बालगीतांपासून बा. भ. बोरकर, आरती प्रभू यांच्या रचना आपल्या संगीतात गुंफणारे संगीतकार आणि भोवतालची माणसं, घटना यांबद्दल अनावर औत्सुक्य असणाऱ्या सलील कुलकर्णी यांचं त्यासंदर्भात ‘व्यक्त’ होणारं पाक्षिक सदर..
बाळूच्या ऑफिसमध्ये आज गडबड आहे. त्याच्या साहेबांचा आज ऑफिसचा शेवटचा दिवस आहे. lok02साहेब खूप मनमिळाऊ आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना खूऽऽप दु:ख असूनही ते हसतमुख असतात. शिवाय शेवटच्या दिवशी ऑफिस झाल्यावर त्यांनी संपूर्ण स्टाफला घरी जेवायला बोलावलंय म्हणून बाळू नेहमीपेक्षा पॉश कपडे घालून, घरून डबा न घेता आला आहे. बाळू खुशीत आहे.. म्हणजे आज जिन्यातच चतुर बंडू भेटला त्याला आणि म्हणाला की, ‘खुशीत दिसते आहे स्वारी..’ त्यामुळे बाळूला समजलं की, तो स्वत: खुशीत असणारच.
चतुर बंडू खूप सॉलिड बोलतो.. म्हणजे ‘कडूक पंच’ असं म्हणतो. ते बाळू घरी जाऊन म्हातारी आई, अशिक्षित बायको आणि तिसरीतल्या मुलासमोर म्हणतो. चतुर बंडू नेहमी राजकारण, रस्त्यावरची रहदारी आणि खड्डे, माणसांनी कसं मस्त राहावं, आयुष्य म्हणजे साला गॅम्बल आहे, प्रत्येक माणूस स्वार्थी असतो.. शेतकरी, क्रिकेट, सौंदर्यप्रसाधनं असं चौफेर बोलत राहतो. बाळू तीच वाक्यं स्वत:ची असल्यासारखी नातेवाईक, चाळीतले मित्र आणि बायको यांच्यासमोर फेकतो.
आपले नवीन साहेब हीरोटाइप असले तरी त्यांना खूप प्रॉब्लेम्स असणार, हे चतुर बंडूनं पहिल्याच दिवशी बाळू आणि बबडूला सांगितलं. बाळू नेहमीप्रमाणे अवाक् झाला. आणि उद्धट बबडू म्हणाला, ‘नुसती परीक्षा पास होऊन कमिश्नर झालेला दिसतोय हा. निर्णय घेताना टेबलखाली लपेल हा..’ बाळू यावरसुद्धा अवाक्.. ‘काय डायरेक्ट बोलतो हा उद्धट बबडू!!’
साहेब रुजू झाल्यावर दोन-तीन महिन्यांत सगळे कुजबुजायला लागले- साहेबांची बायको म्हणे अंथरुणाला खिळलेली आहे. मुलगा व्यसनी आणि मुलगी लफडेबाज आहे त्यांची.
बाळूला कळत नव्हतं की, याचं आपल्याला नक्की काय वाटायला हवं? चतुर बंडू म्हणाला, ‘मला त्यांच्या डोळ्यातच व्यथा दिसली.’ उद्धट बबडू म्हणाला, ‘देव बघत असतो. आता एवढा पैसा.. पैसा करीत येडा होणार हा साहेब. देवानं कशी पाचर मारून ठेवलीये..’
बाळू उद्धट बोलत नाही. पण उद्धट बबडू उद्धट बोलतो तेव्हा बाळूचा श्वास जोरात चालतो. त्याला आवडतं असं तो म्हणत नाही; पण मनात उद्धट, वाईट, दुष्ट, असूयेची भावना आलीच तर तो दुसरा ती भावना व्यक्त करेपर्यंत थांबतो. या साऱ्याचा विचार मनात येतोच; पण तो कुठं कोणाला ऐकू येतो? ऐकू येतं ते बोलणंच. नावडती व्यक्ती किंवा बाळूला जे मिळायला हवं होतं ते ज्याला मिळालं ती व्यक्ती- यांच्याविषयी चतुर बंडू तर्कशुद्ध पद्धतीनं किंवा बबडू उद्धट पद्धतीनं टीका करतात, त्यांची निंदा करतात, त्यांना उगाचच शिव्या देतात तेव्हा बाळूला वेगळंच ‘छान’ वाटतं. पण तरीही तो म्हणतो, ‘सोडा रे, आपण बरं, आपलं काम बरं.’
ऑफिसमध्ये तिशीतही अविवाहित असणारी आणि बबडू जिला साहेबाची ‘खास’ म्हणतो अशी मुक्ता नेमकी बाळूच्या बसमध्येच असते. ती त्याच्या बायकोची लांबची बहीण आहे आणि घरच्या जबाबदाऱ्यांमुळे अविवाहित आहे, हे मनात असूनही धूर्त समाजप्रतिनिधी बंडू आणि आक्रमक समाजघटक बबडू यांच्यासमोर बाळू तिला ओळख देत नाही. शिवाय ‘नातीगोती घरी.. ऑफिसमध्ये काम’ हे चतुर बंडूचं वाक्य त्यानं नातेवाईकांमध्ये चिकटवलं.
ऑफिस संपवून फ्रेश होताना उद्धट बबडू म्हणाला, ‘कशाला घरी बोलवलंय या हीरोनी- त्याची ट्रॅजेडी दाखवायला का?’ चतुर बंडू म्हणाला, ‘ज्याचे त्याचे भोग असतात. आपली पोस्ट क्लार्कची; पण घरी बघ किती सुखं नांदतायत.’ बाळू म्हणाला, ‘साहेबांकडे स्नॅक्स असतील की जेवण? घरी मी जेवून येतो सांगितलंय.’ ‘मुक्ता आज सॉलिड माल दिसतीये,’ बबडू बंडूला म्हणाला.
साहेबांच्या घरी दार उघडायला ज्या प्रसन्न दिसणाऱ्या बाई आल्या, त्यांची ‘ही माझी मिसेस..’ अशी ओळख झाल्यावर सगळ्यांच्या घशात अडकलेला ठसका- त्यांचा नुकताच डॉक्टर झालेला सद्गुणी मुलगा आणि आर्किटेक्ट झालेली आज्ञाधारक, शालीन मुलगी पाहून घशातच विरला. सगळे स्थानापन्न झाले आणि साहेबांनी शांत आवाजात सुरुवात केली.. ‘आज माझा ऑफिसमधला शेवटचा दिवस.. तेव्हा सुरुवातीला तुमच्याशी खोटं बोलल्याबद्दल मला क्षमा करा. पण स्वत:शी कबूल करा, की जर मी तुम्हाला असं सांगितलं असतं की, माझ्या घरी अगदी परफेक्ट चित्र आहे. बायको, मुलं सगळं उत्तम आहे, तर तुम्ही.. ‘च्यायला, सगळंच दिलं देवानं!’ असं म्हणून माझ्याविषयी, माझ्या कुटुंबाविषयी वाईट बोलण्यासाठी काहीतरी शोधून काढलं असतं, खोटं रचलं असतं. पण मी जेव्हा सांगितलं की, माझी बायको अंथरुणाला खिळलेली आहे. मुलगा-मुलगी हाताबाहेर गेले आहेत, तेव्हा अनेकांच्या डोळ्यांत मला गणित सुटल्यासारखा आनंद दिसला. दुसऱ्याच्या भरभराटीपेक्षा आपल्याला त्याची दु:खं, अडचणी ऐकायला मनापासून आवडतं. मग त्याला सल्ले द्यावेसे वाटतात. अगदी त्याचीच दु:खं त्यालाच पुन:पुन्हा सांगून, ‘कसा असा देव निष्ठुर आहे!’ वगैरे तत्त्वज्ञान सांगत तो मनुष्य रडला की त्याला आपला खांदा द्यायला आवडतो. तुम्ही कुणीच दुष्ट नाही, वाईट नाही. पण आपल्याला सगळ्यांनाच सारखं समाधान करून घ्यायचं असतं की, आपल्यासारखाच तो पण कठीण परिस्थितीत आहे. अगदी शाळेतसुद्धा निबंधाची वही चुकून घरी विसरलेल्या मुलाला दुसरा वही घरी विसरलेला मुलगाच जवळचा वाटतो. गाडीतून जाताना आपलं डोकं दुखायला लागलं की इतरांकडून ‘माझंही दुखतंय..’ ‘माझंही..’ ‘माझंसुद्धा’ असं ऐकलं की आपल्याला समाधान वाटतं.’
‘कुणाही प्रतिभावंतांनं काही मिळवलं, काही घडवलं की ‘सध्या नशीब जोरात आहे तुझं!,’ असं म्हणून सगळं श्रेय नशिबाला देऊन त्याच्या प्रयत्नांना, गुणांना खाली खेचून आपण स्वत:च्या पातळीवर आणतो. आपण किंवा आपलं काम ज्या क्षेत्रात लोकप्रिय होऊ शकलं नाही तिथं ‘लोकांना आजकाल फालतूच आवडतं..’ असं म्हणायचं. आपल्याभोवती गर्दी जमली नाही की जिथं गर्दी जमते ते सवंग, उथळ ठरवतो. जीव देण्यापेक्षाही आपल्याला अवघड वाटतं ते दुसऱ्याला श्रेय देणं. एखाद्या कमी उजेड असलेल्या ठिकाणी बसून विशिष्ट पेय पिताना तर आपण एका क्षणात- एखाद्या दिग्गजापेक्षा त्या धाब्यावर गाणारा माणूससुद्धा चांगला गातो, असं म्हणून आपल्या मताची पिंक टाकतो ते त्याच्यावर टीका करायला नाही, तर स्वत:चं अपयशी, सपाट आयुष्य लपवत आपल्या कुरूपतेचा आळ आरशावर टाकून एखाद्या यशस्वी माणसाला खेचून स्वत:च्या सामान्य पातळीवर आणण्यासाठी.’
‘मी माझ्या अडचणी, पालक म्हणून मी कसा अयशस्वी आहे, हे तुम्हाला खोटंच सांगितलं. कारण तुम्हाला ते ऐकायला आवडलं. आणि मग तुम्हाला मी ऑफिसमध्ये केलेल्या कामापेक्षा माझ्याविषयी, माझ्या अपयशाबद्दल बोलून शांत झोप लागली.’
‘यश-अपयशापलीकडे मन रमवण्यासाठी इतक्या सुंदर, शुभंकर गोष्टी या जगात असताना आपण शोधत बसतो ते न्यूनच. प्रचंड बुद्धिमत्ता असलेला शास्त्रज्ञ एखाद्या पार्टीत दारू प्यायल्याची गोष्ट आपल्याला वारंवार सांगायला आवडते, कारण शास्त्र, विज्ञान हे आपल्याला झेपत नाही. कविता समजण्याइतकी संवेदनशीलता नसल्यामुळे चर्चा करावीशी वाटते ती कवीच्या एखाद्या उद्धट वाक्याची.’
‘आज माझा या ऑफिसमधला शेवटचा दिवस. आता नवीन कमिश्नर येतील, त्यांना तुम्ही सांगाल.. आधीचे साहेब खोटारडे होते.’
स्टाफपैकी कुणीच कुणाकडे पाहत नव्हतं. सगळे गप्प. काहीजण अंतर्मुख झाल्याचा अभिनय करत होते.. तर काही गंभीर झाल्याचा.
चतुर बंडू खट्टू झाला.. माझ्यासारख्याचा अंदाज चुकला..? उद्धट बबडूची सटकलीच.. च्यायला फसवलं!
बाळू नेहमीप्रमाणे अवाक्.. कमाल्ये!!!   
-सलील कुलकर्णी                     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा