|| विजय पाडळकर

येत्या २ मे रोजी जगविख्यात चित्रपटकार सत्यजित राय यांची जन्मशताब्दी आहे. त्यानिमित्ताने राय यांच्या चित्रपटांमध्ये नैसर्गिक अभिनय करणाऱ्या बालकलाकारांसंदर्भात…

सत्यजित राय यांच्या चित्रपटातील अभिनयाचा दर्जा हा नेहमीच श्रेष्ठ पातळीवरचा राहिलेला आहे. याचे एक कारण म्हणजे ‘अभिनय’ हा नाटकी असण्यापेक्षा नैसर्गिक असावा यावर असणारा राय यांचा कटाक्ष. आणि दुसरे म्हणजे ते अभिनेत्यावर घेत असलेली मेहनत. आपल्या चित्रपटांतून त्यांनी काही उत्तम बालकलाकारांना सादर केले आहे. हे कलाकार सिनेमाला नवखे होते, पण त्यांच्यात जबरदस्त प्रतिभा होती आणि राय यांच्या पारखी नजरेने ते हेरून त्या हिऱ्यांना पैलू पाडले.

सत्यजित राय यांनी ज्यावेळी विभूतीभूषण बंदोपाध्याय यांच्या ‘पथेर पांचाली’ कादंबरीवरून त्यांचा पहिलाच चित्रपट बनविण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांच्या मनात काही गोष्टी पक्क्या होत्या. त्यापैकी एक म्हणजे शक्यतो व्यवसायाच्या दृष्टीने कोणतीही तडजोड त्यांना करावयाची नव्हती. याच निर्णयाचा एक भाग म्हणून त्यांनी आपल्या चित्रपटासाठी व्यावसायिक, लोकप्रिय कलावंत निवडायचे नाहीत असे ठरविले. इतर पात्रांसाठी त्यांना योग्य कलावंत मिळाले; पण प्रश्न अपूच्या प्रमुख भूमिकेचा होता. त्याकाळी भारतात अभिनय शिकविणाऱ्या संस्था  नव्हत्या. त्यामुळे एक तर शाळा-शाळांतून जाऊन किंवा वर्तमानपत्रांत जाहिरात देऊन मुलांचा शोध घ्यावा लागणार होता. चित्रपटातील अपू पाच-सहा वर्षे वयाचा होता. त्यामुळे एखाद्या शाळेत शोध घेणे व्यर्थ होते. वर्तमानपत्रांत दिलेल्या जाहिरातीला संख्यात्मक प्रतिसाद भरपूर मिळाला, पण सत्यजित राय यांच्या मनात अपूची जी प्रतिमा होती तिला साजेसा मुलगा त्यांना मिळेना. एके दिवशी त्यांच्या पत्नी बिजोयाबाई घराच्या खिडकीपाशी उभ्या असताना त्यांना रस्त्यावर काही मुले खेळताना दिसली. त्यापैकी सुमारे सात-आठ वर्षांच्या एका मुलाने त्यांचे लक्ष वेधून घेतले. तो अपूच्या भूमिकेसाठी त्यांना योग्य वाटला. सत्यजित राय यांचा सल्ला घेण्यासाठी त्यांनी त्याला संध्याकाळी बोलावून घेतले.

त्या मुलाचे नाव सुबीर बॅनर्जी होते. संध्याकाळी सत्यजित ऑफिसमधून आल्यावर ती मुले पुन्हा आली. त्या मुलाला पाहताच अपूसाठीचा आपला शोध संपला आहे असे सत्यजितना मनोमन वाटले. तो मुलगा खूपच लाजाळू होता. पण हरकत नव्हती. आपण त्याच्याकडून उत्तम काम करून घेऊ असे त्यांना वाटू लागले. मात्र, सुबीरला घेऊन पहिलाच प्रसंग चित्रित करताना राय यांना मुलांकडून काम करवून घेणे किती अवघड आहे हे समजले.

प्रसंग असा होता :  शेतात अपूची बहीण पुढे जाते व  तो तिच्या मागे जातो. रायनी सुबीरला सांगितले होते, ‘चालायचे. इकडेतिकडे पाहत तिचा शोध घ्यायचा. थोडे थांबायचे. मग पुन्हा चालू लागायचे.’ पण आपण काय करायचे हे सुबीरला नीटसे कळत नव्हते. तो अगदी ताठपणे चालू लागला. सत्यजित लगेच म्हणाले, ‘कट!’

मुलाच्या चालण्याचा शॉट घेणे इतके अवघड असेल असे सत्यजितना वाटले नव्हते. काही वेळ विचार करून त्यांनी एक शक्कल लढविली. त्यांनी काही माणसांना निरनिराळ्या ठिकाणी गवतात लपविले व थोड्या थोड्या अंतराने ‘सुबीर’ अशा हाका मारण्यास सांगितले. सुबीरला सांगितले की, अशी हाक आली की त्या दिशेने पाहायचे. ही युक्ती लागू पडली व नंतरचा शॉट अगदी त्यांच्या मनासारखा झाला. त्यांनी नंतर सांगितले, ‘मी अपूला माझ्या हातातील बाहुल्यांच्या खेळातील एखादी बाहुली असल्यासारखे वागविले. त्याच्या प्रत्येक हालचालीवर मला लक्ष ठेवावे लागत होते व तिला वळण द्यावे लागत होते.’ दुर्गाची भूमिका करणाऱ्या उमा दासगुप्ताने त्याच्याबद्दल म्हटले आहे, ‘सुबीर इतका लहान होता, की त्याला अक्षरश: कामासाठी ओढावे लागे. अनेकदा प्रलोभनेही द्यावी लागत. आणि प्रत्येक गोष्ट बऱ्याच वेळा समजावून सांगावी लागे. मात्र, त्याच्या चेहऱ्यावरचा तो निरागस भाव, त्यावरील सरसर बदलणारे भावदर्शन, त्याची डोळ्यांची सहज उघडझाप आणि त्यावरून फिरलेली सत्यजित राय यांची जादूची छडी यातून अपूचे लोभस चित्र तयार होई.’

राय हे काम करणाऱ्या मुलाला सर्वांसमोर कधीच सूचना देत नसत. ते त्याच्या जवळ जाऊन त्याच्या कानात कुजबुजल्यासारखे बोलत. जणू ते त्या दोघांमधले गुपितच आहे. मुले त्यांच्याशी लगेच जोडली जात. त्यामुळे त्यांच्या चित्रपटांत मुलांनी केलेल्या काही अतिशय अप्रतिम भूमिका पाहावयास मिळतात. ‘पोस्टमास्तर’ हा रवींद्रनाथ टागोर यांच्या त्याच नावाच्या कथेवर आधारित चित्रपट होता. या कथेत गावातील पोस्टमास्तरच्या घरी पडेल ते काम करणाऱ्या, अनाथ, गरीब मुलीची भूमिका चंदना बॅनर्जी या नऊ-दहा वर्षांच्या मुलीने केली होती. कृश, सडसडीत बांधा, टपोरे डोळे, पण लहानसेच तोंड, चेहऱ्यावर दीनवाणा आज्ञाधारक भाव, अंगाभोवती एक फाटकी, मळकट साडी कशीबशी गुंडाळलेली. भारतातील बालमजुराचे मूर्तिमंत रूप. ही भूमिका ती अक्षरश: जगली होती. तिच्याविषयी राय यांनी म्हटले आहे- ‘मी तिला एका नृत्यशाळेत प्रथम पाहिले आणि तिची निवड केली. ती अतिशय उत्तम अभिनेत्री निघाली. कसलाही ताण नाही. शिवाय समजदार, हुशार आणि सांगितलेले ऐकणारी! ती इतके उत्तम काम करू लागली की ‘पोस्टमास्तर’ची प्रमुख भूमिका करणाऱ्या अनिल चटर्जीसारख्या उत्तम नटाला ती समोर असताना आपल्याकडे कुणी पाहिलं की नाही याची भीती वाटायची.’

चंदना अभिनय करते आहे असे वाटतच नाही. तिची देहबोली, तिचे वागणे, बोलणे, तिच्या मुद्रेवरील भाव हे सारेच अप्रतिम  होते. ही आईबापाविना पोरकी मुलगी आहे हे पाहताच जाणवत होते. कारुण्य आणि समजूतदारपणा यांचे विलक्षण मिश्रण तिच्या नजरेत होते. ती नजर मनाचा ठाव घेणारी होती, हे ध्यानात घेऊन चित्रपटात अनेकदा रायनी तिचा क्लोजअप् घेतला आहे. त्यावेळचे तिच्या चेहऱ्यावरचे समजूतदार दु:ख मन पिळवटून टाकणारे भासते.

या दोन्ही भूमिकांपेक्षा ‘Twol’ या लघुपटातील श्रीमंत मुलाची भूमिका फार वेगळी होती. आलिशान बंगल्यात राहणारा हा एक लाडावलेला, उर्मट, असंस्कृत व समृद्धीमुळे क्रूर बनलेला असा मुलगा आहे. रवी किरण या मुलाकडून राय यांनी ती भूमिका करवून घेतली होती. त्या गर्भश्रीमंत मुलाचा रुबाब, गर्व, ताठा आणि शेवटचा हताशपणा त्याने अचूक व्यक्त केला होता. या लघुपटातील गरीब मुलाची भूमिका करण्यास राय यांना बरेच दिवस मुलगा सापडत नव्हता. शेवटी त्यांनी झोपडपट्टीतून एका मुलाला आणले व त्याच्याकडून ती भूमिका करवून घेतली. या दोन्ही मुलांनी इतका नैसर्गिक अभिनय केला आहे की चित्रपट पाहताना त्या दोघांच्या तोंडी संवाद नाहीत हे आपण विसरूनच जातो.

‘पिकू’ या लघुपटातील मुलाच्या भूमिकेसाठी रुमा गुहा ठाकुरता ही तिच्या नात्यातील एका अर्जुन नावाच्या मुलाला राय यांच्याकडे घेऊन आली. त्याने अर्थातच यापूर्वी सिनेमात काम केले नव्हते. पण रायना अशा मुलांकडून काम करून घेणे आवडे. त्यांनी चित्रपटातील ती महत्त्वाची भूमिका त्याच्याकडून फार अप्रतिम करून घेतली.

मुलांसाठी ‘सोनार केला’ हा चित्रपट तयार करताना राय यांनी त्यातील एका प्रमुख भूमिकेसाठी कुशल चक्रवर्ती या मुलाची निवड केली. कुशलने पुढे यासंदर्भात म्हटले आहे, ‘राय हे मुलांनाही मोठ्यांच्या बरोबरीने वागवीत व त्यामुळे आमच्या मनातही एक नवा आत्मविश्वास जागा होई.’ राय यांचे या मुलाबद्दल मत फार चांगले होते. ‘हा एक देणगी असलेला कलाकार होता. कॅमेऱ्याचे त्याच्यावर मुळीच दडपण नसे. स्वत:ला विसरून तो अभिनय करी. मुळीच नव्र्हस न होणारा असा दुसरा मुलगा मी पाहिलेला नाही.’

या कुशलच्या संदर्भातील एक आठवण सौमित्र चटर्जी याने सांगितलेली आहे. ‘एकदा दिवसभराचे शूटिंग आटोपून सारे युनिट परत येत होते. सारे थकून गेले होते. कुशलच्या मनात अनेक प्रश्न होते. पण त्यांची उत्तरे देण्याचेही आम्ही टाळत होतो. मात्र, त्याने जेव्हा राय यांच्याकडे मोर्चा वळवला तेव्हा त्यांनी त्याच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे न कंटाळता दिली. जणू काही तो एक बरोबरीची व्यक्ती असावी असे ते बोलत होते.’

राय यांचे मुलांशी असणारे नाते शेवटपर्यंत टिकून होते. ‘आगंतुक’ या त्यांच्या अंतिम चित्रपटासाठीदेखील त्यांनी लहान मुलाला महत्त्वाची भूमिका असणारी कथा निवडली व विक्रम भट्टाचार्य या नव्या मुलाकडून त्यांनी फार सुरेख काम करून घेतले. राय यांच्या मनात एक लहान मूल दडून बसलेले होते. म्हणूनच त्यांनी मुलांसाठी जे लेखन केले ते प्रचंड लोकप्रिय झाले. आजच्या नव्या पिढीतील मुलेदेखील ते आवडीने वाचत आहेत.

vvpadalkar@gmail.com

Story img Loader