२८ फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन.  त्या निमित्ताने विज्ञानात प्राचीन भारताची प्रगती किती झाली होती, हे पाहणे मार्गदर्शक आणि मनोज्ञही ठरेल.
‘वि शिष्टं ज्ञानम् विज्ञानम्’ अशी विज्ञानाची व्याख्या भारतात करण्यात आली होती. कौटिलीय अर्थशास्त्रात चौलकर्म म्हणजेच मुलाचे जावळ केल्यावर त्याला लिपी व संख्या शिकवायला सरुवात करावी, असे म्हटले आहे. छांदोग्य उपनिषदातील सातव्या अध्यायात, अध्यायाच्या सुरवातीलाच विज्ञानाने अनेक विषयांचे आकलन होते, म्हणून विज्ञानाचा अभ्यास करावा असे सांगताना ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, इतिहास, पुराणं यांच्याबरोबर नक्षत्रविद्या, भूतविद्या, क्षत्रविद्या, तृण-वनस्पती विद्या, सर्पविद्या, श्वापदविद्या, कीटकविद्या अशा अनेक विषयांची यादी दिली आहे. आज ज्याप्रमाणे विषयांचे वर्गीकरण केलेले दिसून येते, तसे पूर्वी नव्हते. त्यामुळेच आयुर्वेदाचार्याला वनस्पतीशास्त्राबरोबरच प्राणिशास्त्र व रसायनशास्त्रासारख्या आयुर्वेदाला सहायकारी विषयांची सखोल माहिती असणे गरजेचे होते.
आधुनिक काळात विज्ञान विषयाचे ढोबळमानाने चार प्रकारे वर्गीकरण करण्यात येते. त्यानुसार गणित – तर्कशास्त्र, भौतिक विज्ञान – (याअंतर्गत पाच विषय येतात : खगोलशास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, हवामानशास्त्र, भौतिकशास्त्र.) जीवशास्त्र – शरीरशास्त्र व इंद्रिय विज्ञान,  सामाजिक विज्ञान – मानववंशशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र हे विषय येतात. यातील गणित-तर्कशास्त्र हा विज्ञानाला सहायकारी असा विषय मानला जातो. तर सामाजिक विज्ञान हे आधुनिक विज्ञानाच्या भाषेत विज्ञान मानले जात नाही. या पाश्र्वभूमीवर भौतिक विज्ञान  व जीवशास्त्र हे दोन विषय विज्ञानाचे म्हणून उरतात. यातील जीवशास्त्र किंवा आयुर्वेदातील भारताची प्रगती सर्वश्रुत आहे. विस्तारभयास्तव आपण केवळ गणित व भौतिकशास्त्रांतर्गत रसायन या दोनच शाखांचा विचार करणार आहोत.
गणित
 वेदकाळात निरनिराळ्या आकारांच्या यज्ञवेदी असत. यज्ञकर्मात जराशी जरी चूक झाली तरी यज्ञफल मिळणार नाही, याची खात्री असल्यामुळे त्याच्या प्रत्येक कोनाचे अचूक मोजमाप घेतले जात असे. कल्पसूत्रांतर्गत बौधायन शुल्बसूत्र येतात. शुल्ब याचा अर्थ दोरी. दोरीने मोजमापे घेऊन यज्ञवेदी निर्माण केल्या जात, म्हणून त्यांना शुल्बसूत्र असे म्हटले आहे. यांचा काळ साधारणपणे इसपूर्व सातवे शतक मानला गेला आहे. विशिष्ट यज्ञ विशिष्ट ग्रहस्थितीत फळतो म्हणून ज्योतिर्गणिताची प्रगती झाली होती. त्यामुळेच ख्रिस्तसनापूर्वी अंकगणित, ज्योतिर्गणित, रेखागणित, त्रिकोणमिती अशा गणिताच्या वेगवेगळ्या शाखांचा विकास झाला होता. गणिताविषयी ग्रीकांचे दहाचा चौथा व रोमनांचे १०चा तिसरा घात इतके ज्ञान असताना भारतात मात्र १०च्या १८व्या घातापर्यंत मजल गेली होती. स्थानमहात्म्याने अंक वापरण्याची पद्धत भारतात इ. स. पूर्व तिसऱ्या शतकापासून होती. यजुर्वेदाच्या वाजसनेयी संहितेत एकं, दशं, शतं, सहस्र, अयुत, नियुत, प्रयुत, अर्बुद, न्यर्बुद, समुद्र, मध्य, अन्त व परार्धपर्यंत उल्लेख सापडतो. फार प्राचीन काळापासून बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ, या अंकगणितातील प्रमुख आठ क्रिया सापडतात.  सातव्या शतकाच्या उत्तरार्धात पाश्चात्त्य देशात प्रसिद्ध असलेला पास्कल ट्रँगल ‘मेरूप्रस्तर’ या नावाने प्रसिद्ध होता. याचे विवेचन िपगलाने छंदशास्त्रात (इस पूर्व तिसरे शतक) केले आहे. आर्यभटाने (इस ४९९)स्र् चे मूल्य ३.१४१६ असे दिले आहे व ते अचूक नाही ‘आसन्न’ आहे, असे तो म्हणतो. स्थानमहात्म्याने म्हणजेच दशमान पद्धतीने अंक वापरण्याची पद्धत युरोपात १०व्या शतकापासून सापडते तर भारतात इसपूर्व तिसऱ्या शतकापासून सापडते. पायथागोरस सिद्धांत या नावाने प्रसिद्ध असलेला सिद्धांत बौधायनाने फार पूर्वी शुल्बसूत्रात दिला आहे. याचप्रमाणे न्यूटनचा साईन फॉम्र्युला त्याच्या आधी तीनशे वर्षे माधव या गणितज्ञाने दिला होता व तो फॉम्र्युला आता माधव-न्यूटन फॉम्र्युला या नावाने ओळखला जातो. ब्रह्मगुप्ताच्या ‘ब्राह्मस्फुटसिद्धान्त’ या खगोलशास्त्र व गणितावरील ग्रंथाचे सिन्ध-हिन्द व खण्डखाद्यक या खगोलशास्त्रावरील ग्रंथाचे ‘अल अर्कन्द’ असे अरबी भाषांतर एका खलिफाने करवून घेतले आहे. लिओनार्दो फिबोनात्सी या फ्रेंच गणितज्ञचा शिक्षक अरबी होता. त्याने ही पद्धत फिबोनात्सीला शिकवली. पुढे फिबोनात्सीने लिहिलेल्या ‘लिबेर अँबँसी’ या ग्रंथात दशमान पद्धतीवर आठ प्रकरणं आहेत. त्याने दशमान पद्धतीचा पुरस्कार केला. त्यानंतर पाश्चात्त्यांना दशमान पद्धतीचा परिचय झाला. पण ख्रिश्चन धर्मगुरूंनी हिंदूचे गणित स्वीकारायला विरोध केल्यामुळे अडीचशे ते तीनशे वर्षे त्यावर बंदी होती. नंतर ब्रिटिश व्यापाऱ्यांनी याचा उपयोग सुरू केला व तो सर्वत्र रूढ झाला.
रसायनशास्त्र
इसपूर्व तीन ते चार हजार वर्षांपूर्वीपासून रसायनशास्त्रातील प्रगतीचे संदर्भ सापडतात. मुळात आयुर्वेदाचे एक अंग म्हणून त्याचा विकास झाला. चरक, सुश्रुत, वाग्भट, नागार्जुन हे सारे आयुर्वेदज्ञ रसायनशास्त्रातील तज्ज्ञ होते. रसरत्नाकर, चक्रदत्त, सिद्धयोग, रसार्णव, रसहृदय, रसेन्द्रचुडामणी, रसप्रकाश अशी रसशास्त्रावरील प्राचीन ग्रंथांची फार मोठी यादी मिळते. आयुर्वेदात वेगवेगळ्या धातूंच्या पावडरींचा उपयोग होत होता. इसपूर्व पाचव्या शतकातील उत्खननात काचेच्या वस्तू सापडल्या आहेत. या काचेचे पृथक्करण केले असता त्यात सिलिकेट, अलुमिना, मँग्निशियम, अल्कली, फेरिक ऑक्साइड इत्यादी घटक मिळाले. सिंधू संस्कृतीत झालेल्या उत्खननात सोने, चांदी, तांबे, शिसे, कास्य, शिलाजीत, गेरू, शंख असे विविध पदार्थ उपलब्ध झाले आहेत. याशिवाय आयुर्वेदात पाऱ्याचा उपयोग फार मोठय़ा प्रमाणात होत होता.  संस्कृतमध्ये पाऱ्याला ‘रस’ असेही म्हटले जाते.  साधारणपणे तेराव्या शतकातील ‘रसरत्नसमुच्चय’ या ग्रंथात ‘रसनात्सर्वधातूनां रस इत्यभिदियते।’ रस ऊर्फ पारा सर्व धातूंचे रसन म्हणजे भक्षण करतो म्हणून त्याला ‘रस’ म्हणतात, असे सांगितले आहे. पाऱ्याचे रस, रसेन्द्र, सूत, पारद, मिश्रक असे विविध प्रकार ज्ञात होते. द्रवरूप पाऱ्याची पारदिलग करण्याची प्रक्रिया भारतात प्राचीन काळापासून अस्तित्वात होती. इस तिसऱ्या शतकातील कौटिलीय अर्थशास्त्रात अध्यक्षीय प्रचार नावाचे अधिकरण आहे. यातील १२ ते १४ हे अध्याय भारतीयांची धातुशास्त्रातील प्रगती दर्शवितात. यातील १२वा अध्याय हा खाणी व कारखाने सुरू करण्याविषयी आहे. यात सुरुवातीलाच ‘आकर’ म्हणजे खाणीच्या अध्यक्षाला शुल्बशास्त्र, धातुशास्त्र, रसपाक, मणिराग या विषयांचे ज्ञान असले पाहिजे असे म्हटले आहे. शुल्बशास्त्राला विविध अर्थ आहेत. ते पुढीलप्रमाणे- १. जमिनीतील धातूंच्या शिरांचा शोध घेण्याचे शास्त्र २. तांब्याचे रुप्यात अथवा सोन्यात परिवर्तन करण्याचे शास्त्र ३. भूमिपरीक्षाशास्त्र. तर रसरूपातील धातू आटवणे व शुद्ध करणे म्हणजे ‘’रसपाक’ होय.  १३वा अध्याय सोन्यावर प्रक्रिया करण्याविषयी आहे. यात सोन्याचे दागिने करताना क्षेपण, गुण आणि क्षुद्रक असे तीन प्रकार सांगितले आहेत. क्षेपण याचा अर्थ सोन्यात रत्ने बसवणे, गुण म्हणजे सोन्याच्या तारांची साखळी करणे व क्षुद्रक याचा अर्थ भरीव किंवा पोकळ सुवर्णमण्यांनी युक्त दागिने घडवणे असा आहे. याचाच अर्थ आधुनिक रसायनशास्त्रातील तन्यता, वर्धनीयता इत्यादी धातूंचे गुण प्राचीन भारतीयांना ज्ञात होते. याशिवाय विविध वर्णाचे सोने करण्याविषयीही या अध्यायात उल्लेख आहेत. खाणींचे महत्त्व सांगताना कौटिल्य म्हणतो, ‘खाणींमुळेच कोशाची उत्पत्ती होते, कोशामुळे सन्य उभारले जाते आणि कोश व सन्य यांच्या बळावरच राष्ट्र चालते म्हणून खाणीची काळजी राजाने घ्यावी.’
भारतीयांचे रस-तंत्रज्ञान किती प्रगत होते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे दिल्ली येथील मेहरौली गावातील लोहस्तंभ. हा स्तंभ इस ४०० मध्ये विक्रमादित्याने हुणांवरील विजयाचे प्रतीक म्हणून मथुरेला उभारला. पुढे अनंगपालाने तो दिल्लीला नेला. तिथे एकूण २७ मंदिरे होती. कुतुबुद्दीन ऐबकाने ती मंदिरं उद्ध्वस्त केली. पण हा स्तंभ त्याला उद्ध्वस्त करता आला नाही. जमिनीवर याची उंची ६.७ मीटर तर जमिनीखाली ०.५ मीटर व वजन सहा टन आहे. या स्तंभाचा विशेष म्हणजे आज इतकी वर्षे होऊनही हा लोखंडाचा स्तंभ गंजलेला नाही.
भारतीयांची रसायानशास्त्रातील प्रगती भारताबाहेरील जगतातदेखील कौतुकाचा विषय होती. त्यामुळेच इ.स. ६३३ मध्ये खलिदच्या सन्यातील मुजाने,‘अत्यंत लवचिक अशा या भारतीय तलवारी आहेत,’ अशा शब्दांत भारतातील तलवारींचे कौतुक केले आहे. म्हैसूर प्रांतात पूर्वी पोलाद निर्मिती होत असे व त्याला ‘वुट्झ स्टील’ असे नाव होते. ते परदेशात विकले जाई व त्यापासून बनलेल्या तलवारी ‘दमास्कस तलवारी’ या नावाने प्रसिद्ध होत्या.
सद अल अन्दलुसी नावाचा खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञानाच्या इतिहासाचा अभ्यास करणारा संशोधक इ. १०२९-१०७० मध्ये होऊन गेला. त्याने अल-तरीफ-बी-तबकत-अल-उमम नावाचा ग्रंथ लिहिला या ग्रंथात त्याने राष्ट्रांचे दोन प्रकारे वर्गीकरण केले आहे – विज्ञानाची आवड नसलेली राष्ट्रे आणि विज्ञान रुजवलेली राष्ट्रे. विशेष म्हणजे त्याने भारताला विज्ञानाची आवड असलेल्या किंवा विज्ञान रुजवलेल्या गटातील राष्ट्रांमध्ये प्रथम स्थान दिले आहे.       
(संदर्भग्रंथ सूची – भारतस्य विज्ञानपरम्परा – संस्कृतभारती, देहली, आयुर्वेदीय रसशास्त्र – डॉ. सिध्दिनन्दन मिश्र, सायन्स अँड सोसायटी इन एन्शन्ट इंडिया – देबीप्रसाद चट्टोपाध्याय, प्राचीन भारतीय भौतिक विज्ञान – श्री. भि. वेलणकर, सायन्स अँण्ड टेक्नॉलॉजी इन  एन्शन्ट इंडिया – विज्ञान भारती, मुंबई)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा