– सुबोध जावडेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विज्ञानलेखक जयंत नारळीकर यांचा १९ जुलै हा जन्मदिवस. मराठी विज्ञान परिषदेने हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञानकथा दिन’ म्हणून जाहीर केला आहे. गेल्या शतकभरात या प्रकारच्या लेखनात देशभरासह मराठीमध्ये कोणता प्रवाह होता आणि सध्या काय लिहिले जात आहे याविषयी यानिमित्ताने चर्चा…

मराठीत पहिलं विज्ञानसाहित्य (सायन्स फिक्शन) लिहिलं गेलं त्याला पुढील साली सव्वाशे वर्षं होतील. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते महाराष्ट्रात छापलं गेलं नव्हतं. ते छापलं होतं केरळमध्ये! कृष्णाजी आठवले यांनी केलेला ज्युल व्हर्नच्या ‘फ्रॉम अर्थ टू द मून’ या कादंबरीचा अनुवाद ‘केरळ कोकीळ’ या कोचिनमध्ये छापल्या जाणाऱ्या मराठी नियतकालिकात १९०० साली प्रथम प्रकाशित झाला.

पुढच्या चाळीस-पन्नास वर्षांत वामन मल्हार जोशी, श्रीपाद रानडे अशा काही जणांनी लिहिलेल्या दहा-बारा कथा विज्ञानकथेशी नातं सांगणाऱ्या आहेत. त्यांमध्ये थोडंबहुत विज्ञान असलं तरी त्यांना विज्ञानकथा म्हणणं कठीण आहे. नंतरच्या वीस वर्षांत लिहिल्या गेलेल्या काही कथांना विज्ञानकथा हे बिरुद निश्चितच लावता येईल. पण त्यातल्या बहुतेक कथा या अनुवादित किंवा रूपांतरित होत्या. १९६० च्या सुमारास नामवंत कथाकार दि. बा. मोकाशी यांनी लिहिलेल्या विज्ञानकथा मात्र पूर्णपणे स्वतंत्र व विज्ञानकथेच्या निकषावर उतरणाऱ्या होत्या. ‘बालचंद्र’, ‘अंतरिक्ष यात्रा’ असे त्यांचे काही विज्ञानकथासंग्रहही तेव्हा प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे मोकाशींना आद्या मराठी विज्ञानकथाकाराचा मान द्यायला हवा.

१९७० मध्ये मराठी विज्ञान परिषदेने विज्ञानकथांची स्पर्धा घ्यायला सुरुवात केली. त्यात जयंत नारळीकर यांनी १९७४ साली पहिलं बक्षीस मिळवलं. कराडच्या साहित्य संमेलनात दुर्गाबाई भागवतांनी त्यांच्या विज्ञानकथांचा गौरव केला. नारळीकरांच्या नावामुळे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष विज्ञानकथा या साहित्यप्रकाराकडे वेधलं गेलं. विज्ञानकथांना प्रतिष्ठा प्राप्त झाली.

नारळीकरांचा विज्ञानप्रसार…

मात्र नारळीकर यांची विज्ञानकथेकडे पाहायची भूमिका ‘विज्ञान प्रसाराचे एक साधन’ अशी होती. त्यामुळे विज्ञानकथा हा साहित्याचा भाग मानावा की नाही, असा संभ्रम बहुतेक समीक्षकांच्या मनात होता. यावर चर्चा करण्याकरता मुंबई विद्यापीठ आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यामाने १९८३ मध्ये मुंबईत एक चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. या चर्चासत्रात नारळीकरांनी विज्ञानकथेबद्दलची त्यांची भूमिका मांडली, ‘विज्ञानाची गोळी जर कडू लागत असेल तर त्याला साखरेचे कोटिंग, म्हणजे कथेचे रूप देणे योग्य ठरेल. आणि विज्ञानकथा या उद्देशाने लिहिल्या जाव्यात असे मला वाटते.’

हेही वाचा – निरंकुश सत्ताधाऱ्यांचा धांडोळा

नारळीकरांच्या या भूमिकेवर बरीच साधकबाधक चर्चा झाली. विज्ञानकथा ही जर एक कलाकृती आहे तर तिला विज्ञान प्रसाराच्या कामाला लावायची कल्पना बऱ्याच जणांना पटली नाही. आणि विज्ञान प्रसाराचं साधन म्हणून तिच्याकडे बघायचं असलं तर तिला साहित्याचे निकष कसे लावता येतील? असा प्रश्न उभा राहिला. विज्ञानकथेकडे पाहायच्या ‘शर्करावगुंठित गोळी’ या नारळीकरांच्या भूमिकेचा परिणाम असा झाला की व. दि. कुलकर्णी, चंद्रकांत पाटील, दीपक घारे असे काही मोजके अपवाद वगळता, मराठीतल्या बहुसंख्य समीक्षकांनी या साहित्यप्रकाराची समीक्षा करण्याचेच टाळले. हे एकापरीनं बरंच झालं. कारण नारळीकरांची व्याख्या शिरोधार्य मानून केलेली समीक्षा विज्ञानकथेवर अन्याय करणारी ठरली असती. टीकाकारांनी पाठ फिरवली असली तरी विजया राजाध्यक्ष, अरुण साधू व कमल देसाई या व्यासंगी लेखकांनी मात्र काही संग्रहांच्या प्रस्तावनांमध्ये विज्ञानकथा या साहित्य प्रकाराबद्दल सविस्तर मतप्रदर्शन केलं आहे.

अर्थात, समीक्षकांनी विज्ञानकथांना वाळीत टाकलं याचा दोष नारळीकरांकडे जात नाही. त्यांची भूमिका जरी विज्ञानकथेतून विज्ञान शिकवण्याची असली तरी ती त्यांची स्वत:ची भूमिका होती. इतरांनीही आपला कित्ता गिरवावा असं त्याचं अजिबात म्हणणं नव्हतं. ‘विज्ञानकथा या प्रबोधनाच्या उद्देशाने लिहिल्या जाव्यात असे मला वाटते. पण ते सर्व विज्ञानकथा लेखकांना पटेल असं नाही.’ असं त्यांनी ‘यक्षांची देणगी’च्या प्रास्ताविकात स्वच्छ लिहूनच ठेवलेलं आहे.

दुसरं म्हणजे, हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढे अपवाद सोडले तर, आजचा कोणताही मराठी विज्ञानकथाकार प्रबोधनाच्या हेतूनं किंवा विज्ञान समजावून देण्यासाठी विज्ञानकथा लिहीत नाही. एक साहित्यकृती म्हणूनच तो तिच्याकडे पाहतो. त्यामुळे सर्वच विज्ञानकथांवर ‘प्रचारकी साहित्य’ असा शिक्का मारून त्यांना साहित्य व्यवहारापासून दूर ठेवणं, समर्थनीय वाटत नाही.

काही गैरसमज…

जनसामान्यांत विज्ञानकथेबद्दल अनेक गैरसमज आहेत. विज्ञानकथा ही विज्ञानाबद्दल असते, हा त्यातील प्रमुख गैरसमज. वास्तविक इतर कुठल्याही कथेप्रमाणेच तीही माणसाबद्दलच काहीतरी सांगत असते. फक्त ती आजच्या माणसाबद्दल नाही तर उद्याच्या माणसाबद्दल सांगते. ओघानं विज्ञानाबद्दलही ती काही सांगते, हे खरं. पण तिचा फोकस विज्ञानावर नसून माणसावरच असतो. निदान चांगल्या विज्ञानकथेचा नक्कीच असतो.
विज्ञानकथा ही प्राय: भविष्यात घडते. भविष्यात होणाऱ्या बदलांचे अनुमान विज्ञानाच्या भक्कम पायावर केलेलं असतं. साहजिकच काही काळानंतर ते बदल प्रत्यक्षात येताना दिसतात. हे खरं असलं तरी भविष्यात काय होईल त्याचं भाकीत करणं, हे काही तिचं प्रमुख उद्दिष्ट नसतं. ती एक आनुषंगिक बाब असते. शिवाय प्रत्येक विज्ञानकथेत दाखवलेले बदल नेहमीच प्रत्यक्षात येतील असंही नाही. पण तरीही, आजची विज्ञानकथा हे नेहमीच उद्याचं वास्तव असतं, अशी बहुतेकांची समजूत असते.

थोडक्यात सांगायचं तर वाचकाला विचारप्रवृत्त करणं, जीवनदर्शन घडवणं, हे जसं कुठल्याही साहित्यकृतीचं प्रयोजन असतं त्याला विज्ञानकथाही अपवाद नाही. काही बाबतीत तर ती या अपेक्षांची पूर्तता अधिक यशस्वीरीत्या करू शकते.

वैशिष्ट्यं आणि बलस्थानं…

विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या घोडदौडीमुळे माणसा-माणसातले नातेसंबंध बदलून जात आहेत. या बदलत जाणाऱ्या नातेसंबंधांचं नेमकं चित्रण फक्त विज्ञानकथाच करू शकते. विज्ञानसाहित्य आणखी काही बाबतीत इतर साहित्यापेक्षा काहीसं वेगळं असतं. त्यातली अनुभवाची जातकुळी निराळी असते. त्यातला अनुभव आपल्याला यापूर्वी कधी आलेला नसतो. मात्र पुढे नक्कीच येणार असतो. भविष्यकाळात येणारा हा अनोखा अनुभव विज्ञानकथा आजच वाचकाला देते.

विज्ञानकथेचं एक मोठं बलस्थान म्हणजे ती एका अगदी निराळ्या चष्म्यातून तुम्हाला जगाचं दर्शन घडवते. सर्वसाधारण साहित्यातल्या व्यक्तिरेखा या मानवी असतात. त्यांची सुखदु:खं, भावभावना, आशाआकांक्षा मानवी असतात. विज्ञानकथा मात्र आपल्याला एक पाऊल पुढे नेते. त्यात भेटणारी पात्रं अनेकदा खरोखरच वेगळ्या जगातून आलेली असतात. कधी ती शंभर वर्षांनंतर जन्माला आलेली व्यक्ती असते तर कधी परग्रहावरचा जीव. कधी तो यंत्रमानव असतो तर कधी डॉल्फिन. त्यांच्या नजरेतून जेव्हा आपण जगाच्या पसाऱ्याकडे पाहू लागतो तेव्हा आपलं जग पार उलटंपालटं झालेलं आपल्याला दिसतं. एका अगदी वेगळ्याच कोनातून आपल्या स्वत:च्याच जगण्याचं घडणारं हे दर्शन आपल्याला चक्रावून टाकतं. रूढ विचारसरणीची झापडं दूर करण्याची ही किमया केवळ विज्ञानकथाच करू शकते.

सद्या:स्थिती…

मराठीतील अनेक दिवाळी अंक आजकाल आवर्जून विज्ञानकथा छापताना दिसतात. नवल आणि धनंजय ही तर दुर्लक्षित वाङ्मय प्रकारांना वाहिलेली मासिकं. दरवर्षी पाच-सहा विज्ञानकथा त्यांत असतातच. पण दीपावली, अक्षर, महाअनुभव, लोकसत्ता, हंस, महाराष्ट्र टाइम्स, पद्मागंधा, साप्ताहिक सकाळ, सामना, संवादसेतू अशा मुख्य धारेतील नियतकालिकांनी देखील विज्ञानकथांना हल्ली आपल्या दिवाळी अंकात स्थान द्यायला सुरुवात केली आहे. पूर्णपणे विज्ञानसाहित्याला वाहिलेली ‘कल्पबिस्व’, ‘विज्ञान-कथा’ आणि ‘विग्यानसंप्रेक्षण’ नियमितपणे प्रसिद्ध करणारे बंगाली व हिंदी भाषिक निश्चितच कौतुकास पात्र आहेत.

वेचक मराठी विज्ञानकथांचे बरेच खंड (अँथॉलॉजीज) विविध प्रकाशकांनी गेल्या काही वर्षांत प्रकाशित केलेले आहेत. उदाहरणार्थ: ब्रह्मांडाची कवाडं (गार्गीज प्रकाशन), मराठीतील निवडक विज्ञानकथा (स्नेहवर्धन पब्लिशिंग हाऊस), पूर्वसंचित – गोफ नात्यांचा (विश्वकर्मा प्रकाशन), मन्वंतर – युवा लेखकांनी साकारलेल्या विज्ञानकथा (डायमंड पब्लिकेशन), निवडक मराठी विज्ञानकथा (शब्दवेध प्रकाशन), यंत्रमानव – मराठीतील यंत्रमानवांच्या कथा (मनोविकास प्रकाशन), वेधक विज्ञानकथा (डिंपल प्रकाशन), निवडक धनंजय – विज्ञान कथा (राजेंद्र प्रकाशन), इत्यादी. अनेक पाठ्यपुस्तकांत व महाविद्यालयीन अभ्यासक्रमातही अलीकडे विज्ञानकथांचा समावेश केलेला आढळतो.

