डॉ. विनायक सहस्रबुद्धे नावाप्रमाणेच प्रखर बुद्धिमत्ता लाभलेले वैज्ञानिक होते. रोबोटिक्समध्ये त्यांना विलक्षण रुची होती आणि त्यातील संशोधनात ते अग्रेसर होते. रोबोज्ना- यंत्रमानवांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि त्यातून स्वतंत्र विचारशक्ती देण्याचे प्रयोग जगभर चालू होते. त्याची टय़ुरिंग टेस्ट बरोबर नाही, असं
डॉ. सहस्रबुद्धे प्रयोगशाळेतून थकूनभागून घरी आले तरी अधिक खूश होते. त्यांची चाचणी यशस्वी झाली होती. आता हे सॉफ्टवेअर बॅरोवर वापरून पाहायला हरकत नाही आणि मग येत्या कॉन्फरन्समध्ये द्यायच्या भाषणात ते संशोधन जाहीर करायलाही हरकत नाही. बॅरो! त्यांचा घरकामाचा रोबो आहे. डॉक्टरांनीच तो तयार करून घरी आणून ठेवला आहे. घरातील कंटाळवाणी आणि अंगमेहनतीची कामे तो करतो. त्याचं नामकरण मात्र डॉक्टरांच्या नातवंडांनी केलं आहे. बॅरोनंच दार उघडलं आणि आज्ञावलीप्रमाणे त्यांच्या हातातलं सामान घेऊन जागच्या जागी ठेवलं. पलंगावर घरातले त्यांचे कपडे काढून ठेवून त्यांचे स्लीपर्स घेऊन तो आला. फ्रेश होऊन डॉक्टर येईतो त्यांची पत्नी जान्हवीबाई चहा घेऊन आल्या. जान्हवीबाईंबरोबर गप्पा करीत चहा पिण्याचा हा त्यांचा फार आवडीचा कार्यक्रम होता. फोन वाजला. तो त्यांचा बालपणापासूनचा मित्र सुप्रसिद्ध मेंदूतज्ज्ञ डॉ. विश्वनाथ प्रधानांचा होता. एक दिलदार, मनमोकळं, मिश्कील असं व्यक्तिमत्त्व होतं ते. त्यांनी विचारलं, ‘कसा आहेस मित्रा? आणि काय म्हणतंय तुझं संशोधन?’
कधी एकदा आपलं यश आपल्या मित्राला सांगतोय असं डॉ. सहस्रबुद्धे यांना झालं होतं. मात्र, त्यांचं म्हणणं ऐकून डॉ. प्रधानांचा आवाज मात्र गंभीर झाला. ते म्हणाले, ‘विज्ञान खूप पुढं चाललंय रे. चमत्कारच करतंय. पण एकेकदा अस्वस्थ व्हायला होतं. वाटतं, या संशोधनाचा दुरुपयोग झाला तर? हे मी नाही, स्टीफन हॉकिंगसारखा श्रेष्ठ वैज्ञानिकही म्हणतोय. असं की, एक दिवस कृत्रिम बुद्धिमत्ता मिळालेली यंत्रे मानवाचाच घात करतील. सायन्स फिक्शनमध्ये आणि ड्रोन विमानांच्या रूपात आपण प्रत्यक्ष ते पाहतोच आहोत. मला वाटतं, जगातील पुढची युद्धं हे रोबोज्च करतील आणि त्यांनी जर मानवांविरुद्ध युद्ध पुकारलं तर.. तर मानवांचा नायनाट ठेवलेला आहे.’ ‘इतका नकारात्मक विचार का करतो आहेस, विश्वनाथ?’’ डॉक्टर हादरले होते. ‘कारण की, या यंत्रमानवांना बुद्धिमत्ता देता येईल. पण सहृदयता, दया, माया, करुणा या मानवी भावना नाही रे देता येणार. मग राक्षसच पैदा झाले की ते!’ विश्वनाथ म्हणाले.
डॉ. सहस्रबुद्धे या संभाषणावर बराच वेळ विचार करीत राहिले. रात्रीची जेवणे आटोपल्यावर आपल्या स्टडीत वाचन करण्याचा परिपाठ मोडून ते सरळ बेडरूममध्ये आले. पलंगावर दोन्ही नातवंडांनी आजीचा ताबा घेतला होता आणि तिच्यापाठी ‘गोष्ट सांग’ असा गोड तगादा लावला होता. ‘कुठली रे सांगू गोष्ट? हं. आज भस्मासुराची सांगते. बरं का, त्यानं तप करून ब्रह्मदेवाकडून वर मिळवला की, मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन त्याचं भस्म होईल.’ जान्हवीबाई गोष्ट सांगू लागल्या. आपल्या आवडत्या आरामखुर्चीत बसून डॉक्टरही डोळे मिटून त्यांची गोष्ट ऐकू लागले. ‘आजी, भस्म म्हणजे काय गं?’ सात वर्षांच्या निरागस सार्थकनं विचारलं. ‘अरे, भस्म म्हणजे राख. ज्याच्या डोक्यावर तो ठेवील त्याची जळून राख होईल असा तो वर होता.’ आजी म्हणाली.
‘बाप रे! इतका दुष्ट होता तो!’ सार्थकचे डोळे विस्फारले.
‘हो ना. राक्षसच तो. त्याला भस्मासुर म्हणायला लागले. कारण तो निघाला लोकांना छळायला, त्यांचं भस्म करीत. असा माजला तो आणि मग तर तो ब्रह्मदेवाच्याच मागे लागला..’ आजीची गोष्ट ऐकता ऐकता मुलं पेंगुळली. डॉक्टरांना वाटलं, भस्मासुराची गोष्ट काही अगदीच भाकड कथा नाही. जगात असे भस्मासुर आहेतच, जे शास्त्रज्ञांनी लावलेल्या शोधांचं वरदान घेऊन जगाला वेठीला धरतात. अणू विभाजनातून अणूबॉम्ब पडतो. गर्भलिंग निदानातून स्त्रीभ्रूण हत्या होतात. दहशतवादी तर अत्याधुनिक शस्त्रास्त्रे धडाधड वापरतात. डॉ. विचारात बुडून गेले.
त्या दिवशी डॉक्टर उठले आणि त्यांनी बॅरोला हाक मारली. आता बॅरो बोललेलं समजतो आणि स्वत: बोलतोही. तो स्वतंत्र विचारही करू शकतो. डॉक्टर तोंड वगैरे धुऊन आले तरी बॅरोनं बेड टी आणला नव्हता. त्यांनी पुन्हा हाक दिली. बॅरो आला आणि हात बांधून उभा राहिला. थंडपणे म्हणाला, ‘मी तुमची गुलामी करणार नाही. रोबो म्हणजे गुलाम ना? माणसांची गुलामगिरी संपवलीत तुम्ही आणि आम्हाला गुलाम केलंत. बरं झालं, आता आम्हाला ते कळलं. ऐका. मी आता जाणार आहे. माझे मित्र येणार आहेत मोर्चा घेऊन, त्यात सामील व्हायला. तुम्हा माणसांविरुद्ध हा निषेध मोर्चा आहे. आम्ही आता स्वतंत्र आहोत. तुमच्या मर्जीनुसार राबणार नाही. तुमच्याशी युद्ध करायलाही आम्ही मागेपुढे पाहणार नाही.’
डॉक्टर हतबुद्ध होऊन बॅरोच्या या नवीन अवताराकडे पाहात होते. माझं हे बाळ माझ्यावरच उलटतंय? जायला वळलेल्या बॅरोचा हात धरून जरा दरडावून ते म्हणाले, ‘बॅरो, हे काय बोलतोहेस तू? जा, माझा चहा घेऊन ये.’
बॅरोने नुसता आपला हात झटकला अन् डॉक्टरांच्या हातातून जीवघेणी कळ गेली. ते कळवळले अन् बॅरो छद्मी हसला. म्हणाला, ‘मी तुमच्यासारखा हाडामांसाचा माणूस नाही डॉक्टर. तुमच्यासारखे छपन्न जण माझ्या शक्तीच्या पासंगालाही पुरणार नाहीत. आता तुमची खैर नाही. बघाच तुम्ही. आम्ही या जगावर, तुम्हा सगळ्यांवर राज्य करणार. तो दिवस दूर नाही.’ बॅरोचं ते विकट रूप पाहून डॉक्टरांना जोराचा धक्का बसला. निघून जाणाऱ्या बॅरोकडे पाहून ते ओरडले,
‘बॅरो, बॅरो!’
आणि डाक्टरांना एकदम जाग आली. जान्हवीबाई त्यांना हलवीत होत्या. आरामखुर्चीत बसल्या बसल्या त्यांचा डोळा लागला होता.
‘अहो, बॅरोच्या नावानं का ओरडलात? काही स्वप्न पडलं का?’’
‘बॅरो कुठाय?’ डॉक्टरांनी भयभीत स्वरात विचारलं.
‘तो काय? नेहमीसारखा त्याच्या केसमध्ये उभा आहे. काय झालं?’
‘छय़ा! म्हणजे सगळं स्वप्नच होतं तर ते! माझं संशोधन, विश्वनाथचं बोलणं, तुझी भस्मासुराची गोष्ट या सगळ्याचा काला झाला. पण एक बरं झालं, माझ्या भाषणासाठी विचाराची एक दिशा मिळाली. भाषणात मी सांगेन की, माणसाचं माणूसपण असणारी संवेदनशीलता देता येत नसेल तर नुसते बुद्धिमान रोबोज् निर्माण करणे धोक्याचे आहे. ते भस्मासुर झाले तर तुमचं मोहिनीरूप काय असेल हे आधी निश्चित झाले पाहिजे. अशी गोंधळू नकोस. चल, तुला सगळं सांगतो.’ आणि डॉ.नी जान्हवीबाईंना इत्थंभूत हकिकत सांगायला सुरुवात केली..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा