आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१९६२ च्या चिनी आक्रमणाच्या पाश्र्वभूमीवर पक्ष-कार्यकारिणीची बैठक होऊन संरक्षणमंत्री कृष्ण मेनन यांचा राजीनामा मागणारे एक गुप्त पत्र पं. नेहरूंकडे रवाना झाले होते. दुसऱ्या दिवशीच्या बैठकीस नेहरू येताच त्यांनी या पत्राबद्दल संताप व्यक्त करून दोन गोष्टी सदस्यांनाच सुनावल्या. शिवाय, ‘‘माझे नेतृत्व मान्य नसेल तर हा घ्या माझा राजीनामा..’’ असेही ते म्हणाले. त्यावर एक सदस्य परखडपणे म्हणाले, ‘‘ठीक आहे, आज मेननची पाळी आली आहे, उद्या ती तुमच्यावर येईल!’’

‘हिंदूी-चिनी भाई-भाई’ या नात्याच्या चीनने केव्हाच चिंधडय़ा उडवल्या होत्या. पण यानिमित्ताने जगाचा दुसऱ्या एका नात्यावर शंभर टक्के विश्वास बसला. ते नाते होते- ‘विविधतेत एकता’! १९६२ च्या जून-जुलैपासून सुरू झालेल्या चिनी आक्रमणाने ऑक्टोबरमध्ये उग्ररूप धारण केले. अशा वेळी समस्त भारतीय एकजुटीने, कोणतीही उणीदुणी न काढता, टीकाटिपण्णी न करता सरकारच्या पाठीशी तन-मनानेच नाही, तर धनानेसुद्धा उभे राहिले. एवढेच नव्हे तर सीमेवर जाणाऱ्या सैनिकांचे त्यांच्या गावातच नाही, तर प्रत्येक स्टेशनवर ओवाळून, त्यांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करत त्यांचा उत्साह ते वाढवीत होते.. त्यांना नवी उमेद देत होते.

ही दृश्ये हृदयस्पर्शी होती. पण हे अनुभवताना कुणाच्याही लक्षात आली नसेल अशी एक गोष्ट सरकारने केली होती. ती म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रत्येक रेल्वेगाडीचा एक वा कमीत कमी अर्धा तरी डबा लष्करासाठी आरक्षित असे. डब्यावर ‘मिलिटरी’ म्हणून मोठय़ा अक्षरात लिहिलेले असे. मात्र, लष्करासाठीची ही सवलत सरकारने केव्हा आणि कशी कमी केली, हे कोणाच्याही- अगदी संरक्षण खात्याच्याही- लक्षात आले नाही याचा खेद वाटतो. चीनच्या आक्रमणामुळे सरकारचे सर्वच क्षेत्रांत कंबरडे मोडले होते असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही. त्यामुळे सरकारला पैशाबरोबरच गरज होती ती सोन्याची. सरकारने जनतेला शक्य तितके सोने सरकारजमा करण्यासाठी हाक दिली. त्यातून संरक्षण निधी उभारण्यात आला. जनतेनेसुद्धा या आवाहनास उत्स्फूर्तपणे साथ दिली. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात या निधी-उभारणीसाठी सोने देणाऱ्या लोकांची मोठी गर्दी होऊ लागली. या गर्दीत केवळ मध्यमवर्गीयच नाही, तर गरीब लोकही होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्त्रियांनी आपलं सौभाग्यलेणं समजलं जाणारं मंगळसूत्रही या निधीसाठी द्यायला आणले होते. याहून आणखीन वेगळं हृदयस्पर्शी दृश्य काय असू शकतं?

मात्र, दिल्ली अशांत होती ती दुसऱ्याच कारणांनी. या ठिकाणी एका गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो, ते म्हणजे- दिल्लीत जे घडते त्यातील पाच टक्केही आपल्यापर्यंत पोहोचत नाही! आपले दिल्लीतील घडामोडींसंबंधातील माहिती आणि विचार केवळ प्रसारमाध्यमांवरच अवलंबून असतात. ऑक्टोबरपासून ‘संरक्षणमंत्री पंतप्रधानांची दिशाभूल करत आहेत, त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा..’ असे दबावाचे राजकारण सुरू झाले होते. परंतु नेहरू आणि संरक्षण मंत्री कृष्ण मेनन यांचे घनिष्ठ संबंध असल्यामुळे नेहरूंचा त्यांच्यावर अतोनात विश्वास होता. त्यापायी सत्याकडे पाठ फिरवून ते त्यांची पाठराखण करीत होते. (कृष्ण मेनन यांच्याबाबतचा एक गमतीशीर किस्सा इथे सांगावासा वाटतो. ते मोटारीत चालकाशेजारी बसत. गाडीचा वेग ताशी ११०-१२० कि. मी.च्या खाली आला की ते हातातील काठीने चालकाला टोचत असत.) ६ नोव्हेंबर १९६२ रोजी पक्ष कार्यकारिणीची बैठक होऊन मेनन यांचा राजीनामा मागणारे एक गुप्त पत्र नेहरूंकडे रवाना झाले होते. दुसऱ्या दिवशीच्या बैठकीत नेहरू येतील तेव्हा सर्वानी आपली नाराजी दाखवण्यासाठी माना खाली घालून बसायचे असेही या बैठकीत ठरले. नेहरू बैठकीस येताच त्यांनी या पत्राबद्दल संताप व्यक्त करून उलट दोन गोष्टी कार्यकारिणी सदस्यांनाच त्यांनी सुनावल्या. एवढेच नव्हे तर ‘‘माझे नेतृत्व मान्य नसेल तर हा घ्या माझा राजीनामा..’’ असेही ते म्हणाले. त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर कार्यकारिणीतील एक सदस्य परखडपणे म्हणाले, ‘‘ठीक आहे. आज मेननची पाळी आली आहे, उद्या ती तुमच्यावर येईल!’’ खरं तर आज अशाच परखडपणे विचार मांडणाऱ्या पक्षसदस्यांची आपल्याकडे गरज आहे, असे नाही वाटत?

कार्यकारिणीतील सदस्यांचा हा पवित्रा पाहून नेहरूंना धक्काच बसला. कृष्ण मेनन यांचा राजीनामा घेण्याशिवाय त्यांना गत्यंतर उरले नव्हते. मेनन यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर नवीन संरक्षणमंत्र्यांसाठी चर्चेला आरंभ झाला. केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री, मुख्यमंत्री यांची नामावली तपासता तपासता नेहरू आणि लालबहादूर शास्त्रीजी यशवंतराव चव्हाण यांच्या नावापर्यंत पोहोचले आणि तिथेच थांबले. संरक्षणमंत्रीपद यशवंतरावांकडे सुपूर्द करण्याचे दोघांनीही निश्चित केले. नेहरूंनी यशवंतरावांना त्यांचा होकार वा नकार कळवण्यासाठी फोन करून, ‘‘अजून निश्चित असे काही नाही, तरी हे गुप्त ठेवा,’’ असे त्यांना सांगितले. कितीही का गुप्त गोष्ट असेना, पण लग्न झाल्या दिवसापासून मृत्यूपर्यंत वेणूताईंना ती सांगितल्याशिवाय यशवंतराव कधीच राहिले नाहीत. त्यांनी ही बाब वेणूताईंना सांगून त्यांचाही सल्ला घेतला.

यशवंतराव मनाच्या द्विधावस्थेत सापडले होते. आजपर्यंत त्यांनी नेहरूंचा शब्द खाली पडू दिला नव्हता. त्यामुळे ही कामगिरी स्वीकारण्यास त्यांचे एक मन तयार झाले तरी दुसरे मन मुंबईचा त्याग करण्यास धजत नव्हते. हे साहजिकही होते. एक समर्थ मुख्यमंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राने त्यांना जीव लावला होता. जनतेच्या विकासासाठी त्यांनी जी अनेक कामे हाती घेतली होती ती यामुळे अपुरी राहण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. सीमेवर धुमश्चक्री चालू असताना दिल्लीच्या नवीन राजकीय वातावरणात संरक्षणविषयक समस्यांचेच काय, शस्त्र-अस्त्रांचेही थोडेदेखील ज्ञान नसताना संरक्षणमंत्रीपदाची सूत्रे हाती घेणे यशवंतरावांच्या मनाला पटणारे नव्हते. हे हात दाखवून अवलक्षण करण्यासारखेच होते. यशवंतरावांकडे भांडवल होते ते केवळ देशभक्ती! शिवाय दोन भावांचे संसार आणि मुख्य म्हणजे जिवापाड प्रेम, जिव्हाळा असलेल्या वृद्ध आईला सोडून जाणे त्यांच्या जीवावर आले होते. महाराष्ट्रातील जनतेला सोडून जाण्याचे धैर्य यशवंतरावांसारख्या योद्धय़ामध्येही नव्हते. मी ते प्रत्यक्ष पाहिले, अनुभवले आहे. पुढे यशवंतराव दिल्लीला गेले तेव्हा ही वस्तुस्थिती असतानादेखील त्यांच्यावर सतत टीका होत होती, की ते सत्तेचे, खुर्चीचे भुकेले आहेत. खरं तर दिल्लीतील सत्तास्थानी जाणे हे जसे गौरवाचे होते तसेच पुढील प्रगतीचे पहिले पाऊल ठरण्याचीही शक्यता होती. शिवाय या पदासाठी केंद्रातील दोन मंत्री- टी. टी. कृष्णमाचारी आणि बिजू पटनाईक- अतिशय उत्सुक होते. यशवंतरावांना मात्र सत्तेपेक्षा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील जनता जास्त प्रिय होती. १० नोव्हेंबरला नेहरूंनी यशवंतरावांना दिल्लीत बोलावून घेतले. तिथे यशवंतरावांच्या या अडचणींना उत्तर देताना ते म्हणाले, ‘‘मला त्याची कल्पना आहे; परंतु मला खात्री आहे, की हे सगळं तुम्ही लवकरच आत्मसात कराल. मला इथे राजकीय नेतृत्व देईल असे कुणीतरी हवे आहे. तुम्ही दिल्लीला असणे माझ्या दृष्टीने आवश्यक आहे.’’ भारताच्या पंतप्रधानांचे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबाबतचे हे मत आणि विश्वास म्हणजे खरं तर महाराष्ट्राचा गौरव होता. परंतु यशवंतरावांच्या कार्याचे मूल्यमापन करताना त्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले गेले.

एवढं झाल्यानंतरही यशवंतराव पंतप्रधानांना म्हणाले की, ‘‘माझी तयारी आहे, परंतु मी उद्या मुंबईस जाण्यापूर्वी आपण खरोखरीच मी इथे यायला पाहिजे का, याचा पुन्हा एकदा विचार करा अन् मला सांगा.’’ नेहरू आणि शास्त्रीजींचा विचार पक्का झालेला होता. नेहरूंनी यशवंतरावांना असेही सांगितले, की तुमच्या निवडीमुळे कृष्णमाचारी खूप खवळले आहेत.

अखेरीस १४ नोव्हेंबर १९६२ रोजी यशवंतराव संरक्षणमंत्री झाल्याची अधिकृत घोषणा झाली. चव्हाण कुटुंबीयच नाही, तर महाराष्ट्रातील जनताही संभ्रमात पडली, की या घोषणेचा आनंद मानायचा की हृदयाचा एक तुकडा तोडला जात आहे म्हणून खेद मानायचा? परंतु वास्तव स्वीकारण्यावाचून पर्यायच नव्हता.

यशवंतरावांनी ताबडतोब लोकशाही प्रणालीनुसार विधानसभेच्या नेत्याची, मुख्यमंत्र्यांची निवड आदी औपचारिकता पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावले उचलली. कुटुंबासाठी सुरक्षित आणि त्यांच्या गरजा पूर्ण होतील अशी जागा शोधणे सुरू केले. ही जबाबदारी त्यांनी पत्नी आणि निवासी खासगी साहाय्यक यांच्यावर सोपवली. हा धीरोदात्त पुरुष चिंतेने ग्रासला होता. दिल्लीला जायला मन धजत नव्हतं व पायही निघत नव्हता. सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर गिरगाव येथील सभेत मराठी बांधवांचा मोठय़ा जड अंत:करणाने त्यांनी निरोप घेतला. या निरोपाच्या प्रसंगी यशवंतरावांनी जनतेला सर्वशक्तिनिशी सरकारच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. मराठी जनतेची आठवण म्हणून याप्रसंगी यशवंतरावांना तीन-साडेतीन फुटांची मोठी चांदीची तोफ दिली गेली. ती यशवंतरावांनी शेवटपर्यंत आपल्या दिवाणखान्यात ठेवली होती. त्यांच्या दृष्टीने ती तोफ नव्हती, तर मराठी माणसांची मने होती, म्हणूनच ती त्यांना आदरणीयही होती.

विवाह समारंभातील आनंद शेवटी जेव्हा मुलगी सासरी जायला निघते तेव्हा विरून जातो. मुलीच्या, तिच्या आई-वडिलांच्या, कुटुंबीयांच्या डोळ्यांतील अश्रूंचे हृदयस्पर्शी, करुणामय, भावनात्मक दृश्य बघणाऱ्यांच्या हृदयाला पाझर फोडते. यशवंतराव दिल्लीस जाण्यासाठी निघाले तेव्हा जवळपास असेच दृश्य पाहावयास मिळाले. विशेषत: त्यांच्या आईची मन:स्थिती खूप नाजूक झाली होती. त्यामुळे तेव्हा यशवंतरावांच्या मनाची काय स्थिती झाली असेल याचे वर्णन कोणालाही करता येणे शक्य नाही. यावेळी यशवंतरावांसोबत होते- त्यांचे खासगी सचिव (आयएएस), त्यांचे खासगी साहाय्यक (स्टेनो) व यशवंतरावांचे निवासी खासगी साहाय्यक. तारीख होती- २० नोव्हेंबर १९६२!

दिल्लीत पोहोचताच यशवंतराव विमानतळावरून सरळ ‘तीन मूर्ती भवन’ या नेहरूंच्या निवासस्थानी गेले. यशवंतरावांचा वाटले होते की त्यांना पाहून नेहरूंना थोडेसे हायसे वाटेल. परंतु तिथे त्याउलट परिस्थिती होती. सर्वाचे चेहरे उदासीन, गंभीर होते. नेमके काय घडले आहे याची कल्पना यशवंतरावांना नसल्याने त्यांचाही चेहरा पडला. यशवंतराव दिल्लीला जाण्यापूर्वी महाराष्ट्रातील औपचारिकता पूर्ण करण्यात इतके व्यग्र होते, की त्यांना गेले चार-पाच दिवस क्षणाचीही उसंत मिळाली नव्हती. दिल्लीतच काय, सीमेवरही काय घडते आहे हे जाणून घेण्यासाठीही त्यांना उसंत मिळाली नव्हती. नेहरूंनी त्यांना गेल्या तीन-चार दिवसांत दिल्लीत आणि सीमेवर काय घडले आणि काय घडते आहे याची सविस्तर माहिती दिली. ती ऐकून यशवंतरावांना आपल्या पायाखालची वाळूच सरकते आहे की काय, असे वाटले. इतकी परिस्थिती गंभीर आणि धोकादायक बनली होती. नेहरूंनी त्यांना सांगितले की, काळाची निकड व परिस्थितीमुळे संरक्षण मंत्रालयात बरेच बदल करण्यात आले असून सचिव, सेनाध्यक्ष यांची नव्याने नेमणूक करण्यात आली आहे. त्यामागील कारणांचीही जाणीव त्यांनी यशवंतरावांना करून दिली. दिल्लीतील घटनांची साद्यंत माहिती नेहरूंनी यशवंतरावांना दिली. पण त्यानंतरची माहिती ऐकताच या परिस्थितीत संरक्षणमंत्रीपद स्वीकारणे म्हणजे आपण आतापर्यंत मिळवलेल्या यशावर पाणी फेरण्यासारखे होईल याची यशवंतरावांना खात्रीच पटली. ते साहजिकही होते. नेहरूंनी सांगितले, ‘‘१७ नोव्हेंबरला चीनने प्रचंड लष्करी बळासह नेफा भागातून घुसखोरी सुरू केली आहे आणि ब्रह्मदेशाच्या बाजूने नवीन आघाडी उघडून भारताचा प्रदेश काबीज करण्यास सुरुवात केली आहे. चिनी आक्रमणाची गती अशीच राहिली तर हिमालय ओलांडून भारतात प्रवेश करण्यास चीनला फारसा वेळ लागणार नाही. असे झाले तर भारताचे स्वातंत्र्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.’’ या नामुष्कीच्या भीतीपोटी नेहरू आणि सरकारही चिंतेत होते. हे सगळं ऐकल्यानंतर पडल्या चेहऱ्यानेच यशवंतराव नेहमीच्या शिरस्त्यानुसार मोरारजी देसाईंच्या निवासस्थानी मुक्कामाला गेले. दिल्लीत यशवंतरावांचे स्वागत ‘प्रथम घासे मक्षिका पात:’ असेच झाले होते. यशवंतरावांनी मोरारजी देसाईंना सर्व गोष्टी सविस्तरपणे सांगितल्या. सीमेवरच्या चिंता वाढवणाऱ्या घडामोडींमुळे मन आणि शरीर सुन्न झालेले असल्यामुळे झोप येण्याची यत्किंचितही शक्यता नसतानासुद्धा केवळ विश्रांतीसाठी यशवंतरावांनी गादीला पाठ टेकवली. तोच..

ram.k.khandekar@gmail.com

मराठीतील सर्व सत्तेच्या पडछायेत.. बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ram khandekar article on jawaharlal nehru