शुद्धलेखनाबाबत कमालीच्या आग्रही असलेल्या, त्यासाठी प्रसंगी पदरमोड करून, लेख लिहून आणि वाद घालून शब्दांच्या शुद्धतेबाबत इतरांना सतत जागरूक ठेवू पाहणाऱ्या सत्त्वशीला सामंत यांचे नुकतेच निधन झाले. मराठी भाषेच्या व्याकरणिक नियमावलीविषयीची त्यांची आग्रही मते  स्वीकारली गेली नसली तरी त्यांचं मराठी भाषेवरचं, व्याकरणावरचं आणि शुद्ध  लेखनपद्धतीवरील प्रेम वादातीत होतं. त्यांच्या कार्याचा परामर्श घेणारा लेख..
मराठीचे सत्त्व आणि शील जपण्यासाठी एकाकी झुंज देणाऱ्या सत्त्वशीला सामंत यांना एक मे या महाराष्ट्रदिनी मृत्यू यावा, हा विचित्र योगायोग आहे. आणि हा मृत्यूही इतका अचानक आणि अकल्पित! हाती घेतलेल्या कामांची काही व्यवस्था करण्यासाठीही त्यांना वेळ मिळाला नाही. घसरून पडण्याचे निमित्त, खुब्याच्या हाडाला इजा, तपासण्यासाठी रुग्णालयात दाखल, यशस्वी शस्त्रक्रिया आणि त्यानंतर दोन-तीन तासांतच हृदयविकाराने बेशुद्धी आणि त्याच रात्री मृत्यू. सारा पाच-सहा दिवसांचा खेळ! मृत्यूच्या दोनच दिवस आधी त्यांच्याशी दूरध्वनीवर माझे बोलणे झाले होते. त्यावेळी पाठय़पुस्तक मंडळाच्या मुर्दाडपणामुळे आपण मुंबईच्या उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याची तयारी करीत आहोत असे त्या म्हणाल्या होत्या.
आपल्याला पटलेली गोष्ट अन्य लोकांना पटवून देऊन त्यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न त्या करीत. पण कोणी बरोबर आले नाही तरी एकाकी झुंज देण्याची त्यांची तयारी असे. त्यासाठी चिकाटीने पदरमोड व पायपीट करण्याची त्यांची तयारी असे. २००५-०६ मध्ये त्यांनी मानससरोवराला ‘मानसरोवर’ म्हणून संबोधण्याच्या प्रकाराविरुद्ध आघाडी उघडली होती. त्यासाठी संशोधन करून माहिती जमा करणे, युक्तिवाद तयार करणे, त्याला पाठिंबा मिळवण्यासाठी अनेक संस्थांशी पत्रव्यवहार करणे, संस्थाप्रमुखांना भेटणे आणि केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या खात्यांशी पत्रव्यवहार करणे- हा सर्व उद्योग त्यांनी वयाच्या साठाव्या वर्षी केला. त्यासाठी टंकलेखन, टपाल, प्रवास इत्यादी कामांसाठी त्यांना किती वेळ व पैसा खर्च करावा लागला असेल याची कल्पनाही करता येणे कठीण! आणि या सगळ्याचे फलित काय? तर- शासकीय खात्यांनी एकमेकांकडे अंगुलीनिर्देश करून टोलवाटोलवी करणे आणि कोणताही निर्णय घेण्याची जबाबदारी टाळणे!
सत्त्वशीलाबाईंचे ‘सत्त्वशीला’ हे पाळण्यातले नाव. ते ठेवताना त्यांच्या आई-वडिलांना कल्पनाही नसेल, की आपल्या मुलीच्या बाबतीत हे नाव इतके अन्वर्थक ठरेल! २५ मार्च १९४५ ही त्यांची जन्मतारीख. (या वर्षी त्यांनी ६८ वर्षे पूर्ण करून ६९ व्या वर्षांत पदार्पण केले होते.) संस्कृत व मराठी हे विषय घेऊन त्या बी. ए. झाल्या आणि त्यांनी ‘अनुवादक’ म्हणून महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयात प्रवेश केला. भाषा संचालनालयातील अनुवादकाचे काम म्हणजे शासकीय निर्णय, परिपत्रके व कायदे यांचे इंग्रजीतून मराठीत भाषांतर करणे. आपले काम अधिकाधिक चांगले करता यावे म्हणून त्यांनी नोकरी सांभाळून कायद्याची पदवी आणि भाषाविज्ञानाची पदविका मिळवली. कार्यालयीन कामही त्या किती निष्ठापूर्वक करीत असत, हे त्यावरून दिसून येते. त्यामुळे त्या भाषा संचालनालयाच्या सहायक संचालक व नंतर उपसंचालक झाल्या यात नवल नाही.
१९८० ते ८४ अशी चार वर्षे त्यांची पुण्याला बदली झाली होती. त्यावेळी त्या फर्गसन महाविद्यालयाच्या तिसऱ्या फाटकासमोरील ‘कायाकल्प’ या बंगल्यात प्रा. ना. पां. गुणे यांच्या घरी राहत असत. त्यावेळीही आपले काम सांभाळून त्यांनी उषाताई गुणे यांच्यासाठी एक महत्त्वाचे काम केले. प्रा. गुण्यांनी रामदासांच्या ‘मनाचे श्लोक’चे इंग्रजी पद्य भाषांतर करून त्याची पुस्तिका स्वत:च प्रकाशित केली होती. पण त्यांच्या मृत्यूमुळे पुस्तिका गठ्ठय़ातच पडून होत्या. सामंतबाईंनी त्या पुस्तिका पुस्तकांच्या दुकानांत विक्रीसाठी ठेवण्याचा प्रयत्न केला आणि उरलेल्या सर्व पुस्तिका सज्जनगडावर स्वत: नेऊन दिल्या.
१९८४ मध्ये ‘उपसंचालक’ या पदावर बढती मिळून त्या मुंबईला परतल्या. पण तिथे संचालकपदावरून डॉ. न. ब. पाटील निवृत्त झाल्यानंतरच्या वातावरणाचा त्यांना उबग आला आणि १९८६ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर नऊ वर्षे १९९५ पर्यंत त्या मुंबईतच होत्या. त्या काळात त्यांनी संहिता संपादन व मुद्रितशोधनाची अनेक कामे केली. त्यातले विशेष उल्लेखनीय काम म्हणजे ‘जर्नल ऑफ एशियाटिक सोसायटी’चे संहिता संपादन व मुद्रितशोधन. या काळात मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाने सुरू असलेल्या ‘स्वाधार’ या संस्थेचे कार्यालयीन काम, बैठकांचे वृत्तान्तलेखन, अहवाल लेखन अशी अनेक कामे त्या करीत. श्री. व्यं. केतकरांची कन्या वीरा शर्मा यांच्या इंग्रजी कथांचा त्यांनी मराठी अनुवाद केला. ग्रंथालीने ‘आहेर’ या शीर्षकाने तो १९९० मध्ये प्रकाशित केला.
पुण्यात आल्यानंतरही त्या ‘स्वाधार’च्या पुणे शाखेत काम करीत. त्याचप्रमाणे पुस्तकांच्या संहितांचे संपादन व मुद्रितशोधनाचीही कामे करीत. पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या विलास संगवे यांच्या जैनविद्येबद्दलचे अनेक खंडांतील ग्रंथांचे काम त्यांनीच केले होते. कुठल्याही बाबतीत शंका असल्यास तिच्या मुळाशी जाऊन, लेखकाशी चर्चा करून स्वत:चे समाधान होईपर्यंत त्या तिचा पाठपुरावा करीत. त्यामुळे काही प्रकाशकांशी त्यांचे खटकेही उडाले होते.
त्यांची शुद्धलेखनाबाबतची भूमिका वादग्रस्त ठरली. त्या जुन्या (१९६२ पूर्व) शुद्धलेखनाबाबतीत आग्रही होत्या. ऱ्हस्व-दीर्घ, अनुस्वार यांच्या बाबतीत उच्चाराचे अनुकरण करणारी, लोकांचा अनुनय करणारी, सुलभीकरणाचा आग्रह धरणारी, शासनमान्य शुद्धलेखनपद्धती ही त्यांच्या टीकेचा विषय ठरली. त्या पद्धतीला व्याकरणाचा आधार नसल्यामुळे मराठी भाषेच्या ऱ्हासाला ती कारणीभूत ठरेल असा त्यांचा ठाम विश्वास होता. आपले मत सप्रमाण आणि सोदाहरण मांडण्यासाठी त्यांनी ‘व्याकरणशुद्ध लेखनप्रणाली’ या नावाची पुस्तिका १९९९ मध्ये लिहिली. (गेल्या वर्षी या पुस्तिकेची चौथी आवृत्ती प्रकाशित झाली.) या पुस्तिकेच्या प्रस्तावनेत त्यांनी म्हटले आहे की, ‘‘ज्याप्रमाणे उद्योगधंदा, व्यापार, इ. आर्थिक व्यवहारांना किमान नीतिमत्तेचे अधिष्ठान नसेल त्यांना भ्रष्टाचाराची अवकळा प्राप्त होते, त्याप्रमाणेच सार्वजनिक पातळीवरील प्रमाणलेखनाला व्याकरणाची चौकट नसेल तर भाषिक अनाचार माजतो.’’ पण घडय़ाळाचे काटे उलट फिरवता येत नाहीत. त्यांची भूमिका शास्त्रशुद्ध असली तरी शेवटी ‘शास्त्रात् रुढीबलीयसी’ हेच खरे. त्यामुळे त्यांची शुद्धलेखन प्रणाली स्वीकारली गेल्याचे दिसत नाही. आपले लेखन छापताना आपली शुद्धलेखनपद्धती वापरावी असा त्यांचा आग्रह असे. पण नंतर नाइलाजाने त्यांना तोही सोडावा लागला.
१९९९ मध्ये त्यांनी आणखी एक लढा सुरू केला. टंकलेखनयंत्राच्या सोयीसाठी शासनाने आडवी जोडाक्षरपद्धती स्वीकारली होती. म्हणजे बुद्धी, विद्वान, विठ्ठल हे शब्द बुद्धी, विद्वान, विठ्ठल असे लिहावेत असे ठरवले. हे नियम अस्तित्वात आल्यानंतर स्थापन झालेल्या पाठय़पुस्तक मंडळाने (म्हणजे बालभारतीने) ही आडवी जोडाक्षरपद्धती आजतागायत चालू ठेवली आहे. वास्तविक १९९० च्या दशकात संगणकयुग अवतरले व ही ‘तोडाक्षर’ पद्धती चालू ठेवण्याचे कारण उरले नाही. सत्त्वशीला सामंतांनी १९९९ पासून पाठय़पुस्तक मंडळाशी, शासनाशी, साहित्य संस्थांशी पत्रव्यवहार सुरू केला. वृत्तपत्रांतून लेख लिहिले. पण ही आडवी जोडाक्षरपद्धती बालभारती वगळता महाराष्ट्रातल्या कोणत्याही प्रकाशन संस्थेने स्वीकारली नव्हती. त्यामुळे सामंतबाईंच्या लढय़ाकडे कुणी फारसे गंभीरपणाने पाहिले नाही. २००९ मध्ये शासनाने नवी वर्णमाला व जोडाक्षरांची उभी (जुनी) पद्धती स्वीकारली व तसा शासकीय निर्णय जाहीर केला. पण पाठय़पुस्तक मंडळ अडेलतट्टूप्रमाणे शासनाचा हा निर्णय अमलात आणायचे नाकारत आहे. त्यामुळे बालभारतीला (पाठय़पुस्तक मंडळाला) वठणीवर आणण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याची सामंतांनी तयारी केली होती. ते त्यांचे कार्य त्यांच्या मृत्यूमुळे अपूर्णच राहणार की काय, अशी शंका येते. तसे होऊ नये. पण बालभारतीला सद्बुद्धी सुचेल अशी आशा बाळगण्याशिवाय आपण दुसरे काय करू शकतो?
त्यांचे आणखी एक महत्त्वाचे कार्य म्हणजे ‘शब्दानंद’ हा त्रभाषिक कोश. इंग्रजी, मराठी व हिंदी या तीन भाषांतील हा व्यवहारोपयोगी शब्दकोश विषयवार आहे, हे त्याचे वैशिष्टय़. त्याला शासनाचा सवरेत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार व राज्य हिंदी साहित्यनिर्मिती पुरस्कार असे तीन मान्यताप्राप्त पुरस्कार मिळाले.
सामंतबाईंच्या कामात श्रीयुत सामंतांचा मन:पूर्वक सहभाग असे. मजकूर टंकलिखित करून घेणे, त्याच्या छायाप्रती काढणे, टपाल कचेरीत फेऱ्या मारणे, इ. कामे रासायनिक अभियंता असलेले सामंत आनंदाने करीत. त्यांनाही भाषेमध्ये रस व गती आहे. त्यामुळे १९७२ मध्ये विवाहबद्ध झाल्यानंतर त्यांनी आपल्या अर्धागिनीला समर्थ साथ दिली. मराठीच्या सत्त्वाचे व शीलाचे रक्षण करण्यासाठी सामंत पती-पत्नीने तन-मन-धन खर्च करून अथक प्रयत्न केले. तोच त्यांचा संसार होता. सत्त्वशीलाबाईंच्या प्रयाणाने सामंत मात्र आता एकटे राहिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा