडला होता. परंतु शेवटी मात्र हार पत्करावी लागली. तिसऱ्या दिवशी हृदयविकाराच्या धक्क्याने तिचा मृत्यू झाला. यशवंतरावांना ही बातमी कळताच त्यांनी निरोप पाठवला- ‘येण्याची घाई करू नका.’ अर्थात हा त्यांचा मोठेपणा होता. परंतु त्यांच्या मराठी पत्रव्यवहाराचे काम माझ्या अनुपस्थितीमुळे अडून राहील याची मला जाणीव होती.
१५ दिवसांनी मी मुंबईला गेलो. एक दिवस डिक्टेशन दिल्यावर त्यांनी माझ्या घरची विचारपूस केली. नागपुरात माझे वृद्ध वडील आणि दोन लहान भाऊ राहत असून, लग्न झालेला मोठा भाऊ भाषिक राज्यरचनेमुळे इंदूरला गेला असल्याचे आणि तो पुन्हा महाराष्ट्रात परत येण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे त्यांना माझ्या बोलण्यातून समजले. त्यानंतर त्यांनी मुख्य सचिवांना बोलावून माझ्या भावाची बदली शक्यतो लवकरच नागपूरला होईल अशी व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. आश्चर्य म्हणजे दोन-अडीच वर्षांत जे झाले नाही ते केवळ आठ दिवसांत झाले! माझ्या भावाची बदली नागपूरला त्याच्याच विभागात झाली. हे सगळं मी न सांगता वा तशी अपेक्षाही न करता यशवंतरावांनी आपणहून केले. अशा विशाल मनाच्या व्यक्तीकरता दहा-बारा दिवसच काय, महिनाभर जरी बंगल्यावर राहावे लागले असते तरी मी राहिलो असतो. माझ्या पत्नीनेसुद्धा मला माझ्या या कर्तव्यात पूर्ण साथ दिली.
आपल्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला आदराची, योग्य ती वागणूक दिली पाहिजे असा यशवंतरावांचा कटाक्ष असे. त्यांच्या सर्व नातलगांनासुद्धा त्यांनी तशा सूचना दिल्या होत्या. स्वत: यशवंतराव सर्वाना आदराने वागवत.
एकदा अपघातात पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे त्यांचा २०-२१ वर्षांचा पुतण्या दिल्लीला आला होता. एक दिवस त्याला आलेला फोन घेण्यासाठी तो कार्यालयात गेला. तिथे असलेले खासगी सचिव डोंगरे यांनी त्याला आतल्या खोलीतील एक्स्टेंशनवर फोन घेण्यास सुचवले. कारण तिथे अभ्यागत बसले होते. परंतु त्याला काय दुर्बुद्धी सुचली कोण जाणे. तिथेच फोनवर बोलण्याचा त्याने अट्टहास धरला. खासगी सचिव त्याला फोन देईनात म्हणून तो मोठय़ाने ओरडू लागला. त्याचे दुर्दैव असे, की त्याच वेळी यशवंतराव भेटीला आलेल्यांना सोडण्यासाठी पोर्चपर्यंत आले होते. आरडाओरड ऐकून त्यांनी कसला गोंधळ आहे याची चौकशी केली. तेव्हा पुतण्या खासगी सचिवांबरोबर हुज्जत घालत असल्याचे त्यांना कळले. त्यांनी पुतण्याला बोलावले. त्याचे वागणे यशवंतरावांना सहन झाले नव्हते. त्याचं वय, पायाचं फ्रॅक्चर वगैरे काहीही लक्षात न घेता त्यांनी त्याच्या थोबाडीत इतक्या जोराने मारली, की तो ही गोष्ट आयुष्यभर विसरला नसेल. साहेबांचा आवाज ऐकून वेणूताई बाहेर आल्या. साहेबांचा चिडलेला चेहरा पाहून त्यासुद्धा काही बोलल्या नाहीत. खासगी सचिवांना त्यांनी बोलावून सांगितले की, ‘उद्या सकाळच्या विमानाने याला मुंबईला पाठवण्याची ताबडतोब व्यवस्था करा.’ मंत्री, त्यांची अपत्ये, नातेवाईक खासगी सचिवाला आपलाच घरगुती नोकर समजतात. मात्र, यशवंतराव त्यास अपवाद होते.
यशवंतरावांची ही संवेदनशीलता प्राण्यांच्या बाबतीतही होती. त्यांनी पाळलेला एक देशी कुत्रा उन्हाळ्यात यशवंतराव कार्यालयात गेले की त्यांच्या वातानुकूलित बेडरूममध्ये येऊन बसत असे. यशवंतरावांची चाहूल लागली की तो ताबडतोब उठून बाहेर जात असे. एकदा त्याला त्यांची चाहूल न लागल्यामुळे तो तसाच झोपून राहिला. ते बघून यशवंतरावांनी रागाने त्याचा उद्धार केला. तो उठून पोर्चकडे गेला. उन्हाळ्याचे दिवस असल्याने त्याच्याकडे कोणी फारसे लक्ष दिले नाही. दुसऱ्या दिवशी जेवणाची वेळ झाली तरी तो आला नाही, हे पाहून आवारात शोधाशोध सुरू झाली. रात्रीही तो आला नाही. यशवंतरावांना तिसऱ्या दिवशी सकाळी हे कळल्यावर त्या दिवसापासून जवळपास पंधरा दिवस सकाळी ९ ते १२ मी गाडीतून आणि सायंकाळी कार्यालय सुटल्यानंतर साहेबांसोबत रात्री साडेआठपर्यंत नव्या-जुन्या दिल्लीतील रस्त्यांवरूनच नाही, तर गल्ल्यांतूनही त्याच्या शोधासाठी हिंडलो होतो. निराश होऊन परतताना यशवंतरावांचा चेहरा अपराध्यासारखा असे. जेवणाकडेही त्यांचे लक्ष नसे. परंतु शेवटपर्यंत तो न सापडल्याने याला आपणच कारण असल्याची खंत त्यांना कित्येक दिवस भंडावत होती.
स्वातंत्र्य संग्रामातील सहकाऱ्यांना, मित्रांना त्यांनी कधी सरकारी पदांची खिरापत वाटली नाही. परंतु त्यांच्या सुखदु:खाच्या, अडीअडचणीच्या वेळी मात्र ते धाऊन जात.
सगळ्या सुखसोयी असूनदेखील बंगल्यातील वास्तव्य मात्र मला बंदिवासासारखे वाटत असे. कार्यालय, बंगला याखेरीज मला तिसरे विश्वच नव्हते. लग्न झाल्याशिवाय यातून सुटका होणार नव्हती. दिल्लीतील परिस्थितीशी, जीवनमानाशी पूर्ण परिचित झाल्याविना संसाराची कल्पना करणे उचित नव्हते. लहान भावाचे लग्न ठरल्यामुळे वडिलांना माझ्या लग्नाची आता घाई झाली होती. १९६३ च्या जानेवारीत तीन-चार दिवसांसाठी वडिलांना व भावंडांना भेटण्यासाठी मी नागपूरला गेलो असताना वडिलांच्या आग्रहास्तव, माझी इच्छा नसतानाही केवळ औपचारिकता म्हणून मी चार मुली पाहिल्या होत्या. त्यानंतर त्याबाबत कधीही चर्चा झाली नाही. परंतु एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात मला- ‘१० मे रोजी तुझे आणि १४ मे रोजी लहान भावाचे लग्न ठरले असून, आठ-दहा दिवस अगोदर नागपूरला ये..’ अशा आशयाचे वडिलांचे धक्कादायक पत्र आले. आणि पाठोपाठ पत्रिकासुद्धा! त्यात मुलगी, तिचे शिक्षण, घराणे, फोटो वगैरे काहीही नव्हते. यशवंतराव-वेणूताईंना मी निमंत्रण दिले तेव्हा मुलीसंबंधी विचारलेल्या एकाही प्रश्नाला मी उत्तर देऊ न शकल्याने यशवंतराव म्हणाले, ‘‘खांडेकर, तुम्ही कोणत्या युगात वावरता आहात? पुण्यातील एका महत्त्वाच्या कार्यक्रमामुळे आम्हाला लग्नाला येणे शक्य नाही; परंतु नंतर मी आठ-दहा दिवसांत नागपूरला येईन तेव्हा तुमच्याकडे नक्की येईन.’’ त्यांनी हे आश्वासन पूर्णही केले. जवळपास ४०-५० मिनिटे मुख्यमंत्र्यांनी माझ्या कुटुंबीयांसोबत वेळ व्यतीत केला. चातुर्मासातील सणवारांसाठी वडीलधाऱ्यांच्या आग्रहास्तव पत्नीला नागपूरला ठेवून मी दिल्लीला परत आलो. या बंदिस्त वातावरणातून दिवाळीपर्यंत तरी सुटका नाही असे गृहीत धरून दिवस काढू लागलो. असो.
..तर विमानतळावरून सरळ ‘तीन मूर्ती’मध्ये जाऊन यशवंतरावांनी नेहरूंना आदरांजली वाहिली. तिथे १०-१५ मिनिटे थांबून त्यांनी इंदिराजींचे सांत्वन केले. इंदिराजी दोन मुलांना घेऊन दु:खी अंत:करणाने बसल्या होत्या. परतताना मोटारीत यशवंतराव म्हणाले, ‘‘नेहरूंच्या निधनापेक्षा पुढील आयुष्याची चिंता इंदिराजींच्या चेहऱ्यावर अधिक दिसली.’’ हे त्यांचे निरीक्षण यशवंतरावांवरील पुढील टीकेला उत्तर तर होतेच; परंतु याच घटनेची पुनरावृत्ती पुन्हा झाली होती, म्हणून हे लक्षात ठेवले पाहिजे. नेहरूंच्या निधनामुळे यशवंतरावांना झालेल्या दु:खाची कल्पना करणे अशक्य होते. नेहरूंचा यशवंतरावांवर इतका विश्वास होता, की तिन्ही सेनादले सुसज्ज करण्याच्या दृष्टीने यशवंतराव घेत असलेल्या निर्णयांचे व त्यांच्या अंमलबजावणीचे ते कौतुक करीत असत. त्यांत त्यांनी कधीही हस्तक्षेप केला नाही. यशवंतरावांच्या रूपाने नेहरूंना विश्वासू सहकारी, मदतनीस मिळाला होता. नेहरूंच्या निधनाने यशवंतरावांनी खूप काही गमावले होते. कोणाच्या लक्षात एक गोष्ट तेव्हा आली नव्हती. ती म्हणजे- नेहरूंच्या आकस्मिक निधनामुळे यशवंतरावांच्या दिल्लीतील सुगीच्या दिवसांना ‘ब्रेक’ लागला होता. तो कसा, ते पुढे पाहूच..
ram.k.khandekar@gmail.com