नव्या भाषेबरोबर आपल्या ज्ञानाच्या कक्षा, क्षितीज व्यापक होत जाते. आपण नवीन भाषा शिकतो तेव्हा केवळ शब्द आणि व्याकरणच नाही, तर त्या भाषेच्या नजरेतून जगाकडे.. आणि मुख्य म्हणजे दुसऱ्याच्या नजरेतून स्वत:कडेही बघायला शिकतो. त्यातून आपल्याला दिसणाऱ्या जगाची परिमिती आणि आपले परिप्रेक्ष्य बदलते. यातून माणसे अधिक परिपक्व आणि समृद्ध होत जातात.
आ
पल्याला जसे हात-पाय, नाक-डोळे असतात तशी आपली एक भाषाही असते-अगदी बालवयापासून. प्रथम भाषा आपण विनासायास शिकतो, म्हणून तिचे महत्त्व आपल्याला वाटत नाही. जरा दूर उभे राहून तिच्याकडे आपण कधी तटस्थपणे बघत नाही, तिचे निरीक्षण करत नाही. भाषा येणे आणि भाषेचा प्रभावी वापर करणे यातला फरक लक्षात घेणे आवश्यक आहे.
भाषा म्हणजे शब्द आणि व्याकरण याच्यापलीकडे बरंच काही- किंबहुना शब्दाच्या पलीकडचे शब्दांत बांधण्याचा, मांडण्याचा प्रयत्न म्हणजेच भाषा. भाषेची व्याप्ती म्हणजे आपल्या आयुष्याची व्याप्ती. जरा विचार करून बघा की, आपल्या आयुष्यातला एक तरी भाग, एक तरी अंश असा आहे का, की जो आपल्याला भाषेपासून वेगळा करता येईल किंवा निभाषिक करता येईल? जे आहे ते आपण शब्दांत व्यक्त करतोच, पण जे नाही तेही आपण शब्दांत व्यक्त करतो. आपल्या कल्पनेतले, स्वप्नातले जग, कादंबरीतले विश्व, विज्ञानकथांमधले काल्पनिक विश्व हेही तर आपण भाषेतच व्यक्त करतो. किंबहुना एखाद्या गोष्टीला शब्दरूप दिल्यानेच ती अस्तित्वात येते. जोपर्यंत ती शब्दात व्यक्त होत नाही तोपर्यंत ती गोष्ट आपल्या ध्यानीमनी, आपल्या कल्पनाविश्वातही नसतेच. परिकथेतली परी ही परी या शब्दातूनच अस्तित्वात येते. ती प्रत्यक्षात आहे की, ती जड स्वरूपात दिसेल का, असे प्रश्न आपल्याला पडत नाहीत. आपल्याला अभिव्यक्तीसाठी योग्य पर्याय सापडला नाही तर आश्चर्याने किंवा धक्क्य़ाने आपण ‘अवाक्’ होतो, नि:शब्द होतो. हेही आपण शब्दातच व्यक्त करतो! नि:शब्द अवस्था ही ‘नि:शब्द’ या शब्दातूनच व्यक्त होते. आपण म्हणतो, की देव विश्व व्यापून दशांगुळ उरला आहे. हेच आपल्याला भाषेविषयीही म्हणता येईल. आपण ओमकारातून, म्हणजे ध्वनीतून विश्वनिर्मिती झाली, असे मानतो. बायबलची सुरुवातही ‘सर्वप्रथम होता शब्द’, त्यातून विश्वनिर्मिती झाली अशीच आहे. ध्वनी आणि ध्वनीतून निर्माण झालेला शब्द हे तर भाषेचे मूळ घटक आहेत.
भाषाक्षमता माणसाला जन्मत:, उपजत मिळालेली असली तरी सगळ्या भाषा मानवनिर्मित आहेत. प्रत्येक भाषासमाज आपला सभोवताल आपल्या दृष्टिकोनातून शब्दांकित करत असतो. प्रत्येक भाषासमाजाच्या आपल्या संकल्पना असतात. सभोवतालच्या जगाचे आपल्या नजरेतून तुकडे किंवा भाग करून एकेका भागासाठी जो तो भाषासमाज आपल्या संदर्भात शब्दाची निर्मिती आणि नियोजन करतो.
आपण ‘बर्फ’ हा शब्द ‘आइस’ किंवा ‘स्नो’ या दोन्ही अर्थानी वापरतो तर इंग्रजीत ‘राइस’ हा शब्द ‘तांदूळ’ आणि ‘शिजलेला भात’ दोन्हीसाठी वापरतात. त्या त्या समाजात सभोवतालच्या संदर्भाप्रमाणे बारकावे जाणवतात आणि रोजच्या आयुष्यात या फरकाचे महत्त्व वाटल्याने प्रत्येक वेगळ्या घटकाला वेगळे नाव दिले जाते. असे म्हणतात की, एस्किमो भाषेत बर्फाचे वेगळे प्रकार दाखवणारे अनेक शब्द आहेत. आता रंगाचे आणि विविध रंगछटांचेच बघा ना. प्रत्येक भाषेत प्रत्येक रंगछटेला शब्द असलेच, असे नाही. एखाद्या विशिष्ट रंगछटेचे वेगळेपण आणि महत्त्व जाणवले तरच त्या छटेला वेगळे नाव दिले जाईल. उदा. चिंतामणी, मोरपंखी, पोपटी असे रंग वेगळे ओळखता येतात. त्यात निळ्या-पिवळ्या रंगाच्या मिश्रणाचे प्रमाण वेगळे असते. पण आपल्या भाषेत सीग्रीन किंवा बज या रंगासाठी वेगळा शब्द योजलेला नाही. बजसाठी आपण पिवळसर रंग म्हणालो तरी त्याची बरोबर कल्पना येत नाही. पिवळट म्हटलं तरी त्याचा अर्थ जरा वाईटाकडे झुकतो. आपल्या मनात संदर्भ ‘पिवळट पडलेला’ असा असतो. नारिंगी, शेंदरी, केशरी, भगवा हे शब्द जवळजवळच्या रंगछटा दाखवणारे असले तरी आपण ते विशिष्ट संदर्भातच वापरतो. भगवा भात आणि केशरी झेंडा असे या शब्दाचे उपयोजन करता येत नाही. आपण एखाद्याला ‘तो अगदी गाढव आहे’ असे म्हणू शकतो. पण ‘तो अगदी बावळट, मूर्ख, गाय आहे’ असे म्हणू का? ही संकल्पना आपल्या समाजात अशक्य वाटते.
प्रत्येक भाषेतल्या भौगोलिक, ऐतिहासिक, धार्मिक, राजकीय, सामाजिक तत्त्वज्ञानाचे राजकीय विचारप्रणाली आणि वैचारिक वादाचे संदर्भ असतात.
आपल्या समाजात, वाङ्मयात, दैनंदिन जीवनात सूर्य, ऊन, पाऊस यांना असलेले स्थान हे युरोपातल्यापेक्षा वेगळे आहे. भाषेत त्याचे वारंवार प्रतिबिंब दिसते. पाऊस आणि पावसाळा हा आपल्याकडे अनेक वाक्यप्रचारात, कविता, गोष्टी, सिनेमामध्ये प्रेमिकांच्या प्रणयासाठी एक पोषक वातावरण निर्माण करतो. पावसात विरहाचे दु:ख तीव्र होते. ढगाला, चंद्राला प्रेमिकांचे दूत म्हणून काम करावे लागते. ही परंपरा कालिदासापासून आजतागायत चालू आहे. आपण प्रेमात न्हाऊन निघतो, आनंदात चिंब भिजतो, आपल्यावर स्तुतीचा वर्षांव होतो. पण युरोपमधील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेतली तर पावसाला प्रेम, आनंद, प्रणयोत्सुकता असे संदर्भ निर्माण होऊ शकत नाहीत. एका कठीण परिस्थितीतून अतिशय त्रासदायक परिस्थितीत गेलो तर आपण म्हणतो ‘हे आगीतून फुफाटय़ात’ पडण्यासारखे आहे. जर्मनमध्ये अशा परिस्थितीत माणूस ‘पावसातून पन्हाळी’खाली जातो. जर्मन भाषेत एखाद्याचा गौरव करताना त्याला मध्यान्हीच्या उन्हात ‘झनिथ’वर स्थान मिळते, तर आपण एखाद्याला शिक्षा करताना त्याचे घर उन्हात बांधतो.
राजकीय इझम्स किंवा वेगवेगळे वाद किंवा विचारप्रणाली बघितल्या तर त्याचेही संदर्भ कसे बदलत गेले आहेत, हे लक्षात घेण्यासारखे आहे. राष्ट्र किंवा राष्ट्रवाद ही युरोपात रुजलेली, वाढलेली संकल्पना आणि आपल्याकडे वापरली जाणारी संकल्पना फार वेगळी आहे. तिचे राजकीय संदर्भात आणि जनमानसात असलेले स्थानही फार वेगळे आहे. एकोणिसाव्या शतकात युरोपमध्ये राष्ट्रवाद निर्माण झाला आणि त्याचा नाझींनी जो अतिरेक केला, त्याचा परिपाक दुसऱ्या महायुद्धात झाला. त्यामुळे राष्ट्रवाद, देशभक्ती हे शब्द तिथे आता खूप कमी वापरले जातात आणि अभिमान वाटावा असा सकारात्मक संदर्भ त्यांना नसतो.
आता काही भाषावैज्ञानिकांचे निरीक्षण बघू. भाषाशास्त्रज्ञाच्या मते एकाच भाषेत तंतोतंत समानार्थी शब्द नसतात आणि दोन वेगळ्या भाषांमध्ये तंतोतंत जुळणारे शब्द नसतात. याचे कारण म्हणजे प्रत्येक शब्दाच्या अर्थाचा आवाका, त्याचा वापर आणि त्याच्या उपयोगात अनस्युत असलेले संदर्भ एकच नसतात. म्हणून म्हटले जाते की प्रत्येक भाषा आपल्या नजरेतून दिसणारा सभोवताल आणि आपले म्हणून एक सत्य अभिव्यक्त करत असते. म्हणून भाषावैज्ञानिकांनी असे म्हटले आहे की प्रत्येक भाषेला आपल्या मर्यादा असतात. त्याचप्रमाणे ज्या एका भाषेच्या कक्षा असतात, त्यात ती भाषा वापरणाऱ्या माणसाच्याही कक्षा असतात. म्हणूनच नव्या भाषेबरोबर आपल्या ज्ञानाच्या कक्षा, क्षितीज व्यापक होत जाते. आपण नवीन भाषा शिकतो तेव्हा केवळ शब्द आणि व्याकरणच नाही तर त्या भाषेच्या नजरेतून जगाकडे आणि मुख्य म्हणजे दुसऱ्याच्या नजरेतून स्वत:कडेही बघायला शिकतो. त्यातून आपल्याला दिसणाऱ्या जगाची परिमिती आणि आपले परिप्रेक्ष्य बदलते. यातून माणसे अधिक परिपक्व आणि समृद्ध होत जातात.
भाषेची व्याप्ती
नव्या भाषेबरोबर आपल्या ज्ञानाच्या कक्षा, क्षितीज व्यापक होत जाते. आपण नवीन भाषा शिकतो तेव्हा केवळ शब्द आणि व्याकरणच नाही, तर त्या भाषेच्या नजरेतून जगाकडे.. आणि मुख्य म्हणजे दुसऱ्याच्या नजरेतून स्वत:कडेही बघायला शिकतो.
आणखी वाचा
First published on: 24-11-2013 at 12:07 IST
मराठीतील सर्व मायबोली बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scope of the language