हेही वाचा – ‘रजनी’च्या पुनर्शोधासाठी ‘रजिया’चा लढा

गेल्या सहा-सात वर्षांत विज्ञानकथा लिहायला लागलेल्या मराठी लेखकांची संख्या आणि त्यांच्या कथांची गुणवत्ता निश्चितच लक्षणीय आहे. दोन वर्षांपूर्वी लक्ष्मण लोंढे यांच्या स्मरणार्थ एक विज्ञानकथा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात तब्बल नव्वद नवोदित लेखकांनी भाग घेतला होता. त्या स्पर्धेत पहिलं बक्षीस मिळवणाऱ्या असीम चाफळकर या उदयोन्मुख लेखकानं आजवर दहा-बारा उत्तम विज्ञानकथा लिहिल्या असून इतर स्पर्धेतही पारितोषिके मिळवली आहेत. स्वरा मोकाशी यांच्या तर वीसपेक्षा जास्त विज्ञानकथा दर्जेदार अंकातून प्रकाशित झाल्या आहेत. संजीव कुलकर्णी हे विज्ञानकथांच्या बरोबरीनं विज्ञानाधारित कथाही सुरेख लिहितात. त्या अभ्यासपूर्ण आणि तरीही रंजक असतात. गिरीश पळशीकर यांनी गेल्या तीन-चार वर्षांत विज्ञानकथा लिहायला सुरुवात केली असली तरी त्यांच्या आजवर अकरा कथा प्रकाशित झाल्या आहेत. उज्ज्वल राणे यांनी मोजक्याच विज्ञानकथा लिहिल्या असल्या तरी आपल्या शैलीदार लेखणीनं जाणकारांचं लक्ष वेधून घेतलं आहे. चेतन कोटबागे हे मराठीबरोबर इंग्रजीतही विज्ञानकथा लिहितात. सु. वि. पारखी यांनी गेल्या वर्षीच्या किस्त्रीमच्या दिवाळी अंकात ‘माणसांचा कारखाना’ ही वेगळ्या बाजाची विज्ञानकथा लिहिली आहे. शुभम देशमुख या शालेय विद्यार्थ्यानं गेल्या वर्षी मविपच्या स्पर्धेत भाग घेऊन बक्षीस पटकावलं होतं. याशिवाय आकाश होगाडे, अमोल सांडे, श्रीकांत कुमावत, रवींद्र भयवाल अशा काही मंडळीनी अलीकडे काही चांगल्या विज्ञानकथा लिहिल्या आहेत. संजय भास्कर जोशी, विजय तांबे यांच्यासारखे काही प्रस्थापित लेखकही हल्ली विज्ञानकथा हा प्रकार हाताळून पाहात आहेत, ही समाधानाची गोष्ट आहे.

इथं मुद्दाम लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे या नव्या-जुन्या लेखकांच्या लिखाणात विज्ञान शिकवायचा अट्टहास नाही. कथेत वैज्ञानिक माहितीचा भडिमार नसतो. अंतराळ प्रवास, समांतर विश्व, यंत्रमानव यासारखे रूढ विषय टाळून हे लेखक कृत्रिम प्रज्ञा, जेनेटिक इंजिनीअरिंग, पर्यावरण समस्या यासारख्या नव्या विषयांवर कथा लिहिताना दिसतात.

इतर भाषांच्या तुलनेत…

मराठी विज्ञानकथा नेहमीच इतर भारतीय भाषांच्या दोन पावलं पुढं राहिली आहे. पंचवीस वर्षांपूर्वी नॅशनल बुक ट्रस्टनं ‘इट हॅपन्ड टुमारो’ या नावानं भारतीय विज्ञानकथांचा एक संग्रह प्रकाशित केला होता. त्यातल्या निम्म्यापेक्षा जास्त कथा मराठीतल्या होत्या. आजही भारतातल्या अन्य भाषांच्या मानानं मराठी विज्ञानकथाविश्व कितीतरी जास्त समृद्ध आहे. हिंदी विज्ञानकथांच्या संख्येत गेल्या काही वर्षांत वाढ झालेली आहे. बंगालीत तर संख्यात्मक आणि गुणात्मक दोन्ही अंगाने बऱ्यापैकी वाढ झाली आहे. बाकी इतर भाषांत मात्र परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. त्यामुळे मराठी विज्ञानकथेची आघाडी अजूनही कायम आहे.

एकंदरीत, मराठी विज्ञानकथेचा इतिहास आणि वर्तमान पाहता तिचं भविष्यही उज्ज्वल असेल असं म्हणायला प्रत्यवाय नाही.

subodh.jawadekar@hotmail.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Science writer jayant narlikar birthday is 19 july the marathi science council has declared this day as national science fiction day ssb
Show comments