राम खांडेकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
एकदा नरसिंह रावांच्या मुलांनी पंतप्रधान निवासातील टेलिफोन ऑपरेटर्स उद्धटपणे वागल्याची तक्रार खासगी सचिवांकडे केली. खासगी सचिव आयएफएस अधिकारी होते, शिवाय तापट वृत्तीचेही! त्यांनी काही विचार न करता दूरसंचार मंत्र्यांच्या खासगी सचिवांना सर्व टेलिफोन ऑपरेटर्स बदलण्याबाबत सूचना दिल्या. आजारपणामुळे मी कार्यालयात नव्हतो. दुसऱ्या दिवशी कार्यालयात गेल्यावर थोडय़ा वेळाने खासगी सचिवांनी बोलावले. त्यांनी चौकशी करून यात लक्ष घालण्यास सांगितले. मी त्यांना स्पष्ट सांगितले, ‘‘वर्षांनुवर्षे पंतप्रधानांच्या निवासस्थानी काम करणारे टेलिफोन ऑपरेटर्स उद्धटासारखे वागूच शकत नाहीत.’’
सकाळची शिफ्ट संपल्यानंतर त्या दोन्ही ऑपरेटर्सना मी बोलावले. त्यांच्याकडून घडलेल्या घटनेचा तपशील समजून घेतला. घडले असे की, नरसिंह रावांच्या मुलाने हैदराबादहून फोन केला होता. तिकडून ‘मी राजेश्वर राव..’ एवढे म्हणताच, ऑपरेटरने टेलिफोन करणाऱ्या व्यक्तीस राजेश्वर राव यांच्याशी बोलायचे आहे असे समजून पटकन लाइन नरसिंह रावांची मुलं उतरतात त्या ‘३, रेस कोर्स रोड’ येथील स्वीय साहाय्यकाला जोडून दिली. पुन्हा मुलाने फोन केला, तेव्हाही असेच झाले. तिसऱ्या वेळी मात्र त्याने ऑपरेटरची तोंडात येतील त्या शब्दांत खरडपट्टी काढली. त्यावर ऑपरेटरने क्षमाही मागितली. मात्र पंतप्रधानपुत्राचा अहंकार! आपला अपमान केला गेला असे गृहीत धरून त्यांनीच खासगी सचिवांकडे स्वत:च वापरलेले अपशब्द टेलिफोन ऑपरेटरच्या तोंडचे असल्याचे सांगत तक्रार केली. खरे तर टेलिफोन बोर्डवर काम करणाऱ्या ऑपरेटरची कीव यावी असे त्यांच्या कामाचे स्वरूप असते. एका बोर्डवर दहा लाइन्स असतात. म्हणजे अनेक कॉल एकाच वेळी येण्याची शक्यता. म्हणून संबंधित व्यक्तीस लाइन जोडून देण्याची त्यांना घाई असते. त्या एक मिनिटही निवांत बसू शकत नाहीत. हे मी स्वत: त्यांच्याविरुद्ध तक्रारी आल्या तेव्हा तिथे दहा मिनिटे बसून पाहिले आहे. नंतर मात्र, सर्व सविस्तर सांगितल्यावर ऑपरेटरनी रडायला सुरुवात केली. मी त्यांची समजूत काढली. वाचकहो, डिपार्टमेंटला परत जाणे म्हणजे काहीतरी हेराफेरी केली असेल असाच इतरांचा समज होतो. कितीही सांगितले तरी घरच्यांचा, नातेवाईकांचा विश्वास बसत नाही. त्यामुळे त्या ऑपरेटर घरी जाण्यास तयारच नव्हत्या. तुम्हांपैकी कोणालाही परत जावे लागणार नाही, अशी वारंवार खात्री दिल्यानंतरच त्या निघाल्या. माझा शब्द शेवटचा शब्द असतो हे त्यांना माहीत होते.
याच संदर्भात एक गोष्ट सांगावीशी वाटते, की पंतप्रधानांच्या कार्यालयात अतिशय खेळीमेळीने काम चाले. तोवर वरिष्ठ केंद्रीय मंत्रीही पंतप्रधान कार्यालयात दबत दबत येत; आता ते हास्यमुद्रेने येऊ लागले होते. पूर्वी त्यांना योग्य सन्मान मिळत नव्हता; तो मिळू लागला होता. त्यांच्यापैकी कोणीही माझ्या वा खासगी सचिवांच्या खोलीत आले, तर आम्ही उठून उभे राहत असू. पूर्वी त्यांच्याकडे खासगी सचिव ढुंकूणही पाहात नसत. नरसिंह राव जेव्हा सोनियाजींना भेटायला जात तेव्हा मी तिथे बाहेर खासगी सचिवांच्या खोलीत बसत असे. मला कधी त्यांनी पाणीही विचारले नाही. असो. परंतु सीताराम केसरी, अर्जुन सिंग, शंकरराव चव्हाण यांच्यासारख्या वरिष्ठ मंत्र्यांनी माझी व खासगी सचिव रामू दामोदरन यांची तोंड भरून स्तुती केली होती. नरसिंह रावांनीच नंतर हे मला सांगितले.
नरसिंह रावांचे कार्यालय हे माणुसकीचे मूर्तिमंत उदाहरण होते. तिथे कोणी लहान वा मोठा नव्हता, पण आदर व शिस्त कायम होती. १८-१८, २०-२० तास सतत काम करूनही माझ्या वा खासगी सचिवांच्या चेहऱ्यावर कधी तणाव नसे. कारण नरसिंह रावांपासून आम्हा सर्वाचा व्यवहार पारदर्शक होता. कोणाच्या एक कप चहालाही आम्ही कधी लिप्ताळे झालो नव्हतो. तसेच राज्याचे मुख्यमंत्री असो वा केंद्रीय मंत्री असोत, कधी कोणालाही एखादे काम आडून सांगितले नाही. माझ्याच काय, पण माझ्या कुठल्याही नातेवाईकांसाठी कोणतीही एजन्सी मागितली नाही. कोणाच्याही बढतीसाठी शब्द टाकला नाही. आज मी निवृत्तीवेतनावरच उदरनिर्वाह करत आहे. म्हणूनच कितीही आरोप-प्रत्यारोप होवोत, आम्ही शेवटपर्यंत ताठ मानेनेच आणि स्वाभिमानाने राहिलो. याचे कारण नरसिंह रावच या वृत्तीचे होते. थोडे विषयांतर झाले याची मला कल्पना आहे; परंतु मंत्री वा पंतप्रधान त्यांच्या मुलांमुळे कसे बदनाम होऊ शकतात, हे समजावे म्हणून लिहिण्याचा मोह झाला. असो.
लोकसभा अध्यक्षपदी काँग्रेसचा उमेदवार निवडून आल्यानंतर नरसिंह रावांनी नवीन आर्थिक धोरणावर लक्ष केंद्रित केले. नरसिंह रावांच्या संगणकात असलेले हे धोरण बाहेर आले होते आणि मसुदा मंजुरीसाठी मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात आला होता. तो प्रथमदर्शनी मंजूर होईल अशी फारशी आशा अनुभवाने नरसिंह रावांनाही नव्हती. देशाच्या आर्थिक परिस्थितीची माहिती त्यांनी अगदी सविस्तरपणे सहकाऱ्यांना समजावून दिली. पं. नेहरूंच्या वेळचे धोरण आणि आता आवश्यक असणारे धोरण यांच्यातील मध्यम मार्ग म्हणजे हे नवीन धोरण असल्याचे त्यांनी सहकाऱ्यांना पटवून दिले. परंतु देशापेक्षा नेतृत्वनिष्ठा महत्त्वाची असलेल्या त्यांच्या काही सहकाऱ्यांनी पं. नेहरू, इंदिराजी, राजीवजी यांचा त्यात उल्लेख नसल्याबद्दल खंत प्रकट केली होती. त्यामुळे तो मसुदा परत घेण्यात आला. मग मसुद्यात योग्य ते बदल करून दोन दिवसांनी तो मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात आला. खरे तर हा सारा शब्दांचा खेळ होता. मात्र, त्यांच्या सहकाऱ्यांना हे कळलेच नाही. याचे कारण नरसिंह रावांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व! नरसिंह रावांइतके भाषाप्रभुत्व त्यांच्या सहकाऱ्यांमध्येच काय, पण प्रशासनातील एकाही अधिकाऱ्यामध्ये नव्हते. म्हणून आंतरराष्ट्रीय बैठकींसाठी तयार करण्यात येणारी भाषणे ते स्वत: लिहीत. संयुक्त सचिवांकडून मसुदा आला, की वाचून तो बाजूला ठेवत आणि स्वत: भाषण तयार करण्यास बसत. विमान प्रवासात ते आपले भाषण संगणकावर पूर्ण करीत. गंतव्य स्थानावर पोहोचल्यानंतर रात्री बसून त्यावर नजर फिरवत आणि छापील प्रत काढून रात्रीच आमच्या बेडरूमच्या दरवाजातून आत सरकवण्याची व्यवस्था करीत. आम्ही उठल्याबरोबर संबंधित व्यक्तीला ते देऊन बैठक सुरू होण्यापूर्वी छापून तयार होत असे. तर, संसदेच्या अधिवेशनापूर्वी आर्थिक धोरणाची आखणी पूर्ण झाली होती. आता प्रतीक्षा होती संसदेच्या मंजुरीची!
नरसिंह रावांच्या भाषाप्रभुत्वाविषयीची आणखी एक आठवण सांगाविशी वाटते.. २१ जूनच्या शपथविधीनंतर दुसऱ्या दिवशी राष्ट्राला उद्देशून संदेश देण्यासाठी टेलीव्हिजन स्टुडिओमध्ये ध्वनिमुद्रणाची व्यवस्था केली होती. आम्ही सात वाजता तिथे पोहोचलो. इंग्रजी भाषणाचे ध्वनिमुद्रण झाल्यानंतर हिंदीचे सुरू झाले. दोन परिच्छेद वाचून पूर्ण होताच नरसिंह राव थांबले व म्हणाले, ‘‘हे किती कठीण शब्दश: भाषांतर आहे. लोकांना हे समजेल का, याचा विचार तुम्ही कोणी केला नाही? कोणी वाचून घेण्याचे कष्टही घेतलेले दिसत नाही.’’ नरसिंह रावांनी खरोखरच उग्ररूप धारण केले होते. ध्वनिमुद्रण तर लगेच होणे गरजेचे होते. सर्वाचे गंभीर चेहरे पाहून नरसिंह राव भाषणाचा तो स्क्रोल (टेलीव्हिजन स्क्रीनवर पुढे पुढे सरकणाऱ्या जवळपास चार इंच रुंदीच्या स्क्रोलवरील भाषणाचा मजकूर ध्वनिमुद्रणावेळी वाचला जातो.) हातात घेऊन खुर्चीवर बसले व जवळपास अर्धे भाषांतर सोपे शब्द लिहून तयार केले. तो स्क्रोल पुन्हा यंत्रावर लावला. आणि नरसिंह रावांचे भाषण झाले.
वाचकहो, नवीन धोरण राबवण्यासाठी नरसिंह रावांना जे प्रशासन मिळाले होते, त्यात आपण थोडेफार सुधारावे अशी प्रवृत्ती नसावी. कारण ९ जुलै १९९१ रोजी नवीन आर्थिक धोरणाच्या अनुषंगाने जेव्हा दूरदर्शनवर ध्वनिमुद्रण होते, तेव्हाही हिंदी भाषणाच्या वेळी मागील घटनेचीच पुनरावृत्ती झाली. जवळपास ५० मिनिटे खर्च करून नरसिंह रावांनी हिंदी भाषांतर लिहून काढले. नवीन आर्थिक धोरण मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्याची जबाबदारी नरसिंह रावांनी स्वत:वर घेतली होती. कारण त्यातील बारकावे, तसेच स्पष्टीकरण देण्याचे धाडस त्यावेळी त्यांच्याजवळच होते. जून संपत आला होता आणि यापुढे कधी नव्हे असे धाडसी निर्णय एकामागोमाग एक घ्यावे लागणार होते. यासाठी त्यांनी गीतेतील भगवान श्रीकृष्णाचा उपदेश अंगीकारला होता. तो श्लोक आहे :
‘सुखदु:खे समे कृत्वा लाभालाभो जयाजयौ ।
ततो यूद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि।।’
(अर्थात- ध्येयपूर्तीसाठी सुख व दु:ख, लाभ व हानी, जय व पराजय हे दोन्ही सारखेच समजून युद्धाला प्रवृत्त हो. त्यात तुला कोणतेच पाप लागणार नाही.)
नरसिंह रावांसमोर अगदी अशीच परिस्थिती होती. हे युद्ध होते आर्थिक विकासासाठी. तसेच अशा नवीन धोरणाचा कोणालाही काहीच अनुभव नव्हता. प्रशासक ते कसे राबवतील, हेही निश्चित माहीत नव्हते. यातील यश, अपयश अंधारात होते. नरसिंह रावांसाठी यश मिळाले तर शिखर आणि अपयश मिळाले तर पाताळ. अपयश त्यांना राजकारणातूनच नाही, तर जीवनातून उठवू शकणार होते. सत्तेसाठी भुकेलेल्या कोल्ह्य़ांनी तर त्यांचे लचके तोडले होते. वाचकहो, यातील एकूण एक शब्द सत्य आहे. याची कल्पना १९९१ साली सर्वसामान्यांना आली नव्हती. असे धाडस केवळ आणि केवळ अशीच व्यक्ती करू शकते, जिने आयुष्यभर देश, देशाचा स्वाभिमान याला इतर गोष्टींपेक्षा सर्वात जास्त प्राधान्य दिले होते. नरसिंह रावांसमोर अर्जुनाप्रमाणे एकच ध्येय होते- आर्थिक संकटातून देशाला बाहेर काढायचे! त्यासाठी जीवाची पर्वा न करता वाटेल ते धाडस करण्याची त्यांची पूर्ण तयारी होती. लोक काय म्हणतील, याची त्यांना पर्वा नव्हती. त्याकडे त्यांनी पूर्ण दुर्लक्ष करण्याचे ठरवले होते. एकदा ते मनमोहन सिंगांना थट्टेने म्हणाले होते, ‘‘मनमोहन सिंगजी, इसमें सफलता नहीं मिली तो आपकी गर्दन छाटी जाएगी. मगर सफलता मिलेगी तो दोनो को क्रेडिट मिलेगा.’’ पण झाले उलटेच. जणू काही सर्व धोरण मनमोहन सिंगांनी तयार केले आणि नरसिंह रावांनी पाठिंबा दिला अशी जनसामान्यांची धारणा झाली (आजही आहे). श्रेय मनमोहन सिंगांना आणि टीका नरसिंह रावांच्या पदरी पडली!
नरसिंह राव व मनमोहन सिंग यांनी रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर व वाणिज्य मंत्री यांच्या सहकार्याने हे सर्व पार पाडायचे होते. उद्योगमंत्र्यांचे सहकार्यही आवश्यक होते. मात्र, नरसिंह रावांनी उद्योग खाते मुद्दामच आपल्याकडे ठेवून घेतले होते, जेणेकरून अडथळा येण्याची शक्यता कमी राहील. जूनअखेरीस झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नरसिंह रावांनी सहज विनोदाने मत्रिमंडळ सचिवांना विचारले, ‘‘घडय़ाळ आहे का?’’ सचिवांनी होकारार्थी उत्तर दिले. नरसिंह विचारले, ‘‘चालते ना?’’ सचिव म्हणाले, ‘‘हो.’’ त्यावर नरसिंह रावांनी त्यांना सांगितले, ‘‘आता ते थोडे फास्ट करा. कारण यापुढे जे निर्णय घेतले जातील ते प्रत्येक ठरावीक कालावधीत पूर्ण झालेच पाहिजेत. यासाठी त्याला अधिक गती देण्याची गरज आहे. सुस्ती, शिथिलता, बेजबाबदारपणा, निष्काळजी वगैरे प्रशासनातील गुणांना आता तिलांजली देण्यास सांगा. ‘आर्थिक स्वातंत्र्यासाठी युद्ध आमचे सुरू, जिंकू किंवा मरू’ अशी अवस्था आहे हे सर्वाच्या लक्षात आणून द्या. कोणाचीही, कुठेही गय केली जाणार नाही. वेळेची किंमत त्यांना समजावून सांगा.’’
‘आधी केले, मग सांगितले’ असा नरसिंह रावांचा स्वभाव होता. वेळ वाया गेलेला त्यांना आवडत नसे. त्यांना भेटणाऱ्यांपैकी काही मोजके असे होते, की त्यांच्या कामाचे पाल्हाळ लावून वेळ विनाकारण घ्यायचे. मग नरसिंह रावांची चिडचिड सुरू व्हायची आणि तो राग आमच्यावर निघे. त्या दिवशी रात्री जेवताना मी पंतप्रधान आज कसे रागावले, हे माझ्या पत्नीला सांगत जेवण आटोपत असे! पंतप्रधानांसाठी जो फोन यायचा तो कोणाचाही का असेना, केवळ मीच देत असे. कारण पंतप्रधानांबरोबर कोण बसले आहे आणि काय विषय असेल, याची मला कल्पना असे. मी कामात असलो, तर स्वीय साहाय्यकांनाच परस्पर देण्यास सांगत असे. ते म्हणत, ‘‘साहब गुस्सा करेंगे.’’ मी त्यांना सांगत असे की, ‘‘तुम्ही भाग्यवान आहात. देशाचे पंतप्रधान तुम्हाला रागावत आहेत!’’
पंतप्रधानांच्या जुन्या बंगल्यावर सतत येऊन भेटणाऱ्या एका मित्राचा नरसिंह रावांसाठी स्वीय साहाय्यकाच्या खोलीत फोन आला आणि नरसिंह रावांना जोडून देण्यास सांगितले. साहाय्यक म्हणाले, ‘‘ठहरो, खांडेकर साहब से पुछते है.’’ पलीकडची व्यक्ती रागात म्हणाली, ‘‘खांडेकर कौन होता है?’’ आणि फोन बंद करून त्याने सहा पानांचे पत्र नरसिंह रावांना लिहिले. त्यात मला अनेक दुषणे देण्यात आली होती. ते पत्र मी बराचसा भाग अधोरेखित करून नरसिंह रावांकडे पाठवले. ते आजही माझ्या संग्रही आहे!
नरसिंह रावांनी स्पष्ट सांगितले होते, ते देशात दौऱ्यावर असतील व त्या ठिकाणी फक्त एक दिवसच कार्यक्रम असेल तर रात्र कितीही होवो, मुक्कामासाठी दिल्लीत यायचेच. कारण दुसरा दिवस पहाटेपासून मिळतो. तसेच परदेश प्रवास असेल, तर शक्यतो उगीच वेळ वाया जाणार नाही असे प्रस्थान ठेवायचे आणि कार्यक्रमाची पूर्ण इतिश्री झाली, की ताबडतोब निघायचे. नरसिंह राव स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचे एकमेव पंतप्रधान असतील, ज्यांच्या बंगल्यावर धूलिवंदनाचा कार्यक्रम झाला नाही किंवा तेही अशा कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत. दरवर्षी काही तरी कारणाने तो ते साजरा करीत नव्हते.
काँग्रेसजनांना ढोल पिटून आपला गाजावाजा करून घेण्याची संस्कृती वारसा हक्काने मिळाली असावी. काँग्रेस सरकारचे शंभर दिवस पूर्ण झाल्यावर वरिष्ठ काँग्रेसजन हा दिवस थाटामाटाने साजरा करण्याचे ठरवून पंतप्रधानांकडे आले. त्याला त्यांनी स्पष्ट नकार दिला, ‘‘तुम्हाला साजरा करायचा असेल, तर पक्ष कार्यालयात करा. मला वेळ नाही.’’ ते लोक गेल्यानंतर नरसिंह राव मला म्हणाले, ‘‘या लोकांना यानिमित्ताने टेलीव्हिजनसमोर यायचे आहे. मुख्य म्हणजे माझ्या सरकारचे आयुष्य अल्प आहे का, की १०० वा दिवस उजाडला म्हणजे गंगेत घोडे न्हाले. कितीही अडथळे येवोत, कितीही टीकाटिप्पणी होवो, कोणी साथ देवो वा न देवो, मी पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करणारच!’’ हे त्यांचे वाक्य माझ्या रेकॉर्डमध्ये आहे. त्यात एकाही शब्दाची माझ्याकडून भर नाही. किती आत्मविश्वास होता नरसिंह रावांकडे!
ram.k.khandekar@gmail.com