सागरची जीभ बरीच भाजली होती. आतापर्यंत आम्ही ती गोष्ट हसण्यावारी नेत होतो. पण त्याचे हाल बघून सगळ्यांनाच काळजी वाटायला लागली होती, म्हणून आम्ही सरळ सिव्हिल हॉस्पिटलचा रस्ता धरला. ओपीडीमधला तरुण डॉक्टर सागरच्या जिभेला कसलंतरी औषध लावून त्याला घरी पाठवणार होता, पण मी
‘‘आम्ही ट्रेकर्स ट्रेक सुरू करायच्या आधी नेहमी चांगलंचुंगलं खाऊन घेतो. ट्रेकला निघायच्या आदल्या रात्री आम्ही असंच एखादं चांगलं ठिकाण शोधत होतो. टुरिस्ट लोकांच्या गर्दीपासून दूर.. आणि आम्हाला ‘ताऊ दा ढाबा’चा बोर्ड दिसला.
‘‘ताऊ, तुमची स्पेशालिटी काय आहे?’’ आम्ही त्यांना विचारलं.
‘‘इथल्यासारखे स्टफ्ड पराठे तुम्हाला जगात कुठेच मिळणार नाहीत..’’ ताऊ अभिमानाने म्हणाले. आम्ही भराभर आमच्या आवडीचे पराठे ऑर्डर केले. चौघांनी चार प्रकार!
आमच्या ऑर्डरी आत तयार होत असताना ताऊ आमच्याशी गप्पा मारत उभे होते. ‘‘तुम्ही ट्रेकर लोक आपल्या पायांची काळजी घेता, पण पाठ आणि खांद्याकडे दुर्लक्ष करता. तुमचे खांदे चांगले मजबूत असायला हवेत..’’ आमच्या प्रत्येकाच्या खांद्यावर दोन-चार प्रेमळ गुद्दे मारत ते म्हणाले.
एवढय़ात ताईजीनी त्यांना आतून हाक मारली. आमचे पराठे तयार होते.
तसे पराठे खरोखरच जगात कुठे मिळणार नाहीत इतके मस्त होते. आम्ही तर त्यांच्यावर तुटूनच पडलो.
नंतर मी खारी, विन्याने गोडी, रुबेनने केशर पिस्ता आणि सागरने स्ट्रॉबेरी लस्सी घेतली. लस्सी पण जबरदस्त होती. आम्ही बिल देऊन बाहेर पडलो. ताऊजीनी आम्हाला आमच्या सॅक्स पाठीवर चढवायला मदत केली. आणि आम्ही रात्रीपुरते एका साध्याशा हॉटेलमध्ये चेक-इन केले.
‘‘पण त्याची जीभ जर त्या ताऊ दा धाब्यावर भाजली नाही, तर ही एवढी लांबलचक स्टोरी तुम्ही मला कशाला सांगताहात?’’ डॉक्टर घडय़ाळाकडे पाहत म्हणाला.
‘‘ऐकून घ्या डॉक्टर, त्या धाब्याचा या घटनेशी काहीतरी संबंध आहे असा आमचा संशय आहे..’’ रुबेन पोटतिडिकेने म्हणाला.
‘‘कसली घटना? कसला संशय?’’ डॉक्टरला आपलं हसू लपवता येत नव्हतं.
‘‘दो गाय हन्तोय दे जया ऐग्गा हणजे तुहाला या हटनेचं आंबिल्य तमदेल..’’ सागर गयावया करीत म्हणाला.
आता मात्र आम्ही अतिशयोक्ती किंवा मस्करी करीत नसून ‘घटना’ खरंच गंभीर आहे हे त्या डॉक्टरला पटलं असावं.
‘‘बरं, सांगा. मी ऐकतोय,’’ तो म्हणाला.
‘‘ट्रेकच्या पहिल्या दिवसापासूनच सागर विचित्र वागत होता. कुठलीही गोष्ट प्यायला गेला की त्याला स्ट्रॉबेरी लस्सीचीच चव लागायची. पुढे पुढे तर तो खरोखरच वैतागला. चहा-कॉफी सोडा; प्रत्येक गोष्टीला त्याला स्ट्रॉबेरी लस्सीचीच चव लागत होती. काल रात्री आम्ही इथे परतल्यावर कॉफी प्यायला गेलो होतो. तिथे याने लस्सी समजून कॉफीचा मोठा घोट घेतला आणि हे असं झालं.’’
हे ऐकून तो डॉक्टर दोन मिनिटे डोळे फाडून आम्हा सर्वाकडे बघतच राहिला. आणि मग भानावर येत म्हणाला, ‘‘ही केस खरंच वेगळी दिसतेय. तुम्ही दुपारी तीन वाजता या. डॉ. तिवाना म्हणून एक प्रसिद्ध न्युरोफिजिशियन आहेत. तेच ही केस हाताळू शकतील.’’
दुपारी तीन वाजता आम्ही सर्वजण डॉ. तिवानांच्या वेटिंग रूममध्ये बसलेले होतो. सागरचा नंबर सातवा होता. आता काय ऐकायला मिळतंय आणि काय नाही, याचीच चिंता सगळ्यांना लागून राहिली होती. त्यातून ‘न्युरोफिजिशियन’ हा डॉक्टरचा प्रकार ऐकून तर छातीत धडकीच भरली होती. डॉ. तिवाना चांगले उंच, धिप्पाड, पण प्रेमळ चेहऱ्याचे होते. त्यांनी सागरची सगळी कहाणी माझ्याकडून ऐकली आणि त्याला डोळे बंद करायला सांगितले. टेबलावरच्या एका ग्लासात थोडासा ऑरेंज ज्यूस ओतून तो त्यांनी सागरला प्यायला दिला. ‘स्ट्रॉबेरी लस्सी!’ सागर म्हणाला. डॉक्टर उठून सागरच्या मागे येऊन उभे राहिले. त्यांच्या हातात एक भिंग आणि एक चिमटा होता. सागरची कॉलर मागे खेचून त्यांनी भिंगातून पाहत काहीतरी शोधलं आणि चिमटय़ाने हळूच ते अलगदपणे उचललं. ती रव्याच्या कणाएवढी चमचमणारी वस्तू होती. ती काढून एका काचेच्या बशीत ठेवून त्यांनी सागरला पुन्हा एकदा ऑरेंज ज्यूस प्यायला दिला. ‘ओयेंज यूस!’ सागर डोळ्यांवरची पट्टी काढत ओरडला.
‘‘डॉक्टर, हा काय प्रकार आहे? सागरला नक्की काय झालं होतं?’’ मी विचारलं.
‘‘आपण त्याविषयी नंतर सविस्तर बोलू. असं करा- आज रात्री आठ वाजता तुम्ही मला ताऊ दा ढाबामध्ये भेटा.’’
‘‘ताऊ दा ढाबा? नको रे बाबा!’’ आम्ही एका सुरात ओरडलो.
डॉक्टर हसले आणि म्हणाले, ‘‘अजिबात घाबरू नका. आपण तिथे निवांतपणे बोलू शकू.’’ त्यांनी आमच्याकडून फीसुद्धा घेतली नाही.
संध्याकाळी आम्ही घाबरत घाबरतच ताऊ दा ढाबामध्ये पाय टाकला.
पाचच मिनिटांत डॉ. तिवाना तिथं येऊन पोहोचले. आमच्याबरोबर तेही जेवायला बसले. त्यांनी सर्वासाठी पराठे मागवले. टेबलावर गरमागरम पराठे येऊन दाखल झाल्यावर ताऊनी आमच्या ऑर्डर्स घ्यायला सुरुवात केली. हा प्रकार थोडा विचित्र होता; पण आम्ही प्रत्येकानं आपल्याला हव्या त्या पराठय़ांच्या ऑर्डर्स दिल्या.
‘‘घ्या. तुमच्या ऑर्डर्स तुमच्या समोर आहेत,’’ ताऊ म्हणाले. आम्ही पराठे खायला सुरुवात केली, पण ते अगदीच बेचव होते. आमच्या चेहऱ्यावरून ताऊनी ते लगेच ओळखलं आणि ताईजीना हाक मारली. आतून ताईजी एक छोटीशी डबी घेऊन आल्या आणि प्रत्येकाला त्याची ऑर्डर विचारून त्याच्या मानेवर एक बारीकशी चकाकणारी वस्तू लावून गेल्या. आता मात्र पराठे पहिल्या खेपेइतकेच चवदार लागायला लागले.
‘‘आता थोडा रुचीपालट हवा आहे का?’’ ताऊनी विचारलं.
‘‘जरूर.’’ आम्ही म्हणालो. ताऊ उभे राहिले आणि आमच्या मानेवरच्या ‘त्या’ वस्तूंची त्यांनी अदलाबदल केली. आता माझ्यासमोरचा आलू पराठा मला मेथी पराठय़ासारखा लागायला लागला.
‘‘डॉक्टर, हा काय प्रकार आहे?’’ मी विचारले.
‘‘आपण एखादी चव चाखतो तेव्हा ती विजेच्या लहरींच्या स्वरूपात आपल्या जिभेपासून मेंदूपर्यंत पोहोचते. या लहरी घेऊन जाणारे मज्जातंतू मानेतून जातात. मला आणि ताईजीना दोघांनाही स्वयंपाक अजिबात येत नाही. मी लोकांना उत्कृष्ट दर्जाचे पराठे खायला घालून त्यांच्या मानेवर एकेक चिप लावून त्या लहरी रेकॉर्ड केल्या. नंतर त्या चिप्स हे बेचव पराठे खाणाऱ्या लोकांच्या मानेवर ठेवल्या की त्यांच्या मेंदूला आपण तो- तो पदार्थ खात असल्याचा भास होतो. त्या दिवशी तुमच्या पाठीवर सामान चढवताना मी सगळ्या चिप्स काढून घेतल्या खऱ्या; पण बिचाऱ्या सागरच्या मानेवरची चिप माझ्या हातातून निसटली आणि परत त्याच्या मानेवरच पडली. आणि मग त्याला प्रत्येक गोष्ट स्ट्रॉबेरी लस्सीसारखीच लागायला लागली.’’
‘‘पण हा सगळा खटाटोप कशासाठी?’’ मी वैतागून विचारले.
‘‘चांगला प्रश्न विचारलास..’’ डॉ. तिवाना हसत हसत म्हणाले, ‘‘आज प्रगत देशांमध्ये लोक चवीच्या आहारी जाऊन आरोग्याला घातक अशा गोष्टी खात सुटतात. गरीब लोकांना चवदार अन्न परवडत नसल्यामुळे अतिशय बेचव अन्नावर दिवस काढावे लागतात. आमच्या या संशोधनाने दोन्ही जगांचा फायदा होईल.’’
‘‘ताऊ आणि ताईजी या संशोधनात म्हणा किंवा गुन्ह्यात म्हणा, माझे साथीदार आहेत. आम्ही हे संशोधन एकत्रच करतोय.’’
‘‘व्वा! मग तुम्ही असे चोरून प्रयोग का करता?’’ रुबेनने विचारले.
‘‘योग्य शब्द वापरलास बेटा. आम्ही अक्षरश: चोरून हे प्रयोग करतोय. कायद्याप्रमाणे आधी सर्व प्रयोग उंदीर किंवा गिनिपिग्जवर करावे लागतात. पण मला सांगा, कोणता उंदीर तुम्हाला आलू पराठा आणि गोभी पराठय़ातला फरक सांगू शकेल? पण मेडिकल एथिक्स कमिटी आमचा हा युक्तिवाद ऐकून घ्यायलाच तयार नाही. म्हणून मग हे संशोधन आम्हाला असे चोरून करावे लागते आहे, ही एक दु:खाची गोष्ट आहे.’’
०डॉ. जोगिंदरसिंग तिवाना यांचा यावर्षीच्या नोबेल पुरस्काराच्या नामांकन यादीत समावेश आहे.
ताऊ दा ढाबा
सागरची जीभ बरीच भाजली होती. आतापर्यंत आम्ही ती गोष्ट हसण्यावारी नेत होतो. पण त्याचे हाल बघून सगळ्यांनाच काळजी वाटायला लागली होती, म्हणून आम्ही सरळ सिव्हिल हॉस्पिटलचा रस्ता धरला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 01-02-2015 at 02:53 IST
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Science story tauda dhaba