अरुंधती देवस्थळे arundhati.deosthale@gmail.com
अलबेर्तो ज्योकोमीटींच्या मनुष्यकृतींचा मोह आवरू शकलेलं जगातलं एकही कला संग्रहालय नसावं. विशेष म्हणजे, शिल्पांमध्ये लौकिकार्थानं सुंदर असं काही नाही. पृष्ठभाग आणि आकार ओबडधोबडच वाटणारे आणि तरीही त्यांचं आकर्षण वाटतं. ती ओळखीची वाटतात आणि अनोळखीही! शिल्पात नेमकं अस्वस्थ करणारं काय असतं हे नाही लक्षात येत, पण काहीतरी नक्की असतं की ज्यामुळे मनातली खळबळ आपल्याला जाणवते.
आयुष्याच्या अस्तित्ववादाच्या जाळय़ात अलगद सापडलेली आणि त्यामुळे आतून बेचैन असलेली माणसं.. पुरुष आणि स्त्रिया हा त्यांच्या अनेक विख्यात चित्रांचा, शिल्पांचा विषय. निर्मिलेल्या कृतींमधून निराकार सत्याचा शोध घेताना, ‘नेति नेति’ म्हणत इतरांना सुंदर दिसणारे काम, स्वत:ला हवं ते न गवसल्याने, निर्ममतेने मोडून टाकत परत नव्याने शिल्प घडवणारे, असे अनेक दिवस आणि प्रयत्न उलटल्यावर शेवटी एकावर थांबणारे आणि ‘हे मला अभिप्रेत आहे ते नाही, पण त्याच्या जवळपास पोहोचणारं आहे,’ म्हणणारे ज्योकोमीटी! म्हणूनच एका प्रदर्शनानंतर दुसरं भरण्यामध्ये १५ वर्ष जात; आणि ज्यासाठी ते तयार होत ते आर्थिक गरजांसाठी! प्रदर्शन पाहणाऱ्या जाणकारांना त्यांचं काम थोर वाटे आणि शिल्पकाराच्या परिश्रमांचा, स्वत:शी मांडलेल्या छळाचा अंदाजही येई. अलबेर्तो ज्योकोमीटींच्या कलेवर घनिष्ट मित्र सात्र्नी लिहिलेल्या ‘ The Quest For the Absolute’’ या आस्वादात्मक निबंधातलं एक निरीक्षण : ‘‘याच्या (ज्योकोमीटी) संवेदनशीलतेने चेहरे आणि हावभावांची जादू हाताळणारं माझ्या तरी पाहण्यात कोणी नाही. त्यांच्याकडे तो एका उत्कट इच्छेने बघत असतो, जणू काही स्वत: कोणा परक्या जगातून आल्यासारखा! पण कधीकधी हा संघर्ष त्याला पार भंजाळून टाकतो आणि तो या त्याच्या बांधवांना गर्तेत ढकलून टाकावं म्हणतो. पण एखादी दरड कोसळून दगडधोंडे गडगडत यावे तसे ते आंधळय़ा झुंडीने अंगावर चालून येताहेत असं त्याला वाटायला लागतं. म्हणून त्याचं प्रत्येक ऑब्सेशन एक कलाकृती बनलंय, एक प्रयोग ठरलाय, स्पेस अनुभवण्याचा मार्ग मिळालाय.’’
कलेचा तीन पिढय़ांचा वारसा रक्तात घेऊन जन्मलेल्या शिल्पकार अलबेर्तो ज्योकोमीटीची (१९०१-६६ ) बातच निराळी. त्याचं बालपण रम्य स्वीस- इटालिअन सीमेजवळच्या गावात गेलं होतं. आजोबा फॉव्हिस्ट शैलीतले चित्रकार, तर वडील जिओव्हानो ज्योकोमीटी पोस्ट- इम्प्रेशनिस्ट चित्रकारांमधलं मोठं नाव. बाप- लेकांत कला, लाकडावर कोरीव काम यावर संवाद होत. त्यांच्याकडूनच अलबेर्तो एनग्रेिव्हग, अॅक्वाटिंट आणि लिथोग्राफी शिकला. पण हे त्याचे माध्यम गवसण्यापूर्वीचे दिवस होते. शिल्पं करण्याआधी काही खेळ आणि खेळणी बनवली. एक भाऊ आर्किटेक्ट, तर दुसरा डिझायनर. अलबेर्तोच्या शिल्पांसाठी मॉडेलही हाच- भरतभावाने कायम साथ निभावणारा. वयाच्या बाराव्या वर्षी अलबेर्तोचं एक तैलचित्र बोर्गोनोवोच्या प्रदर्शनात मांडलं गेलं होतं. कर्मभूमी मात्र कलेची राजधानी- पॅरिसच ठरणार होती. पॅरिसला जाऊनही त्यांची मायदेशाबद्दलची आत्मियता कमी झाली नाही. दरवर्षी कुटुंबाबरोबर राहायला ते घरी येत. दुसऱ्या महायुद्धादरम्यान ते जेनेव्हाला येऊन राहिले होते. या काळातली त्यांची शिल्पं अडीच-पावणेतीन इंची- शिल्पकारापासूनचं अंतर दर्शवणारी! पुढे ती उंच होत गेली, इतकी की ‘ग्रां फेम्मा’ मालिकेतील चार स्त्रिया (ब्रॉन्झ विथ डार्क ब्राऊन पॅटीना) नऊ फुटाच्या आसपास जाऊन पोहोचतात. ज्योकोमीटींची ‘बॅलेरिना’ मालिका म्हणजे अतीव सुंदर नृत्यकलेला शिल्पकलेने केलेलं डौलदार अभिवादन आहे.
ज्योकोमीटींच्या व्यावसायिक चित्र आणि शिल्पकलेची सुरुवात पॅरिसमध्ये सरिअॅलिझम आणि क्युबिस्ट परंपरेचे पाईक आंद्रे ब्रेतोंच्या ग्रुपच्या प्रभावाखाली झाली. त्यांनी त्या शैलीत काही चित्रं आणि शिल्पं केलीही, पण अमुक एका शैलीशी बांधून घेणं त्यांना जमलं नाही. मार्ग स्वत:च शोधायचा होता, त्यासाठी जिवंत मॉडेल्स घेऊन ते काम करू लागले. हे अमूर्त, निखळ आठवणीतून यथार्थाकडे बघणाऱ्या सरिअॅलिस्टिक कलाकारांना शैलीच्या तत्त्वांची तोडमोड करणारं वाटलं म्हणून त्यांनी ज्योकोमीटींना या मंडळातून काढून टाकलं. पण ज्योकोमीटींच्या मनात व्यामिश्र अनुभूती, लैंगिकता आणि मानसिक धक्क्यांचा होणारा परिणाम यांसारखे सरिअॅलिस्टिक विषय आणि आकार घोळतच होते- जे आदिमतेशी नातं सांगणाऱ्या शैलीतून शिल्पांमध्ये उतरत गेले. कुमारवयात पाहिलेल्या पहिल्या आणि जाणतेपणी पाहिलेल्या दुसऱ्या महायुद्धाचा परिणाम त्यांच्यावर झाला होता. याच टप्प्यावर त्यांची लंबगोलाकृती कोऱ्या चेहऱ्याची माणसांची मालिका सुरू झाली. ब्रॉन्झमधली शिल्पं, चिकण माती किंवा प्लास्टरचे पूर्वाकार बनवून केलेली ज्योकोमीटींची शिल्पं बघितल्यास माणसाचं डोकं हे कायम येत राहणारं मोटिफ.. लांब काटकुळे हात- पाय, मान, जगायपुरतं स्त्रीत्वमात्र दर्शवणारं मांस अंगावर. ज्यॉ पॉल सार्त् म्हणत, ‘‘ही माणसं एकटय़ा पडलेल्या झाडांसारखी वाटतात. हिवाळय़ात पानं गळून पडल्यावर दिसतात तशी उघडीबोडकी.’’ डोळय़ात न मावणारं कोरेपण. खूप काही माहीत झाल्याने, भ्रमच नाही तर भ्रमनिरास कुठला!
‘व्हेनिस वीमेन’ ही ज्योकोमीटींची १९५०च्या दशकातली मालिका. शिडशिडीत देहयष्टी, पिवळसर केस लटकलेले.. मूक आव्हान देत समोर बघत असणारे डोळे. नजर एकाच क्षणी अस्वस्थ करत काहीतरी सांगू पाहणारी आणि सगळं संपल्यासारखी मेलेली. त्यांच्यात एक गूढ आकर्षण आहे, नजर परत-परत वळत राहते, आणखी काही कळतंय का हे शोधत राहते. या शिल्पांच्या मॉडेल्स वेश्या होत्या असं बोललं जातं. तिथूनच भावशून्यताआली असावी. आपल्या युगाची व्याख्या करणाऱ्या नव्या आणि जुन्या मानवाच्या शिल्पांसाठी ज्योकोमीटींना १९६२ च्या व्हेनिस बिनालेमध्ये सन्मानित केलं गेलं होतं. कलेच्या माध्यमातून माणसाचं अस्सलपण आणि त्याच्या अस्तित्वाचा जगाशी असलेला संबंध शोधत असलेल्या या शिल्पकारानं मनुष्यजातीची घडवलेली शिल्पं कालजयी आहेत असं निवड समितीचं मत होतं.
‘वॉकिंग मेन’ ही ज्योकोमीटींची सगळय़ात प्रसिद्ध ब्रॉन्झ शिल्प मालिका. सहा फुटी पुरुष, उंच काटकुळे देह, लांबलचक हात- पाय, असून नसल्यासारखे चेहरे, लांब माना, जगण्यातलं कोरडेपण, आयुष्याच्या आव्हानांपुढे मानवी इच्छेचं अपुरेपण आणि मनाच्या दाटून राहिलेल्या अनामिक अस्वस्थपणाने होणारी हालचाल. संवाद नाकारणारी, कुठेही न बघणारी नजर. कधी शांत उभा असला तरी आतून अशांत, तर कधी कुठल्यातरी तणावाखाली पावलं टाकत निघालेला, देहबोलीतून मानवी जीवनाला ग्रासून राहिलेला तणाव साकार करणं हे ज्योकोमीटींचं अद्भूत कौशल्य!
ज्योकोमीटींचा कल चिंतकाचा. दुसऱ्या महायुद्धाआधी आणि नंतर मनुष्य जीवन आणि अस्तित्ववादाबद्दल होणाऱ्या विचारमंथनाचा खोल परिणाम त्यांच्या साऱ्याच अभिव्यक्तीत दिसतो- विशेषत: फिगरेटिव्ह शिल्पांमध्ये. या दरम्यान ते मासिकं, वृत्तपत्रं यांसारख्या माध्यमांतून खूप लेखनही करत. स्वत:च्या कामाच्या अतिचिकित्सेमुळे त्यांना असुरक्षित वाटे. चित्रं असोत वा शिल्पं, ते पुन्हा- पुन्हा त्यावर काम करत, तपशील गाळत किंवा बदलत जात. न्यू-यॉर्कच्या गुगेनहाईम म्युझियममध्ये असलेल्या ‘हेड’ या शिल्पाखाली ज्योकोमीटींचं एक सुंदर विधान आहे, बहुतेक सर्वच कलाकारांचा अनुभव व्यक्त करणारं- ‘‘मी हे हेड बनवण्याच्या जितका जवळ येतो, तितकं ते हातून निसटतं आणि आमच्यातलं अंतर वाढतं. मग ते मला त्याच्या जवळ, आणखी जवळ जायचा प्रयत्न करायला बाध्य करतं. जर कोणी हजारेक वर्ष माझ्यासाठी मॉडेल म्हणून बसून राहिला ना, तरी मी त्याला हेच सांगेन, नाहीच जमत आहे मनासारखं, पण मी पावला-पावलाने जवळपास मात्र येतोय त्याच्या.’’ चित्रं मोनोक्रोमॅटिक असतं. एकावेळी एकच पिगमेंट (रंगद्रव्य) घेऊनच काम होई. चित्रांमधली त्यांची रेघ अस्थिर, तुटक, जणू काही आपल्या मनात उडालेला गोंधळ कागदावर बोलून दाखवणारी, नक्की खरं काय, नेमकं काय हवंय आपल्याला हे स्वत:लाच विचारत असल्यासारखी, तर कधी हे काही खरं नव्हे हे कंपनातून सांगणारी तळमळ अति अंतरात!’’
ज्योकोमीटींचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, त्यांनी स्वत:साठी सुरुवातीला जो एक छोटासा स्टुडिओ घेतला होता तोच ते नंतरची चाळीसेक वर्ष वापरत राहिले. इमारतीच्या गचपणात जेमतेम बसवल्यासारखा स्टुडिओ म्हणजे पॅरिसच्या साधारणशा कानाकोपऱ्यातला ४६ रु दी हिप्पोलीते. इथे नियमितपणे येणाऱ्यांमध्ये कादंबरीकार सॅम्युएल बेकेट, सात्र्, मतीस, अभिनेत्री मर्लिन डायट्रीच, रेन्वासारखे मित्र. हयातीतच भरपूर यश मिळालं, एखादा सुंदरसा, प्रशस्त स्टुडिओ घेणं सहज शक्य होतं, पण त्यांनी ते केलं नाही. ते म्हणत, ‘‘मला आरामशीरपणाच्या तुरुंगात स्वत:ला डांबून नाही ठेवायचं.’’ हा लोकांना अस्ताव्यस्त वाटणारा स्टुडिओच त्यांचा कोश बनला होता. फक्त अत्यावश्यक गरजांना पुरेशी जागा त्यांना स्वत:साठी हवी होती. काम करताना हातात सिगरेट, हात चालवता- चालवता ती वेडीवाकडी होई, कुठे भोकं, तर कुठे राख पडलेली. इथल्या पलंगाखाली ते सगळी कमाई ठेवत असत, अनेकदा पैशांची चोरीही होई. स्टुडिओत एकच खुर्ची. मॉडेल किंवा भेटायला येणारे कोणीही असो. स्टुडिओ आता विकला गेला आहे, पण भिंतींवर ज्योकोमीटींची चित्रं, तांब्यावरली एचिंग्ज अजूनही पाहता येतात. नव्या- मूळचा फ्रेंच नसलेल्या मालकाला चित्रांची जाण असावी.
ज्योकोमीटींनी चित्रं आणि शिल्पांपुरतीच आपली कला मर्यादित ठेवली नाही, तर त्यांना नवनवे प्रयोग करायला आवडत. त्यांनी शोभेच्या कलावस्तू, भित्तिचित्रं, फुलदाण्या, लॅम्पशेड्स, आभूषणंही डिझाईन केली. या कलात्मक वस्तूंना वोग आणि हार्पर बझारसारख्या फॅशन हाऊसेसनी मान दिला होता. डेन्मार्कमध्ये त्यांच्या चित्रं आणि शिल्पांचा मोठा संग्रह आहे. टेट मॉडर्नमध्ये ज्योकोमीटींच्या सुरुवातीपासूनच्या कलाप्रवासाचं एक दालन आहे. ज्योकोमीटींच्या सन्मानार्थ, स्वित्झर्लंडच्या सरकारने तर १०० फ्रॅंक्सच्या नोटेवर त्यांचा आणि त्यांच्या ‘वॉकिंग मॅन’ मालिकेतील शिल्पाचा फोटो छापला आहे. ज्योकोमीटींच्या मिनीमालिस्टिक शिल्पांची ओढ वेगळीच आहे. आज इतक्या वर्षांनी मानवी अस्तित्वाला वेढून राहिलेली नि:शब्द अस्वस्थता पाहणाऱ्याच्या मनाची तार छेडते हे विशेष आहे. काळ, संस्कृती वा भौगोलिक सीमा अनायासच गळून पडतात त्या अशा!