‘‘मामा, आज पण मीच जिंकली. आता मात्र काहीतरी वेगळं करा की!’’
राघव सुलीकडे वळला. तिच्या आवाजात आनंद ओसंडून वाहत होता. तिच्या भोकरासारख्या डोळ्यांत तो मावत नव्हता. बरोबरच्या चार मुलींसोबत सोंगटय़ा खेळता खेळता ती उठून आली होती.
‘‘काय वेगळं करायचं म्हणतेस?’’
‘‘बघा, तुम्ही सांगितलं की, या सोंगटय़ा अशा बाजूबाजूला मांडायच्या.. होय की नै? आणि समोरचा भिडूपण तश्शाच मांडणार सोंगटय़ा.’’
‘‘हो.. मग?’’
‘‘आणि भिडूच्या एका सोंगटीवरून आपली सोंगटी नेली की त्याची सोंगटी आपली होणार.’’
‘‘बरोबर!’’
‘‘तर काय होतं- मी लगालगा या पोरींच्या सोंगटय़ा घेती नि जिंकती.’’
‘‘म्हणजे तू या खेळात तरबेज होतेयस.’’
तिला प्रोत्साहन देताना राघवला बरं वाटत होतं.
‘‘पण मामा, आता मला मजा नाय येत यात..’’ ती फुरंगटून म्हणाली.
‘‘का गं?’’
‘‘तुम्ही बघा की. या सोंगटय़ा काय सारख्या नायत. माझ्या काळ्या सोंगटय़ा घेतल्या तरी त्या नऊ काळ्याबी सारख्या नायत. दोन छोटय़ा हायत, तर एक लांबुटकी हाय. हाय की नै? एक तर अगदी घोडय़ावाणी दिसते..’’
‘‘बरोबर आहे. पण काय आहे सांगू का- आधी या खेळात खूप सोंगटय़ा होत्या. सोळा काळ्या नि सोळा सफेद असायच्या. सोळा वेगवेगळ्या.. पण तशाच काळ्या नि तशाच पांढऱ्या.’’
‘‘सोळा?’’
‘‘हो. पण आपल्या हातात आल्या तेव्हा एकेक करून हरवल्या त्या. ज्या उरल्या त्या तुम्हाला दिल्या खेळायला.’’
‘‘ते ठीक हाय. पण मग या वेगळ्या वेगळ्या दिसतात, तर त्यांना नियमपण वेगळे वेगळे द्या की!’’
‘‘म्हणजे?’’
‘‘म्हणजे असं की..’’
सुलीने तो फाटकातुटका पट त्याच्या समोर ठेवला. एकाआड एक काळ्या-पांढऱ्या चौकोनांचा तो पट एकेकाळी बुद्धिवंत लोकांचा आवडता खेळ होता.
सुली रंगात येऊन त्यावर सोंगटय़ा लावायला लागली. ‘‘हां.. ही घोडय़ावाणी दिसणारी सोंगटी हाय ना, ती बघा अशी दौडत दौडत जोरानं जाणार. टपटप टापा टाकत जाणार. समोर कोणी आलं तरी डर नाय! सर्रकन् त्यांच्यावरून उडी टाकत जाणार!’’
राघव कुतूहलाने बघायला लागला.
‘‘आणि आता ही जाडी सोंगटी. ती थोडीच जाणार घोडय़ावाणी? तिला तर चालायलापण नाय होणार!’’ खुदूखुदू हसत सुलीने ती सोंगटी पार एका कोपऱ्यात नेऊन उभी केली.
‘‘ती बघा जाम हळूहळू चालते असं करा. त्या बारक्या दोन.. त्या फक्त पुढे जाणार. आणि ती लांबुटकी हाय ती पुढे आणि मागे दोन्ही बाजूंनी जाणार असं करा.’’
राघव थक्क होऊन पाहत राहिला. ते चिमुकले हात पटावर सरसर फिरत होते.
‘‘अगं, पण असं का?’’
‘‘ओ मामा, म्हणजे काय होणार, की सोंगटय़ा खेळताना भारीच विचार करायला लागेल. समोरचा कोणती सोंगटी उचलेल, ती सोंगटी कशी चालेल, तो भिडू ती सोंगटी कसा नि कुठं ठेवेल.. किती विचार करायला लागेल नै? नि तो काय करेल, त्याचा अदमास घेत घेत मग आपण आपली सोंगटी निवडायची. हरलो नाय पायजे ना आपण!’’
तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. राघव रोमांचित होऊन गेला.
‘‘आणि मग काय गं?’’
‘‘मग गंमत अशी की, समोरचा भिडूपण काय कमी नसणार! तो पण असा पुढचा विचार करणार ना! त्याला तर मला हरवायचं असणार! म्हणून मग तो तश्शी त्याची खेळी करणार.’’ ती नादात सोंगटय़ा हलवून बघत होती.
‘‘खरंय.’’
‘‘म्हणजे त्याची चाल काय असेल, मग माझी चाल काय असेल, मग त्यावरची त्याची चाल काय असेल.. असा कितीतरी पुढचा पुढचा विचार करायला लागेल मला! भारी मजा येईल हो मामा.’’ त्या कल्पनेने सुली नुसती खूश होऊन गेली.
‘‘मग करू की आपण तसं. चल, नवे नियम बनवू नि तसं खेळून बघू.’’
ही पोरगी आज या पृथ्वीवर उरलेल्या शंभरेक मुलांपैकी एक. तिला तो सोंगटय़ांचा साधा खेळ आता पुरे नाही पडत. तिच्या मेंदूला चालना मिळतेय. तिला तो खेळ कठीण करायचाय. त्यातून आव्हान हवंय तिला. तिला चौकटीबाहेर जायचंय आता.
सुलीचं बोलणं ऐकत दोन-चार पोरं पुढे झाली. त्यात भुरक्यापण होता.
‘‘बरोबर बोलती ही मामा. तो खेळ भारीच सोपा- म्हणून मला नाय आवडायचा. पण अवघड केलात ना, तर मी खेळीन तो.’’
त्या दोघांकडे बघताना राघवचा ऊर भरून आला.
असाच बनवला असेल का बुद्धिबळाचा खेळ माणसाने पहिल्यांदा? मुद्दाम विचार करायला लावणारा? असेच तयार झाले असतील का त्यातले चित्रविचित्र नियम..? मेंदूला ताण देणारे? असेच घडत गेले असतील त्यातले भन्नाट डावपेच? माणसाच्या बुद्धीचा कस बघणारे? कोणाच्या असतील या अध्र्यामुध्र्या सोंगटय़ा? कोणाचा असेल हा बुद्धिबळाचा पट?
पृथ्वीवर एवढं मोठं अणुयुद्ध झालं! देशच्या देश बेचिराख होऊन गेले. कुठे कुठे वाचली काही काही माणसं. जेमतेम चारशे. कसेबसे एकत्र आलो आपण सगळे.
आणि आहे काय आपल्याकडे आता? काही कपडे, काही अवजारं नि काही खाण्याच्या वस्तू.. एवढीच तुटपुंजी संपत्ती सगळ्यांकडे मिळून. मग त्यात हा पट कसा? कोणाचा? कुठून आला?
..एका अनामिक जाणिवेने भारावून गेला राघव. कोणालाच बुद्धिबळाचे नियम नीटसे आठवत नव्हते. मग आपण त्यातल्या त्यात सोपा नियम घेऊन मुलांना तो खेळायला दिला होता. सरळ-साधा सोंगटय़ा जिंकायचा खेळ. पण आज सुलीने एक सीमा नकळत ओलांडली होती. तिला तो सोपा खेळ आता नको झाला होता. आपणच तो कठीण करण्याचा विडा उचलत होती ही चिमुकली मुलगी. माणसाच्या बुद्धीची उपजत ताकद दाखवून देत होती ती.
नसेना का आपल्याकडे फार काही.. ही मुलं आहेत ना! या काळ्या-पांढऱ्या पटावरून सुरुवात करून कुठल्या कुठे झेप घेतील ही मुलं!
पट
‘‘मामा, आज पण मीच जिंकली. आता मात्र काहीतरी वेगळं करा की!’’ राघव सुलीकडे वळला. तिच्या आवाजात आनंद ओसंडून वाहत होता. तिच्या भोकरासारख्या डोळ्यांत तो मावत नव्हता. बरोबरच्या चार मुलींसोबत सोंगटय़ा खेळता खेळता ती उठून आली होती. ‘‘काय वेगळं करायचं म्हणतेस?’’
आणखी वाचा
First published on: 15-03-2015 at 03:26 IST
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Science story board