सनीला कवटाळून बसलेल्या सायाला बागेतल्या त्या बेंचवर बसूनही चार तास झाले होते. तिच्या या सुन्न स्थितीत तिला फक्त दोन गोष्टींची जाणीव होती : कानावर अजूनही आदळत असलेले सारंगचे शब्द आणि
आपण साक्षीची जुळी बहीण आहोत असंच आजवर वाटत आलं होतं. पण तरी साक्षीला सगळं काही चांगलं मिळायचं. आणि मला मी सिंड्रेला वाटायची. सिंड्रेला सावत्र मुलगी होती. पण मला का असं वागवलं जातंय, याचं कारण कळायचं नाही कधी मला! मी स्वत:ला त्या कुटुंबातलाच हिस्सा समजत होते. पण एकदा शिशाचा उकळता रस कानात ओतला जावा तसं ते बोलणं माझ्या कानावर पडलं. मी सख्खी, जुळी, सावत्र अशी कोणतीच मुलगी नव्हते माझ्या आई-वडिलांची! मला जन्मही मी जिला आई समजत होते त्या साक्षीच्या आईने दिलेला नव्हता. मी त्या घरातली म्हटली जावी का, हाही प्रश्नच होता. मला दत्तक घेतलेलं नव्हतं. मी ‘क्लोन’ होते साक्षीचा! साक्षीच्या डीएनएपासून बनलेली! हा धक्काच होता मला. माझं वेगळं अस्तित्व होतं की नव्हतं, कळत नव्हतं. कारण मी तिची फक्त नक्कल होते. पण असं असलं तरी माझ्या जन्माला कारण मात्र होतं, ते साक्षीचंच होतं. साक्षी झाली तेव्हा म्हणे ती कशामुळे तरी आजारी असायची. सतत तिला काही होईल की काय, या चिंतेने आई-बाबा व्याकूळ असायचे. त्यावेळी डॉक्टरांनी तिचा ‘क्लोन’ करून घ्यायचा सल्ला दिला. क्लोन असला की त्याच्याकडून बोन मॅरो घेता येतो. अवयव, हृदय, डोळे काहीही हक्काने घेता येतं. हे कारण जेव्हा मला कळलं तेव्हा मी पार हादरून गेले होते. मी जन्माला आले तोवर साक्षी औषधाने बरी व्हायला लागली होती. नंतर तर तिला काहीच त्रास झाला नाही कधी! जणू माझा जन्म व्हायचा होता म्हणून तिला काही झालं होतं. मीही साक्षीबरोबर शाळेत जात होते. कॉलेजमध्ये गेले. साक्षीला चांगले मार्क्स मिळाले की तिचं कौतुक व्हायचं. ते मी चांगले मार्क्स मिळवले तरी माझ्या वाटय़ाला कधीच आलं नाही.
साक्षीची ‘नक्कल’ म्हणून सतत तिचे जुने कपडे, पुस्तकं वापरत आले. साक्षीला काही होत नाहीये आणि म्हणून आपण जिवंत आहोत, यात सुख मानत राहिले. काय करणार होते मी? मला मी ‘साया’ म्हणून कोणी मानत नव्हतंच. खरं तर माझं नाव तरी कसं ठेवलं गेलं, कोण जाणे! कदाचित मी साक्षीची सावली म्हणून कोणी तसं म्हणायला लागलं असेल. सावली. सतत तिच्याबरोबर असणारी! साक्षीला कधी मेंदूची गरज पडली तर तो मेंदू सुशिक्षित व्यक्तीचा असलेला बरा; म्हणून मला शिकवलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. साक्षीने सारंगला घरी आणलं तेव्हा सारंगच्या नजरेपासून दूर राहायला सांगितलं होतं आईने मला. राहिले मी दूर. पण तरी सारंगला पाहायला बंदी नव्हती म्हणून त्याला हळूच पाहून कुतूहल शमवून घेतलं. पण ते का केलं, असं मग वाटायला लागलं. कारण मी सारंगच्या प्रेमात पडले होते. मला ठाऊक होतं, की तो निव्वळ साक्षीचा आहे. पण इतक्या देखण्या, अत्यंत हुशार अशा वैज्ञानिकाच्या मी प्रेमात पडणं अगदी स्वाभाविक होतं. त्याचा स्वभाव तरी किती ऋजू! माझ्याही नकळत मी त्याची स्वप्नं पाहायला लागले. साक्षीच्याच डीएनएने बनल्यामुळे तर असं झालं नव्हतं ना? कोण जाणे! साक्षी-सारंगचं लग्न झालं तरी मला काय फरक पडणार होता? कारण मला तो मिळणं शक्य नाही, हे माहीत असूनही त्याची स्वप्नं रंगवत होते मी! तो एक चाळाच लागला मला. साक्षीला धवल झाला. पण तिच्या घरी काही ना काही कुरबूर सुरू झाल्याचं माझ्या कानावर आलं. साक्षीला सारंग पुरेसा वेळ देत नाही म्हणे! हे काय कारण झालं? वेळ मिळेल त्यातून वेचायला नको का? पण हे साक्षीसारख्या हट्टी मुलीला कसं जमावं? शेवटी एक दिवस ती सारंगशी भांडून माहेरी परत आली. माझा जीव सारंगसाठी खूप कळवळला. पण मला कोण विचारणार होतं? आई-बाबांनी साक्षीला खूप समजावलं. तिला ते परत जायला भाग पाडू बघत होते.
एक दिवस रात्री अचानक साक्षी माझ्या खोलीत आली. तिने मला सांगितलं, ‘‘साया, मी जातेय. मी नाही राहू शकत सारंगबरोबर. त्याच्या आणि माझ्या आवडी पूर्णपणे वेगळ्या आहेत. माझा जीव घुसमटतो तिथे. आई-बाबा ऐकणार नाहीत. मी इथून जातेय. पण धवलमध्ये जीव अडकतोय. तू आणि मी काही वेगळ्या नाही. तू तिथे जा. धवलला सांभाळ. मी इथून जातेय. मला माझं स्वातंत्र्य हवंय. मला इथेही राहायची इच्छा नाही. इथे राहिले तरी आई-बाबा तिथे जा म्हणून भुणभुण लावणार.’’
तिच्या शब्दांनी मी थक्कच झाले. मी आणि ती वेगळ्या नाही म्हणतेय. कोणत्या वळणावर आले होते मी? माझ्या स्वप्नातल्या राजकुमाराकडे जायची संधी साक्षी आपणहून मला देत होती. ती फक्त धवलचा विचार करत होती. सारंगच्या आणि माझ्या मनाला काय वाटेल, हे तिच्या खिजगणतीतही नव्हतं. तिने मला तिची रोजनिशी दिली. मी ती वाचली. तिचा हेकेखोरपणाच खरं तर जाणवला मला त्यात. मी तिला समजवायला हवं होतं का, असा पुसटसा विचार मनाला शिवला. पण आलेली संधी पाहून मी इतकी हरखले होते, की तसं करावंसं वाटेना. इथेच मी बहुधा स्वार्थी व्हायला सुरुवात झाले. पण खरंच त्या स्वार्थी होण्यात माझा दोष होता?
सारंगकडे गेल्यावर त्याला मी साक्षीच वाटले. आई-बाबांना मीच सांगितलं की, साया पळून गेली. पण साया सारंगकडे जायला तयार आहे म्हटल्यावर ती गोष्ट त्यांना गौण वाटली असावी. सारंगला ‘साक्षी’त झालेला बदल भावला. मलाही ‘साक्षी’ बनून राहण्यात कसला खेद वाटला नाही. मी धवलला सांभाळत होते. पण जेव्हा सनी जन्माला आला तेव्हा मात्र माझ्या मनातली कमीपणाची भावना उचंबळून आली. साक्षीबद्दलचा तिरस्कार धवलला धुडकावण्यातून बाहेर पडू लागला. धवलला आणि सारंगलाही माझ्या वागण्याचं नवल वाटत असावं.
अचानक एक दिवस साक्षीचा आई-बाबांना फोन आला. त्यांना धक्काच बसला. ते तातडीने इकडे आले. साक्षीच्या अधिकाराची जागा सायाला मिळणं म्हणजे घोर पाप होतं ना! तिला तिची जागा परत हवी होती. बाहेर परिस्थितीच्या थपडा खाऊन तिला संसाराची किंमत कळली होती म्हणे! पण मी काय करायचं आता? तिलाही मुलगा आहे आणि मलाही! सारंगचीच ही दोन्ही मुलं! सारंग साक्षीला आणायला निघाला. मी त्याला थांबवलं तेव्हा त्याने मला ढकलून दिलं. धवलला दिलेला त्रास मला भोवला. मी कळवळून विचारलं, ‘‘पण माझा काहीच अधिकार नाहीए?’’
त्यावर सारंग म्हणाला, ‘‘माझं तुझ्याशी लग्नच झालेलं नाहीये. तू कोण?’’
मी कसं सहन करू हे? सनीलाही वडील हवेत की! त्याचा तो अधिकार नाहीये का? पण अधिकाराच्या गोष्टी मी कशी करणार? मलाच माझं अस्तित्व नाहीये, तिथे त्याचं कसलं अस्तित्व आणि कसला अधिकार? मी ‘क्लोन’ आहे म्हणजे मी माणूस नाही? नक्कीच आहे! तसं जर आहे तर मी या लोकांकडे अस्तित्वाची भीक का मागावी? थँक्स सारंग! मी सनीला घेऊन जातेय. या क्षणापासून मी मुक्त आहे माझं आयुष्य जगायला.
साया निर्धाराने उभी राहिली.
स्मिता पोतनीस – potnissmita7@gmail.com
मुक्तता
सनीला कवटाळून बसलेल्या सायाला बागेतल्या त्या बेंचवर बसूनही चार तास झाले होते. तिच्या या सुन्न स्थितीत तिला फक्त दोन गोष्टींची जाणीव होती : कानावर अजूनही आदळत असलेले सारंगचे शब्द आणि lr15विचारांच्या धडकांनी दुखत असलेलं डोकं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 05-07-2015 at 12:14 IST
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Science story freedom