‘दिसते तसे नसते, म्हणूनच जग फसते’ ही म्हण आजच्या काळात कोणाचेही मूल्यमापन करताना लक्षात ठेवली पाहिजे. आजच्या प्रचंड आर्थिक स्पर्धेच्या जगात माणसाची ओळख त्याच्या पोशाखावरून, तर कधी त्याच्या श्रीमंतीवरून करण्याची पद्धत झाली आहे. थोडक्यात, आपण अंतरंगापेक्षा जास्त महत्त्व बारंगाला देतो असे दिसते. समर्थ रामदास म्हणतात –

‘वरी चांगला, अंतरी गोड नाही,

तया मानवाचे जिणे व्यर्थ पाही।

वरी चांगला अंतरी गोड आहे,

तया लागि कोणी तरी शोधिताहे।

भला रे भला बोलती ते करावे,

बहुता जनांचा मुखे येश घ्यावे।’

यशवंतरावांच्या अंतरंगाचा शोध घेत असताना या उपदेशाची आठवण होते. विकासाचे उगमस्थान मंत्रालय, त्याच्या मजबूत पायाभरणीनंतर ही गंगा खेडोपाडी कशी जाईल, याचीच चिंता त्यांना होती. ते साधारणत: गुरुवारी किंवा शुक्रवारी सायंकाळी मुंबईबाहेर पडत व मुक्काम पुण्यातील सर्किट हाऊसवर असे. इथे मुक्काम करण्याची दोन कारणे होती. एक म्हणजे येथून सातारा-सांगली भागात, तसेच मराठवाडय़ातील औरंगाबाद, जालना भागात जाण्यास सोयीचे होते. तर दुसरे म्हणजे, त्या काळी पुणे हे उद्योग व शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र होते. इथे अनेक छोटय़ा-मोठय़ा उद्योगपतींचे वास्तव्य होते, नावारूपास आलेल्या शिक्षण संस्था होत्या, साहित्यिक-कलाकारांचे वास्तव्य होते. शिवाय कोयना धरणाचे काम यशस्वीरीत्या वेगाने प्रगतिपथावर होते. यशवंतरावांजवळ दूरदृष्टी होती. तहान लागली की विहीर खोदायची, ही त्यांची वृत्ती नव्हती. धरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर किती वीज व पाणी उपलब्ध होऊ शकेल, याची माहिती त्यांनी गोळा करण्यास सुरुवात केली. या ठिकाणी एका गोष्टीचा प्रामुख्याने उल्लेख केला पाहिजे, तो म्हणजे यशवंतराव मुंबई सोडतानाच मुख्यमंत्रिपदाची वस्त्रे तिथेच सोडून सर्वसामान्यांसारखे वागत. पुण्याचा मुक्काम रात्रीचे जेवण, चर्चा, विचार-विनिमय, मार्गदर्शन यासाठीच ठेवलेला असे. आपण ‘मुख्यमंत्र्यां’शी नाही तर ‘यशवंतरावां’शी बोलतो आहोत, या भावनेनेच हास्य-विनोद, थट्टा-मस्करी करीत महत्त्वाच्या गोष्टींबाबत हातचे राखून न ठेवता मनमोकळ्या गप्पा होत. बरेच राज्यकर्ते हे विनोदी स्वभावाचे असतात. हे सर्वसाधारण लोकांना खरे वाटणार नाही. एकच उदाहरण देऊन शंका दूर करतो.

एकदा पंडित नेहरू भारतीय प्रतिनिधी मंडळासह परदेशात गेले होते. यात काही संसद सदस्यही होते. तो काळ असा होता की परदेशवारी क्वचितच घडत असे. रात्री प्रतिनिधी मंडळाला जेवण होते. सर्व वस्तू चांदीच्या होत्या. जेवताना एका प्रतिनिधीला दुर्बुद्धी झाली वा मोह झाला म्हणा, त्याने एक चमचा खिशात टाकला. त्याचे दुर्दैव असे की, ही गोष्ट नेहरूंच्या लक्षात आली. जेवण झाल्यानंतर उठण्यापूर्वी नेहरू उभे राहिले. नेहमीप्रमाणे आभाराची भाषणे झाली. पंडित नेहरू म्हणाले की, ‘‘मी एक जादू दाखवतो.’’ आणि चेहऱ्यावर गंभीरता आणून टेबलावरील एक चमचा उचलून तो खिशात ठेवत ते म्हणाले की, ‘‘मी हा चमचा तुमच्यापैकी कोणाच्या तरी खिशातून काढून दाखवतो.’’ हे ऐकून सर्व जण थक्क झाले. एक-दोन मिनिटे नेहरू सर्वाकडे पाहात बसले व नंतर त्या प्रतिनिधीला उभे राहण्यास सांगून खिसे पाहण्यास सांगितले! सर्वाचे लक्ष त्याच्याकडे आहे हे लक्षात येताच एका क्षणात नेहरूंनी खिशातील चमचा कोणाच्याही नकळत टेबलावर ठेवला. त्या प्रतिनिधीला तो चमचा खिशातून काढून दाखवावा लागला. नेहरूंनी विनोदाने एका दगडात दोन पक्षी मारले. लोकांना हसवले व सहकाऱ्यास चुकीच्या वृत्तीपासून दूर केले.

महाराष्ट्र राज्य हे सार्थ कल्याणकारी राज्य व्हावे, या दिशेनेच यशवंतरावांनी वाटचाल सुरू केली. कल्याणकारी राज्याच्या यशवंतरावांच्या कल्पना वेगळ्या होत्या. कल्याणकारी राज्यात केवळ सरकार लोकांना मदत करते असे नव्हे तर लोकही सरकारला मदत करतात/ करावी, अशी त्यांची धारणा होती. आपले नागरिक अपंग आहेत असे समजून त्यांच्यासाठी सतत कुबडय़ा तयार करण्यात गुंतलेले राज्य म्हणजे कल्याणकारी राज्य, हा विचार त्यांना कधीच मान्य नव्हता. ‘कल्याण’ ही कल्पना परस्परांच्या सहकार्यातून अवतीर्ण व्हावी लागते आणि याच दृष्टीने यशवंतरावांची वाटचाल सुरू होती. अशा उच्च विचारांचे नेतृत्व महाराष्ट्राला लाभले म्हणूनच केवळ चार-पाच वर्षांतच महाराष्ट्र सर्व बाबतींत अग्रेसर होत गेला. यशवंतरावांनंतर महाराष्ट्राला अशा विचारांचा नेता क्वचितच लाभल्याचे दिसून येते. गेल्या काही वर्षांपासून तर विरोधी पक्षाच्या कृपेने सरकार जनतेला कुबडय़ा देण्यातच व्यस्त आहे, असेच वाटते. यशवंतरावांच्या विचारांची आज गरज आहे, असे नाही का वाटत? कालाय तस्मै नम:।

उक्ती आणि कृती यांचा प्रत्यक्षात मेळ घालणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्या काळात त्यांचा गौरव होत गेला. मुख्यमंत्री या नात्याने त्यांनी जेव्हा द्विभाषिक राज्याची धुरा स्वीकारली; तेव्हा महाराष्ट्राचा सर्वागीण विकास घडवून आणण्यासाठी नेमके काय करावे लागणार आहे, समस्या कोणत्या आहेत, सरकारचे निर्णय व लोक यांच्यात फार मोठी दरी निर्माण होऊ नये यासाठी काय करायचे, यासंबंधी सखोल विचार करून त्याबाबत विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांशी चर्चा करण्यास त्यांनी आरंभ केला. त्यातून विकासाच्या दृष्टीने प्राधान्य असलेली तीन क्षेत्रे निवडली- उद्योग, शेती आणि शिक्षण. या तिन्ही गोष्टींची मुळे पुणे व त्याच्या आसपास होती आणि म्हणूनच पुण्याच्या मुक्कामाला महत्त्व असे. तीन-चार महिन्यांतून एकदा चार-पाच दिवसांसाठी पुण्यास, तर कधी औरंगाबादला त्यांचा मुक्काम असे. त्यावेळी मला व एका इंग्रजी स्टेनोग्राफरला ते सोबत अवश्य नेत असत. दिवसभर आजूबाजूच्या भागात जाऊन तेथील लोकांशी संवाद साधायचा, प्रश्न समजून घ्यायचे. सायंकाळी परतयेऊन पुण्यात चर्चा-विचारांचे सत्र असे. यात सर्व क्षेत्रांतील विद्वान, तज्ज्ञ उपस्थित असत. यावेळी वन टू वन सोडून इतर चर्चेच्या वेळी आम्ही हजर राहत होतो. खूप ऐकण्यास-शिकण्यास मिळत होते.

कोयनेतून उत्पन्न होणाऱ्या विजेचा उपयोग प्रथम उद्योगांसाठी करावा लागणार होता.  त्यामुळे लहान-मोठय़ा उद्योग निर्मितीसाठी पुण्यातील शंतनुराव किलरेस्करांसारख्या लोकांशी चर्चा करून उद्योग एकाच जागी न राहता ते महाराष्ट्रभर पसरतील, अशा योजना तयार करण्यात आल्या. अनेक ठिकाणी उद्योगांसाठी जमिनी राखीव करण्यात आल्या. अन्य गोष्टीही उपलब्ध होतील याची काळजी घेण्यात आली. तसेच प्रत्येक क्षेत्रात तरुणांना प्राधान्य देण्याचा संकल्पही करण्यात आला. केवळ निर्णय घेऊन यशवंतराव थांबले नाहीत, तर कामास सुरुवात करण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना देण्यात आले, जेणेकरून कारखान्यांची उभारणी व वीजपुरवठा एकाच वेळी होऊ शकेल.

पूर्वीच मी उल्लेख केला आहे की, प्रत्येक जिल्ह्य़ात जवळपास अर्धे तालुके दुष्काळग्रस्त होते. मी मुख्यमंत्र्यांबरोबर दौऱ्यावर जायचो. तेव्हा कितीतरी मैल ओसाड जमिनी दिसायच्या व अधूनमधून एखाद् दुसरे झाड दिसायचे. वीजनिर्मितीबरोबरच कालवे काढून पाण्याचा योग्यरीतीने उपयोग करण्याची गरज होती. महाराष्ट्र हे एकमेव राज्य असावे, की जिथे प्रत्येक क्षेत्रात निपुण, महर्षी आढळतीलच. शेतीचा विकास करताना सहकार चळवळीलासुद्धा प्राधान्य देऊन तिचे जाळे पसरवण्याचे यशवंतरावांनी ठरवले. म्हणून सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे, वसंतदादा पाटील, विखे-पाटील आदींसारख्या लोकांशी चर्चा करून याबाबतही निश्चित धोरण आखण्यात आले होते. या सर्वाच्या प्रयत्नांमुळे त्या काळी महाराष्ट्रात सर्वात जास्त- म्हणजे जवळपास १८ सहकारी साखर कारखाने अस्तित्वात आले होते. यशवंतराव स्वत: ग्रामीण भागातून आले असल्यामुळे ग्रामीण भागाचा विकास म्हणजे नेमके काय, त्याचा निकष कोणता या संदर्भातील त्यांचे विचार निश्चित झाले होते.

ग्रामीण भागात आर्थिक दूरवस्थेत सापडलेल्या आणि पिढय़ान्पिढय़ा दरिद्री जीवन जगणाऱ्या लोकांना गरिबीच्या चिखलातून बाहेर काढायचे म्हणून कृषी-औद्योगिक समान रचनेचा पाया यशवंतरावांनी घातला. खेडय़ातील लोकांचे जमीन हे उपजीविकेचे साधन आहे. सर्व धंद्यांत शेती हा महत्त्वाचा धंदा, याची पूर्ण जाणीव असलेले यशवंतराव हे मुख्यमंत्री होते. ते कागदी घोडे नाचवणाऱ्यांपैकी नव्हते. त्यांनी प्रत्यक्षात या योजना यशस्वी करून दाखवल्या.

यंदा १२ मार्चला- यशवंतरावांच्या जन्मदिनी त्यांच्या समाधीचे, त्यांच्या स्मारकाचे दर्शन घेण्यासाठी मी कराडला गेलो होतो. तेव्हा कराड, सातारा, त्यांचे जन्मगाव देवराष्ट्रे व सांगली जिल्ह्य़ातील बराच भाग फिरलो. १९७०-७२ पर्यंत दृष्टी पोहोचेल तिथपर्यंत नुसती जमीनच दिसायची; अधूनमधून एखाद् दुसरे झाड दृष्टीस पडत असे. यावेळी मात्र सर्व बाजूला हिरवेगार दिसत होते. जमिनीचा एक इंच भागही दिसत नव्हता! विश्वास ठेवा वा ठेवू नका, यशवंतराव आजही त्या भागात जिवंत आहेत, प्रत्येकाच्या मनात आहेत. वाचकहो, हे सर्व सविस्तर लिहिण्याचा उद्देश एकच- त्यांचे कार्य आजचे प्रश्न सोडवण्यासाठी काही अंशी मार्गदर्शकही होऊ शकेल.

स्वतंत्र देशात प्रगतीचे प्रमुख साधन असते- साक्षरता! त्यामुळे ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्ती साक्षर झालीच पाहिजे. यासाठी धोरण आखून यशवंतरावांनी अंमलबजावणीसुद्धा सुरू केली. एवढेच नव्हे, तर ग्रामीण व शहरी भागांत शिक्षणाची गंगा सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिक्षणाचे दालन सर्वासाठी मुक्त बनवले. गरिबांना शिक्षणासाठी आर्थिक साहाय्यदेखील मंजूर केले. शिक्षणातील गुणवत्ता वाढवण्यासाठी ते तज्ज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन घेत गेले. यशवंतरावांचा महत्त्वाचा गुण म्हणजे कोणाशीही सल्लामसलत करताना तो लहान की मोठा हे ते कधीच पाहात नसत.

अनेक क्षेत्रांतील त्यांचे कार्य पाहिल्यानंतर मनात शंका येत होती, की ही व्यक्ती बहुरूपी तर नाही ना? राजकारण, प्रशासन, लोकांच्या भेटीगाठी, दौरे, कार्यक्रम, यांच्या जोडीला विविध क्षेत्रांतील कार्य. असा पिंड तयार करण्यास ईश्वराला बरीच मेहनत व वेळ खर्च करावा लागला असेल, नाही!

– राम खांडेकर

ram.k.khandekar@gmail.com